चित्रांच्या किमती इतक्या का असतात? त्या कशा ठरतात?

– सुयोग दळवी

नमस्कार पालक,

हा प्रश्न कुठे विचारला जातो त्यावर मिळणारे उत्तर अवलंबून असते.

समअनुभवी लोकांच्या कट्ट्यावर, पार्टीत, गप्पांमध्ये चित्रांच्या अनाकलनीय किमतीची टवाळी होते. आर्ट गॅलरीत तिथल्या कुणालाच किंवा त्या चित्रकाराला हा प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाही. शाळेत चित्रकलेचे शिक्षक या मुद्द्यांवर चर्चा करत नाहीत. शेवटी हा प्रश्न असाच अनुत्तरित राहतो. मुलांसाठी करिअर निवडताना हे आकडे पालकांना खूश करणारे आहेत.

कुठल्या बाबींवर चित्रांच्या किमती ठरतात, हे आपण पाहूयात.

चित्र कुणी काढले, त्यावर ते विकले जाते. त्या चित्रामागे एक मोठे, प्रतिष्ठित नाव असावे लागते. ते नाव कमावण्यासाठी कलाकाराची अनेक वर्षांची साधना असते. किंवा एक जबरदस्त शोध, कल्पना त्यामागे असते.

उदा. बाजारात दोन कविता-संग्रह आहेत; एक माझा आणि दुसरा कुसुमाग्रजांचा. तुम्ही कुणाचा विकत घ्याल?

कुसुमाग्रजांच्या पुस्तकाची ही विक्री-स्थिती काही एका दिवसात आलेली नसणार.

चित्रांच्या बाबतीतही अनेक घटक महत्त्वाचे असतात. चित्र-प्रदर्शन कुठल्या गॅलरीत होते त्यावर चित्राची प्रतिष्ठा ठरते. संग्रहालये, कला-महोत्सव ही ठिकाणे चित्रकाराची प्रतिष्ठा वाढवत असतात. कलेच्या क्षेत्रात ही प्रतिष्ठा फार महत्त्वाची असते. ती नसेल तर चांगल्या चित्राला आणि चित्रकारालाही काडीची किंमत मिळत नाही. व्हॅन गॉग याला त्याच्या जिवंतपणी अक्षरश: शून्य किंमत होती. त्याच्या हयातीत त्याचे एकच चित्र विकले गेले; ते त्याच्याच भावाने विकत घेतले होते.

नवीन किंवा कमी प्रसिद्ध कलाकारांची चित्रे विकलीच जात नाहीत असे काही नाही; पण सहसा त्यांना मिळणारी किंमत फारशी नसते. कारण ती दुर्मीळ नसतात. हे थोडे जमिनीत केलेल्या गुंतवणुकीसारखे असते. आज स्वस्त पण जसजशी चित्रकाराची प्रतिष्ठा वाढत जाईल तशी त्याची चित्रे महाग होत जाणार. म्हणून गुणवत्ता असणाऱ्या तरुण चित्रकारांची चित्रे गुंतवणूक म्हणून चांगल्या किमतीला विकत घेतली जातात. यातही गॅलरीचा वाटा मोठा असतो.

डिजिटल प्रिंट भरपूर छापता येतात; मात्र हॅन्डमेड प्रिंट त्यामानाने मर्यादित असतात. चित्र तर एकदाच घडते. एकसारखे दुसरे तंतोतंत होत नाही. यावरून त्यांचा दुर्मीळपणा वाढतो. जे अधिक उपलब्ध असते ते स्वस्त मिळते. जे चित्रकार आज हयातच नाहीत, त्यांची चित्रे अर्थातच दुर्मीळ असतात. उदाहरणार्थ जिवंतपणी व्हॅन गॉगच्या वाट्याला गरिबी आली; पण आज त्याची चित्रे अमूल्य आहेत. एखाद्या कलाकाराने कमी चित्रे काढली असतील आणि ती विशिष्ट शैली दुर्मीळ असेल, तर त्याच्या चित्रांची किंमत वाढते. एकमेव किंवा मर्यादित आवृत्तीतील चित्रे जास्त मौल्यवान असतात.

 काही चित्रे एखाद्या विशिष्ट काळातली किंवा चळवळीतली महत्त्वाची कलाकृती असल्याने त्यांना ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक महत्त्व असते. स्वाभाविकपणे अशा चित्रांची किंमत जास्त असते. चित्राचा विषय, ते कोणत्या परिस्थितीत काढले गेले आणि कलाजगतात त्याची भूमिका काय आहे, हेदेखील महत्त्वाचे असते.

