‘आविष्कार शिक्षण संस्थेचा’ सहावा ‘अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार’ जळगावच्या ‘वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या प्रणाली सिसोदिया व अद्वैत दंडवते यांना प्रदान करण्यात आला. वर्धिष्णू संस्थेच्या वतीने कचरावेचक मुलांसाठी जळगाव, चोपडा तसेच अमळनेर येथे ‘आनंदघर’ चालविले जाते. प्रणाली पालकनीतीच्या संपादक गटाच्या सदस्य असून अद्वैत ह्यांचेही पालकनीतीशी मैत्र आहे. पालकनीती मासिकातून त्यांचे लेख वाचल्याचे वाचकांनाही स्मरत असेलच.
पालकनीती परिवारातर्फे प्रणाली व अद्वैत ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ह्या पुरस्काराच्या निमित्ताने प्रणाली ह्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या…

‘आविष्कार शिक्षण संस्थे’च्या वतीनं दिला जाणारा या वर्षीचा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार ‘वर्धिष्णू’ला मिळणार हे कळल्यापासून ते तो पुरस्कार मिळाला, ह्या सगळ्या काळात मनात एक खूप वेगळ्या प्रकारची भावना होती…
खरं तर अरुणदादांची आणि आमची कधी व्यक्तिशः भेट झाली नाही; परंतु ‘नरक – सफाईची गोष्ट’ या पुस्तकातून २०१३ साली आम्ही त्यांना भेटलो आहोत. त्याच वर्षी वर्धिष्णूच्या कामाची सुरुवात करताना आम्ही जळगाव शहरातील कचरावेचक समूहाचं सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण केलं. हे सर्वेक्षण करत असताना ‘नरक – सफाईची गोष्ट’ या पुस्तकात दिलेल्या अनेक घटना, त्यामागील कारणं, वंचित समूहाचं शोषण याबद्दलचं एकूण चित्र समजून घ्यायला खूप मदत झाली.
नाशिकहून आनंदनिकेतन शाळेची टीम आमचं काम बघायला जळगावला आली. त्यांनी आमची मुलं, ताई-दादा सर्वांसोबत वेळ घालवला, वर्धिष्णूचं काम अगदी मनापासून समजून घेतलं. निघताना त्यांनी त्यांच्या भेटीचं प्रयोजन सांगितलं आणि त्याक्षणी काय प्रतिक्रिया द्यावी कळेना… डोळ्यात पाणी आलं… शिक्षणक्षेत्रात एवढं मोलाचं काम उभं केलेल्या अनुभवी संस्थेकडून वर्धिष्णूला एवढा मोठा सन्मान मिळणार!
थोड्या दिवसांनी कळलं, की हा पुरस्कार आम्हाला ‘पालकनीती परिवारा’च्या ‘खेळघर प्रकल्पा’च्या प्रमुख शुभदा जोशी यांच्या हस्ते मिळणार आहे; म्हणजेच सुरुवातीपासून वर्धिष्णूच्या मार्गदर्शक (mentor) असलेल्या, आनंदघराच्या उभारणीत मोलाची साथ देणाऱ्या आमच्या शुभदाकाकूंकडून!!! हे म्हणजे चेरी ऑन द केक!
दुपारी आनंदनिकेतन शाळेला भेट आणि संध्याकाळी पुरस्कार वितरण असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप होतं. दुपारी शाळेत पोचलो. अगदी पहिल्या भिंतीपासून संपूर्ण शाळाभर मुलांचं, त्यांच्या कामाचं, त्यांच्या अनुभवविश्वाचं राज्य आहे. कम्माल बोलक्या भिंती आहेत शाळेच्या… शैक्षणिक साहित्याची सुंदर मांडणी करून शाळेतल्या तायांनी आम्हाला ते समजावून सांगितलं. लहान मुलांना हे साहित्य मोकळेपणी हाताळता यावं, फाटलं – तुटलं तरी काळजी नसावी म्हणून सर्व साहित्य हातानं बनवलेलं आहे. शाळेतली मला आवडलेली दोन भन्नाट ठिकाणं म्हणजे कलादालन आणि ग्रंथालय! अहाहा!!! कलादालन तर कला आणि अभिव्यक्तीचं भांडारच होतं.
संध्याकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. संपूर्ण कार्यक्रमात मनाला भावणारा साधेपणा होता. कुठलाही बडेजाव नाही. कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या एका सुंदर गाण्यानं झाली. शाळेच्या दीपाताई पळशीकर यांनी वर्धिष्णूचा गेल्या १२ वर्षांचा प्रवास सन्मानपत्रात मांडला होता. ते ऐकत असताना सुरुवातीपासूनचे दिवस भरभर डोळ्यासमोरून जात होते. प्रत्येका वाक्यानं मन भरून येत होतं. आनंदघरातली मुलं नजरेसमोर येत होती. सन्मानपत्रात दीपाताईंनी शब्दांची अत्यंत सुंदर गुंफण केली होती.
नाशिकच्या महापौर मा. हिमगौरी आडके आणि पालकनीती परिवाराच्या मा. शुभदा जोशी यांच्या हस्ते मी आणि अद्वैतनं हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आमचे ‘निर्माण’चे मित्र अतुल आणि मुक्ता यांनी आमची मुलाखत घेतली. २०१३ सालापासून आजपर्यंतचा वर्धिष्णूचा प्रवास त्यांनी अगदी सहज गप्पांच्या रूपात लोकांसमोर उलगडत नेला. कार्यक्रमाला आलेल्या सर्व मंडळींनी अगदी मनापासून वर्धिष्णूचं काम समजून घेतलं, कौतुक केलं. या पुरस्काराच्या निमित्तानं आनंदनिकेतन आणि वर्धिष्णू परिवाराचं एक सुंदर नातं निर्माण झालं.

