समीना मिश्रा

ऑगस्ट महिन्यात मुझफ्फरनगरमधल्या एका शाळेत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सात वर्षांच्या एका मुस्लीम विद्यार्थ्याला थप्पड द्यायला दुसर्‍या विद्यार्थ्यांना सांगत आहेत. याचे कारण त्याने म्हणे पाढे पाठ केले नव्हते. सोबत ‘मुस्लीम पालकांचे शिक्षणाकडे पुरेसे लक्षच नसते’ वगैरे बोलणेही चालू आहे. यामुळे अर्थातच सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले. दुसर्‍या बाजूला – ‘त्यावरून गैरसमज निर्माण केले जात आहेत’, ‘नेहमीच्याच शिक्षांना उगीचच धार्मिक रंग दिला जातो आहे’ इ.इ. सुरू आहे. मुझफ्फरनगरच्या भाजपाच्या खासदाराने सांगितले, की या दुर्दैवी घटनेचे उगीच राजकारण केले जाते आहे, या भागात असल्या शिक्षा होतच असतात. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत या मुख्याध्यापिका त्यागीबाई म्हणाल्या, ‘मी लाज वाटण्यासारखे काहीही केलेले नाही… शिक्षा न करण्याचे कायदे आहेत; पण मुलांना ताब्यात ठेवायला असे काही करावेच लागते.’

या घटनेतून सध्याच्या एकांगी विचारविश्वाची कल्पना येते. त्याशिवाय बालपण आणि शिक्षण याबद्दल समाजात रूढ असलेल्या समजुतीचे चित्र आपल्या समोर उभे राहते… ते असे, की बालपण ही मोठ्यांनी नियंत्रणातच ठेवायची गोष्ट आहे!

बालपण हा माणसाच्या आयुष्यातला एक वेगळा टप्पा समजणे ही आधुनिक काळातली गोष्ट आहे. फिलीप आयीस नावाचे एक प्रसिद्ध फ्रेंच लेखक होते. त्यांनी 1960 मध्ये लिहिलेल्या ‘सेन्च्युरीज ऑफ चाइल्डहूड’ या पुस्तकात अशी मांडणी केली होती, की आधुनिक काळापर्यंत प्रौढजीवनापेक्षा बालपणाची वेगळी स्थिती आणि वेगळ्या गरजा मान्य केल्या जात नसत. हा टप्पा वेगळा समजला गेला, तेव्हापासून मुलांना आदर्श नागरिक बनवण्यासाठी ‘त्यांना वळण कसे लावावे’ इकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले दिसते. प्रौढांना भविष्याची सारखी काळजी लागून राहिलेली असते, आणि ती मुलांच्या जगण्याला झाकोळून टाकते. भविष्याची जबाबदारी मुलांवर टाकायला, आपली स्वप्ने त्यांच्या खांद्यावर ठेवायला आपण अगदी उत्सुक असतो. आपल्याला त्यांचे काहीही ऐकूनच घ्यायचे नसते. सगळी मुले एकसारखी, सुव्यवस्थित, शिस्त लावण्याजोगी असायला हवीत असे आपण समजतो. नेमके असेच कुठल्याही हुकूमशाही शासनाला नागरिकांच्याबद्दल वाटत असते.

शासनाची आणि शाळेची दृष्टी समांतर असल्याचे फार जुन्या काळापासून दिसते आहे. नागरिकांनी आधारकार्डे बाळगावीत, नियम पाळावेत, पाळले नाहीत तर शिक्षा भोगावी!! शाळांचीदेखील अशीच अपेक्षा असते. त्यागीबाईंनी याच्या जरासे पुढे जाऊन मुलाला शिक्षा केली होती. अधिकार कोणाचा हे दाखवणे आवश्यकच असते ना! मुलाला सांगितलेले पाढे त्याने पाठ केले नव्हते. मुस्लीम असण्याबद्दल त्यांनी केलेली कॉमेंटसुद्धा काही नवीन नव्हती!! शिक्षक वर्गात येताना त्यांचा वर्ग, जात, धर्म, सगळ्यांसकट येतात. दुसर्‍या मुलांकडून एखाद्या मुलाला मारहाण करवणे याचे पुरावे नसले, तरी तशा घटना आधीही घडतच होत्या. त्या सगळ्या त्या त्या वेळीही टाळायला हव्या होत्या. पण काय होते? तशी तर आपल्याकडे शाळांमध्ये शारीरिक शिक्षा आणि भेदभावाची परंपराच आहे; मात्र एकविसाव्या शतकाच्या मध्याशी जाताना हा प्रसंग घडला. घडला एवढेच नाही, तर ज्या प्रकारे घडला त्यामुळे मनामनांमध्ये अतिशय विखारी द्वेष-पेरणी झाली; ती फार त्रासदायक वाटते आहे. आत्ता आपला भवताल हा न्याय हातात घेऊन एकट्यादुकट्या माणसाला मारून टाकणार्‍या जमावांनी भरलेला आहे. आपण काय खायचे, प्यायचे, ल्यायचे, बोलायचे सारे ठरवून दिलेले आहे. जरा वेगळे बोलू पाहिले, तर ते राज्यद्रोही मानले जाते. सरकारला हवीत ती कागदपत्रे नसली, तर डांबून ठेवले जाते. अशात एखादा शिक्षक आपले (गैर)विश्वास आणि जुनाट पद्धती वर्गात वापरून लहानग्यांच्या मनांवर सर्रास आघात करतो ही आपल्या सगळ्यांना लाज वाटवणारीच घटना घडते. एकेक लहान मूल वाढवायला सगळ्या गावाचा आधार लागतो, असे आपण ऐकत आलेलो आहोत… पण इथे या सगळ्या गावांची अवस्थाच सडकी-कुजकी झालेली आहे.

