
प्रा. डॉ. नरेश दधिच हे पुण्यातील ‘आयुका’ (IUCAA) संस्थेतील मोठे शास्त्रज्ञ होते हे आपल्या सर्वांना माहीत असेलच. मलाही माहीत होतंच; पण म्हणजे नेमकं काय, ते फक्त समजायलाही, त्या विषयाची काहीएक माहिती नसणार्या माझ्यासारख्या व्यक्तीला (मला वाटतं अनेकांना), बरेच श्रम करावे लागतील. त्यांची पत्नी साधना माझी आणि अनेकांची मैत्रीण असली, त्यांची मुलं, जावई या सर्वांशी आमची ओळख असली, तरी त्यांना आदरांजली वाहताना विनय र. र. या एका सुहृदानं ‘नरेशजी व्यक्ती म्हणून अतिशय ग्रेट होतेच तसेच ते एक ग्रेट वैज्ञानिकही होते’ ही आठवण माझ्या आणि बहुधा अनेकांच्या मनात जागी केली.
डॉ. नरेश दधिच हे भारतातील एक प्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं संशोधन मुख्यतः सामान्य सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण, कृष्ण विवरं आणि ब्रह्मांडशास्त्र यावर केंद्रित होतं. ते खगोलभौतिकी आणि क्वांटम गुरुत्व या क्षेत्रातील संशोधक होते. त्यांचं योगदान भारतातील विज्ञान क्षेत्रालाच नाही तर सर्वांनाच कायम प्रेरणादायी राहील, इतके ते खरोखरी ‘ग्रेट’ होते.
ते परिषदेसाठी बीजिंगला गेले होते आणि तिथेच ६ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांचं निधन झालं. डॉ. नरेश दधिच (१९४४–२०२५) हे भारतातील सर्वात मोठे सामान्य सापेक्षतावादी (General Relativist) होते. पुण्यातील आयुका चे सह-संस्थापक आणि माजी संचालक होते. त्यांनी १५० पेक्षा जास्त संशोधन-लेख लिहिले; त्यातील बहुतांश कृष्ण विवरं, गुरुत्वीय पतन आणि ब्रह्मांडशास्त्र या विषयांवर आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ त्यांना ‘भारताचा चंद्रशेखर’ म्हणतात.
तरीही ते फार साधे होते. आजूबाजूच्या सामाजिक जीवनात भाग घेणारे होते. पालकनीती परिवार संस्थेनं एकलव्य संस्थेच्या हिंदी ‘संदर्भ’ या द्वैमासिकासारखं काहीतरी सुरू करावं अशी सूचना त्यांनी केली होती, त्यानुसार हिंदी संदर्भचा बराचसा आधार घेणारं ‘शैक्षणिक संदर्भ’ पालकनीतीनं सुरू केलं. नंतर ‘संदर्भ’ नावानं एक वेगळा न्यास सुरू होऊन ते काम पुढे गेलं.
त्यांच्या संशोधनाबद्दल आपण सर्वांनी समजावून घ्यायला हवं. त्याबद्दलचा लेख लिहिला जावा, तो संदर्भ या द्वैमासिकात यावा आणि आपण सर्वांनी तो वाचावा अशी इच्छा. इतका महान शास्त्रज्ञ आपल्या सर्वांच्या ओळखीत आहे, ‘जरुरी नही है’ सारखी कविता लिहिणारा आहे, याबद्दल आपण मोठी कृतज्ञता व्यक्त करावी, यापेक्षा आपण काय करणार?
पालकनीती परिवाराच्या वतीनं डॉ. नरेश दधिच ह्यांना आदरांजली.
पालकनीतीच्या ऑगस्ट २०१८ च्या ‘धर्म’ ह्या विषयावरील अंकात डॉ. नरेश दधिच ह्यांची ‘जरुरी नही है’ ही कविता पुनर्प्रकाशित झाली होती.
लिंक : https://palakneeti.in/जरुरी-नही-है/
संजीवनी कुलकर्णी
