रमाकांत धनोकर
आम्ही मूळचे शेगावचे. १९३९ साली वडील कामानिमित्त पुण्यात आले. ते रेल्वेमध्ये गार्ड होते. आम्ही सहा भावंडे; तीन बहिणी, तीन भाऊ. पहिल्या तिघांचा जन्म आमच्या गावी झाला. नंतरचे तिघे पुण्यात जन्मले. मी शेंडेफळ. आम्ही दारूवाला पुलाजवळ एका मस्त वाड्यात दहा बाय बाराच्या एका खोलीत राहत होतो. माझ्या जन्मानंतर शेजारची आणखी एक खोली भाड्याने घेतली. सुदैवाने आमच्या दोन्ही खोल्या कोपऱ्यावरच्या होत्या, त्यामुळे तिन्ही बाजूला गॅलरी मिळत असे. तिथे आम्ही उन्हाळ्यात एकापाठोपाठ एक सर्वजण झोपू शकत होतो. आमच्या पुढे राहणाऱ्या भाडेकरूंना गॅलरीत झोपताना आम्हाला यायला जायला एका बाजूला जागा सोडावी लागायची. आम्हाला तशी कटकट नाही ह्याचासुद्धा आम्हाला कोण अभिमान वाटत असे. त्या खोल्यांचे भाडे होते प्रत्येकी साडेबारा रुपये.
बाबा स्वभावाने एकदम कडक. रागावले म्हणजे एकदम काठीनेच बडवत. बाकी घरात खाण्यापिण्याची एकंदरीत चैन होती. मंडईतून टोपल्या टोपल्यांनी फळे आणणे हा त्यांच्या आवडीचा भाग होता. दोन खोल्या आणि सहा भावंडे; त्यामुळे घर म्हणजे फक्त जेवायची आणि झोपायची जागा असाच आमचा समज होता. अभ्यासाला शनिवार वाडा, पाताळेश्वर किंवा मित्राच्या घरी जाणे साहजिकच वाटायचे.
माझी आई शाळेत गेलेली नव्हती. ती लहान असताना मास्तरीण घरोघरी मुली गोळा करायला येत असे. तेव्हा आमची आजी आईला सांगायची, “लप, लप. मास्तरीण आली!” आई बाजेखाली लपायची. अशी मग आई काही शाळेत गेली नाही. मावशी मात्र चौथीपर्यंत शिकली. हां, मात्र आई तिचे रोजचे पैशाचे व्यवहार व्यवस्थित सांभाळू शकत असे. ती भाजी घेऊन आली की मी तिला विचारे, “कितीची भाजी आणली?” आई म्हणायची, “रुपयाला वीस पैसे कमी.” तिला बहुधा ३०, ४०, ५० पर्यंत सोपे वाटत असावे. ८० हा आकडा म्हणायला जमत नसावे.
वडील तापट असल्यामुळे एक धाक कायमच सोबत करत राहायचा. आणि आईचे अस्तित्व तो धाक सौम्य करायचा. घरात एक ‘कॉट’ होता. त्याला मच्छरदाणी लावून वडील झोपायचे. बाकी आम्ही सर्वजण खाली. सकाळी उठून गाद्या काढल्याशिवाय घरात हलायला जागाच नसायची. त्यामुळे गाद्या काढण्याचे काम नित्यनेमाने, ताबडतोबीने आणि व्यवस्थित करावे लागे. कॉटवर मागील बाजूस गाद्या मांडून, त्यावर चादर टाकून तिथे रेलून बसता येईल अशा पद्धतीने रचण्याची छान सवय झाली.
