नीला आपटे
तसं काही आमच्या शाळेचं धर्मविषयक धोरण लिखित स्वरूपात अस्तित्वात नाही; पण महात्मा फुले प्रेरणास्थान असलेली आणि धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचार मार्गदर्शक मानणारी ही शाळा आहे. धर्म मुलांपर्यंत पोचवण्यासाठी शाळेमध्ये काय करावं यापेक्षा काय करू नये हे शाळेनं निश्चित केलेलं आहे. तेच शाळेचं धोरण आहे असं म्हणायला हरकत नाही.
शाळा हे सार्वजनिक ठिकाण आहे. सर्व धर्म – पंथ – जातींच्या मुलांना येथे स्थान आहे. त्यामुळे आपल्या संविधानानुसारही शाळेसारख्या सार्वजनिक ठिकाणी एखाद्याच धर्माची उपासना करणं चुकीचं आहे. सर्व जाती – धर्म – पंथांच्या मुलांना शाळा ‘आपली’ वाटली पाहिजे, सर्वसमावेशक असली पाहिजे असा आमच्या शाळेचा प्रयत्न असतो. शाळेतला कुठलाही कार्यक्रम सरस्वती पूजनानं सुरू होत नाही. मात्र प्रसंगानुरूप ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, महात्मा गांधी, आदि महापुरुषांच्या प्रतिमेला हार अर्पण करून किंवा शाळेच्या दर्शनी भागात असलेल्या फुलेंच्या पुतळ्याला शाळेत येणार्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मालार्पण करून अभिवादन केलं जातं. शाळेत देशातील महापुरुषांचे फोटो आहेत. अनेकांची जयंती – पुण्यतिथी साजरी केली जाते; परंतु कोणत्याही प्रकारचे धार्मिक कर्म – प्रतिमेला कुंकू लावणं, उदबत्ती अथवा निरांजन घेऊन ओवाळणं, प्रमुख पाहुण्यांना श्रीफळ देऊन स्वागत करणं, असे सोपस्कार केले जात नाहीत. शाळेचं धोरण म्हणून या गोष्टी अगदी ठामपणे पाळल्या जातात.
आमच्या शाळेत दोन शिक्षिका मुस्लीम धर्मीय (विशेष म्हणजे या दोघी मराठी आणि कन्नड भाषेच्या शिक्षिका आहेत; अर्थातच, त्यांची शिक्षणं त्या त्या माध्यमातून झालेली आहेत), एक शिक्षिका ख्रिश्चन, तर इतर सर्व शिक्षक हिंदू आहेत. सर्व शिक्षकांचे आपापसातले संबंध खेळीमेळीचे, आपुलकीचे आहेत. धर्म त्यांच्या मैत्रीच्या आड कधी येत नाही; पण आमची इच्छा असूनही आमच्या शाळेत अन्य धर्मीय मुलं फारशी येत नाहीत. बेळगाव शहरात चार मोठ्या कॉन्व्हेंट शाळा आहेत, त्यामुळे ख्रिश्चन मुलं बहुधा इतर शाळांमध्ये जात नाहीत. उर्दू माध्यमाच्याही सरकारी आणि निमसरकारी शाळा आहेत. तिथे बहुसंख्य मुसलमान मुलं जातात. तसाही हल्ली बहुसंख्य पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. त्यामुळे थोडीफार जी मुसलमान मुलं उर्दू व्यतिरिक्त माध्यम निवडतात, ती मराठी किंवा कन्नड या परिसर-भाषा निवडण्याऐवजी इंग्रजी माध्यमाची निवड करतात असं चित्र दिसतं (आमच्या शाळेत शिकवणार्या शिक्षिकासुद्धा). शाळेत इतर धर्मीय मुलं अजिबात नाहीत. त्यामुळे सहज मैत्रीतून एकमेकांच्या धर्मांची ओळख होण्याचं वातावरण सहजसुलभ नाही. तशी ओळख मुद्दाम करून देण्यासाठी काही वेगळं करणं म्हणजे मोठी जोखीम वाटते. कारण एक तर शाळेचे सर्व पालक हिंदू असताना आणि कधीकधी काही पालकांनी विचारणा केलेली असतानाही शाळेनं कोणत्याही प्रकारच्या हिंदू धार्मिक कार्यक्रमांना, कृतींना शाळेत जागा दिलेली नाही. गणेशोत्सव, सरस्वती पूजन वगैरे सण जाणीवपूर्वक ठामपणे नाकारले आहेत. त्यामुळे अन्य धर्मांची ओळख करून देण्यासाठी त्या धर्मांचे सण, ख्रिसमस किंवा ईद वगैरे, मुद्दाम साजरे करणं म्हणजे नाहक विरोध ओढवून घेण्यासारखं आहे, जे शाळा किंवा शिक्षणसंस्था म्हणून आम्ही आजवर करू शकलेलो नाही.
