शुभदा जोशी

‘‘रोहन, अरे रोहन, थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे.’’ ताई म्हणाल्या.

रोहन थांबला पण गप्पच होता.

‘‘अरे, गेला आठवडाभर तू खेळघरात आला नाहीस, काय झालं?’’

‘‘मी सोडलं खेळघर ताई!’’  

‘‘अरे पण काय झालं? सांग ना.’’

‘‘काय नाय…’’

रोहन निघून गेला आणि ताई विमनस्क होऊन तिथेच उभ्या राहिल्या. क्षणभर त्यांना खूप राग आला. अपमान झाल्यासारखंही वाटलं. भावना शांत होण्यासाठी ताईंनी काही वेळ जाऊ दिला. दुसर्‍या कामाला लागल्या. मन जरा शांत झाल्यावर विचार करायची सुरुवात झाली. का असं वागला असेल रोहन? आपल्या हातून वर्गात त्याचा काही अपमान झाला का? मित्रांमध्ये भांडणं?… शोध सुरू झाला…

रोहन या वर्षी नव्यानंच वर्गात आला होता. 12 वर्षांचं अडनिडं वय, गावाकडून पुण्यात स्थलांतर; त्याचं वर्गातल्या इतर मुलांशीही फारसं जमत नव्हतं.

रोहन नसताना वर्गातल्या इतर मुलांशी बोलून, समजावून घेताना काही गोष्टी ताईंच्या लक्षात आल्या. रोहन जेव्हा सलग दोन-तीन दिवस वर्गाला उशिरा आला होता, तेव्हा ताईंनी थोडं कडकपणे आणि सर्वांसमोर, वर्गात वेळेवर यायचं महत्त्व रोहनला समजावून सांगितलं होतं. यावर मुली हसल्या होत्या आणि ‘तरी आम्ही त्याला सांगत होतो’ अशी कुजबूज त्याच्या कानावर आली होती. ही जागा आपली नाही, इथे आपलं कुणी नाही, असं काहीसं रोहनला वाटलं असावं, हे ताईंच्या लक्षात आलं.

त्यानंतर ताई आणि काही मुलं मिळून रोहनच्या घरी गेले. त्यानं वर्गाला यावं असं सर्वांना वाटतं आहे, हे लक्षात आल्यावर रोहनच्या चेहर्‍यावर स्मित उमटलं. 

मोठ्या माणसांना आपली चूक मान्य करणं फार अवघड जातं. पण आपण मोकळेपणानं चूक मान्य केली, तर मुलं माफ करतात. मुलं खूप क्षमाशील असतात. सारं विसरून ती पुन्हा आपल्याशी जोडली जातात हे ताईंच्या लक्षात आलं.  

खेळघरातला हा एक प्रसंग! आपल्या मनात अनेक प्रश्न-तरंग उमटले असतील ना? थोडं अधिक खोलवर समजावून घेऊयात… खेळघर हा ‘पालकनीती परिवार’चा एक प्रकल्प आहे. मुलं जिथे आपण होऊन येतील, शहाणा विचार करायला शिकतील, मोकळेपणानं अभिव्यक्त होतील, स्वतःचा शोध घेतील, मनापासून रमतील अशी जागा प्रत्येक मुलाच्या आयुष्यात असायला हवी; विशेषतः वेगवेगळ्या वंचिततांच्या विळख्यामध्ये बांधल्या गेलेल्या मुलांसाठी तर अशी जागा ही आशेचा किरण असेल, असं स्वप्न बघत 1996 साली पालकनीतीच्या खेळघराची सुरुवात झाली. गेल्या 27 वर्षांत खेळघराची ‘आनंदानं शिकण्याच्या दिशेनं’ ही पद्धती विकसित होत गेली आहे. आज 6 ते 22 या वयोगटातली सुमारे 200 मुलं आणि त्यांचे पालक यांच्यासमवेत हे काम चालू आहे.