आमच्या वाड्यात १८ भाडेकरू होते. वाड्यात नळ दोन आणि संडास तीन. घरी सर्वांना अंघोळीला पुरेल एवढे, म्हणजे साधारण २२ ते २५ घागरी पाणी खालून वर आणावे लागे. त्यामुळे शरीर श्रमाला चांगले सरावले. वडील रेल्वेत असल्यामुळे केवळ; पण आम्हाला साधारण दर वर्षी गावाला जायला मिळे. आम्ही सहा भावंडे असलो, तरी आम्हाला एकच काका आणि एकच मावशी होती. नो मामा आणि नो आत्या. चुलत बहिणी दोन आणि मावस भावंडे सहा. मावशीकडे राहायला धमाल यायची. मावशीकडून आम्हाला अकोल्याला घ्यायला बैलगाडी यायची. त्यात बसून मावशीच्या घरी जाताना, यायला किती वेळ लागला आणि जाताना तो किती कमी होतो ते गाडीवान आम्हाला सांगत असे. परत जाताना वेळ कमी लागायचा कारण आपल्याला घरी जायचे आहे हे बैलांना कळत असे. घराच्या ओढीने ते जास्त वेगाने जात. रानातून जाताना आम्हाला तो मोरही दाखवी. मावशीचे घर, तिच्याकडच्या म्हशी हे सारे आम्हाला खूप मनापासून आवडत असे. म्हैस आणि तिच्या रेडकासाठी सरकी भिजत घालणे, त्यांना बादलीभर ताक प्यायला देणे ही सगळी जबाबदारीची कामे मावशी आमच्यावर सोडायची. म्हशीची धार मात्र कधी काढली नाही. कदाचित ते काम जबाबदारीचे नसावे. मावशीच्या शेतात मोठी विहीर होती. वडील आम्हा सर्व बहीणभावांना तिथे पोहायला घेऊन जात. मावशीकडे मोठी आमराई होती. आमराईत जाताना स्वच्छ सुंदर ओढा लागे. ओढ्यातले पाणी इतके नितळ स्वच्छ असे, की त्यातला खडा न् खडा स्वच्छ दिसत असे. मासोळ्या, खेकडेही दिसत. एकंदरीत मजा वाटायची. पाण्यातले सुंदर पांढरे आवडते गोटे गोळा करण्यात आमचा भरपूर वेळ जात असे. आमराईतून आंबे उतरवले, की ते पिकू घालायला एक स्वतंत्र खोली होती. मावशी सकाळी उठून पिकलेले एक टोपलीभर आंबे बाहेर काढायची आणि आम्हाला दम भरायची, “हे आंबे खा, जवनीत हात घालू नका.” मावशीच्या घरासमोरच बाजार भरे. तिथे आम्ही आंबेपण विकले. अशा उन्हाळी सुट्ट्या आम्हाला लाभल्या – हे आमचे मागच्या जन्मीचे पुण्यच असे वाटण्यासारखी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे.
पुण्याला घरून स्टेशनला जाताना आई, मी, माझ्यापेक्षा मोठी बहीण, पेट्या आणि एक पितळी फिरकीचा तांब्या एवढे टांग्यामध्ये असत; इतर मंडळी टांगा टाकत स्टेशनवर येत. मला अजूनही स्पष्ट आठवते, की जवळपास सहावी-सातवीपर्यंत मी आईजवळच झोपत असे. त्यावरून भावंडांकडून माझी टिंगलटवाळी व्हायची. आई मात्र मला काही म्हणत नसे. लहानपणापासून मी डाव्या हाताने लिहायचो. यासाठी मला लोकांकडून अनेक वेळा बोलणी खावी लागत. मी जेवतोसुद्धा डाव्या हाताने म्हणून नातेवाईकांकडून आईसमोरसुद्धा प्रसाद मिळत असे. ‘अरे डाव्या हाताने आपण xxx धुतो आणि त्याच हाताने तू जेवतो?’ परंतु ‘तू उजव्या हाताने लिही’ किंवा ‘उजव्या हाताने जेव’ असे आई मला कधीही म्हणाली नाही. ती फक्त माझ्याकडे पाहत असे. तिच्या त्या नजरेत मला ती माझ्या पाठीशी आहे असा विश्वास दिसत असे. त्यामुळे कोणी काहीही म्हणो पण आई माझ्यासोबत असेल तर मला अस्वस्थ होण्याचे कारण नाही, अशाच थाटात मी असे. मी दुसरीत असताना माझ्या डाव्या हाताला जखम झाली होती, तेव्हा दोन-तीन आठवडे मी काही करू शकत नव्हतो, लिहूही शकत नव्हतो. तेव्हा मात्र आई मला म्हणाली, “आपल्याला दोन हात आहेत. तू दुसऱ्या हाताने लिही.” आणि त्या काळात खरेच मी उजव्या हाताने लिहायला लागलो होतो. मी खेळायला गेलो, मित्राकडे अभ्यासाला गेलो तरी फक्त तिला सांगून जाणे मला पुरेसे वाटे आणि ते तिलाही मान्य असे. वडील आम्हा मुलांना काही बोलले, त्यांनी आम्हाला मारहाण केली, तर ती त्यात पडत नसे. क्वचित कधीतरी विरोध दर्शवायची; पण याबाबत तिचे अस्तित्व आपल्या सोबत आहे असे मला तरी वाटत असे. त्यामुळे मी मला आवडतील अशा गोष्टी करत राही.
