उर्मी चंदा

आंतरधर्मीय विवाहातील वैयक्तिक अनुभव आणि मिश्र संस्कृतीमध्ये मूल वाढवताना आलेले अनुभव आठवत असताना उर्मी चंदा  आपल्या आयुष्याबद्दलच्या  आतापर्यंत  न स्वीकारलेल्या सत्याला सामोरे जातात.

प्रस्तावना

हा  लेख  ‘पालकनीती’  ह्या पालकत्वाला वाहिलेल्या मासिकासाठी असल्यानं आणि मी पालकत्वाच्या आदर्श म्हणावं अशा कल्पनेपेक्षा फार दूर असल्याचं सुरुवातीलाच स्पष्ट करते. असं मी म्हणते याची पाच कारणं आहेत. एकतर, मी एक घटस्फोटिता आहे. सध्या एका लिव्ह-इन नात्यात आहे. एका 13 वर्षांच्या मुलाची आई आहे आणि माझा मुलगा माझ्यासोबत राहत नाही. हा माझा किशोरवयीन  मुलगा  कोणतंही औपचारिक शिक्षण घेत नाही, कारण त्याच्या बाबानं आणि मी त्याला शाळेत न घालताच शिकवायचं असं ठरवलंय. मी अंगावर अनेक ठिकाणी गोंदवून घेतलंय, टोचवूनही घेतलंय. गेल्या दहा वर्षांत मी बरेचदा माझं काम बदललंय. तर एकंदरीनं आदर्श पालकाची काहीही लक्षणं माझ्यात नाहीत… हो ना? पण मी माझी गोष्ट सांगायलाच हवी अशीही बरीच कारणं आहेत.

एक कारण म्हणजे मी सध्या ‘आंतरधर्मीय अभ्यास’ या विषयावर पीएचडीसाठी काम करतेय. एक कार्यकर्ता म्हणून आणि एक विद्यानिष्ठ या नात्यानंसुद्धा या विषयात मला खूप रस आहे आणि त्यात माझी खूप गुंतवणूक आहे. दुसरं म्हणजे, दहापेक्षा जास्त वर्षं मी आंतरधर्मीय विवाहात होते आणि तो विवाह बहुतेक सर्व निकषांवर चांगलाच ठरला होता. आम्ही एकत्र असण्याच्या काळात आम्हाला एक मूल झालं, त्याला आम्ही प्रेमानं आणि स्वतंत्र वातावरणात वाढवलं, त्याच्यात जिज्ञासू वृत्ती रुजावी म्हणून प्रयत्न केले. जेव्हा आमच्या आयुष्याचे मार्ग वेगवेगळ्या दिशेनं

जाऊ लागले, तेव्हा परस्पर संमतीनं आणि आदरानं घटस्फोट घेऊन आम्ही त्या नात्यातून बाहेर पडलो. (माझा

नवरा सॉफ्टवेअर व्यवसायाकडून लाकूडकामाकडे वळला आणि मी पत्रकारिता सोडून पूर्णवेळ विद्यार्थी झाले.) आमचा आंतरधर्मीय विवाह म्हणजे एका अर्थानं चाकोरीबाहेरचं आयुष्य कसं असतं याचं उदाहरणच होतं; त्यातूनच आम्हाला आमच्या असामान्य प्रश्नांवर सर्जनशील उपायही सापडले होते.

कथानकातील मुख्य पात्रं

माझा माजी नवरा रोमन कॅथॉलिक असून गोवन आणि मंगलोरी वातावरणात वाढलेला आहे. गोव्याचे कॅथॉलिक आणि मंगलोरचे कॅथॉलिक हे मूलतः वेगळे समजले जातात. असं असलं तरी त्याच्या वागण्यात किंवा त्यांच्या घरी अशा अशक्य मिश्रणाचा उद्रेक नव्हता. खरं  तर  माझा  नवरा  रोजच्या जगण्यावागण्यात मुळीच ख्रिस्ती नव्हता. त्यामुळे त्याची ख्रिस्ती अशी ओळख सांगणं कोणालाही कठीणच. त्याच्या हिंदू नावामुळे तर ते अजूनच कठीण होतं. त्यानं अगदी किशोरवयात चर्चमध्ये जाणं बंद केलं, कारण बायबलमधल्या काही सूचना त्याला पटत नसत. त्याचे आईवडील निस्सीम कॅथॉलिक असले, तरी त्यांनी आपल्या चारही मुलांवर काहीही लादलेलं नव्हतं.