खेळघरात मुलांसाठी भयमुक्त आणि मोकळं वातावरण असावं, असं आम्हाला मनापासून वाटतं आणि म्हणूनच खेळघरात शिक्षा आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टींना थारा मिळत नाही ना याकडे आम्ही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो. प्रथम एक गोष्ट सुस्पष्टपणे सांगते, हे अजिबातच सोपं नाही. पालकनीती खेळघरात काम करणार्‍यांचा काम करून पैसे मिळवणे हा उद्देश नाही. या कामावर, मुलांवर आमचा सर्वांचा जीव आहे आणि म्हणूनच मुलांच्या विकासाच्या मार्गात अडथळे असलेल्या शिक्षा आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टींना दूर ठेवणं आम्हाला शक्य झालं आहे. यासाठी सातत्यानं स्वतःला तपासत राहावं लागतं, स्वतःवर काम करत राहावं लागतं. या कामामुळे आमच्या स्वतःच्या आयुष्यातदेखील अर्थपूर्ण बदल झाले आहेत.

माझ्यासाठी याची सुरुवात झाली पालकनीती मासिकाच्या कामातून! 1993-94 च्या सुमारास मी पालकनीतीच्या संपादकगटाशी जोडले गेले. मुलं वाढवताना जेव्हा अनेक प्रश्न पडायला लागले तेव्हा आर्किटेक्चरची बर्‍यापैकी चालणारी प्रॅक्टिस सोडून देऊन, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी पालकनीतीच्या कामात सहभागी झाले. माझी मुलं पुण्यातल्या सर्जनशील आणि बालकेंद्री पद्धतीनं चालणार्‍या ‘अक्षरनंदन’ या शाळेत जात होती. तिथे आणि पालकनीतीच्या कामादरम्यान सातत्यानं होत असलेल्या चर्चा-संवादांमधून मनात काहीतरी जागं होत होतं. प्रचंड मानसिक उलथापालथीचा काळ होता तो! मुलांसमवेत आनंदानं जगायचं असेल, तर मोठं माणूस म्हणून आपल्या हातातली सत्ता सोडायला हवी, आदर आणि सन्मानाची अपेक्षा फक्त मुलांकडूनच करण्यात अर्थ नाही, तर ही अपेक्षा दोन्ही बाजूंनी असायला हवी, अशा अनेक गोष्टी समजत आणि पटतही होत्या. आपण जे बोलतोय, मासिकात लिहितोय ते आपण आपल्या आयुष्यात यावं म्हणून प्रयत्न करत नसू, तर आपल्याला असं काही म्हणायचा अजिबात अधिकार नाही असं आम्हाला वाटत असे. मात्र एखादी गोष्ट मनापासून पटणं आणि ती प्रत्यक्षात येणं यात बरंच अंतर असतं हे पदोपदी लक्षात येत होतं.

1998 मध्ये पालकनीतीत संजीवनीनं लिहिलेली ‘आमिषांचा मुका आणि शिक्षेचा दम’ ही लेखमाला माझ्यासाठी दिशादर्शक ठरली. मुलांना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावणं, मुलं त्याप्रमाणे नाही वागली तर अपमान, धमकी, शिक्षा यांतून त्यांना भीती वाटायला लावणं ही सर्वत्र रूढ झालेली पद्धत किती मोठ्या प्रमाणात नुकसान घडवून आणते, मुलांशी असलेलं नातं कसं दुरावतं, मुलांच्या शिकण्यात कसे अडथळे उभे करतं हे या लेखमालेतून मला नीट समजलं.

