१९८७ च्या जानेवारी महिन्यात पालकनीतीचा पहिला अंक प्रकाशित झाला त्याला या डिसेंबरमध्ये ३९ वर्षे होतील. मधल्या काळात एकाही अंकाचा खंड न पडता अव्याहतपणे पालकनीती वाचकांच्या भेटीला येत राहिली. पालकनीती सुरू झाली त्या काळात पालकत्व, शिक्षण यासारख्या विषयांवर मराठीत कमी लेखन उपलब्ध होतं. पालकत्व हा आनंदाचा तरीही गंभीरपणे विचारात घ्यावा असा विषय आहे, ही समज फारशी नव्हती अशा वेळी सातत्यानं भेटीला येणारी पालकनीतीसारखी मैत्रीण आवश्यक होती. आज काळ बदलला आहे. म्हणून पालकनीतीची आवश्यकता कमी झाली आहे असं अजिबात म्हणता येत नाही; पण वाचक बदलले, तंत्रज्ञानानं भरारी घेतली. आता अंक छापून पाठवायला होणार्या खर्चापेक्षा वेगळ्या वाटेनं गेलो, तर अधिक लोकांपर्यंत पोचता येईल असं नव्या संपादकगटाला वाटतं आहे.
गेल्या सात आठ वर्षांत संपादक मंडळात नवीन पिढीचे तरुण येणं, कार्यकारी संपादक हे पद निर्माण होणं, वेगवेगळ्या पद्धतींनी नव्या वाचकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करणं असे बदल झालेले आहेतच.
आता बदललेल्या काळाची पावलं ओळखून पालकनीतीनं एक मोठाच निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२६ पासून पालकनीतीचे अंक छापले जाणार नाहीत. आता पालकनीती केवळ ऑनलाईन रूपात वाचकांसमोर येणार आहे. माध्यम बदलत असल्याचा एक फायदा असा, की फक्त लेखच नाही तर पॉडकास्ट / व्हिडिओ अशा विविध रूपांत दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोचवण्याचा नव्या संपादकगटाचा विचार आहे. मात्र हा सगळा बदल जानेवारी २०२६ पासून होणार आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत छापील अंक सुरू राहणारच आहे.
ज्या वाचकांना आत्ता ऑनलाईन अंक मिळत नाहीय त्यांनी आपला मेल आयडी आणि मोबाईल नंबर palakneeti@gmail.com वर अवश्य पाठवा.
या बदलाच्या विविध परिणामांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्याची या अंकात सुरुवात आहे.
तुम्ही या वर्षाची वर्गणी भरलेली असेल तर डिसेंबरपर्यंत अंक मिळणारच आहेत.
गेली ८-९ वर्षं आम्ही आजीव वर्गणी घेतलेलीच नाही. त्याआधीच्या बहुतेक आजीव वर्गणीदारांकडे सामान्यपणे निदान दहा वर्षं पालकनीती येतेच आहे. आजीव वर्गणी याचा अर्थ दहा वर्षं असा होत नाही; फक्त मग पैसे वाया गेले असं वाटत नाही.
प्रश्न आहे तो २०२५ ह्या वर्षात अध्येमध्ये वर्गणी भरलेली असेल त्यांचा. त्यांना या वर्षातले आधीचे अंक मिळतीलच. तरीही यामध्ये आपले नुकसान होते आहे असे कुणाला वाटत असेल तर आम्हाला संपर्क करा.
ऑनलाईन अंक काढला तरी काही खर्च होतोच. त्यासाठी तुमच्या मदतीची अपेक्षा आहे.