मी आयुष्यभर महाराष्ट्रात राहिले असले आणि हीच माझी कर्मभूमी समजत असले, तरी मी मूळची पश्चिम बंगालमधील हिंदू कुटुंबातली. आईवडिलांची एकुलती एक, बंगाली लोकांमध्ये असलेल्या रास्त खुल्या वातावरणात लहानाची मोठी झाले. अर्थात, सहजपणे दिला जाणारा इस्लाम धर्माविरुद्धचा इशारा ‘मुस्लीम सोडून कोणाशीही लग्न कर’ हा मलाही लागू होता.

मी नवर्‍याला ऑनलाईन भेटले. आमची चांगली मैत्री झाली. आमच्या डेटिंगची सुरुवात नुकतीच होत होती, तेवढ्यात अचानक आमच्या विवाहाचा विषय निघाला. मी फक्त 24 वर्षांची होते, लग्नासाठी अजून तयार नव्हते आणि मला वाटत होतं, की त्याच्या ख्रिश्चन पार्श्वभूमीमुळे विरोध होईल मग तो कालांतराने निवळेल, यात बराच काळ जाईल; पण आश्चर्य म्हणजे माझे आईवडील या विवाहासाठी सहज तयार झाले. बहुधा तो ‘मुस्लीम नाही’ या एकाच मुद्यावर ते खूश होते. त्यामुळे माझं लग्न आणि बारा वर्षांनंतर आमचा घटस्फोट या दोन्हीला अगदीच कमी विरोध झाला. म्हणून मला शेवटची गोष्ट अशी सांगायची आहे, की माझ्यासाठी हे इतरांपेक्षा सोपं गेलं. कारण सध्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणात आंतरधर्मीय विवाहांना इतक्या असहिष्णू आणि त्रासदायक प्रतिक्रिया येतात… तुम्ही धर्माबाहेर प्रेम करण्याचा आणि विवाह करण्याचा प्रयत्न करा, की लगेच तुमच्यावर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करण्यात येईल, तुमच्यावर धर्मांतर लादण्याचा आरोप होईल आणि तुमची तुरुंगात रवानगी होईल. हे काहीच माझ्या वाट्याला आलं नाही.

अतिमहत्त्वाच्या कायदेशीर बाबी

आजकालच्या तरुणांना आंतरधर्मीय विवाहामुळे ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्या तुलनेत माझा विवाह सहज सोपा होता; मात्र त्यात काहीच अडचणी नव्हत्या असं नाही. एखाद्या ख्रिश्चनेतर व्यक्तीनं ख्रिश्चन व्यक्तीशी चर्चमध्ये विवाह केला, तर मुलांना ख्रिश्चन धर्माप्रमाणे वाढवणं अनिवार्य असतं, हे पहिल्यांदा समजलं तेव्हा झालेली माझी तडफड मला अजूनही आठवते. फक्त चर्चची नाही तर माझ्या (होणार्‍या) सासूबाईंचीही हीच अट होती. हे समजल्यावर तर माझी अजूनच तडफड झाली. आम्ही चर्चमध्ये लग्न करावं, अशीच त्यांची इच्छा होती. मग मी माझ्या मनातल्या भावनांकडे दुर्लक्ष केलं आणि माझा व्यवहारी मेंदू आणि माझं उदारमतवादी हिंदू संगोपन यांच्या कलानुसार वागले. मी स्वतःला समजावलं, की तसंही मुलांना वडिलांचं आडनाव आणि धर्म लागू होतो, मग उगाच अजून एक धर्म त्याच्यावर लादून त्याला घोळात कशाला टाकायचं? मी विचार केला, की मी ख्रिश्चन पद्धतीनं विवाह टाळला आणि मुलाच्या ख्रिश्चन संगोपनाला विरोध केला, तर भविष्यात माझ्या मुलाला त्याच्या वडिलांच्या कुटुंबात उपरं वाटेल. शिवाय मी तिला / त्याला हिंदू धर्मातील उत्तम ते सारं शिकवू शकतेच, मग तेवढंच ठीक राहील. आपल्या भविष्यातल्या मुलाबद्दल कल्पना करणं चोविसाव्या वर्षी कठीणच जातं, त्यामुळे मी ते फारसं धरून ठेवलं नाही.