माझा मोठा भाऊ आणि मोठी बहीण हे नगरपालिकेच्या शाळेत शिकले. त्यानंतरच्या दोघी जणी आगरकर हायस्कूलमध्ये आणि आम्ही धाकटे दोघे भारत हायस्कूलमध्ये. आता मोठे झाल्यावर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भारत हायस्कूलमध्ये चित्रकलेचा एक वेगळा मोठा प्रशस्त हॉल होता. त्यामध्ये अनेक चित्रे लावलेली असत. चित्रकलेच्या तासाला आम्ही मुले ओळीने त्या हॉलमध्ये जाऊन चित्र काढत असू. त्यामुळे चित्र काढणे ही एक फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे असे माझ्या मनावर बिंबले गेले असावे. चित्रकलेला आम्हाला वनारसे सर होते. मी जरा चांगली चित्रे काढत असल्यामुळे त्यांचा थोडा लाडका असावा. ते मला एखादा जास्तीचा कागद आणि रंग देत. कुठे चित्रकलेची स्पर्धा असली, तर आवर्जून सांगत. आमच्या मोठ्या भावाला बाकी कलेची आवड होती. तो स्वतः चित्रेही काढत असे. घरी आवर्जून किशोर मासिक आणायचा. किशोरमधली रवी परांजपे, पद्मा सहस्रबुद्धे, प्रभाशंकर कवडी यांची चित्रे मी मन लावून पाहत असे. काही काळ आमच्या घरात किर्लोस्कर, स्त्री ही मासिकेही येत. दिवाळीमध्ये दीपावली हा दिवाळी अंकसुद्धा तो आणायचा. त्यामधली दलालांची चित्रे मी विशेषकरून भारावून पाहत असे. त्या चित्रांच्या प्रतिकृतीसुद्धा मी शाळेत असताना रंगवल्या आहेत. त्यामुळेही माझ्या आयुष्यात चित्रकलेचे एक पाऊल पुढे पडले असावे.
शाळेमध्ये माझे नाव दाखल करणे याव्यतिरिक्त वडील शाळेत आल्याचे मला अस्पष्टही आठवत नाही. फक्त १९६२ मध्ये आलेल्या पुराच्या दिवशी मला घ्यायला माझी बहीण शाळेत आली होती. मुलांना शाळेतून घरी न्यायला कुणी येत नसे, सर्व मुले आपापली घरी जात. आमच्या शाळेत फक्त एक-दोन मुलांना घ्यायला त्यांचे आजोबा यायचे – तेव्हा आम्हा मुलांना वाटायचे, की काय बावळट मुले आहेत, त्यांना घ्यायला यावे लागते.
वडिलांबद्दल मला धाकाशिवाय इतर कुठलीही भावना कधीही शिवली नाही. अभिनव कला विद्यालयात प्रवेश घेतल्यावर पेपरसाठी रोज दहा पैसे लागत. ते त्यांना मागण्याचेसुद्धा धाडस होत नसे. तरी आमचे सरकारी कॉलेज असल्यामुळे वार्षिक फी फक्त ५०० रुपये होती. आमच्या वर्गात अशी काम करून पैसे कमवून कॉलेजशिक्षण घेणारी बरीच मंडळी होती. एका मित्राकडे तर एक पायजमा आणि एक शर्ट एवढेच कपडे होते. त्याच्या आईने त्याला स्वतःच्या हातातली एकमेव सोन्याची बांगडी दिली आणि म्हणाली, “माझ्याकडे एवढेच आहे. यातून तुला जमेल ते तू कर.” ती माऊली त्याच्या पाठीशी उभी राहिली. आज तो एक प्रथितयश मूर्तिकार आहे. एक मित्र सकाळी दूध टाकत असे. त्याच्याकडे पैसे असत. तो आमचा ‘फायनान्सर’ होता. म्हणूनच कॉलेजमध्ये आपण खूप वेगळे आहोत असा ‘फील’ कधी आला नाही. अशा परिस्थितीत एखाद-दुसऱ्या वेळेस न सांगता घरातून पैसे घेणे असेही घडले. तसे पुन्हा करायला लागू नये म्हणून आम्ही मित्र स्क्रीन प्रिंटिंग, आकाशकंदील करून देणे, ग्रीटिंग्स तयार करणे अशा काही गोष्टी करत असू. शक्यतो वडिलांना पैसे मागायला लागू नयेत असा दृष्टिकोन. त्या कामासाठी बाहेर राहायला लागले तरी त्यावर वडिलांची फार बोलणी खावी लागत; पण तरी काही गोष्टी करत राहायची सवयच लागली.
आमचे एक-दोन मित्र कसब्यातच राहत. त्यापैकी एकाच्या आईला चित्राची आवड होती. सिनेमामध्ये तिला विशेष रस होता. त्यामुळे सिनेनटांची चित्रे काढणे आणि तिच्याकडून कौतुक करून घेणे हे उन्हाळ्याच्या सुट्टीत चाले. यामुळेही आयुष्यात चित्रकला थोडी पुढे सरकली. त्याचे घर मोठे होते. बुटके. वर पत्रे होते. त्याच्याकडे आम्ही मोठ्ठा, अर्ध्या खोलीभर किल्ला करत असू. बघायला खूप मित्रमंडळी येत. मित्राचा भाऊ दिवाळीत मोठ्या आकाराचे वेगळे कंदील आवर्जून करायचा. कधी बोट, कधी विमान, कधी रथ… बांबूच्या काड्यांचे कंदील करून, त्यावर पेपर चिकटवून ते घराबाहेर लावायचा. त्यांचे घर अगदी रस्त्यावर असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय असायचा. कॉलेजला असताना मी पडद्याच्या कापडाच्या कटपिसेसची शबनम बॅग शिवून विकत असे. अशा सर्व उपद्व्यापांतून बरेच काही शिकलो.