अर्थात, या गावातल्याच काहींना हे असले नासलेपण मंजूर नाही! त्यांनी काय करायचे? कदाचित मुलेच काहीतरी मार्ग सांगू शकतील… असे समजून मी सहावी ते आठवीतल्या काही मुलांच्या गटांशी बोलले. ‘हम हिंदुस्थानी’ नावाचा हा प्रकल्प गेल्या काही वर्षांत चालू केला आहे. ‘ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशन फॉर सस्टेनेबल फ्युचर्स’ या नेटवर्कतर्फे – मुले आणि नागरिकत्व या विषयावर तो आयोजलेला आहे. मी यासाठी तीन ठिकाणे निवडली होती. दिल्लीतील शाहीन बाग – इथे सीएए (उAAअअ) विरोधी निदर्शने झाली होती. दुसरे पंजाबातील फिरोझपूर इथला गाव-भाग – इथून शेतकर्‍यांनी आंदोलनात भाग घेतला होता. तिसरे मुंबईतील गोवंडी – इथे विस्थापित दलित आणि मुस्लीम मजूर-कुटुंबे पुन्हा वसवली गेली आहेत.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत संकल्पनांची जाण यावी म्हणून माध्यमिक शाळेतल्या मुलांना भारताच्या राज्यघटनेची ओळख करून देणे अपेक्षित असते. या मूल्यांशी संबंधित मुद्द्यांवर आम्ही लेखन केले, चित्रे काढली. सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार क्रिस्ता टिपेट यांनी म्हटले आहे, ‘‘आपल्या भवताली योग्य दिशा दाखवणार्‍या अनेक गोष्टी नेहमी दिसत राहतात. त्याच उदार गोष्टींवर मानवता जीव धरत असते.’’ त्या योग्य गोष्टींची आशा मला मुलांच्या रचनांमधून मिळते.

त्यातले एक चित्र गोवंडीमधल्या एका दलित मुलीने काढले होते. आपल्याला समतेचा आणि विषमतेचा प्रत्यक्ष आलेला अनुभव – यावर मुले चित्रे काढत होती. चौदा वर्षांच्या या मुलीने हिजाब घातलेल्या मुलींना शाळेत जाऊ दिले नाही – असे चित्र काढले होते. लाउडस्पीकरवरून अजान देण्यावरून झालेल्या भांडणाबद्दलही ती सांगत होती… ‘‘मग प्रार्थनेची वेळ कशी समजणार लोकांना?’’

पण तुला कुठे अशी अडचण आहे, असे विचारल्यावर तिने सांगितले, की तिच्या अनेक मैत्रिणी आणि शेजारी आहेत त्यांना हे प्रश्न येतात. त्यांच्याबरोबर वावरत असल्याने, त्यांच्यासोबत राहत असल्याने त्यांचे आयुष्य एकमेकांत गुंफले गेलेले आहे. त्यांचा खाजगी आणि सार्वजनिक अवकाश एकच असल्याने तिला त्यांच्या अडचणी, संघर्ष यांची व्यवस्थित जाण आलेली होती. ती एक दिशा दाखवत होती… एकमेकांसोबत राहण्याची, रोजचा दिवस सोबत घालवण्याची, एकमेकांना जाणून घेण्याची, माणसाने माणसाशी नाते जोडण्याची, छोटे-मोठे फरक ओलांडून जाण्याची. त्यागीबाईंनी रोज असा काही वेळ त्या मुलांसोबत घालवला असता, तर त्यांच्या लक्षात आले असते, की पाढे पाठ का होत नाहीत. मग तो मुस्लीम आहे, एवढीच त्याची ओळख त्यांच्या मनात उरली नसती. मनात भरलेल्या रागाऐवजी त्यांच्या वागण्यात थोडी काळजी उतरली असती.

