दीपस्तंभ – मार्च २०२४
बियार कोन केनियामध्ये निर्वासितांच्या छावणीत लहानाचा मोठा झाला. युद्धामुळे त्याच्या आईवडिलांना शेजारच्या सुदानमधून पळून येणे भाग पडले होते. १७ वर्षांचा झाल्यावर तो शिक्षणासाठी केनियाच्या राजधानीचे शहर असलेल्या नैरोबीला गेला.
तिथे काही कागदपत्रांसाठी त्याला सुदानी दूतावासात जायचे होते; पण कोणालाच त्याबद्दल काही माहीत नव्हते. तेवढ्यात एका आजीबाईने त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला विचारले, “कसा आहेस बाळा?”
कोन त्या आठवणीने गदगदतो, “बाळा म्हणून आवाज दिला तिने मला.”
कोन येणाऱ्या-जाणाऱ्याला काहीतरी विचारतो आहे हे आजीबाई बघत होती. त्याला कदाचित पैसे हवे असतील, खायला हवे असेल किंवा आसरा तरी हवा असेल असे तिला वाटले. अच्छा, म्हणजे आपण बेघर आहोत असे आजीबाईला वाटले तर… कोनच्या लक्षात आले. कारण केनियामध्ये अशी आसरा शोधणारी अनेक मुले नजरेस पडतात.
समजुतीतला गोंधळ दूर झाल्यावर आजीबाईने कोनला सुदानी दूतावासात कसे जायचे ते समजावून सांगितले.
“मी स्वतः एक आई आहे न! माझ्या मुलावर अशी रस्त्यावर भटकण्याची वेळ येऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे कुठे कुणी गरजू मूल दिसलं, की त्याला मदत केली पाहिजे म्हणून माझं मन मला धडका द्यायला लागतं.” आजीबाई कोनला म्हणाली.
ह्या प्रसंगाचा कोनच्या मनावर खोलवर ठसा उमटला. आपणही असेच वागायचे असे त्याच्या मनाने घेतले.
पुढे तो बोस्टनला गेला. इथल्या सुबत्तेविषयी ऐकून असल्यामुळे, रस्त्यावर फिरणारी बेघर माणसे पाहून त्याला धक्काच बसला.
“मला फार वाईट वाटलं. मी स्वतः निर्वासितांच्या छावणीत राहिलेलो असल्यामुळे, उपाशीपोटी झोपणं काय असतं ते मला चांगलंच माहीत आहे. डोक्यावर छप्पर नसताना काय वाटतं ते मी जाणतो.”
एकदा एका कॉफी शॉपसमोर एक तरुण एका बाईकडे पैशांसाठी याचना करत असलेला कोनला दिसला.
“तू काही कामधंदा का करत नाहीस?” त्या बाईने रागाने त्याला विचारले.
कोनला पाच वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. आजीबाईने त्यावेळी दाखवलेली सहृदयता अजूनही त्याच्या मनात घर करून होती.
“कॉलेजात असताना माझ्या हातून एक चूक झाली, त्यामुळे आता कुणीही मला काम देत नाही.” तरुणाने कोनला सांगितले.
कोनने त्याला खायला घेऊन दिले, थोडेसे पैसे दिले. पाच वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आज जणू परतफेड झाली होती.
तुम्ही समोरच्याशी जोवर बोलत नाही, तोवर त्याच्यावर नेमका काय प्रसंग ओढवलेला आहे ते कळू शकत नाही. आजच्या घटनेने कोनला त्याचे पूर्वीचे दिवस आठवले. त्या आजीबाईची आठवण झाली.
कोन आता मॅसॅच्युसेट्स लॉवेल विद्यापीठात शिक्षण घेतो आहे. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना आसरा देणारी संस्था एक ना एक दिवस उभारण्याचा त्याचा मानस आहे.
“तिने जणू त्या दिवशी माझ्या मनात दयेचं बीज पेरलं. आता कुणी अडचणीत आहे असं दिसलं, की माझ्या मनात जुन्या आठवणी जाग्या होतात आणि त्यांच्या मदतीला मी धावतो,” कोन म्हणतो.
‘माय अनसंग हिरो सिरीज’ – हिडन ब्रेन टीम