सुरुवातीच्या काळात मी घरातच खेळघर सुरू केलं होतं. मुलांनी आवडीनं आणि आपण होऊन खेळघरात यावं, त्यांना कंटाळा येऊ नये आणि नवीन काहीतरी शिकायला मिळावं एवढा उद्देश होता. मी सातत्यानं मुलांच्या सहवासात होते. मनात पक्कं ठरवलेलं प्रत्यक्षात उतरवण्याची उत्तम संधी समोर होती. मुलांनी मला खूप शिकवलं. वेळोवेळी धक्के दिले. बदलायला प्रवृत्त केलं. खेळघरात मुलांबरोबर काम करताना प्रत्येक क्षण कसोटीचा होता. ठरल्याप्रमाणे मुलं वेळेत आली नाहीत, मी बोलत असताना मध्येच आपापसात बोलू लागली, एका जागी बसू शकली नाहीत, रागानं उलटून बोलली… अशी एक ना अनेक छोटी छोटी कारणं मला सातत्यानं चिडायला लावत होती. राग डोक्यात मावला नाही, की वागण्यात उतरत होता. रागाच्या भरात मुलांना काही बोलले, रागावले की मला वाईट वाटायचं. खंत वाटायची. अशी भावनांची वादळंच मला शोधासाठी प्रवृत्त करू लागली. मुलं अशी का वागतात आणि मला तरी एवढा राग का येतो याची कारणं मी शोधू लागले.

माझ्या स्वतःच्या संदर्भातल्या प्रश्नांचा मला हळूहळू उलगडा होत होता. लहानपणापासून हेच पाहिलं होतं मी माझ्या सभोवती! मोठ्या माणसांवर लहान मुलांना वळण लावण्याची जबाबदारी असते आणि त्यामुळे ती एक प्रकारच्या ताणाखाली असतात. मुलांच्या विकासाची जबाबदारी शिरावर घेऊन, चांगल्याच हेतूनं, पण ती मुलांचं आयुष्य ताब्यात घेऊन टाकतात. आणि स्वत:ला नियंत्रकाच्या भूमिकेत बसवून घेतात. मुलांनी आपलं ऐकावं म्हणून जिवाचं रान करतात. मूल स्वतःच्या प्रयत्नांनी शिकत असतं. मुलांनी जसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं स्वतः वागणं आणि मुलाच्या स्व-विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्याला मदत करणं एवढंच आपण करू शकतो, ही ‘पालकनीती’ हळूहळू लक्षात येत होती. लहानपणापासून झालेली आपली जडणघडण, धारणा, सवयी बदलणं अवघड असतं; मात्र प्रेरणा असेल, हुरूप असेल, इच्छा असेल, तर प्रयत्नांना यश लाभतं ह्याचा अनुभवही मी घेत होते.

मुलं अशी का वागतात?

‘मुलं अशी का वागतात?’ ह्या प्रश्नाचं उत्तर मुलांबरोबरच्या कामातून, संवादातून आणि अभ्यासातून लक्षात येत होतं. पालकनीती मासिकाच्या निमित्तानं भरपूर वाचन होत होतं. जॉन होल्ट, पियाजे, वायगॉटस्की या परदेशी अभ्यासकांबरोबरच गिजुभाई बधेका, गांधीजी आणि सध्याच्या काळातले कृष्णकुमार यासारख्या तज्ज्ञांच्या लेखनातून आणि त्यासंदर्भात होणार्‍या चर्चा, संवादांतून गोष्टी समजत होत्या. ‘मुलं बेशिस्तपणे का वागतात?’ या संदर्भात आल्फ्रेड अ‍ॅडलर यांनी फार छान सांगितलं आहे. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपण ज्या गटात आहोत त्या गटात आपलं असणं महत्त्वाचं आहे हा अनुभव मिळाला, तर त्याला आश्वस्त वाटतं. ज्या मुलांना लहान वयात असं सुरक्षित वातावरण मिळत नाही, मोठ्यांचा वत्सल सहवास मिळत नाही, ती मुलं महत्त्व मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहतात. मोठ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणं, मोठ्यांना विरोध करून सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करणं किंवा आपल्याला काही जमणारच नाही असं समजून माघार घेणं हे दोन्ही बंडखोरीचेच प्रकार आहेत.

खेळघराचं काम झोपडवस्तीतल्या मुलांसोबत होतं. इथे बालपणापासूनच विविध नकारात्मक अनुभवांना तोंड देण्याचे प्रसंग मुलांवर वारंवार येत असणार. हे समजत गेल्यावर मुलांच्या बेशिस्त वर्तनाचा आपल्याला येणारा रागही कमी होतो. कुठेतरी विरोध करणारच की ही मुलं!

