उत्तरा जाधव

अर्थ 

‘इंद्रधनुष्याची वाट’ (https://palakneeti.in/indradhanushyachee-vaat/) ह्या माझ्या पहिल्या लेखात माझी इंद्रधनुष्याच्या वाटेवरची वाटचाल कशी सुरू झाली ते तुम्ही वाचले. पुढचे अनुभव सांगण्याआधी काही संकल्पना स्पष्ट कराव्यात असे वाटते. 

LGBTIAQ चा अर्थ काय आहे?

हे समजून घेण्यासाठी आधी लिंग (Biological Sex – BS), लिंगभाव (Gender Identity – GI) आणि लैंगिक कल (Sexual Orientation – SO) म्हणजे काय हे जाणून घेऊ. 

लिंग (BS) – सामान्यपणे माणसांमध्ये दोन प्रकारच्या प्रजनन-शरीररचना म्हणजेच लिंग आढळून येतात. स्त्री-शरीररचना (स्त्रीलिंग) आणि पुरुष-शरीररचना (पुरुषलिंग). क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोघांचेही काही प्रजनन-अवयव विकसित झालेले दिसतात. तिला इंग्रजीत ‘इंटरसेक्स’ (Intersex) आणि मराठीत द्विलिंगी म्हणतात.   

लिंगभाव (GI) – शरीराचे लिंग कुठलेही असले, तरी ती व्यक्ती स्त्री म्हणून जग अनुभवते की पुरुष म्हणून, तो तिचा लिंगभाव असतो. बहुतांश व्यक्तींचा लिंगभाव त्यांच्या लिंगानुसार असतो; मात्र काही जणांमध्ये अशी संलग्नता असत नाही.  

लैंगिक कल (Sexual Orientation) – वयात आल्यावर मुलांमुलींना लैंगिक आकर्षण वाटू लागते. कुठल्या लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते तो त्यांचा लैंगिक कल असतो.  

लेस्बियन (L – Lesbian) –  अशी व्यक्ती जिचे लिंग (BS) स्त्रीचे असते, लिंगभाव (GI) स्त्री असतो आणि फक्त स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. 

गे (G – Gay) – अशी व्यक्ती जिचे लिंग (BS) पुरुषाचे असते, लिंगभाव (GI) पुरुष असतो आणि फक्त पुरुषांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते. 

बायसेक्शुअल (B – Bisexual) – अशी व्यक्ती जिचे लिंग (BS) स्त्रीचे असते, लिंगभाव (GI) स्त्री असतो आणि पुरुष आणि स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते,

किंवा

जिचे लिंग (BS) पुरुषाचे असते, लिंगभाव (GI) पुरुष असतो आणि पुरुष आणि स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण वाटते.

ट्रान्सजेन्डर – ट्रान्सवुमन (T – Transgender-Trans woman) अशी व्यक्ती जिचे लिंग (BS) पुरुषाचे असते, लिंगभाव (GI) स्त्रीचा असतो आणि लैंगिक आकर्षण स्त्री किंवा पुरुषाबद्दल किंवा स्त्री व पुरुष दोघांबद्दलही वाटू शकते किंवा कोणाच्याच बद्दल वाटत नाही. 

ट्रान्सजेन्डर – ट्रान्समॅन (T – Transgender-Trans man)  अशी व्यक्ती जिचे लिंग (BS) स्त्रीचे असते, लिंगभाव (GI) पुरुषाचा असतो आणि लैंगिक आकर्षण स्त्री किंवा पुरुषाबद्दल किंवा स्त्री व पुरुष दोघांबद्दलही वाटू शकते किंवा कोणाच्याच बद्दल वाटत नाही. 

इंटरसेक्स (I – Intersex) – अशी व्यक्ती जिचे लिंग (BS) द्विलिंगी असते, लिंगभाव (GI) स्त्री किंवा पुरुष किंवा दोन्हीही किंवा कोणताच नसतो आणि लैंगिक आकर्षण स्त्री किंवा पुरुषाबद्दल किंवा स्त्री व पुरुष दोघांबद्दलही वाटू शकते किंवा कोणाच्याच बद्दल वाटत नाही.