खरं तर धर्मनिरपेक्षता किंवा संविधान मानणार्यांना नेहमीच या विरोधाभासाला तोंड द्यावं लागतं. रूढ अर्थानं तुम्ही स्वतःचा धर्म नाकारता आणि अन्य धर्मीयांशी असलेली मैत्री व्यक्त करण्यासाठी तुम्हाला सण – समारंभांशिवाय अन्य औचित्य मिळतच नाही. तुमचे धार्मिक सण नाकारणं आणि इतर धर्मीयांचे सण भाईचारा जपण्याच्या हेतूनं साजरे करणं हे खूपच अप्रशस्त वाटतं.
मग धर्मच पूर्णपणे नाकारायचा का? तेही शक्य नाही. तो तर आपल्या समाजाचा, व्यक्तिगत जीवनाचा अविभाज्य घटक; होता, आहे आणि असेल.
मला स्वतःला धर्म ही गोष्ट हवेसारखी वाटते. हवा प्रदूषित झाली, तरी ती असतेच. आपण हवेचं अस्तित्व नाकारू शकत नाही. तिच्याशिवाय आपल्याला जगताही येत नाही. हवेत वेगवेगळे घटक असतात. आपण श्वास घेताना सगळीच हवा आत घेतो. पण त्यातलं प्राणतत्त्व – प्राणवायू तेवढाच आपलं शरीर ठेवून घेतं आणि अन्य घटक बाहेर सोडून देतं. तसंच आता धर्माचं करायला हवंय. सर्व धर्मांतली प्राणतत्त्वं – शाश्वत मानवी मूल्यं, सत्य – प्रेम – करुणा – शांती, हीच आपण प्राणवायू म्हणून स्वीकारावीत आणि बाकीची हवा बाहेर सोडून द्यावी. असं केलं तर मानवधर्मच खरा धर्म म्हणून आपोआप पुढे येईल. आता ही शाश्वत मानवी मूल्यं न्याय, स्वातंत्र्य (सत्य), समता, बंधुता (प्रेम – करुणा), समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या रूपात आपल्या संविधानात समाविष्ट आहेतच. या सर्व मूल्यांचं अंतिम ध्येय ‘शांती’ हे आहे. मला वाटतं, की शाळेच्या संदर्भातही आपण हाच धर्म मानायला हवा.

धर्म ही खरंतर अमूर्त संकल्पना आहे. आज धर्माचं दृश्य रूपातील अस्तित्व म्हणजे धार्मिक उपासना-पद्धती, सणसमारंभ, रीतीरिवाज, परंपरा वगैरे. त्यामुळे शाळेच्या बाबतीत धर्माचा विचार करताना या सर्व दृश्य गोष्टी केल्या जातात की नाही हेच लक्षात घ्यावं लागेल. आणि मग या निकषांवर आमच्या शाळेत रूढार्थानं धार्मिक गोष्टी होत नसल्यानं आमची शाळा धर्मनिरपेक्ष आहे असं नक्कीच म्हणता येईल.
तशी शाळेत रोज प्रार्थना म्हटली जाते. यातल्या पाच प्रार्थना मराठी आणि आमची प्रादेशिक भाषा कन्नड असल्यामुळे एक कन्नड प्रार्थना आहे. सर्व प्रार्थना, व्यापक अर्थानं, मानवी मूल्यं अधोरेखित करणार्या आहेत. खरा तो एकची धर्म, देह मंदिर चित्त मंदिर, सदाचार संकल्प संकल्पना दे, हीच आमुची प्रार्थना, सर्वात्मका शिवसुंदरा, अशा पाच दिवसांच्या पाच प्रार्थना आहेत. याशिवाय संविधानाची प्रस्तावना व राष्ट्रगीत सामूहिकपणे म्हणणं हाही रिवाज आहे. शाळेची प्रार्थना अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरेल संगीताच्या साथीनं होते. श्रवणीय असते. मुख्य म्हणजे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रार्थनेला हजर असतात आणि स्वतः प्रार्थना म्हणतात.
आता धर्माच्या अंगानं प्रार्थनेचा विचार करायचा झाल्यास एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल ती ही की, प्रार्थना हात जोडून, म्हणजेच हिंदू पद्धतीनं म्हणण्याची प्रथा शाळेत रूढ झालेली आहे. शाळेतल्या अन्य धर्मीय शिक्षिकाही हात जोडूनच प्रार्थना म्हणतात. हे करणं त्यांना खरोखर मनापासून रुचत असेल का, शाळेच्या आणि सहकार्यांच्या दडपणाखाली त्यांना हे करावं लागत असेल का, असे प्रश्न मनात येतात; पण नंतर, गावातल्या कॉन्व्हेंटमधल्या मुलांनाही प्रार्थनेसाठी चर्चमध्ये नेलं जातं हे आठवतं आणि मग हे असं करणं काही चुकीचं नाही अशी मी मनाची समजूत घालते. मात्र आज हा लेख लिहिताना, इतर बाबतीत आम्ही धार्मिकता पाळत नाही असं ठामपणे लिहिताना, प्रार्थनेची गोष्ट मनाला खटकली. पण तरीदेखील ‘हात जोडणं’ चुकीचं आहे असं म्हणावंसं वाटत नाही. खरंच हे चुकीचं आहे का? धार्मिक आहे का? की ही भारतीय पद्धत आहे असं म्हणायचं? कुणी नवीन व्यक्ती भेटली, की आपण पटकन नमस्ते, नमस्कार, असं लगेच म्हणतोच ना! ते अगदी सवयीचं झालेलं असतं. हात जोडून अभिवादन करणंही अंगवळणी पडलेलं असतं…
घरातल्या धार्मिक कार्यक्रमांप्रमाणेच शाळेतले कार्यक्रमही परंपरा आहे म्हणून चालू राहतात असं मला वाटतं. शाळेत अनेक वर्षं गणेशोत्सव साजरा केला जातो. तो एकदम बंद कसा करायचा? तो चालू ठेवला पाहिजे का, असा प्रश्नही शिक्षकांच्या मनात येत नसावा. महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये – सरकारी शाळांमध्येदेखील – शारदोत्सव हा वार्षिक कार्यक्रम आहे. अनेक शाळांमध्ये याला जोडूनच वार्षिक स्नेहसंमेलन किंबहुना हेच वार्षिक स्नेहसंमेलन मानलं जाते. माणसाला एकत्र येऊन उत्सव साजरे करायला आवडतात. हे एकच कारण शाळेत धार्मिक सण साजरे करण्यामागे वाटतं. याला शैक्षणिक मूल्य काय असा विचार कोणी करत नाही. शाळा हे सार्वजनिक ठिकाण आहे आणि त्यामुळे सार्वजनिक पद्धतीनं साजरे केले जाणारे सर्व कार्यक्रम शाळेत साजरे करायचे, शालेय उपक्रम म्हणून साजरे करायचे, अशी एक प्रथाच निर्माण झालेली दिसते. हे सगळे उत्सव का करायचे असा प्रश्न एखाद्या शिक्षकाच्या मनात येतही असेल; परंतु धर्म ही अत्यंत संवेदनशील गोष्ट असल्यामुळे तो विचारण्याचे धाडस करत नाही. कारण असं विचारणं म्हणजे धार्मिक भावना दुखावणं असा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात बदल करण्याची कठोरता क्वचितच कोणी दाखवतं.परिणामी हे कार्यक्रम परंपरेनं चालू राहतात.
