बाल-मजुरांच्या दृष्टीतून पैसा…
गेल्या काही वर्षांत झालेल्या विविध अभ्यासांनुसार भारतात बाल-मजुरी करणार्या मुलांमध्ये कचरावेचकांचे प्रमाण वाढत चाललेले आहे. आज बाल-मजुरी करण्यार्या मुलांपैकी एक तृतीयांश मुले कचरा-वेचण्याचे काम करतात. 2014 साली या कचरा-वेचक मुलांमध्ये शिक्षणाविषयी आवड-गोडी निर्माण व्हावी ह्या हेतूने आम्ही जळगावात ‘आनंदघर’ या उपक्रमाची सुरुवात केली. शिकण्याची आणि शिकवण्याची प्रक्रिया आनंददायी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. खूप लहान वयातच पैसा हाती आल्याने त्याबद्दल त्यांची स्वत।ची अशी काही मते आहेत, हे मुलांना शिकवताना, त्यांच्याशी गप्पा मारताना समजून येत होते.
21 वर्षांचे होईपर्यंत शिकायचे आणि त्यानंतरच कमवायला सुरुवात करायची, अशी सर्वसाधारण मानसिकता आपल्याला मध्यमवर्गीय समाजात दिसून येते; पण कचरा वेचणारी, मजुरी करणारी मुले वयाच्या साधारण पाचव्या वर्षापासून कामाला सुरुवात करतात. अगदी सुरुवातीला, मुख्यत। पालकांसोबत किंवा मोठ्या भावा-बहिणीसोबत मुले कामाला जायला लागतात. प्लास्टिकच्या बाटल्यांची झाकणे, पिशव्या गोळा करून, त्या नेऊन भंगारवाल्याला विकणे इथून या मुलांच्या कामाला सुरुवात होते.
या मुलांना असलेली पैशाची समज, पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असतो, हे समजून घेण्यासाठी आम्ही आनंदघरातील मुलांशी गट-चर्चेच्या माध्यमातून संवाद साधला. ही सगळी मुले 6 ते 14 वयोगटातील होती. वयाच्या साधारण कितव्या वर्षी त्यांनी कमवायला सुरुवात केली? सगळ्यात पहिल्यांदा किती पैसे मिळाले होते? सगळ्यात जास्त पैसे आजपर्यंत कधी मिळाले आणि किती? मिळालेल्या पैशांवर कोणाचा हक्क असतो? आई-वडिलांकडून खर्चायला काही पैसे मिळतात का? पैसा चांगला की वाईट? ह्या प्रश्नांच्या अवती-भोवती ही चर्चा झाली.
कामातून आलेले व्यवहार ज्ञान
अत्यंत लहान वयात ही मुले दुकानात जाऊन, स्वत।च आर्थिक व्यवहार करायला लागतात. त्यांचे व्यवहारज्ञान खूप पक्के असते. 5-6 वर्षाचे मूलदेखील एकटे जाऊन, दुकानातून हवे ते खरेदी करते आणि उरलेले पैसे अगदी व्यवस्थित परत घेते. त्याने केलेल्या कृतीला शैक्षणिक भाषेत गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार म्हणतात हे त्याला कदाचित ठाऊक नसेल; पण गणिती संज्ञा व्यवहारात मांडण्यात मात्र ती पटाईत आहेत. आपला फायदा होतोय की नुकसान, ते त्यांना अगदी बरोबर कळते.
पैशावर हक्क कुणाचा?
मुलांनी कमावलेल्या पैशांवर मुख्यत। घरातील वरिष्ठ व्यक्तींचा हक्क असतो. मात्र मुलांनी केलेल्या मेहनतीचा मोबदला म्हणून त्यातील काही पैसे त्यांना परत दिले जातात. ह्या पैशातून मुले मग चॉकलेट, वेफर्स आणि बर्याचवेळा गुटखा, तंबाकू देखील विकत घेतात. गमतीचा भाग म्हणजे लहान मुलांना खर्चासाठी जास्त पैसे मिळतात तर मोठ्यांना कमी. मात्र बर्याचदा मुलींच्या मानाने मुलग्यांकडे पालकांचा झुकता कल असलेला पाहायला मिळतो. याची बोचणी मुलींच्या मनात कायम राहते आणि ती त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहते.