असेक्शुअल (A – Asexual) – अशी व्यक्ती जिचे लिंग (BS) स्त्री अथवा पुरुषाचे असते, लिंगभाव (GI) कोणताही असू शकतो; मात्र कोणाबद्दलही लैंगिक आकर्षण वाटत नाही.

क्वीअर (Q – Queer) – 

१. आपल्या लैंगिकतेबाबत खात्री नसलेल्या / मनात गोंधळ असलेल्या व्यक्तीला क्वीअर असे संबोधतात.  

२. LGBTIA व्यक्तींना एकत्रितपणे संबोधण्यासाठीसुद्धा क्वीअर हा शब्द वापरलेला असू शकतो.

अनर्थ कसा होतो? 

माणसांचे लैंगिक कल आणि त्यांच्या या सर्व छटा समजून घेतल्यावर लक्षात येते, की आपल्याभोवती इतकी विविधता आहे हेच आपल्याला आत्तापर्यंत फारसे माहीत नव्हते. ह्या अनभिज्ञतेमुळे अनेकदा, कळत नकळत, आपल्याकडून चुकीचे वागले जाऊ शकते. काही उदाहरणे पाहू –  

१. आपल्याला आजूबाजूला ट्रान्सजेंडर कम्युनिटी खूप दिसत असल्यामुळे सर्व LGBIQ व्यक्तींना ‘हिजडा’ म्हटले जाते. 

२. ‘वेगळे’ असलेले आपले मूल आपण स्वीकारतो असे एकीकडे म्हणताना पालक मुलांना सांगतात, की ह्याबद्दल बाहेर कोणाला काही सांगू नकोस. त्या मुलासाठी हे अतिशय अस्वस्थ करणारे आणि अपमानजनक असते. 

३. पालक म्हणतात, ‘हे असलं मूल? काय म्हणायचं याला? शी…’ 

   हे ऐकायला तुमच्या मुलाला किती वाईट वाटत असेल? 

४. काही पालक मुलांना मारतात. कोंडून ठेवतात. त्यांचा फोन काढून घेतात. 

५. काही पालकांना वाटते, की ही एक ‘फेज’ आहे. 

६. काही पालकांच्या मते हे पाश्चात्य समाजाचे अंधानुकरण आहे.

७. सर्वात जास्त धोकादायक बाब अशी, की एकदा व्यक्तीची खरी लैंगिक ओळख समजली, की लोक त्या व्यक्तीला न पाहिलेसे करून पुढे जाऊ लागतात. जणू आपल्यापुरते त्यांनी तिचे अस्तित्व पुसून टाकले आहे.   

सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की स्वतःविषयी तुमच्याशी किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलण्याआधी या समाजातली मुले स्वतःशीच खूप झगडलेली असतात. काही मुले स्वतःविषयी कधीच बोलू शकत नाहीत. आयुष्यभर आपली ओळख लपवून खोटे आयुष्य जगतात. मूल त्याची खरी लैंगिक ओळख सांगेपर्यंत पालकांचे त्याच्याशी वागणे वेगळे असते. मात्र वास्तव समजल्यावर पालक त्याच्याशी जे बोलतात, ते ऐकून त्या मुलाचा जगण्यातला रसच निघून जातो. अशा मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार खूप प्रबळपणे येतात. 

माणुसकी तुमच्या लेखी महत्त्वाची असेल, तर या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लैंगिक ओळखीबाबत क्वीअर समाज वेगळा असला, तरी त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेऊन आपण आदरपूर्वक कसे वागवू शकू याचा सर्वांनी विचार करायला हवा.   

या समाजातील मुलांशी आणि पालकांशी बोलण्याचे माझे अनुभव पुढच्या लेखात सांगते. 

उत्तरा जाधव 

uttaraad@gmail.com

गेली ४५ वर्षे प्रकाशन, आयटी आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण ह्या क्षेत्रात कार्यरत. सध्या ‘वंचित विकास’ ह्या संस्थेसाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करतात. आपले जग चांगले बनवण्यासाठी काम करण्यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.