आमच्या शाळेत पुरोगामी विचारांचे कार्यक्रम वरचेवर होतात. अनेकांच्या बोलण्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल उल्लेख येतो. परंतु शाळेतले अनेक शिक्षक, विशेषतः शिक्षिका, व्रतवैकल्यं, उपासतापास करणारे आहेतच. अनेकांच्या घरात सत्यनारायणाच्या पूजा घातल्या जातात. धार्मिक सहिष्णुता म्हणून अशी व्रतं करण्याला आम्ही बंधनं घालू शकत नाही आणि व्यक्तिगत जीवनात अशी धार्मिक व्रतवैकल्यं का करायची असा प्रश्न स्वतःला विचारून ती सोडण्याचं आणि धर्म – परंपरा – रूढी संपवण्याचं काम तथाकथित सुशिक्षित शिक्षकवर्ग करत नाही. अर्थातच, असे शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलताना कधीच व्रतवैकल्यांच्या विरोधात मत मांडू शकणार नाहीत. मग विद्यार्थ्यांच्या मनावर असे संस्कार होणारच आहेत. शाळेत याविषयी बोलणारे शिक्षक नाहीत आणि घरात तर धार्मिक कर्मकांडं विपुल प्रमाणात केली जातात. याचा परिणाम अर्थातच पूर्णपणे धार्मिक मानसिकतेची पिढी घडवण्यात होतो. मला वाटतं सर्व धर्मांची ओळख शालेय वातावरणात करून देणं अवघड आहे. तशी ती आग्रहपूर्वक केली, तर खूप कृत्रिमपणे करावी लागेल. म्हणून धार्मिक गोष्टींचा शाळेत समावेश न करणं हेच शाळांचं धार्मिक धोरण असायला हवं.
सर्व धर्मांकडे समाजानं सहिष्णुतेनं पाहणं, दुसर्या धर्माचा द्वेष न करणं, ही मूल्यं मुलांना देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा आणि त्या अनुषंगानं, प्रत्येक धर्मानं शाश्वत मानवी मूल्यंच कशी सांगितली आहेत हे आवर्जून सांगावं.
शिक्षकांची निवड करताना किंवा मुलांना प्रवेश देताना आमच्या शाळेत धर्म अजिबात पाहिला जात नाही. उलट सर्व स्तरावर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व असावं असाच शाळेच्या व्यवस्थापकीय सदस्यांचा विचार असतो. परंतु प्रत्यक्षात असं करणं आजवर साध्य झालेलं नाही.
दुसर्या धर्माचा अनादर होतो आहे अशी घटना शाळेत माझ्या आठवणीत कधी घडलेली नाही. मात्र स्वतःच्या धर्माचा दुरभिमान मुलांच्यात रुजतो आहे हे जाणवलं आहे. हाच दुरभिमान पुढे कधीतरी इतर धर्मीयांच्या द्वेषात रूपांतरित होईल हे नक्की. म्हणूनच अशा वेळेला याबद्दल मुलांशी संवाद साधण्याचा, स्वतःच्या धर्माचा दुरभिमान बाळगणं आणि दुसर्या धर्माचा अनादर करणं कसं चुकीचं आहे, असंवैधानिक आहे, हे पटवून देण्याचा काही समविचारी शिक्षक आणि मी प्रयत्न करतो. त्याहून अधिक काही करायला हवं; पण व्यवस्थेला धक्का न लावता ते कसं शक्य आहे?
नीला आपटे

neeluapte512@gmail.com
लेखक गेली 25 वर्षे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करतात. सध्या बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन शाळेत शिक्षण-संयोजक म्हणून कार्यरत. विनोबांच्या शिक्षण-विचारांचा विशेष अभ्यास व बुनियादी शिक्षणविषयक लेखन करतात.
`