‘‘जत्रेला गेल्यावर आईने सगळ्यांसाठी वस्तू घेतल्या; पण मला नाही घेतली. ती नेहमी असंच करते.’’ अशी तक्रार सीमा करते तर, ‘‘पप्पा विशालला जास्त पैसे देतात; पण मला नेहमी कमी देतात.’’ असा सल अनिता बोलून दाखवते.
पैसे साठवायला पाहिजेत
मिळणार्या 2-3 रुपयातून सुद्धा काही पैसे साठवावेत याकडे बर्याच मुलांचा कल असतो. विशालला दररोज 5 रुपये मिळतात. त्यातल्या 3 रुपयांचे तो चॉकोलेट घेतो, तर 2 रुपये साठवतो. पैसे साठवण्याचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो. शाळेत जाणारी काही मोजकी मुले, पुस्तके, पेन, पेन्सिल यासाठी पैसे साठवतात, तर इतर मुले सणासुदीला पैशाची गरज पडते म्हणून देखील पैसे साठवतात. बहुतांश मुलांच्या पालकांचे कुठलेही बँक खाते नसते किंवा असले तरी ते केवळ नावालाच असते, त्यामुळे जवळ-जवळ प्रत्येकाच्या घरी पालकांचा आणि मुलांचा मिळून असा ‘बचत-गा’ असतो. सणासुदीला, एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणून, यात सगळे मिळून पैसे साठवतात. ठरावीक महिन्यांनी तो गा फोडला जातो आणि त्यातले पैसे वापरले जातात.
‘‘मी पैसे साठवतेय कारण मला माझ्या बाच्या दहाव्याला (दशक्रिया विधीला) पैसे पाहिजे. पैसे जमले की मगच आम्ही दहावा करणार.’’ – नेहा
घरातल्या कार्यक्रमांसाठी पैसे साठवण्याचा निर्णय जरी पालकांनी घेतलेला असला, तरी पैसा साठवणे ही आपलीदेखील जबाबदारी आहे असे मुलांना वाटत असते आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात. उदा. गणपतीच्या काळात घरी भंडारा (सगळ्या वस्तीला वरण-बट्टी-वांग्याच्या भाजीचे जेवण) असल्याने प्रतीक्षा तिला मिळालेले पैसे आईजवळ साठवायला देते तर चंचल तिच्या आईने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता साठवून ठेवते. ‘‘आई – बाबांकडे आधीच पैसे नसतात, तरी पण ते माझे लाड करायला मला पैसे देतात. पण मला ते खर्च करायला नाही आवडत. मग मी ते सगळे पैसे साठवते आणि घरात एखादी अडचण आली की ते पैसे आईला परत करते’’, असे ती म्हणते.
बहुतांश घरी वडिलांना दारूचे व्यसन असल्याने, साठवलेले पैसे त्यांनी वापरू नयेत म्हणून आई आणि मुलांचे प्रयत्न सुरू असतात.
कधी कधी पैसे सापडतात सुद्धा
खांद्यावर झोळी घेऊन फिरणार्या ह्या कचरा-वेचक मुलांकडे समाज कायमच संशयाच्या नजरेतून बघत आलेला आहे. चहाच्या टपरीवर काम करणारी, बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट वाहणारी मुले दिसली, की त्यांच्याकडे सहानुभूतीने, मायेने बघितले जाते. मात्र हे प्रेम कचरा-वेचकांच्या वाट्याला येत नाही. चोरी करण्याच्या हेतूनेच ही मुले आपल्या गीत फिरताहेत असा ग्रह लोकांच्या मनात असतो. साडेचार वर्षे या सगळ्या मुलांसोबत घालवल्यावर एक गोष्ट आम्ही ठामपणे सांगू शकतो, की काही मोजके अपवाद वगळता बहुतांश मुले अत्यंत प्रामाणिक, प्रेमळ आणि जीव लावणारी असतात.
