बर्टोल्ट ब्रेश्ट
सरकारनं जनतेसाठी धोकादायक आणि दूषित ज्ञान देणारी पुस्तकं
जनतेच्या साक्षीनंच भर चौकात जाळून टाकण्याची आज्ञा दिली…
आणि
चारी दिशांनी पुस्तकांनी लदबदलेल्या बैलगाड्या
पुस्तकं सरणावर आणून टाकायला धावू लागल्या.
तडीपार केलेल्या एका धगधगत्या लेखकानं पाहिलं,
की जाळून टाकण्याच्या यादीत त्याची पुस्तकं नव्हती!
धक्काच बसला त्याला!
विसरले ते त्याची पुस्तकं?
संतापानं त्याला जणू पंख फुटले…
ताबडतोब पत्र लिहायला बसला तो सत्ताधार्यांना.
‘‘जाळा ! जाळून टाका माझी पुस्तकं.
माझा असा अपमान करू नका. मला शिल्लक ठेवू नका.
मी नेहमी सत्यच तर सांगितलं ना माझ्या पुस्तकांमधून?
मग?
मला खोटारडा ठरवताय?
मी आज्ञा करतो तुम्हाला
जाळून टाका माझी पुस्तकं.’’
मूळ जर्मन कविता : बर्टोल्ट ब्रेश्ट
(1898 – 1956)
अनुवाद : शर्मिष्ठा खेर