त्यासाठी मुलांना शिक्षा करणं योग्य नाही तर मग काय? पर्याय म्हणून अनेक शब्द समोर येत होते… शिस्त, सकारात्मक शिस्त, स्वयंशिस्त, सुव्यवस्था आणि त्यासाठी नियम, कायदे इत्यादी…

देश, राज्य अशा मोठ्या पातळीवर व्यवस्थेची गरज आहे हे मान्य! अगदी शाळेच्या किंवा संस्थेच्या पातळीवरदेखील सगळं सुरळीत चालायचं, तर नियमांची चौकट आवश्यक आहे. मात्र हे नियम ज्यांनी पाळायचे आहेत, त्या सर्वांच्या सहमतीतून तयार झालेले असावेत. नियम बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होता न येणार्‍या लहान मुलांना त्या नियमांमागचं मर्म तरी निदान समजावून सांगितलं जायला हवं.

नियम, कायदे, रीती या सगळ्या शब्दांमध्येदेखील एक प्रकारचा करकरीत कोरडेपणा आहे. त्यात एक सक्ती आहे, एक चाकोरी आहे, भावनांचं नियंत्रण आहे, उत्स्फूर्ततेला नकार आहे. जिथे 2-3 मुलं आहेत अशा घरात किंवा 20-25 मुलांच्या वर्गात शिस्तीचा अति आग्रह योग्य आहे का आनंदाला, आस्थेला, स्वतःला आणि इतरांना समजून घेण्याला महत्त्व असावं? भीती आणि ताण नसेल, ताईंवर आणि वर्गमित्रांवर विश्वास असेल तर मुलं मनानं, शरीरानं स्वस्थ असतील. हे जमलं तर ते वातावरण मुलांना शिकण्यासाठी किती समृद्ध असेल!

तरीही आपल्याला 15-20 मुलांच्या समवेत एकत्र काम करायचं असेल, तर एकमेकांना समजून घेऊनच वागायला हवं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा वरकरणी बेशिस्त वाटणारं असं मुलांचं वागणं, दंगा, भांडणं, लक्ष नसणं, इतरांना त्रास देणं वर्गात नेहमीच अनुभवाला येतं, तेव्हा  आपण काय करायचं? समजूत, आदर, विश्वास हे मुलांना कसं शिकवायचं?

उदाहरणादाखल खेळघरात सध्या जाणवणारा एक प्रश्न समजावून घेऊयात.

सहावी – सातवीच्या कुमारवयीन मुला-मुलींचा वर्ग! वर्गात मुलगे आणि मुली यांची निम्मानीम संख्या. मुलगे अशांत, सतत दंगा, चिडवाचिडवी, एका जागी शांत बसून काही संवाद करण्याची कल्पनाच जणू मान्य नाही. मुली त्या मानानं जरा शांत. शिकण्यासाठी उत्सुक. मग त्यांना मुलांचा सारखा राग येतो. त्यातून वर्गात कुठल्याही क्षणाला भांडणं सुरू होतात. अशा परिस्थितीत शिकणं – शिकवणं कसं व्हावं? या मुलांबरोबर काम करणारे शिक्षक आणि स्वयंसेवी कार्यकर्ते अगदी वैतागून जात आहेत. आपण करतोय त्या कामाचा काही उपयोग आहे की नाही अशी शंका मनात येऊ लागली आहे. मुलांचा राग येतो आहे. यावर रूढ उपाय म्हणजे समजावून सांगणं, नियमांचा आग्रह धरणं, रागावणं, शिक्षा करणं, पालकांकडे तक्रार करणं इत्यादी. पण खेळघरात शिक्षा आणि त्या दिशेनं जाणार्‍या गोष्टींचा उपाय म्हणून विचारच करायचा नाही असं ठरलेलं आहे. मग करायचं काय? आपण चिडून काहीच उपयोग नाही, दोन्ही बाजूंनी दोरी ताणून धरण्यापेक्षा आपण आपल्या बाजूचं दोरीचं टोक सोडून द्यावं हेच योग्य! 

