पंकज खटीक

मयुरी गोलाम्बडे

विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासामध्ये भावनिक आणि सामाजिक विकास महत्त्वाची भूमिका बजावतो. यातून मुलाचा आत्मविश्वास, सहअनुभूती, सहवेदना, मैत्री करून ती टिकवण्याची क्षमता विकसित होते. त्यासाठी अपनी शाला इ. 4 थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला एक तास सामाजिक व भावनिक कौशल्याचे वर्ग शाळा-शाळांत घेते. मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, ह्या प्रकारे या तासिकांची रचना केलेली असते.

या तासिका घेत असताना आलेला एक अनुभव पाहू…

सहावीच्या वर्गात एकदा एका तासाला आम्ही नाटुकले घेत होतो. सगळे जण उत्साहात होते. नाटकानंतर दादा वर्गात ‘सांस्कृतिक विविधता’ ह्या विषयावर चर्चा करणार होता. त्यासाठी त्याने मुलांचे छोटे छोटे गट केले. दादा पुढच्या सूचना देणार इतक्यात इशित म्हणाला, ‘‘दादा, मला या मुलाबरोबर ग्रुपमध्ये नाही राहायचं. या धर्माच्या लोकांशी बोलायचं नाही असं माझे मम्मी-पप्पा म्हणतात.’’ हे ऐकून दादा आणि वर्गातले इतर विद्यार्थी सुन्न झाले. काय करावे कोणालाच कळेना. दादाने शाळेतल्या एका ताईवर नाटकाची जबाबदारी सोपवली आणि तो स्वतः इशितला घेऊन वर्गाच्या बाहेर आला. त्याला प्यायला पाणी दिले. आणि ‘रिफ्लेक्टिव्ह प्रश्ना’च्या मदतीने त्याला नेमके काय म्हणायचे होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला.

दादा : तू या शाळेत पहिलीपासून आहेस का?

इशित : हो.

दादा : म्हणजे पहिलीपासून तुम्ही सगळी मुले सोबतच आहात तर?

इशितने  होकारार्थी मान हलवली.

दादा : मला तुझी थोडी मदत हवी आहे, करशील का?

त्याने स्मितहास्य करत पुन्हा होकारार्थी मान हलवली.

दादा : तू मला तुमच्या वर्गातले मजेदार किस्से सांगशील का? तुम्ही काय काय मज्जा करता, त्यामध्ये कोण कोण असतं, वगैरे.

इशितने बरेच काही सांगितले.

दादा म्हणाला, ‘‘अरे व्वा! तुम्ही तर भरपूर मज्जा केली आहे एकत्र. दंगा घातलात, भांडलात आणि पुन्हा एकत्रही आलात. किती छान! आता तुझी अजून एक छोटीशी मदत हवी आहे. तुम्ही सगळे इतके मिळूनमिसळून राहता, मग मघाशी वर्गात तुला नक्की काय म्हणायचं होतं, ते मला थोडं समजावशील का?’’

‘‘दादा, मम्मी-पप्पांनी सांगितलंय, की त्या धर्मातल्या लोकांशी बोलायचं नाही, त्यांच्याबरोबर खेळायचं नाही, त्यांच्या डब्यातलं खायचं नाही, म्हणून मी तसं म्हणालो.’’

त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यावर दादाने त्याला विचारले, ‘‘तुला काय वाटतं इशित, तुझं बोलणं ऐकून तुझ्या वर्गातल्या इतर मुलांना काय वाटलं असेल?’’

 इशित दादाच्या बोलण्यावर विचार करू लागला.

दादा म्हणाला, ‘‘तू थोडा वेळ घे. आपण यावर पुढच्या आठवड्यात बोलू.’’

पुढे काही महिने दादाने मुलांसोबत काही उपक्रम घेतले. त्यातून मुलांना समोरच्याला समजून घेण्याची संधी मिळाली. इतर मुलेही आपल्यासारखीच आहेत हे लक्षात आले. विविधता आणि सर्वसमावेशकता ह्यांचा अर्थ समजावा म्हणून काही उपक्रम घेण्यात आले.

शिक्षकांनी वर्गात खुले, सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास मुलांच्या मनातली अस्वस्थता बाहेर येण्यास मदत मिळते. ती स्वतःचे अनुभव इतरांना सांगू लागतात. इतर मुलांचे अनुभव त्यांना ऐकायला मिळतात. आपल्याप्रमाणेच बाकीची मुलेही विविध प्रसंगांना सामोरी जातात, आपल्यासारखेच विचार इतरांच्या मनातही येतात, हे जाणून त्यांच्या मनात सहभाव निर्माण होतो. हे सगळे माझ्याच वाट्याला येते, ह्या विचारातून मूल बाहेर येते. शिकवण्याच्या या विशिष्ट पद्धतीला ‘खिडक्या  आणि  आरशां’चा अभ्यासक्रम (ुळपवेुी  ाळीीेी र्लीीीळर्लीर्श्रीा) म्हणतात. ‘आरसा’ म्हणजे स्वतःच्या अनुभवांवर चिंतन-मनन आणि ‘खिडक्या’ म्हणजे इतरांच्या अनुभवांशी स्वतःच्या अनुभवांची सांगड घालणे. विद्यार्थी जसजशी अनुभवांची देवाणघेवाण करू लागतात, इतरांवर बेतलेल्या गोष्टी ऐकतात, तशी इतरांशी अधिकाधिक जोडली जातात. शाळा मुलांना ही संधी देऊ  शकते.

