आपण ज्या काळात असतो, जगतो, वाढतो त्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिघात सजगपणे पालकत्व निभावणे हे सोपे काम नाही. त्यासाठी वैयक्तिक पालकत्वासोबतच सामाजिक पालकत्वाचा विचारदेखील महत्त्वाचा ठरतो.

अर्थात, त्यात घडोघडी मर्यादा जाणवतात, योग्यायोग्यतेचा निर्णय करणे अवघड होते. मात्र हा कुणा एकाचा प्रश्न नाही. सभोवतालच्या घटनांकडे उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या सर्वांना ह्या परिस्थितीची जाणीव होतच असते. ह्यासाठी ह्या काळात वैयक्तिक तसेच सामाजिक पालकत्व निभावणार्‍या सर्वांशी जोडून घ्यावे, म्हणजे प्रश्नांची समज विस्तारेल, उत्तरांच्या दिशा नजरेत येतील ही ‘पालकनीती’ या विचारधारेमागची कल्पना आहे.

पालकनीती परिवार या संस्थेची ‘पालकनीती’ हे मासिकपत्र आणि ‘खेळघर’ हा वंचित मुलां-मुलींच्या शिक्षणाला वाहिलेला प्रकल्प अशी दोन कामे सुरू आहेत.

पूर्वी ‘माहितीघर’ हे पालकत्वाबद्दलचे वाचनालय चालवले जात होते, तसेच संस्थेच्या वतीने ‘कृतज्ञता’ आणि ‘प्रोत्साहन’ असे वार्षिक पुरस्कार दिले जात असत. हे दोन्ही प्रकल्प आता थांबवण्यात आलेले आहेत. ‘संदर्भ’ नावाचे द्वैमासिकही सुरू करण्यात आले होते. त्यासाठी आता ‘संदर्भ’ ही वेगळी संस्था स्थापन करून त्या संस्थेला हे द्वैमासिक चालवायला दिले आहे.