पुरस्कार स्वीकारताना मंचावर आम्ही दोघंच दिसत असलो, तरी वर्धिष्णूमध्ये आतापर्यंत मुलांसोबत तळमळीनं काम करणारे आमचे सर्व ताई-दादा, आमची मुलं आणि आमच्यावर विश्वास दाखवणारे आमच्या मुलांचे पालक या सर्वांचा हा पुरस्कार आहे!
कार्यक्रमातली मला स्वतःला भावलेली अजून एक गोष्ट म्हणजे कार्यक्रमादरम्यान आमची अडीच वर्षांची लेक अगदी स्वच्छंदपणे मंचावर आणि हॉलमध्ये बागडत होती; परंतु कुणाच्याही चेहऱ्यावर त्रासाची किंवा वैतागाची भावना नव्हती. महत्त्वाचं म्हणजे मलाही त्याचं दडपण आलं नाही. मला वाटतं, की ‘मूलकेंद्री’ शिक्षण आणि तसं वातावरण हा आनंदनिकेतन शाळेचा गाभा असल्यामुळेच भर कार्यक्रमात चालणाऱ्या लहान मुलांच्या दंग्याकडे ही सर्व मंडळी सहजपणे बघू शकली.
कार्यक्रमात प्रत्येकाच्या बोलण्यात वारंवार येत होतं, की आज अरुणदादा असते, तर त्यांना आमचं, आमच्या कामाचं खूप कौतुक वाटलं असतं. त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलेले नसलो, तरी शाळेतल्या तायांशी बोलताना, शाळेचं काम समजून घेताना अरुणदादा कसे असतील हे समजत गेलं.
मुलांना केंद्रस्थानी ठेवून, शाळेच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक दरी कमी करण्यासाठी तळमळीनं काम केलेल्या व्यक्तीच्या नावानं पुरस्कार मिळतोय हा वर्धिष्णूच्या प्रवासातला सन्मानाचा क्षण आहे. याचं श्रेय जातं ते तळागाळातून येणाऱ्या आणि आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आमच्या मुलांना!!!
प्रणाली सिसोदिया

pranali.s87@gmail.com
‘वर्धिष्णू’ संस्थेच्या सहसंस्थापक आणि पालकनीतीच्या संपादकगटाच्या सदस्य. त्यांना कुमारवयीन मुलांबरोबर काम करायला आवडते.