सामाजिक आणि भावनिक शिक्षण होत नसेल, तर समाजाबद्दल मुलांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होते. मुले दिवसातला एक तृतीयांश वेळ शाळेत असतात. उरलेला वेळ ती ज्या वातावरणात असतात, त्याचा त्यांच्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. या वातावरणात त्यांचे विचार, भावना विकसित होतात, विविध धर्मांबद्दलची माहिती मिळते आणि पालकांकडून काही सूचनाही मिळतात. त्यामागे त्यांच्या मनात असलेल्या सुप्त भीतींपासून मुलांचा बचाव करण्याचा पालकांचा हेतू असला, तरी त्या सूचनाच अनेकदा मुलांसाठी तणावाचे कारण बनतात. हे अर्धवट ज्ञान अनेक न सुटलेल्या समस्यांचे रूप धारण करते. मनाला भेडसावते. मुलांच्या जगात तणाव पसरतो. भीतीचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण होते. कुणी म्हणेल, ह्याचा एवढा बाऊ करण्याचे कारणच काय? वेगवेगळ्या भावना येतात आणि जातात. पण या सार्‍याचा नेमका काय परिणाम होतो, हे आपण जागतिक पातळीवर झालेल्या संशोधनाच्या माध्यमातून समजून घेऊ. ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2016’नुसार भारतातील सुमारे

14  टक्के  लोकसंख्येला मनोआरोग्याच्या तक्रारी आहेत. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर ती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

आपण स्वतःशी किंवा इतरांशी सतत संघर्षाच्या पवित्र्यात का असतो, अटीतटीच्या प्रसंगी आपल्या कोणत्या भावना उफाळून येतात, प्रतिक्रिया अचानक उग्र का होतात किंवा वादाचे नेमके कारण काय आहे, हे अनेकदा लोकांना माहीतच नसते. यावर काही लोकांनी अभ्यास करून त्यामागील कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एक आहेत क्लेअर कॅनफिल्ड.

आपल्या टेड टॉकमध्ये क्लेअर कॅनफिल्ड सांगतात, संघर्ष फक्त एखादा विषय, परिस्थिती किंवा व्यक्तीच्या विरुद्ध नसतो. तो ह्या सर्वांच्या पलीकडे आहे. आपली ओळख, आपले नाते आणि आपल्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे याभोवती संघर्ष फिरत असतो. ते आपल्या भाषणात एक उदाहरण देतात. लहानपणी त्यांना भांडी घासायला आवडत नसे. त्यावरून त्यांचा घरातल्या माणसांशी वाद व्हायचा. पुढे  महाविद्यालयामध्ये रूममेटशी, लग्न झाल्यावर जोडीदाराशी आणि पुढे मुलांबरोबरदेखील कुरबुरी होत राहिल्या. इतक्या वर्षांनंतर सगळ्या घटनांकडे वळून बघताना आणि त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली, की भांडी घासणे हे फक्त निमित्त होते. संघर्षाची कारणे दरवेळी वेगवेगळी होती. लहानपणीचे कारण स्वातंत्र्याशी  निगडित  होते, महाविद्यालयात  असताना  प्रश्न होता आदर  आणि  नात्याची  कदर करण्याबाबतचा, लग्नानंतरही मुद्दा भांडी घासण्याचा नव्हताच; जोडीदाराने आपण केलेल्या कामाची दखल घ्यावी, थोडे तरी कौतुक करावे व नंतर त्यातले दोष सांगावे या अपेक्षेतून संघर्ष होत होता. म्हणजे घटना एकच असूनही प्रत्येक वेळी त्यामागची कारणे वेगवेगळी होती. क्लेअर म्हणतात, संघर्ष हिमनगासारखा असतो. वरून छोटासा दिसतो; पण पाण्याच्या आत विशाल पर्वतासारखा पसरलेला असतो. ते ओळखून त्याची हाताळणी कशी करावी, यासाठी क्लेअर पुढील टप्पे सुचवतात – 

1. संघर्षाची बीजे ओळखणे

हे सर्वात महत्त्वाचे आहे. घडणार्‍या प्रत्येक घटनेमागे माझ्या भावना काय आहेत, कोणत्या गोष्टींमुळे मी बैचेन होतो / होते आहे, घटनेच्या तळाशी असलेली कोणती गोष्ट माझ्या मनात संघर्षाची बीजे पेरते हे जाणून घेणे.

