समारोप…
नमस्कार पालकहो!
‘चित्राभोवतीचे प्रश्न’ या लेखमालेचा हा दहावा आणि शेवटचा लेख. ह्या वर्षभरात आपण एक सुंदर प्रवास केला. हा प्रवास पेन्सिल, रंग किंवा कागदांचा नव्हता; तो समजुतीचा होता, पालकांच्या नजरेतून मुलांच्या कलेचे अर्थ शोधण्याचा होता. अनेक पालकांनी पत्रे, इ-मेल, मेसेज पाठवले. कुणी म्हणाले, “माझं मूल एक गोलही नीट काढत नाही”, कुणी म्हणाले, “चित्र रंगवताना त्याचा रंग नेहमी रेषेच्या बाहेर जातो”, तर काही जणांनी विचारले, “कलेत भविष्य आहे का?”
प्रत्येक प्रश्नामागे कलेबाबतचे प्रेम होते, कुतूहल होते, आणि मुलासाठी काहीतरी चांगले करण्याची तळमळ होती. मुळात आपल्याला मोठ्यांना ‘चांगली चित्रे’, ‘वाईट चित्रे’ अशी लेबले लावण्याची नेहमीच घाई असते. पण त्या पलीकडे जाऊन चित्रांकडे एक भाषा म्हणून बघितले पाहिजे. ती मुलांची पहिली भाषा आहे. लहान मुलांना आपला आनंद, राग, मत्सर, भीती, कौतुक ह्या साऱ्या भावना शब्दांत मांडता येतीलच असे नाही. अशा वेळी ते मूल कागदावर रंग फेकते, रेषा पसरवते, ठिपके काढते, माती मळते. बघणाऱ्यासाठी हा गोंधळ असेल पण त्याच्यासाठी ही भावनांची मांडणी असते.
मूल जे दिसते ते नाही, जे जाणवते ते काढते…
एका आईने लिहिले होते, “माझी चार वर्षांची मुलगी फक्त काळा रंग वापरते. मला काळजी वाटते.” रंग म्हणजे भावनांचे आवाज असतात. तिच्या मनात कुठली तरी जड भावना असावी किंवा तिला काळ्या रंगातले सौंदर्य दिसत असावे. त्यामागचे कारण समजून घ्यायला तिच्यासोबत बसा, तिला बोलू द्या; मात्र रंग बदलण्याचा आग्रह करू नका.
अनेक पालकांच्या मनात एक मोठा गैरसमज असतो, तो म्हणजे ‘सुंदर (हुबेहूब) चित्र म्हणजे चांगलं चित्र’. पण मुलांच्या कला-विकासात पहिल्या टप्प्यावर चित्रात विस्कळीतपणा असणे हेच नैसर्गिक आहे. रेषा चुकतात, रंग बाहेर जातात, प्राणी उलटे दिसतात; पण त्या बघण्यामध्ये त्याच्या कल्पनेची शोधयात्रा असते. जगातील सर्व महान कलाकारांनीही आपल्या बालपणी अगदी अशीच चित्रे काढली. आज आपण ज्या महाग कलाकृती बघतो, त्यांचे कौतुक ऐकतो, त्या मोठ्यांना एके काळी चुकीच्या वाटल्या होत्या. म्हणून या लेख-मालिकेत एक गोष्ट मी सतत सांगितली. मुलांना ‘सुंदर चित्र काढ’ म्हणण्यापेक्षा ‘जे वाटतंय ते काढ’ म्हणा.
एका पालकाचा प्रश्न होता : “माझा मुलगा जे जे बघतो तेच हुबेहूब काढतो. ही नक्कल आहे का?” निश्चितच नाही. हे निरीक्षणशक्तीचे सामर्थ्य आहे. निरीक्षण ही कलेची सर्वात पहिली पायरी आहे. आज मूल निरीक्षण करायला शिकले, उद्या कल्पना करायला शिकेल आणि मग परवा त्या पायावर सर्जनशीलता उभी राहते.
मोठ्यांना जे बघणे साधे वाटते, ते मूल वेगवेगळ्या वाटांनी पाहत असते. फूल काढताना ते पाकळ्यांमधला प्रकाश बघते, झाड काढताना वाऱ्याची दिशा लक्षात ठेवते, चेहरा काढताना हसणे लक्षात ठेवते… ही लेखमाला सुरू झाल्यापासून अनेक पालकांनी मान्य केले, की मुलांच्या कलेकडे ते गुणांचा मापदंड लावून पाहत होते. त्यापेक्षा माझे मूल आनंदाने चित्र काढायला बसते का, स्वतःची कल्पना वापरतेय का, चुका झाल्या तरी पुन्हा प्रयत्न करतेय का, ‘माझं चित्र चुकत नाही’ असा त्याला आत्मविश्वास आहे का, ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत ‘होय’ आहेत, तोपर्यंत आश्वस्त असा, की तुम्ही त्याला त्याच्या कलाप्रवासात चांगली सोबत करत आहात. कलेला जागा मिळाली, की मुले फक्त रंगात नाही, तर मनानेही भरारी घेतात. या दोन्ही जागा पालक म्हणून तुम्ही देणार आहात. चित्र काढताना चित्र किंवा छोटा चित्रकार गोंधळलेला दिसला किंवा चित्र बिघडताना दिसले, तरी काहीच करू नका. चित्र बिघडू दे. त्याची मनःस्थिती बिघडू दे. कारण ‘बिघडणे’ हाच पहिला शिक्षक असतो. चित्र खराब झाले, की प्रथम मूल निराश होते, मग दुसरे चित्र सुरू करते, आणि पुढच्या वेळी ते स्वतःहून अधिक काळजी घेऊ लागते. मुलांसाठी कलेची पहिली ओळख ही ‘मुक्तपणा देणारी गोष्ट’ अशी असावी; ‘दडपणाची जागा’ म्हणून नाही.
या लेखमालेचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असाही आहे, की मुलांची कला समजण्यासाठी आपल्याला त्यांचे ‘उत्तर’ ऐकायला हवे, त्यांचे चित्र नव्हे.
आज तुम्ही मुलाला चित्र काढायला मोकळे सोडले, तर उद्या तो जगाकडे वेगळ्या नजरेने पाहील. कदाचित चित्रकार होईल किंवा वैज्ञानिक किंवा अगदी साधे, सुंदर माणूस. विज्ञान शिकवता येते, गणित शिकवता येते… पण कल्पनाशक्ती बांधता येत नाही. ती व्यक्तीला मुक्त करते. या मालिकेतून मी फक्त हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही मुलांच्या हातात पेन्सिल चित्र काढायला देत नाही आहात, तर त्यांना त्यांचे जग तयार करायला शिकवत आहात.
धन्यवाद!
श्रीनिवास बाळकृष्ण

shriba29@gmail.com
चित्रकार, इलस्ट्रेटर आणि कला-मार्गदर्शक. मुलांसाठी सातत्याने चित्रकलाविषयक लिखाण करतात. ‘चित्रपतंग’ समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांना कलासाक्षर करण्याचा प्रयत्न करतात.
(सदर समाप्त)