या वयातल्या मुलांबरोबर काम करायचं तर त्यांच्याशी दोस्ती करण्याला पर्याय नाही. त्यासाठी त्यांच्यासमवेत मुलात मूल होऊन खेळायला हवं, समजून घ्यायला हवं, वैयक्तिक संवाद करायला हवा. एक प्रकारे ही मुलांची बंडखोरी आहे. घरात, शाळेत, समाजात त्यांना मिळणार्‍या वागणुकीविरुद्ध जिथे जागा मिळते अशा खेळघरासारख्या ठिकाणी ती स्वतःला उधळून देतात. हे समजून घ्यायला हवं, की हा विरोध आपल्याला नाही तर व्यवस्थेला आहे. त्यांच्या वयाच्या गरजा आणि परिस्थितीमुळे त्यांच्या वर्तनात आलेली अशांतता समजून घ्यायला हवी. आपल्याला हे समजतं आहे हे त्यांना सांगायला हवं, त्यांना शांत होण्यासाठी मदत करायला हवी, त्यांना आवडतील, गुंतवून ठेवतील अशा छोट्या सहली, हातानं करण्याजोग्या कलेच्या गोष्टी, खेळ, ओरिगामी अशा उपक्रमांची आखणी करायला हवी. ही आखणी त्यांच्याबरोबरच्या संवादातून व्हावी. मुलांबरोबरच्या संवादामध्ये आपल्याला त्यांच्या संदर्भात पडणारे प्रश्नदेखील त्यांच्यासमोर मोकळेपणानं मांडावेत. यातून कसा मार्ग काढावा हे सर्वसहमतीच्या प्रक्रियेतून ठरवून घ्यावं. त्यांच्यासह नियम बनवावेत. वर्गाची जबाबदारी एकट्या ताईची नाही, तर वर्गातल्या सर्वांची आहे हे मुलांना सांगायला हवं. नियम पाळले जात आहेत की नाहीत हे बघण्याची जबाबदारीपण मुलांवरच द्यावी. अशा प्रसंगी समतोल साधताना ताईंचा चांगलाच कस लागतो. वेळ लागेल, पण झालेले बदल दीर्घ काळ टिकणारे असतील आणि नात्याची घट्ट बांधणी करणारे असतील यात शंका नाही.

समविचारी साथ

मुलांबरोबर सहभागी होताना स्वतः शिकणं, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणं ही प्रक्रिया अतिशय अर्थपूर्ण आणि आनंदाची आहेच; परंतु मी एकटी अशी किती मुलांपर्यंत पोचणार? आपल्याला बेटासारखं एकटं काम करायचं नाही, अनेकांची साथ मिळवायला हवी, हा विचार आणि ही मूल्यं अनेकांपर्यंत पोचवायला हवीत ही पुढची दिशा समोर होती.

सातत्यानं अनेक कार्यकर्त्यांसमवेत काम केल्यानंतर आता पगार घेणारे आणि स्वयंसेवी पद्धतीनं काम करणारे अशा 20 कार्यकर्त्यांची आमची टीम हे काम पुढे नेत आहे. खेळघरात लोकशाही निर्णयप्रक्रियेतून सर्वसहमतीनं निर्णय व्हावेत असा प्रयत्न असतो. यासाठी आठवड्यातून एकदा एकत्र बसून साधकबाधक विचार होऊन निर्णय घेतले जातात.

