ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल ह्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कविता आणि कादंबरी असे दोन्ही साहित्यप्रकार सहजतेने हाताळले. नैसर्गिक साधेपणा हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मध्यमवर्गीय जीवनातले नकळते बारकावे त्यांनी आपल्या लेखणीतून उलगडून दाखवले. ‘लगभग जयहिंद’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आणि ‘नौकर की कमीज’ ही पहिली कादंबरी. ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ ह्या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. २०२४ साली त्यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या निधनाने साहित्य-विश्वाने एक सच्चा साहित्यिक गमावला आहे.

पालकनीती परिवारातर्फे विनोद कुमार शुक्ल ह्यांना भावपूर्ण आदरांजली. 

विनोद कुमार शुक्ल ह्यांचे सर्जनाचे विश्व : एक दृष्टिक्षेप 

पराग, टाटा ट्रस्टच्या निधि क़ाज़ी ह्यांनी विनोद कुमार शुक्ल ह्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना

माझ्या जडणघडणीत विनोद कुमार शुक्ल ह्यांचं साहित्य सतत माझ्या सोबत होतं. माझ्या घडणीत त्यांच्या साहित्याचा ‘हात होता’ म्हणण्यापेक्षा ‘सोबत होती’ म्हणणं वेगळं आहे. ‘सोबत’ ह्या शब्दातून एक नातं प्रतीत होतं; पुन्हा पुन्हा परतता येणारं नातं; या नात्यात मैत्रीची ऊब जाणवते आणि तरीही त्याकडे साक्षी भावानं बघता येतं. सोबत ही कुठल्याही माणसाची मूलभूत गरज आहे.  मला म्हणायचं आहे ते विनोदजींच्याच कवितेचा आधार घेऊन सांगते :  

हताशा से एक व्यक्ति बैठ गया था

व्यक्ति को मैं नहीं जानता था

हताशा को जानता था

इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया

मैंने हाथ बढ़ाया

मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ

मुझे वह नहीं जानता था

मेरे हाथ बढ़ाने को जानता था

हम दोनों साथ चले

दोनों एक दूसरे को नहीं जानते थे

साथ चलने को जानते थे।

निर्मिकासाठी त्याच्या रचना वाचकांपर्यंत पोचण्याचा मार्ग बनवत असतात हे जसं खरं आहे तसंच ह्या रचनांच्या माध्यमातूनच आपण वाचक कलाकारांबद्दल थोडंफार समजू-जाणू शकतो हेही खरं. विनोद कुमारांच्या साहित्यकृतीतून एक प्रगाढ समंजसपणा डोकावतो. त्यांची ही ओळ पाहा : “बनते कहाँ दिखा आकाश” (कविता: बना बनाया देखा आकाश) किंवा मग “किसी नए अधूरे को अंतिम न माना जाए” (कविता: कोई अधूरा पूरा नहीं होता). ह्या किंवा त्यांच्या इतरही कवितांमध्ये एक अनामिक शांतता आहे. वाचणाऱ्याला ही शांतता अन्तर्बाह्य प्रवास घडवून आणते. असा प्रवास जिथून परतल्यावर माणूस शांत होतो, एक विलक्षण रितेपण अनुभवतो. त्यातून कविता समजण्याचा पैस विस्तारतो. सहसा कलाकाराच्या मांडणीवर ती समजण्याची जबाबदारी असते. वाचणाराही ह्या जबाबदारीचं ओझं वाहत असतोच. ह्याच टप्प्यावर मघाशी म्हटलं तशी साथी-सोबतीची गरज लागते. आणि विनोद कुमारांचं साहित्य ती साथ देतं, तो विश्वास देतं – अर्थाच्या डोहात खोल खोल शिरून, नाकातोंडात पाणी जाऊन पुन्हा त्यातून सूर मारून यशस्वीपणे बाहेर पडण्याचा तो विश्वास असतो.  

‘गोदाम’ नावाची त्यांची एक कथा आहे. ती वाचूनही आपल्याला अशीच अनुभूती येते – एक भाडेकरू त्याच्या राहत्या घरावर तिथे एक झाड आहे म्हणून प्रेम करत असतो. ही प्रेमाची भावना, त्यापासून दुरावल्यामुळे जाणवणारी असाहाय्यता, तगमगच आपल्याला त्या निःशब्द शांततेकडे घेऊन जाते. कदाचित विनोद कुमारांनीही तिचा अनुभव घेतलेला असावा.   

ही त्यांची आणखी एक कविता बघा : 

घरबार छोड़कर संन्यास नहीं लूंगा

अपने संन्यास में

मैं और भी घरेलू रहूंगा

घर में घरेलू

और पड़ोस में भी।

एक अनजान बस्ती में

एक बच्चे ने मुझे देखकर बाबा कहा

वह अपनी माँ की गोद में था

उसकी माँ की आँखों में

ख़ुशी की चमक थी

कि उसने मुझे बाबा कहा

एक नामालूम सगा।

जीवन कळण्यासाठी कुठल्या शर्यतीत उतरण्याची गरज नसते. थबकून, थांबून, अनुभव घेऊन ते समजून घ्यावं लागतं. ह्यासाठी विनोद कुमारांच्या कविता मला नेहमीच हाकारत आलेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्या मी अजून वाचलेल्या नाहीत; पण मला खात्री आहे, की त्याही मला अशाच आकलनाच्या अंगणात येण्याचं आमंत्रण देतील. 

अशा संधींची दारं आम्हा वाचकांसाठी उघडून दिली म्हणून विनोदजींचे आभार!

आणि स्वतःच्या मनातली शांतता त्यांनी शब्दबद्ध केली, त्याबद्दल कृतज्ञता!

माझे हे विचार माझ्या अगदी छोट्याशा वाचनानुभवावर बेतलेले आहेत. विनोद कुमार शुक्ल ह्यांच्या साहित्य-भांडाराचा केवळ एक झरोका मी आत्तापर्यंत उघडला असावा. हा झरोका आणखी उघडेल, विस्तारेल. कदाचित ह्या खिडकीच्या पलीकडे जाऊन अनंत अशा विश्वात माझा प्रवेश होईल. तेव्हाही विनोदजींचं साहित्य माझ्या सोबत असेलच!!

निधि क़ाज़ी 

अनुवाद : अनघा जलतारे