चित्राची गुणवत्ता ही वापरलेली रंगसामग्री आणि त्याची सध्याची स्थिती ह्यावर अवलंबून असते, त्यानुसार त्याची किंमत ठरते. त्याची डागडुजी (रिस्टोरेशन) करण्याचा खर्चही प्रचंड असतो. हा देखभाल खर्च धरूनही त्याची किंमत वाढते.

एखाद्या चित्राची मालकी कुणा प्रसिद्ध व्यक्ती किंवा संग्राहकाकडे असेल किंवा ते चित्र मोठ्या प्रदर्शनात मांडले गेले असेल, तर त्याची प्रतिष्ठा आणि पर्यायाने किंमत वाढते. उदाहरणार्थ अमुक एक जातीचा अस्सल मुधोळ हाउंड किंवा घोडा कुणा संस्थानिकाच्या घराण्यातला असला, तर त्याची जशी किंमत वाढते तसेच. चित्राचा हा इतिहास त्याचे मूल्य वाढवते. करोनाकाळात मास्कची मागणी भरमसाठ वाढली, त्यामुळे त्याची किंमत वाढली. परंतु उत्पादन वाढल्याने ती अचानक कमीही झाली. रेमडेसिव्हीर इंजेक्शनची किंमतही तेव्हा लाखाच्या घरात गेली. कारण तेच – मागणी आणि उपलब्धता. तसेच बाजारात विशिष्ट कलाकाराच्या किंवा विशिष्ट प्रकारच्या चित्रांना किती मागणी आहे, त्या चित्रांची उपलब्धता किती आहे, यावरही त्यांची किंमत अवलंबून असते.

कला बाजारातील ट्रेंड आणि कला संग्राहकांची आवड चित्रांच्या किमतीवर परिणाम करतात.

सामान्यपणे, मोठ्या आकाराच्या चित्रांना जास्त साहित्य आणि वेळ लागतो, त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते.

चित्रातली गुंतागुंत, तपशील आणि त्यात वापरलेल्या तंत्रावरची हुकूमत ह्यावर चित्राची किंमत वर-खाली होत असते.

एकंदरीत, चित्राची किंमत ही केवळ ते बनवण्यासाठी लागलेल्या खर्चावर अवलंबून नसते, तर त्यात कलाकाराची कल्पनाशक्ती, त्याची प्रतिभा, कलेतील त्याचे स्थान आणि बाजारातील मागणी यासारखे अनेक अदृश्य घटकदेखील कळीचे असतात.

एकदा एका मुलाखतीदरम्यान मुलाखतकार एम. एफ. हुसेन यांना म्हणाला, की तुम्ही तर इतके प्रसिद्ध आहात की कागदावर एक रेषा काढली तरी विकली जाईल. त्यावर हुसेन वैतागून म्हणाले, की द्या एक कागद मी लाइन मारतो, आणि लगेच घ्या विकत. त्यावेळी मुलाखतकाराचा चेहरा पडला.

सामान्य लोकांना चित्रांच्या किमती प्रचंड वाटतात. कारण चित्राचे उपयोग माहीत नसतात. त्यातून गुंतवणुकीपासून ते दूर असतात. आत्ता कुठे लोक शेअर मार्केटकडे वळले आहेत. त्यामुळे ते महागडी घरे घेतील, वस्तू घेतील, पण चित्र घेण्याची गरजच न समजल्याने एकूणच मामला गडबडतो.

आता भारतात चित्रकारांना त्यांच्या चित्रांच्या विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पूर्वी केवळ गॅलरीतील प्रदर्शने हाच मार्ग होता. गॅलरीचे भाडे, त्या दिवसातील खर्च, पेंटिंगच्या फ्रेमिंगसाठीचा खर्च, जाहिरात, कॅटलॉग-निर्मितीचा खर्च चित्रकाराला स्वतःला उचलावा लागतो. तो खर्चही चित्रांच्या किमतीत धरला जातो.

एकदा एका शिल्पकाराने एका दिवसात एक शिल्प घडवले. त्याची किंमत त्याने एक लाख सांगितली. समोरचा म्हणे १०० रुपयाची माती वापरली तरी लाख कसे? त्यावर शिल्पकार म्हणाला, ‘‘माती १०० रुपयांचीच आहे, उरलेले ९९,९०० रुपये माझे आजवर मातीत घातलेल्या वर्षांचे आहेत.’’

श्रीनिवास बाळकृष्ण

shriba29@gmail.com

(चित्रकलेसंदर्भातले प्रश्न वाचक या इमेलवर विचारू शकतात.)

चित्रकार, इलस्ट्रेटर आणि कला-मार्गदर्शक. मुलांसाठी सातत्याने चित्रकलाविषयक लिखाण करतात. ‘चित्रपतंग’ समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांना कलासाक्षर करण्याचा प्रयत्न करतात.