तडजोड न करता येण्याजोगी, पण कदाचित थोडी पटणारी, चर्चची आणखी एक अट होती. लग्न ठरलेल्या सर्व  जोडप्यांना विवाहपूर्व समुपदेशनाचा एक कोर्स करावा लागे. माझ्या हिंदू संवेदनशीलतेला कुटुंबनियोजनाबद्दलच्या उघड संवादाचा जरा त्रासच झाला हे मी कबूल करते, तरी मी वरकरणी शांत राहून तो कोर्स पूर्ण केला. आता मागे वळून पाहताना मला त्या कोर्सचं महत्त्व लक्षात येतं आणि कोणत्या का धर्माचा असेना; पण प्रत्येकाला अशा समुपदेशनाची संधी मिळावी असं वाटतं. आपल्यातले बहुतेक जण भारतीय विवाहाच्या झगमगाटात इतके बुडून जातात, की त्यानंतर येणारे कष्ट तेव्हा दिसतच नाहीत. मला दोन्ही बाजूंचा थोडा थोडा अनुभव घेता आला – विवाहाबद्दलचा योग्य दृष्टिकोन आणि त्याचा थाट याचा मला आज आनंदच वाटतो. आमचं लग्न तीन पद्धतींनी झालं – कायदेशीर, हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं. वर दोन्हीकडच्यांसाठी स्वागत समारंभही! आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळणं हे तिप्पट महत्त्वाचं असावं!

आता मूळ अडचणींबाबत

बहुतेक सर्वांसारखं आमच्या लग्नानंतरचं पहिलं दीड वर्ष अत्यानंदात गेलं. देव-धर्म हे विषयसुद्धा निघाले नाहीत! ज्या धार्मिक-सांस्कृतिक परंपरांमध्ये आम्ही वाढलो होतो त्यावर आम्ही कमीतकमी बोललो. मी जितक्या सहजपणे सोरपोटेल खाणं आपलंसं केलं (डुकराच्या मांसापासून केला जाणारा एक खास मसालेदार गोवन पदार्थ) तितक्याच सहजपणे त्यानंही माछ-भात (मासा आणि भात) हे बंगाली लोकांचं खाणं आपलंसं केलं. आमच्या घरात देवघर नव्हतं किंवा दूरदर्शन संचही नव्हता, मात्र भरपूर पुस्तकं आणि कोडी होती. आमचं नवीन धर्मरहित आयुष्य आनंदात चाललं होतं.

माझ्या कल्पनेपेक्षा खूपच लवकर म्हणजे आमच्या लग्नाच्या दुसर्‍या वर्षात माझा मुलगा जन्मला. त्या पिढीतील तो पहिला आणि एकुलता असल्यानं लवकरच सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रस्थान बनला. मी त्याच्यासाठी संस्कृत नाव निवडलं आणि चर्चचे नियम नाखुषीनं स्वीकारण्याची चूक थोडी का होईना सुधारल्यासारखं मला वाटलं. निदान त्याच्या पहिल्या नावात त्याच्या हिंदू आईचा वारसा जपला जाईल अशी मी स्वतःची समजूत घातली; पण तरी माझ्या मुलाचा धर्म माझ्यापेक्षा वेगळा असेल हे आत कुठेतरी सलत होतं. बाहेरून बघणार्‍याला वाटत असेल की तो मी निवडलेला पर्याय होता; पण तेव्हा माझ्या लाडक्या माणसाच्या आईला विरोध करण्याची माझी हिंमतही नव्हती आणि इच्छाही. शिवाय मला माझ्या उदारमतवादी शिक्षणाचा मुद्दाही सिद्ध करायचा होता. मी थोडाही विरोध केला असता, तरी आतून मला स्वतःचीच खूप लाज वाटली असती. म्हणून मग आम्ही तसेच पुढे गेलो. पण ‘माझेपण’ जतन करण्याची ती इच्छा किती प्रबळ होती याचं मला खूप आश्चर्य वाटतं. माझं सर्व शिक्षण आणि विवेक त्या इच्छेला शांत करण्यासाठी वापरावं लागलं; पण तरी ती ठसठस मनातून जात नव्हती.