आमच्या वडिलांसमोर मात्र ‘चित्रकला शिकून पोट कसे भरणार’, ‘तुझे लग्न कसे होणार’, ‘तुला कोण मुलगी देणार’… असे प्रश्न आ वासून उभे असत. आता विचार करताना जाणवते, की शेगावसारख्या खेड्यातल्या नॉन-मॅट्रिक माणसाला या सर्व प्रकाराची माहिती नसणे स्वाभाविकच होते. फक्त त्यावेळेस ते धाडस करून पुण्याला आले. नाहीतर आम्ही सगळे शेगावात जन्मलो असतो. त्या काळी त्यांनाच काय पण अभिनवला प्रवेश घेतल्यानंतर मलाही पुढे काय याची अजिबातच कल्पना नव्हती. फक्त ‘हे मला आवडतं’ इतकेच कळत होते. डिप्लोमा पास झाल्यानंतर मला ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये नोकरी मिळाली. पहिला पगार हातात पडला तो १८० रुपये. त्यातून मी आईसाठी दीडशे रुपयांची एक साडी खरेदी केली. घरी गेल्यानंतर बाबांचे उद्गार कानावर पडले, “पाच वर्षांपूर्वी मी तुला सांगितलं होतं, की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ‘प्यून’ची जागा खाली होती. चांगला सहाशे रुपये पगार मिळणार होता. पण कोणी ऐकत नाही. एवढी पाच वर्षं घासून, इतका खर्च करून पगार किती तर १८० रुपये…” आता त्यांना काय माहीत, की पाच वर्षे घासून माझ्या आवडीला आमच्या मास्तरांनी किती पैलू पाडले असतील. वडिलांसोबत इतरही अनेक बारीकसारीक न पटणाऱ्या गोष्टी घडत असत. त्याहीमुळे असेल, बाबा कायम चार हात दूरच राहिला. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. आमच्या घरात बाबा रोज देवपूजा करत; पण त्यांनी आम्हा भावंडांपैकी कोणालाही ‘तू पूजा कर’ असे कधीही म्हटले नाही. आम्हालाही कोणाला त्याचे काही खास वाटले नाही. आमच्या कुटुंबात पहिले घर, गाडी घेणे हे माझ्या बाबतीत घडल्यामुळे नंतर कधी ते काही बोलले नाहीत.
आत्ता इतक्यात ‘प्रगत शिक्षण संस्थे’चे ‘मातीत रुजलेलं आभाळ’ या पुस्तकाचे काम करण्याचा मला योग आला. पुस्तकाचे नाव मला मनापासून आवडले. ‘आभाळ’ म्हणजे प्रचंड ऊर्जा असलेली मुले. प्रगत शिक्षण संस्थेच्या मातीत ती रुजत आहेत आणि प्रत्येक मूल पुढे जाऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात आभाळाएवढे काम करू शकेल – असे मला या नावातून वाटले. इथे ह्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करण्यामागे कारण आहे. माझ्या मनात आले, की आईने मला ‘ती माझ्यासोबत आहे’ अशा विश्वासाची माती पुरवली नसती, तर पुढे जाऊन काही करण्याचे बळ माझ्यात कितपत निर्माण झाले असते? म्हणूनच, इंग्रजीत वाचलेले एक वाक्य मला आठवते – ‘आय अॅम ए ममाज बॉय विथ माईंड ऑफ माय ओन!’
रमाकांत धनोकर

dhanokar@gmail.com
चित्रकार. पालकनीतीचे विश्वस्त. चित्रांशी दोस्ती करण्याचे उपक्रम मुलांसह सतत करत आले आहेत.
ऐक…
बाळा, ‘अज्जिबात नको’ ऐक,
‘नको करू’ही ऐक,
‘असं नाही केलं पाहिजे’ हेही ऐक,
‘अशक्य आणि अशक्य!’
आणि ‘कधीच होणार नाही’ही ऐक,
‘असं कधीच घडलं नाही!’ हेसुद्धा ऐक.
मग,
माझ्याजवळ ये आणि ऐक,
“सगळं काही घडू शकतं बाळा,
सगळं काही घडू शकतं बाळा,
अगदी सगळं सगळं काही!”
————————————–
मूळ कविता : शेल सिल्व्हरस्टाईन
मराठी अनुवाद : फारूक काझी