कार्यकर्त्यांच्या शिक्षणासाठी अभ्याससत्रं, वाचन, प्रशिक्षणं, संवादगट, विविध प्रयोगशील शिक्षणसंस्थांना भेटी असे उपक्रम सातत्यानं चालू असतात. आठ तासांपैकी कार्यकर्ते तीन-चार तास मुलं आणि पालकांबरोबर काम करतात आणि उरलेला वेळ स्वतःच्या शिकण्यासाठी, वर्गांच्या तयारीसाठी असतो. खेळघरात मुलांच्या गटामध्ये जसं मोकळं, भयमुक्त, शिकण्यासाठी पूरक वातावरण असावं असं आम्हाला वाटतं, तसंच एकमेकांना आधार देणारं, सत्तेची उतरंड नसलेलं वातावरण आम्हा कार्यकर्त्यांच्या गटामध्ये आहे ना, यासाठी आवर्जून प्रयत्न केले जातात.

2007 मध्ये आम्ही टाटा ट्रस्टच्या मदतीनं ‘नवी खेळघरे सुरू व्हावीत म्हणून…’ हा प्रकल्प सुरू केला. खेळघरासारखं वंचित मुलांबरोबरचं शिक्षणाचं काम सुरू करण्याची इच्छा असलेल्या शिक्षक-कार्यकर्त्यांसाठी दरवर्षी प्रशिक्षणं घेऊ लागलो. प्रशिक्षणानंतरही काम करताना कार्यकर्त्यांच्या साथीला असावं म्हणून, ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ ही खेळघराची 400 पानी हस्तपुस्तिका लिहिली. प्रशिक्षणांमध्ये सर्वात अवघड भाग आहे तो वृत्तीविकासाचा! संवेदनक्षमता किंवा वर नमूद केलेली मूल्यं शिकवता येत नाहीत. फार फार तर आपल्या वागण्यातून आपण त्याची अनुभूती दुसर्‍यापर्यंत पोचवू शकतो.

–    रोल मॉडेलिंग म्हणजे इतरांनी जसं वागणं आपल्याला आवश्यक वाटतं तसं आपण स्वतः वागणं,

–    प्रत्यक्ष कृती करायची संधी

आणि

–    संवाद

या तीन माध्यमांतून आम्ही कार्यकर्त्यांसाठीच्या प्रशिक्षणांची आखणी करू लागलो.

खेळघराच्या कामाच्या या टप्प्यावर माझी ओळख ‘अ-भय अभियान’ या गटाबरोबर झाली. मुलांना भयमुक्त वातावरणात शिकायला मिळावं यासाठी शिक्षक, पालक आणि कार्यकर्ते यांच्याबरोबरच्या संवादाचं हे व्यासपीठ आहे. शिक्षांचा मेंदूवर आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो आणि शिक्षा नाही तर मग काय करायला हवं याचा आम्ही शोध घेत होतो. प्रशिक्षणं, त्यासाठी लागणार्‍या साहित्याची निर्मिती, अभ्यास अशा अनेक पातळ्यांवरच्या अभियानाच्या कामात मी सहभागी होत होते. इथेच मला जेन नेल्सन यांचं ‘सकारात्मक शिस्त’ हे पुस्तक मिळालं. मुलांमध्ये स्वयंशिस्त कशी रुजवावी याच्या पद्धती या पुस्तकात अगदी पद्धतशीरपणे सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक मला फार आवडलं. 2014 मध्ये या पुस्तकाचा स्वैर अनुवाद पालकनीती मासिकातून आम्ही प्रकाशित केला होता. मात्र अमेरिकन परिवेशातून आलेल्या या पद्धतींचा आपल्या परिप्रेक्ष्यातून विचार होणं आवश्यकच होतं. जेन यांनी सांगितलेल्या पद्धती शिकताना लोकांना छान वाटत असे, काहीतरी हातात आलं आहे, असंही वाटत असे; परंतु प्रत्यक्षात या पद्धतींनुसार काम करणं अवघड जात असे. अभ्यासातून, अनुभवातून शिकलेल्या गोष्टींवर सातत्यानं संवाद करणं, तपासून पाहणं ही पालकनीतीची रीतच होती. या चर्चांमधून आणि पालकनीतीनं आयोजित केलेल्या प्रशिक्षणांच्या अनुभवांमधूनही अनेक मुद्दे समोर येत गेले.

