मी ओरडते ह्यात तुझी चूक कधीच नसते!

जानेवारी महिन्यात ह्याच पानावर आपण बेकी केनेडींच्या घरातली ‘टॉवेल उचल’ची पाटी कशी तयार झाली ते पाहिलं. आता आरडाओरड्याचं गणित पाहूया!
समजा आपल्याकडून मुलांवर आरडाओरडा झाला. त्यानंतर काही काळानं, आपण शांत झाल्यानंतर, ‘मी तुझ्यावर ओरडले ते भयानक वाटलं असेल न? मी ओरडते ह्यात तुझी चूक कधीच नसते. मी आरडाओरडा कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. खूप वैतागलेलं असतानादेखील न ओरडता बोलता येणं शक्य आहे. सॉरी!’ ह्या अर्थाचं मुलांशी बोलावं असा बेकी आग्रह धरतात.
त्यांच्याकडे जाणारे अनेक पालक ‘मी ओरडते ह्यात तुझी चूक कधीच नसते’ ह्यावर जरा आक्षेप घेतात. ‘रोज सकाळी शाळेत जाताना मुलाला इतकं हळू करायचं असतं सगळं! ढिम्म हलत नाही. माझी ऑफिसची घाई, ह्याची शाळेची घाई आणि आम्ही बूटच घालायला तयार नाही! सगळं सांगून होतं! शेवटी आरडाओरडा होतोच!’ आपल्यातला डरकाळी फोडणारा वाघोबा मुलंच तर तयार करतात! तरी आपण ओरडतो ह्यात मुलांची चूक नाही? कधीच नाही?
बेकी आपल्याला एक कल्पना करायला सांगतात
समजा तुमचा मुलगा मोठा झालाय. ऑफिसमध्ये त्याचा दिवस चांगला गेला नाहीये. आता तो घरी पोचलाय. घरात स्वयंपाक तयार आहे; पण तो त्याच्या फारसा आवडीचा नाहीये. आठवण देऊनही दुकानातून एक गरजेची वस्तू आणणं बायकोला जमलेलं नाही. त्यावरून ठिणगी पेटली, आरडाओरडा झाला आणि स्वतःच्या समर्थनार्थ मुलगा शेवटी तिला म्हणाला, ‘तू एवढी साधी गोष्ट विसरली नसतीस तर मी एवढा आरडाओरडा केलाच नसता!’
मोठेपणी आपलं मूल असं वागणारा माणूस झालंय ही कल्पना आवडत नसेल, तर ‘मी ओरडले त्याबद्दल सॉरी, पण तू सकाळी घाईच्या वेळी ढिम्म राहिला नसतास तर मी ओरडले नसते’ असं आपण का म्हणावं?
बेकीच्या मते, आपलं मूल जसं वागतंय त्यानुसार आपली प्रतिक्रिया होतेय हे वरवर पाहता खरंय. पण खरं तर आपल्या आत तयार होणाऱ्या भावनांनुसार आणि त्या भावना डोक्यात आल्या की त्यांचं काय करायचं ह्याबद्दल आपल्या मेंदूत असलेल्या ‘सर्किट’नुसार आपण प्रतिक्रिया देतोय. गंमत म्हणजे, आपल्या भावनांचं पृथक्करण करणारी आपल्या मेंदूतली ही सर्किट्स मूल जन्मायच्या खूप अगोदर तयार झाली आहेत! त्यामुळे एखाद्या प्रसंगी मला आलेला वैताग आणि तो हाताळण्याची माझी क्षमता, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवं. ‘तू मला ओरडायला लावतोस’ असं म्हणणं म्हणजे आपल्या भावना हाताळण्याच्या आपल्या अक्षमतेसाठी आपल्या मुलाला जबाबदार धरणं!
रुबी रमा प्रवीण

ruby.rp@gmail.com
पालकनीतीच्या संपादक गटाच्या सदस्य.