ख्रिश्चन चर्चनं लग्नासाठी धर्मांतर करण्याचा माझ्यावर दबाव आणला नव्हता, तरी त्यांनी माझ्याकडून बाळाच्या धर्मांतरासाठी मान्यता घेतलीच. संताप कसा साचत जातो आणि त्याचे नात्यांवर कसे दीर्घकालीन परिणाम होतात हे मला त्यानंतर स्पष्ट दिसलं. इथे माझ्यासाठी आणि ज्यांना घ्यायचाय त्यांच्यासाठी एक धडा आहे : प्रेम अधिक बळकट होईल किंवा विरून जाईल; पण निवडीचं खरं स्वातंत्र्य नसेल तर जे आपल्याजवळ आहे त्याबाबत खरं समाधान कधीच मिळणार नाही. आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणार्‍या सर्वांनी कोणताही शब्द देण्यापूर्वी या कठीण विषयावर चर्चा केली पाहिजे. लग्नाचा निर्णय घेण्याआधी स्वतःकडे, स्वतःच्या मूल्यांकडे चिकित्सक दृष्टीनं सखोल बघणं, आपल्यासाठी खरंच महत्त्वाचं काय आहे यावर विचार करणं, हे व्हायला हवं .

माझा मुलगा सहा महिन्यांचा झाल्यावर मी पुन्हा कामाला सुरुवात केली. माझ्या प्रेमळ सासूबाईंनी आजीची जबाबदारी मोठ्या आनंदानं स्वीकारली. माझे सासू-सासरे त्याची इतकी छान काळजी घेत, की मला माझ्या तान्हुल्याच्या स्वास्थ्याची एक दिवसही काळजी करावी लागली नाही. अशी महिन्यांमागून वर्षं गेली. ख्रिस्तीधर्माचे ताण लगेच किंवा सतत जाणवले नाहीत; पण ते आलेच. पहिली विचारणा झाली ती माझ्या मुलाच्या बाप्तिस्म्याबद्दल. बहुतेक ख्रिस्ती कुटुंबांमध्ये मूल जन्मताच त्याला बाप्तिस्मा दिला जातो, तसे माझ्या मुलाबाबत घडले नाही. ते याबद्दल विसरले आहेत अशी मला मनातून आशा वाटत होती. मात्र माझा मुलगा साधारण चार वर्षांचा असताना त्याला बाप्तिस्मा देण्यात आला आणि मी त्याबद्दल काहीही बोलू शकले नाही किंवा करू शकले नाही. काही वर्षांनंतर, पहिल्या पूजेबद्दल विचारणा झाली आणि परत एकदा माझ्याकडे सहमती देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आयुष्यातील तिसर्‍या महत्त्वाच्या (सहमती देण्याच्या) धार्मिक संस्कारात तरुणांना विचारलं जातं, की त्यांना खरंच ख्रिस्ती धर्म स्वीकारायचा आहे का. या संस्कारात निवड करता येते असं म्हणतात; पण सहसा कोणी आपला निर्णय बदललाय असं दिसत नाही. आणि आता माझ्या मुलाची सहमती घेतली जाईल तेव्हा तो त्याबद्दल फारसा विचार न करताच ‘हो’ म्हणेल हे मला आताच दिसतं आहे.