माझ्या लक्षात आलं, की शिक्षकांच्या मनात मुलांविषयी आस्था, त्यांच्या विकासाची तळमळ नसेल, तर कुठलीही पर्यायी पद्धत यशस्वी होऊ शकत नाही. केवळ कोणतीतरी युक्ती, पथ्य किंवा पद्धत वापरून आनंदानं शिकण्याच्या वाटेवरचा प्रवास शक्य नाही. त्यासाठी समजूत, सुरक्षितता, आदर, विश्वास, संवाद ह्या मूल्य-संकल्पना समजावून घेऊन त्या आत्मसात करणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी संवाद हवा, एकमेकांप्रति आस्थेची, सहृदयतेची संस्कृती हवी. अशा वातावरणातच प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा मिळत राहते.

आस्था हवी. संवाद हवा.

आपण मानतो ती मूल्यं मुलांमध्ये आपोआपच रुजली जातील असं मानता येत नाही. मुलं दिवसाचे फक्त दोनच तास खेळघरात येतात. त्यांच्या सभोवतालच्या वातावरणात त्यांना स्पर्धा, शिक्षा, हिंसा यांना वारंवार सामोरं जावं लागतं.

एक अनुभव सांगते – खेळघर सुरू करून 7-8 वर्षं झाली होती. आम्ही मुलांची बँक सुरू केली होती. मुलं त्यात पैसे साठवत असत. या बँकेची व्यवस्था बघण्यात मुलांचा पुढाकार असे. बँकेत सुमारे 5000/- रुपये साठले होते. एक दिवस या पैशांची चोरी झाली. मुलांनी चोराला शोधायची मोहीमच काढली. जो मुलगा बँकेचे हिशोब बघत होता त्याच्याकडे संशयाचा काटा झुकत होता; पण हातात काही पुरावा नव्हता. वयानं थोडी मोठी असलेली 2-3 मुलं त्या मुलाच्या घरी गेली आणि त्याला बाहेर बोलावून एक जोरदार थोबाडीत दिली आणि ‘पैसे घेतलेत हे मान्य कर’ असं धमकावलं. त्या मुलानं खरंच पैसे घेतले होते. त्यानं ते मान्यही केलं. त्याच्याकडून पैसे घेऊन विजयी आनंदानं मुलं खेळघरात परतली. मुलांचं खेळघरावरचं प्रेम, जोडलेपण, त्यातून त्यांना आलेला राग, त्यांना माहीत असलेली पद्धत यातून त्यांच्या वर्तनानं आकार घेतला होता. पण हे सारं शिक्षेकडे, हिंसेकडे जाणारंच वागणं होतं. मुलांशी संवाद साधण्याची एक उत्तम संधीच आमच्या हातात आली होती!

वैयक्तिक आणि गटसंवादाच्या फेर्‍या झाल्या. ‘‘काकू, वस्तीत राहायचं तर अहिंसेनी राहून चालत नाही. जशास तसंच वागावं लागतं,’’ असे मुद्दे मुलांकडून वारंवार येत होते. मुलांनी योजलेल्या उपायांच्या परिणामांबद्दल बोलणं झालं. ज्याच्या हातून चूक घडली होती तो मुलगा खेळघरापासून कायमचा तुटेल, पुढच्या आयुष्यात तो सुधारेल की गुन्हेगारीकडे झुकेल अशा अनेक मुद्द्यांवर बोलणं झालं. आपली चूक मुलांच्या लक्षात येत होती. त्यानंतर मी आणि मुलांनी वेगवेगळ्या पद्धतींनी त्या मुलाशी संवाद साधायचा प्रयत्न केला; पण त्यानं प्रतिसाद दिला नाही. तो पुन्हा खेळघरात आलाच नाही. याची खंत माझ्या मनात घर करून राहिली. त्यानंतर आमच्या लक्षात आलं, की प्रत्यक्ष प्रसंग घडल्यावरच संवाद करणं पुरेसं नाही. मुलांबरोबर नियमितपणे साधकबाधक संवाद घडण्याची गरज आहे. त्यानंतर खेळघरात ‘संवाद-गट’ हा उपक्रम सुरू झाला. आठवड्यातून एकदा चौथीच्या पुढच्या मुलांबरोबर संवाद-गट घेतला जातो. इथे मुलांच्या प्रश्नांना, भावनांना, मोकळं बोलण्याला प्राधान्य दिलं जातं. आणि आपल्याला जे वाटतं ते विचारांच्या पातळीवर तपासून बघण्यासाठीदेखील प्रवृत्त केलं जातं.

