रोहिणी जोशी
1985 पासून साधारण 2020 पर्यंत मी एनडीएमध्ये ‘टेम्पररी बेसिस’वर नोकरी केली. मी तिथे अॅकॅडमिक इन्स्ट्रक्टर / सिविलियन शिक्षक होते. कॅडेटना भाषा शिकवणे हे माझे काम होते. वर्गामध्ये आवश्यक तेवढी शिस्त नेहमीच पाळली जायची. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिक्षा द्यायचा प्रसंग कमीच आला. कोणी विद्यार्थी काही चुकीचे वागला, तर त्याचा रिपोर्ट मी ऑफिसला द्यायचा असे. तिथे दंडपाल किंवा अॅड्ज्युटंट (साहाय्यक) अशी एक पोस्ट आहे. दंडपालाचे काम गैरवर्तणूक करणार्याला दंड देणे आणि त्या दंडाची / शिक्षेची अंमलबजावणी करणे असे असते. कोणत्या गैरवर्तणुकीला कोणती शिक्षा मिळेल ह्याची माहिती विद्यार्थ्यांना म्हणजेच तिथल्या कॅडेट्सना आधीच देऊन ठेवलेली असे.
सैन्य-प्रशिक्षणाची खासियत म्हणजे त्यांच्याकडील शिस्त. वरून दिलेल्या ऑर्डर्सचे खालच्या वर्गाने निमूटपणे पालन करणे अपेक्षित असते. म्हणून आज्ञाधारकपणा अंगी बाणवण्यासाठी सैन्य-प्रशिक्षणात मुख्यत: शिक्षा वापरतात. 1985 मध्ये मी नोकरीला लागले, त्यावेळेस कॅडेटना विचारत नसत, की तू अमूक एक गैरवर्तन केले आहेस का? ‘तुझ्यावर हा ‘चार्ज’ आलेला आहे, तुला ही शिक्षा दिलेली आहे, ती तू पूर्ण कर’ बस. एवढेच असे. कधीकधी तर शिक्षा कशासाठी आहे, हे माहीत नसतानासुद्धा ती पूर्ण करायला लागत असे. हळूहळू जशी वर्षे गेली, तसे आताचे कॅडेट्स ‘मी वर्गात नव्हतो असे तुम्ही म्हणता आहात; पण मी होतो,’ एवढे म्हणण्याची हिंमत करतात.
वरिष्ठांनी घेतलेला निर्णय अमलात आणण्यासाठी सैन्यात खालच्या पदांवरचे लोक असतात. प्रत्येकजण स्वत:चे डोके वापरायला लागला, तर अंमलबजावणी होऊ शकणार नाही. वर्गातल्या मुलांनी वर्गात शेंगा खाल्ल्या आणि टरफले टाकली. सगळ्यांना शिक्षा मिळाली. एखाद्या विद्यार्थ्याने ती घ्यायला नकार दिला, तर त्याला घरी पाठवून देतील. ‘मी टरफले टाकली नाहीत, मी शिक्षा घेणार नाही’ असा अन्यायाला प्रतिकार करणारा बाणा सैन्यामध्ये चालत नाही. अशा बाबतीत मौन-पालन करणे अपेक्षित असते. झालेल्या गोष्टी उगीचच सगळ्यांना सांगत बसणे अपेक्षित नसते. अशा परिस्थितीत प्रशिक्षण देणार्या संस्थेवर मोठी जबाबदारी असते. चुकीची शिक्षा दिली जाऊ नाही असा प्रयत्न नक्कीच केला जातो. काही जरुरी वाटले तर कौन्सिलर्ससुद्धा असतात विद्यार्थ्यांच्या मदतीला. कौन्सिलर्स हे जणू काही प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व्हप्रमाणे असतात. परंतु एखाद्या वेळेस चुकूनमाकून एखाद्याच्या बाबतीत चुकीचा निर्णयही होऊ शकतो; म्हणून म्हणतात, की कॅडेट फक्त बुद्धिमान असून भागत नाही, त्याची भरपूर रगडा खायची तयारी असावी लागते.
माझ्या नोकरीच्या सुरुवातीला मला वाटले, की सिंहगड किल्ला ही चांगली जागा आहे. आपण तिथे ट्रिपला जाऊ शकतो. मी रशियन भाषा शिकवत असल्याने मुलांना ट्रिपचे वर्णन रशियन भाषेत करण्याची संधीही मिळेल. तसा विषय मी वर्गात काढला. पण कॅडेट काही उत्साही दिसले नाहीत. जास्त विचारले तर म्हणाले, ‘‘तो आमच्यासाठी पिकनिक स्पॉट नाही. स्टॅमिना वाढावा म्हणून आम्हाला तिथे पाठीवर वजन देऊन पळायला पाठवतात. दिलेल्या वेळेत जमले तर ठीक, नाही तर पुढच्या रविवारी परत जायला लागते.’’
इथे काही पद्धती पूर्वापार पाळायचा प्रघात आहे. उदा. हंटर स्क्वाड्रनच्या कॅडेटनी नेहमी मिशा ठेवायच्या. दुसर्या एका स्क्वाड्रननी (तुकडी) ‘फिल्म बघायला जायचे’. आवडती / नावडती कशीही असली, तरी ठरलेल्या दिवशी सगळ्यांनी जायचेच. थंडीचा गणवेश कधी घालायचा? 1 नोव्हेंबरपासून – तशी आज्ञा झाल्यावर; थंडी वाजते आहे म्हणून नाही.
