१९९६ साली पालकनीती मासिकाच्या कामाच्या पायावरच ‘खेळघर’ हा उपक्रम सुरू झाला. पुण्यातील कोथरूडमधील लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतील मुलांना आनंददायक बालपण मिळावे, त्यांना आनंदाने शिकता यावे, मोकळेपणाने व्यक्त होता यावे, यासाठी खेळघर प्रयत्न करते. परिस्थितीने निर्माण केलेले अडथळे दूर करून या मुलांना शिकण्यासाठी मोकळे अवकाश मिळवून देणे हे खेळघराचे ध्येय आहे.
खेळघरातील आनंदाने शिकण्याची अनुभूती इतरही वंचित मुलां-मुलींपर्यंत पोचावी म्हणून २००७ पासून खेळघर इतर संस्थांमधील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचे कामदेखील करते.
‘खेळघर’ म्हणजे काय?
‘खेळघर’ या नावामागेही एक विचार आहे. मुलांच्या दुनियेत ‘खेळ’ ह्या गोष्टीला वेगळेच महत्त्व आहे. लहान वयात मुलांसाठी जग समजून घेण्याचे ‘खेळ’ हे एक माध्यम आहे. खेळघरात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांना आवडणारी दुसरी जागा म्हणजे ‘घर’. घरांतून मिळणाऱ्या प्रेम, आधार, संगोपन, सुरक्षितता यांची मुलांना खूप आवश्यकता असते. अशा मुलांना अत्यंत आवडणाऱ्या दोन गोष्टींपासून ‘खेळघर’ हे नाव बनले आहे..