‘काम करत असताना कधी अचानक रस्त्यावर पैसे सापडतात, अशा वेळी तुम्ही काय करता?’ असे विचारल्यावर ‘सगळ्यात आधी आम्ही ते घरच्यांच्या नजरेस आणून देतो, आजूबाजूला उभे असणार्या कोणाचे ते आहेत का… याची चौकशी करतो, एखाद्या घरासमोर पैसे पडलेले असतील तर त्या घरातल्या लोकांना विचारतो’, अशी उत्तरे आली. ‘मग हे पैसे तुम्ही उचलत नाही का?’ असे विचारल्यावर ‘असे कसे उचलायचे? कोणाचे तरी असतील न ते’, ‘पैसे हरवले तं आपल्याले जसं लई दुख व्हतं, तसंच त्यांलेबी होत असीन ना’, ‘जर तिथे कोणीच नसेल तरच ते पैसे आम्ही घेतो’, अशी उत्तरे मिळाली.
मला भरपूर पैसा मिळाला तर…
‘भरपूर पैसा मिळाला तर काय कराल?’ ह्याचे उत्तर सगळ्यांनीच ‘आमच्याकडे घर नसल्याने सगळ्यात आधी आई-वडिलांसाठी स्वत।चे घर बांधू’ असेच दिले. मात्र याचसोबत ‘जर खूप पैसा आला तर स्वत।सोबत इतरांना पण घर बांधून देऊ’, असेही सांगितले. ‘पक्कं घर नाहीये ना.. पावसाळ्यात लई त्रास होतो, छप्पर गळतं, पाणी घरात घुसून जातं. लई नुस्कान होतं. म्हणून लई पैसे मिळाले तर सगळ्यात पहिले मी आमच्या घरासोबत बाकीच्यानले बी घर बंधीसन देईन’, असे अविनाशने सांगितले.
स्वत: अत्यंत गरिबीत आणि हलाखीच्या परिस्थितीत राहणार्या या मुलांना स्वत।सोबतच, ते ज्या समाजाचा भाग आहेत त्याची देखील काळजी आहे ही बाब अक्षरश: अद्भुत आहे.
‘‘मला जर खूप पैसे मिळाले तर खूप सारे पेढे खाईन. कारण मला पेढे लई आवडतात; पण पैसे नसल्याने खाता येत नाहीत’’ – दिव्या
पैसा चांगला असतो की वाईट?
‘‘आपुन काम करता, मग आपल्याले पैसे मिळता, मग आपण काहीबी जेऊ शकता, म्हणून पैसा चांगला राहतो’’ – रोशनी
रोशनीच्या मते पैसा चांगला असतो, कारण आपण कचरा वेचतो आणि तो विकून आपल्याला जो पैसा मिळतो त्यातूनच आपले पोट भरते. प्रतीक्षाच्या मते तो वाईट असतो कारण पैशासाठी कोणीही वाईट काम करायला लगेच तयार होते. यशच्या मते पैसा चांगला पण असतो आणि वाईट पण! ‘आपल्याकडे रोजच्या खर्चाला लागेल इतका पैसा नक्कीच पाहिजे; पण पैशाची जास्त हाव करू नये.’
खूप लहान वयातच सुरू झालेले ‘पैसा कमवणे’ मुलांना व्यवहारज्ञाना-सोबतच धीटपणा देते. या चिमुकल्यांची समज एकीकडे आपल्याला थक्क करून सोडते, तर दुसरीकडे हा पैसा, त्यासोबत येणारा त्रास, जबाबदारीचे ओझे या बालमनाची निरागसता तर घालवत नाहीये ना… अशी चिंता देखील सोबत घेऊन येते.
‘‘पैसा वाईट असतो कारण पैशासाठी लोकं कुणाचाबी मर्डर करू शकता, कुणालाबी किडनॅप करू शकता.’’ – प्रतीक्षा
अद्वैत दंडवते
गेली 5 वर्षे ‘वर्धिष्णू – सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी’ या संस्थेअंतर्गत जळगाव शहरातील कचरा-वेचक तसेच बाल-मजूर मुलांना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत.