शुभम शिरसाळे
रामपुरा आनंदघरात आम्ही वस्ती पातळीवरील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, विशेषत: भिल समुदायातील मुलांसोबत आरोग्य, शिक्षण आणि जीवनकौशल्य या क्षेत्रांमध्ये काम करतो. दरम्यान मुलांची संस्कृती, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, त्यांची बोलीभाषा, परंपरा ह्यामध्ये शक्यतो ढवळाढवळ न करता, त्यांच्या जगातूनच त्यांचं शिक्षण साध्य करायचं हा विचार आम्ही कधीही मनाआड होऊ देत नाही. आम्ही जे काही शिकवतो, त्यांच्यासाठी जी उद्दिष्टं ठरवतो, ती मुलांना बदलण्यासाठी नव्हे; तर त्यांच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या जगाशी जोडून, त्यातून मुलांना अर्थपूर्ण दिशा देण्यासाठी.

प्रत्येक सहामाहीच्या सुरुवातीला आम्ही काही एक विचार करतो. सहा महिन्यांनी आम्हाला आमच्या मुलांना कुठे पाहायला आवडेल, कुठल्या गोष्टी साध्य व्हायला हव्या आहेत, त्यानुसार मुलांची सद्यस्थिती लक्षात घेऊन पुढील सहा महिन्यांची दिशा ठरवतो. अर्थात, ठरवत आम्ही असलो, तरी त्याच्या केंद्रस्थानी मुलांचं जगच असतं. त्यांची संस्कृती, भाषा, राहणीमान, त्यांच्या घरी असलेल्या पद्धती, त्यांचे अनुभव ह्यातलं काहीही न नाकारण्याचा आमचा प्रयत्न असतो. उलट त्यांच्या विश्वाशी जोडलेली उद्दिष्टं जास्त अर्थपूर्ण ठरतात, असा आमचा अनुभव आहे. त्यानुसार सहा महिन्यांचा आराखडा तयार होतो आणि त्यावरून दररोजची सत्रं आखली जातात. ह्या सत्रांमधून आम्हाला मुलांना जिथे न्यायचं आहे, त्या दिशेनं आम्ही हळूहळू, पण सातत्यानं वाटचाल करत राहतो.
मुलांना वाचता आणि लिहिता यावं ही आमची इच्छा असली, तरी त्यांनी त्यांची भिल भाषा सोडून फक्त मराठीच बोलावं, असा दुराग्रह न ठेवता भिल भाषेनं आमचं काम कसं समृद्ध होईल, मुलांशी असलेलं नातं अधिक मजबूत कसं करता येईल, याचा आम्ही शोध घेत राहतो. मुलांच्या जगात प्रवेश करण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे त्यांची भाषा समजून घेणं; आनंदघरात आम्ही हेच करतो. त्यामुळे मग मुलांना दादा आपलेसे वाटतात, त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटतो, जवळीक निर्माण होते. आनंदघर हे त्यांच्या रोजच्या जगण्याचा सुरक्षित, आनंददायी भाग बनतो.
याचं उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही केलेला ‘दंतआरोग्य प्रकल्प’. अशा आरोग्य प्रकल्पांमध्ये सामान्यपणे दात घासण्यासाठी ‘कोलगेट’ आणि टूथब्रश कसा आवश्यक आहे हे सांगितलं जातं. ह्यात त्यांच्या जगाचा विचार कुठेही येत नाही. म्हणून त्याऐवजी आम्ही त्यांच्या घरी दात कसे घासले जातात, आजी-आजोबा कोणती पद्धत वापरतात, पूर्वज कोणत्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करत होते, याची माहिती घेतली. वस्तीतल्या ज्या लोकांचे दात चांगले आहेत त्यांच्यापैकी एका आजींना बोलावून त्यांचे अनुभव ऐकले, मुलांनी त्यांची मुलाखत घेतली. त्या वापरत असलेल्या वस्तूंचा निसर्गावर काय परिणाम होतो, हे पाहण्यासाठी वापरलेल्या वस्तू जमिनीत पुरून आठवड्यागणिक त्यांत होणाऱ्या बदलांचं निरीक्षण केलं. म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणून कुठलीही पद्धत स्वीकारली नाही; मुलांनी स्वतः पाहिलं, अनुभवलं. त्यातून कोणती पद्धत योग्य असेल ह्याचा शोध घेणं सुरू आहे. या प्रक्रियेत मुलांना दातांच्या आरोग्याबद्दल ज्ञान तर मिळालंच; पण त्याचबरोबर निरीक्षण, विचारशक्ती, निसर्गाचा अभ्यास, मराठी भाषेतलं लेखन, गणितातील गणना अशा अनेक कौशल्यांचाही विकास झाला.
आनंदघरातलं शिक्षण केवळ वर्गापुरतं मर्यादित नाही. वस्तीतल्या सणांमध्ये सहभागी होणं, त्या लोकांसोबत कामाला जाणं, त्यांच्या जगण्याचं निरीक्षण करणं हादेखील शिक्षणाचाच एक भाग आहे. वस्तीत घडणाऱ्या घटनांचे फोटो काढून त्याबद्दल मुलांचे विचार, अनुभव आणि त्यांच्या भावना जाणून घेणं या प्रक्रियेतून मुलं स्वतः पुस्तकं तयार करतात. ‘हे माझं पुस्तक आहे’ असं म्हणताना त्यांच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आमच्यासाठी कोणत्याही ‘परिणाम पत्रका’पेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. या पुस्तकांमध्ये मुलांचं जग असतं – त्यांची भाषा, त्यांचे अनुभव, त्यांचे प्रश्न, त्यांची निरीक्षणं. त्यामुळे मुलं ती पुस्तकं मनापासून वाचतात, परत परत वाचतात. आणि वाचन-लेखनाची कौशल्यं सहजच विकसित होतात.
या सगळ्या प्रक्रियेत आनंदघर एक गोष्ट तशीच ठेवतं. मुलांची दुनिया तशीच राहिली पाहिजे. त्यांची भाषा, संस्कृती, खाण्यापिण्याच्या पद्धती ह्या साऱ्यासकट त्यांचा स्वीकार करायचा आहे. त्यानुसार ठरवायच्या आहेत शिक्षण देण्याच्या पद्धती. आमचा विश्वास साधा आहे. मुलांचं जे आहे, जसं आहे, ते समजून घेतलं, तर शिक्षण खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण होतं.
शुभम शिरसाळे

shirsaleshubham@gmail.com
वर्धिष्णू संस्थेतर्फे चोपडा शहरातील रामपुरा वस्तीत सुरू असलेल्या आनंदघरात शिकवतात.
