पंढरपूरजवळील करकंब या छोट्याशा गावात ‘मैत्र फाउंडेशन’ ही संस्था विशेष मुलांसाठी काही उपक्रम राबवते. त्यांना स्वावलंबी होण्याचा आनंद मिळावा असा संस्थेचा प्रयत्न आहे. मुलांना त्यांच्या कुवतीनुसार हस्तकौशल्ये शिकवावीत, जेणेकरून त्यांना काही प्रमाणात तरी स्वावलंबी होता यावे आणि आनंदात जीवन व्यतीत करता यावे हा यामागचा उद्देश. आजूबाजूच्या गावातली दहा-अकरा मुले रोज दुपारी ११ ते ४ या वेळात तिथे येतात. तिथे वर जाण्याच्या वाटेवर (जिन्यामध्ये) बांबूच्या झाडाची दोन चित्रे चिकटवलेली होती. त्या झाडांभोवती आपण वातावरण उभे करावे म्हणजे ती झाडे त्यात सामावून जातील आणि भिंत बोलकी होईल असे मला वाटून गेले. मुलांसोबतच आपण भिंत रंगवू म्हणजे येता-जाता मुलांना त्यांनी रंगवलेले चित्र दिसत राहील. पण त्यात काही अडचणी होत्या. एक तर जिन्यांच्या मधली जागा छोटी होती – एका वेळी फार तर दोन मुले माझ्यासोबत काम करू शकतील अशी. त्याचबरोबर रंगवताना त्यांना सोपे वाटेल, आनंद होईल आणि तरीही चित्र छान दिसेल असेही पाहायचे होते. माझ्यासाठी यात शिकण्यासारखे खूपच होते. मुलांसोबत जसजसे काम होत गेले, तसे मला काही गोष्टी सुचत गेल्या. पुढच्या मुलांसोबत काम करताना मला त्याचा उपयोग झाला. दोन तासांनी मुले निघून गेली. मात्र माझा मी एकटा त्या डोंगराकडे पाहत आकाश रंगवू लागलो आणि पंख फैलावून उडणारे काही पक्षी त्या आकाशात सोडून दिले.
रमाकांत धनोकर