‘जे’चं संगोपन

संस्कृतीची कट्टर अभ्यासक या नात्यानं मला हे माहीत असायला हवं होतं, की मूल वाढत असताना एका व्यक्तीनं केवळ एखादा धर्म स्वीकारणं एवढंच हे मर्यादित नाही. एक संपूर्ण संस्कृती स्वीकारणं, आपली मूळ ओळख स्वीकारणं, आपलं संपूर्ण स्वत्व स्वीकारणं असंच ते आहे. कोणी असा युक्तिवाद केला, की एखाद्या व्यक्तीनं कोण्या एका धर्माचा बाप्तिस्मा घेतला असला, तरी त्याची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक घडण वेगळी असू शकते तर मी त्याच्याशी पूर्णपणे असहमत आहे. धर्म, अध्यात्म आणि संस्कृती ह्या विद्याभ्यासाच्या वेगवेगळ्या शाखा असल्या तरी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते एकच आहेत. विशेषतः भारतासारख्या देशात त्यांचं एकमेकांत गुंतलेलं असणं आणि शेवटी एकच होणं इतकं स्पष्ट आहे, की त्यांना वेगळं ठेवण्याचा कोणताही प्रयत्न व्यर्थ आहे. हिंदू आणि इतर भारतीय धर्मांप्रमाणे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातही बदल होऊन धर्म म्हणजे जगण्याची पद्धत बनली आहे. याउलट पाश्चिमात्यांमध्ये ‘धर्म’ आणि जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या समजू शकतात. इथे धर्म हा केवळ शास्त्रांमधून, विधींमधून शिकवला जात नाही, तर तो भाषा, साहित्य, पाककला आणि कलांमधूनही शिकवला जातो. संस्कृतीच्या या सर्व शाखांमधून धार्मिक आणि पौराणिक तत्त्व झिरपत असतं आणि आपण जेव्हा त्यात गुंततो आणि आपल्याला पवित्र वाटणार्‍या गोष्टींचं महत्त्व पुन्हा पुन्हा सांगतो तेव्हा आपण मुलांना धर्म शिकवत असतो.

माझा मुलगा मोठा होऊ लागला आणि फक्त इंग्रजी बोलू लागला. माझी खूप तडफड झाली. माझा भाषिक वारसा गमावण्यातल्या वेदना मला जाणवू लागल्या. मी बंगाली चांगलं बोलू शकत होते; पण बालपणी बंगालची रहिवासी नसल्यानं मी बंगाली नीट वाचू किंवा लिहू शकत नव्हते. आणि आता असं वाटू लागलं, की माझ्या मुलासोबत बंगाली बोलणंही हरवत चाललं आहे आणि त्याला मीच जबाबदार असेन. पण त्याला त्याची हक्काची ‘मातृभाषा’ शिकवण्याची माझी गरज आणि माझ्या कामाच्या माझ्याकडून असणार्‍या मागण्या यांच्यातील चढाओढीत माझी ही गरज मागे पडली.

पण मी इतक्या सहज हार मानणार नव्हते. मी माझं हिंदू-बंगालीपण वेगळ्या मार्गानं त्याच्यापर्यंत पोचवायचं ठरवलं. नाताळ आणि इस्टर या ख्रिस्ती सणांप्रमाणे दुर्गा-पूजा आणि दिवाळीसुद्धा तितक्याच उत्साहानं साजरी होईल याकडे मी लक्ष दिलं. दरवेळी त्याला समजेल किंवा आवडेल असं नसलं, तरी मी त्याच्या अवतीभोवती हिंदी आणि बंगाली संगीत आणि चित्रपट लावत असे आणि त्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे. मग मी माझ्या अतिपरिचित माध्यमाकडे – पुस्तकांकडे वळले. मी लहानपणी ऐकलेल्या बंगाली बालकथांकडे त्याला नेण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यावर इंग्रजीतील अमर चित्रकथांकडेही ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा कल चमकदार पाश्चिमात्य पुस्तकांकडे न चुकता होता. जगातील डिस्नी आणि पिक्सार प्रकाशनासोबत स्पर्धा करून त्यांच्याविरुद्ध मी जिंकेन अशी शक्यताच मला वाटत नव्हती. तरी मी प्रयत्न केला. पुराणांचा मी केलेला अभ्यास काही अंशी यशस्वी झाला असं मला वाटतं. संधी मिळेल तेव्हा मी त्याला भारतीय पौराणिक कथा सांगितल्या. त्या त्याला त्याच्या जिवंत हिरोच्या तोलामोलाच्या वाटत. जोसेफ कॅम्पबेल च्या ‘हिरोज जर्नी’ बद्दल जाणून घेतल्याचा मला चांगला उपयोग झाला होता. भारतीय कथांमध्ये जीझसला समांतर इंद्र आहे, पोसेईडॉनसारखाच आपला वरुण आहे हे मला त्याला सांगता आलं. फ्रोझन चित्रपटातील एल्सासारखंच रामाला वनवासाला जावं लागलं आणि शेवटी तो विजयी झाला हेही मला सांगता आलं. सर्व मानवी अनुभवांमध्ये आणि भावनांमध्ये सारखेपणा असतो आणि म्हणून या कथांमधले सगळे हिरो सारखेच चांगले आहेत हे मला त्याला पटवून देता आलं.

