डॉ. आनंद करंदीकर ह्यांचे नुकतेच निधन झाले.

ज्ञानपीठ कवी विंदा करंदीकर ह्यांचे पुत्र, आयआयटी मुंबई येथून बी.टेक., आयआयएम कलकत्ता येथून एम.बी.ए. आणि पुढे पी.एचडी, अशी झळझळीत शैक्षणिक कारकीर्द असूनही एवढीच त्यांची ओळख खचितच नव्हती. शांत, विवेकी, संवेदनशील मन आणि तितकीच ठाम विचारसरणी असलेला सामाजिक कार्यकर्ता, लेखक, विचारवंत ही त्यांची  खरी ओळख.

कारकिर्दीच्या सुरुवातीची पाच वर्षे त्यांनी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम केले. त्यानंतर ते सामाजिक चळवळीकडे वळले. ‘युवक क्रांती दला’च्या माध्यमातून ते विविध सामाजिक चळवळींत सक्रिय राहिले. उदगीर मधल्या अनुभवांविषयी त्यांनी ‘माझ्या धडपडीचा कार्यनामा’ हे पुस्तक लिहिले होते. ‘धोका’, ‘वैचारिक घुसळण’, ‘चळवळी यशस्वी का होतात?’, ‘रोजगार निर्मितीची दिशा’ ही त्यांची प्रकाशित झालेली इतर काही प्रमुख पुस्तके आहेत. लोकविज्ञान चळवळीतही त्यांचा सहभाग होता.

विवेकनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी ‘विचारवेध संमेलन’ भरवण्याची परंपरा चालू ठेवत त्यांनी त्याला वेगवेगळ्या उपक्रमांची जोड दिली. आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात व्हावेत ह्यासाठी ते प्रयत्नशील होते. शारीरिक व्याधीने ग्रस्त असूनही शेवटपर्यंत ते आपल्या सामाजिक कार्यात व्यग्र होते.

पालकनीती परिवारातर्फे डॉ. आनंद करंदीकर ह्यांना भावपूर्ण आदरांजली!