संवाद-गट, खेळ, कला, सहली, विशेष कार्यक्रम अशा अनेक उपक्रमांमधून संवेदनक्षमतेनं विचार करणं, संवाद कौशल्यं, निर्णय घेणं, निर्णयांची जबाबदारी घेणं अशा अनेक जीवनकौशल्यांचा विकास होतो.

लेखाचा शेवट एक अनुभव सांगून करते.  

शिक्षकांच्या एका प्रशिक्षणात मी सत्र घेत होते. आमच्या खेळघरातली वयानं लहान अशी एक ताई अगदी मागच्या खुर्चीवर बसली होती. माईक नव्हता. सहभागी होता यावं म्हणून मी तिला पुढे रिकाम्या असलेल्या खुर्चीवर येऊन बसा, असं म्हटलं. तिनं ते ऐकलं नाही आणि तिथेच बसली. एका क्षणात माझ्या डोक्यात रागाची सणक गेली. आणि माझ्याही न कळत वाक्य गेलं, ‘मग नाही बसलात सत्राला तरी चालेल.’ पुढच्या काही क्षणांतच माझी चूक माझ्या लक्षात आली. राग पुसून मनातली आस्था जागी झाली; पण आता शब्द निघून गेले होते. काय करणार? पुढच्या 5-10 मिनिटांतच बोलण्याच्या ओघात मी माझंच उदाहरण घेतलं. काय काय घडलं ते सविस्तर मांडलं आणि ताईला सर्वांसमोरच माझं चुकलं असं सांगितलं.

तरीही, त्यानंतर दीर्घ काळ ताईचं मन दुखावलेलं राहिलंच. तीव्र रागाची भावना आपल्याला आपल्याही नकळत हिंसेकडे नेते. अजूनही माझ्या हातून चुका होतात… मात्र आता मला आपली चूक झाली हे लगेच लक्षात येतं, आणि दुसर्‍या क्षणी मी रागातून बाहेर पडू शकते. चुकीची भरपाई करण्यासाठी सज्ज होते… कामाला लागते.

कधीकधी  दमल्यानं, अति ताणामुळे माझ्या मनाचं आस्थेचं, प्रेमाचं  अस्तर विरळ व्हायला लागलेलं मला समजतं आणि रागाच्या आहारी जाण्याच्या आधीच मी स्वतःला वाचवते.

गेली 27 वर्षं करत असलेल्या या प्रवासानंतर, ‘खेळघरात आम्ही शिक्षा करत नाही’ हे म्हणायची ताकद आज मला जाणवते आहे. हे शक्य आहे, निश्चित घडू शकतं असा विश्वास मी या लेखातून देऊ इच्छिते.   

शुभदा जोशी

shubhada.joshi6@gmail.com

लेखक पालकनीती परिवारच्या विश्वस्त आणि खेळघर प्रकल्पाच्या संचालक आहेत.

अभिनंदन !!!
‘पालकनीती’ हे केवळ मासिक राहू नये, तर ‘पालकनीती परिवार’ नावाची संस्था असावी हा आग्रह शुभदाचाच. मासिकाच्या कामातही तिची मदत असे. मग 1996 साली तिनं पालकनीतीचं ‘खेळघर’ सुरू केलं.
यावर्षीच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या यादीत शुभदा आहे. तिचं हे यश खेळघराच्या सर्व साथींनी मिळवलेलं आहे. आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान वाटतो.
संजीवनी कुलकर्णी