स्वतःशी जोडलेलं राहा आणि इतरांनाही तसं राहू द्या

आमचा मुलगा 10 वर्षांचा असताना आम्ही घटस्फोट घेतला. तेव्हापासून माझा मुलगा आपले आजीआजोबा आणि बाबांबरोबर राहतोय. तो अजून लहान आहे. आता तर त्याचं संगोपन पूर्णपणे ख्रिश्चन पद्धतीनं होतं आहे; पण आता मी ते स्वीकारलंय. धर्माचा आणि पुराणशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास करताना आणि त्यातील काही भाग मुलाला शिकवताना, ‘सर्व मानवजात मुळात एकच / सारखीच आहे’ या कल्पनेनं माझ्या मनावर खोलवर ठसा उमटवला. आजचं माझं काम याच आदर्श कल्पनेला वाहिलेलं आहे आणि जगात अधिक शांती आणि न्याय प्रस्थापित व्हावा, हीच माझ्या कामाची दिशा असते.

मी आणि माझा लेक वारंवार भेटतो, माझ्या कामाबद्दल बोलतो, तो जे व्हिडिओ गेम्स खेळतो त्याबद्दल आणि ज्या युट्यूब हिरोना ‘फॉलो’ करतो त्याबद्दल बोलतो. आमच्या या संवादाची भाषा ना हिंदू असते, ना ख्रिश्चन, ना बंगाली असते, ना इंग्रजी. एकमेकांसाठी काय महत्त्वाचं आहे ते समजून घेणारी, आपलं पूर्ण आणि अविचलित लक्ष मागणारी अशी ती भाषा असते. कदाचित आधी आम्ही ते पुरेसं केलं नसावं; पण आता ‘अनस्कूलिंग करणारे पालक’ म्हणून ते आम्ही शिकत आहोत.

जे हवं ते शिकण्याचं स्वातंत्र्य, स्वतःच्या गतीनं शिकण्याचं स्वातंत्र्य किंवा त्यानं ठरवल्यास काहीच न शिकण्याचं स्वातंत्र्य मुलाला देऊन आम्ही एक खूप मोलाची गोष्ट शिकलो आहोत. यशस्वी विवाहाची किंवा यशस्वी पालक होण्यासाठीची, मग ते आंतरधर्मीय असो किंवा नसो, गुरुकिल्ली म्हणजे आपल्या आतल्या ‘स्व’ला व्यक्त होण्यासाठी जागा करून देणं. त्या स्वातंत्र्याशिवाय आनंद नाही, आनंदाशिवाय प्रेम नाही आणि प्रेमाशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नाही.

उर्मी चंदा

urmi.chanda@gmail.com

वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड विद्यापीठाच्या ‘हार्मनी स्कॉलर’ आहेत. संस्कृती  ह्या विषयावर पत्रकारिता तसेच शांती-निर्मितीसाठी काम करतात.

अनुवाद : आनंदी हेर्लेकर

चित्र : भार्गवकुमार कुलकर्णी