इथे वेळ नेहमी अपुरा पडत असतो. 24 तास काही ना काही तरी चालू असते. मग त्यामध्ये शिक्षेसाठी वेगळा वेळ देता येतोच असे नाही. आहे त्या वेळातच कॅडेटना शिक्षा भोगायची असते. झोपेचा, आरामाचा, विरंगुळ्याचा वेळ शिक्षेत घालवावा लागला तर आपोआपच शिक्षा अधिक होते. शिक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. शाळेत जसे ‘अमूक वाक्य तमूक वेळा लिहून आण’ म्हणून सांगितले जाते, तसे इथेही सांगू शकतात. इतर शिक्षांमध्ये पेरीफेरी रोडवरून किती वेळात पळत चक्कर मारून यायचे असेसुद्धा असते. ठरावीक अंतर कापण्यासाठी आपल्याकडे चालत जाणे, पळत जाणे असते. परंतु इथे कॅडेटना रोलिंग करतसुद्धा दिलेले अंतर कापावे लागू शकते. रोलिंग करताना अंगात शर्ट नसला, तर रस्त्यावरील खडे जास्त टोचतात. कधीकधी सांगितलेले अंतर एकमेकांना खांद्यावर घेऊनदेखील पार करावे लागते. युनिट टेस्टमध्ये नापास झाल्यावर सुट्टीत घरी जाता येत नाही. जी काय उणीव असेल ती इथे राहून भरून काढायला लागते. स्क्वाड्रन – बटालियन पातळीवर अनेक स्पर्धाही असतात. त्यात उत्साहाने भाग घ्यायचाच असतो.
इथे राहणारे विद्यार्थी हे सीनियर – ज्युनियर असतात. वरच्या वर्गातला विद्यार्थी हा खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचा सीनियर असतो. मग सीनियरनी दिलेली आज्ञा ज्युनियरनी पाळायची असते. अशी आज्ञा देताना सगळ्यांना पोच असतोच असे नाही. तेही नवीनच सीनियर झालेले असतील, तर त्यांना आपला रुबाब दाखवायचा असतो. मात्र शिक्षा देताना एकाने दुसर्याला स्वतःच्या हाता-पायाने मारायचे नसते. सीनियरने शिक्षा सांगायची आणि ज्युनियरनी ती पाळायची. ह्यामुळे ज्युनियरला झेपेल एवढी सीनियर करू शकेल, रॅगिंग होऊ नये, अशी अपेक्षा असते.
शिक्षा हा येथील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षेला शिक्षा न समजता मी कुठे कमी पडलो आणि काय सुधारणा केली, म्हणजे मला माझ्या करिअरमध्ये पुढे जाता येईल हे समजणे आवश्यक असते. त्यातल्या त्यात कुठली शिक्षा कमी किंवा मला पत्करण्यासारखी आहे हे जाणून मार्गक्रमण करत राहणे उपयोगी पडते.
सैन्यातले प्रशिक्षण हे कॅडेटला शत्रूला तोंड द्यायला तयार करत असते. इथे लेचेपेचेपणा, मवाळपणा चालतच नाही. शिक्षेशिवाय सैन्य-प्रशिक्षण देता येणार नाही, अशीच या लोकांची पक्की खात्री असते. ह्या प्रशिक्षणात कॅडेटच्या मनावर त्यांना फक्त बिंबवायचे नाही तर कोरायचे असते, की इतर कुठल्याही गोष्टीहून आज्ञापालन हेच सर्वात जास्त आवश्यक आहे.
रोहिणी जोशी
joshrohini@gmail.com
लेखक एनडीएमध्ये रसायनशास्त्र आणि रशियन भाषा शिकवत असत. ‘‘मला मुलांची आवड होती, पण लग्नाचा विचार नव्हता. त्यामुळे दोन मुलांनी मला आणि मी त्यांना दत्तक घेतले,’’ असे त्या म्हणतात.
माणसाच्या पिल्लाला मोठे झाल्यावर पायावर उभे राहता यावे, विचाराने या दुनियेत काही उभे करता यावे, मनाप्रमाणे मार्ग आखता यावा, यासाठीची तयारी सैन्य-प्रशिक्षणात करून घेतली जाते. त्या त्या जिवाच्या क्षमतेनुसार त्याच्या त्याच्या मन-मनगट-मेंदूचा पूर्ण विकास साधता यावा असे शिक्षण असावे आणि प्रत्येकाला ते मिळावे. अनेक प्रकारचे शिक्षण मुलांच्या आणि पालकांच्या आवडीनुसार, समाजातल्या मानमरातबानुसार घ्यावे लागते… सैनिकी व्यवसायाबद्दल अनेक कुटुंबांत विशेष आवड असते, त्या व्यवसायाची गरज, म्हणून ते सैनिकी शिक्षण घ्यावेच लागते. ते मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी योजलेले आणि दिलेले नसते. पण तिथले कॅडेट्स मुलेच तर असतात. त्यामुळे दिलेल्या शिक्षेचा मुलावर काय परिणाम होतो हे त्यांच्या शिक्षकांनी आणि सर्वांनी वेगळ्याने समजावून घ्यायला हवे.
आत्ता दिले जाणारे सैनिकी शिक्षण हे मुलांसाठी योग्य म्हणता येणार नाही; या सगळ्यामधून शिकून बाहेर पडताना स्वतःमधली संवेदनशीलता, दया, क्षमा, कारुण्य राखून ठेवण्याला कितीशी जागा मिळणार? खरे तर आत्मविश्वास, भलेपणा, सहकार्य हेदेखील धरून ठेवणे अनेकांना कठीण जाते. त्यामुळे या शिक्षणप्रकारात वेगवेगळ्या स्तरावरच्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही अधिक दिसतात.
संपादक