2. आपण संघर्षाच्या कुठल्या टप्प्यावर नेमके अडकलेले आहोत ते ओळखणे

एकदा संघर्ष ओळखला, की त्यातील कुठल्या गोष्टीने मला जखडून ठेवले आहे; तो राग आहे, पूर्ण न झालेली अपेक्षा आहे, की वर्षानुवर्षे मनाच्या तळाशी साठून राहिलेली भीती आहे.

3. तजउअAइ चा सराव करणे

त म्हणजे व्हल्नरेबल (स्वतःच्या भावना, दुःख, त्रास, कमतरता न लाजता व्यक्त करणे), ज म्हणजे ओनरशीप (स्वतःच्या भावना, गरजा व निवडीची जबाबदारी घेणे), उ म्हणजे कम्युनिकेशन (यामध्ये फक्त संवाद नाही; स्वतःला कसे व्यक्त करायचे हे शिकणेही आहे), Aअ म्हणजे अ‍ॅक्नॉलेज (वास्तव समजून घेणे आणि आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी सोडून देणे) आणि शेवटचे इ म्हणजे बाऊंड्री (कोणते वर्तन चालू शकेल आणि कुठले स्वीकारले जाणार नाही हे समोरच्याला सांगणे)

क्लेअर म्हणतात, यामुळे संघर्ष पूर्णपणे थांबेल असे नाही; पण ह्याचा वारंवार सराव केल्यास आपल्याला स्पष्टता यायला मदत मिळते. आणि तिथूनच बदलाला सुरुवात होते; स्वतःमध्ये, आपल्या नातेसंबंधात आणि आपल्या सभोवतालच्या जगातही. हा बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक आणि भावनिक कौशल्यांवर लहानपणापासूनच काम होणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक पायरी अमलात येण्यासाठी विशिष्ट कौशल्यांची गरज भासते.

सामाजिक आणि भावनिक शिक्षणातून (सोशल इमोशनल लर्निंग – डएङ) मुले स्वतःच्या भावना समजून घेऊन त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक ज्ञान, वृत्ती आणि कौशल्ये आत्मसात करतात आणि प्रभावीपणे त्यांचा वापरही करतात. ध्येय ठरवून ते साध्य करतात. इतरांप्रति सहवेदना बाळगतात, जबाबदारपणे निर्णय घ्यायला शिकतात. सध्याच्या शिक्षणपद्धतीत हे कौशल्य निर्माण करण्यासाठीचा अवकाश दिसून येत नाही. बहुतेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेचे स्थान महत्त्वाचे असते. आणि त्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे. मात्र शिक्षकांनाही त्यांच्या सामाजिक आणि भावनिक कौशल्यांवर काम करण्यासाठी खूपच कमी अवकाश मिळतो. ह्यातून समाजाची ढासळणारी परिस्थिती आपण पाहतोच आहोत. विविध समुदायांमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. इतरांबद्दल वाटणारी करुणा, आस्था कमी होत चाललीय, तर काही ठिकाणी नाहीशीच झालेली दिसून येतेय. मग अशा परिस्थितीत एक शिक्षणसंस्था म्हणून, एक शिक्षक म्हणून आपण काय केले पाहिजे? येत्या काळात सौहार्दपूर्ण समाजाची निर्मिती करण्यासाठी विद्यार्थ्यांना काय शिकवले जायला हवे? स्वतःला आणि समाजाला खोलवर जाणून घ्यायला शिकवणे हे त्याचे उत्तर आहे. हेच काम ‘अपनी शाला’ मागील 9 वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर विविध उपक्रमांतून साधण्याचा प्रयत्न करते आहे.

हे काम करत असताना आलेले अनुभव नोंदवून ठेवलेले असतात. त्यातील एक पद्धत म्हणजे वर्गातील संवाद.

प्रस्तुत संवाद इयत्ता पाचवीच्या वर्गातला आहे.

ताईने वर्गात प्रश्न विचारला, आपल्या भावना व्यक्त करणे महत्त्वाचे का आहे?

विद्यार्थी 1 : त्यामुळे आपलं नातं मजबूत व्हायला मदत होते.

विद्यार्थी 2 : इतरांशी आपल्या भावना शेअर केल्या, की मला बरं वाटतं.

विद्यार्थी 3 : कधीकधी आपल्या भावना मोकळेपणी व्यक्त केल्यानं मित्रांशी झालेलं भांडण संपू शकतं.

अशा संवादांतून आशा पल्लवित होतात, आणि विद्यार्थ्यांसाठी एक सुरक्षित अवकाश निर्माण करण्याच्या आणि कौशल्य विकसित करण्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येते आहे, असा दिलासाही मिळतो.

पंकज खटीक

pankaj.khatik@apnishala.org

वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीच्या ग्रामीण, शहरी व आदिवासी मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम विकसित करतात.

मयुरी गोलाम्बडे

mayuri@apnishala.org

मुलांना जाणून घेण्यात आणि चांगल्या पद्धतीने जगण्याचे मार्ग समजून घेण्याची कौशल्ये निर्माण करण्यात रस आहे.