भारत सरकारच्या आजच्या दृष्टिकोनामध्ये केंद्रीकरणाकडे नेणारा जोर दिसतो. सुविहित व्यवस्थेकडे जाण्याचा हा मार्ग कार्यक्षम असेलही; पण त्यात सहानुभूती, करुणेसाठी आणि काळजी घेण्यासाठी जागाच नाही. हे सगळे त्या मुलीच्या चित्रातून मांडले गेले आहे. सरकार अत्यंत कष्टपूर्वक ‘एक देश’ उभा करण्यासाठी शिक्षणापासून निवडणुकीपर्यंत सर्वत्र धोरणबदल करू पाहते आहे. सगळे काही आदर्श असावे असा प्रयत्न करते आहे – एक भारत श्रेष्ठ भारत! आदर्श कागदपत्रे, आदर्श वेश – भाषा – अन्न; ते प्रत्यक्षात आणण्यासाठी दहशत निर्माण करते आहे. त्यात न बसणार्‍या लोकांना वेगळे काढते आहे. वर्ग – जात – लिंग यांच्या प्रचलित उतरंडीला काळानुसार धक्के बसत आहेत, नागरिकांच्या नवीन इच्छा-आकांक्षांची घुसळण चालू आहे… त्याला सरकारचे उत्तर काय आहे? तर व्यवस्था आणि नियंत्रण अधिक काटेकोर केले जाते आहे. आदर्श नागरिक अशी व्याख्या ते बनवते आहे; त्यामध्ये बसणार्‍या लोकांनाच सरकार काही फायदे देऊ करेल. त्यागीबाईंच्या वर्गाप्रमाणेच! पाढे येत नाहीत, म्हणजे घरात काहीतरी चूक आहे… त्यांना शिक्षा करा. शाळेत आदर्श विद्यार्थ्याने योग्य ते ओळखपत्र आणलेच पाहिजे, बोलण्यापूर्वी हात वर करून परवानगी मागितली पाहिजे, गणवेश घातला पाहिजे… नागरिक जसे दिलेल्या चौकटीत मावले पाहिजेत, तसेच मुलाचे रोजचे आयुष्य अपेक्षित चौकटीत बसलेच पाहिजे.

अनेकांचा रोजचा दिवस नीटनेटक्या कप्प्यात बसत नाही. वेगवेगळे अनुभव येतात, एकेका जागेवर, एकेका रोजगारावर अनेकांना हक्क सांगायची वेळ येते. सगळ्याच माणसांना तसे अनुभव येतात. स्त्रीवादी इतिहासकार आणि तत्त्वज्ञ लता मणी म्हणतात, ‘‘आपण ज्या कहाण्या सांगतो, त्यातूनच आपली घडण होत असते.’’ आपल्या कहाण्या एकमेकांसह घडलेल्या असतील, तर आपली व्यक्तिमत्त्वेही तशीच एकमेकांसह गुंफली गेलेली असतील हे आपल्याला समजते आहे ना? मग आपण आपल्याच दुनियेतल्या काहींना ‘वेगळे’, ‘दुसरे’ कसे काय समजू शकतो?

भारतातली विविधता गुंतागुंतीची आहे. अनेक सुरावटी, अनेक धर्म, अनेक व्यवहार यातून ती समृद्ध होते. ‘विविधतेत एकता’ असे म्हटले, की ती समृद्धी सपाट निरंगी होऊन जाते. त्याचा अर्थ वरवरचा राहतो; ती भाषा सुधारणावादी वाटली तरी. उदा. एनईपी 2020 मध्ये बालकेंद्री दृष्टिकोनाबद्दल आणि शिक्षणात कलेला जास्त वाव देण्याबद्दल चर्चा आहे – हा दृष्टिकोन सुधारणावादी आहे; पण देशभर अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गांमध्ये तो प्रत्यक्षात आणायचा मार्ग सारखाच कसा असेल? त्यात फरक असणारच. कोणत्याही उच्चभ्रू शाळेत – किंवा त्यागीबाईंच्या शाळेत एकच एक मार्ग कसा उपयोगी ठरेल? बालपणाचे इतके विविध नमुने असताना त्यातला एकच आदर्श कसा निवडणार? आदर्श मूल, आदर्श कुटुंब कसे ठरवता येतील? नव्याने वसलेली झोपडवस्ती आणि उच्चभ्रू वस्तीमधले आयुष्य इतके वेगवेगळे असते, की मूल कसे असावे आणि कसे बनावे याबद्दल एकच एक ‘आदर्श’ अपेक्षा करणे म्हणजे वास्तवाकडे डोळेझाक करणे आहे. पालक, शिक्षक, मुलांची देखभाल करणारे सगळे प्रौढ हे मुलांच्या बाजूचे असले पाहिजेत. त्यांना या वेगवेगळ्या वास्तवाची जाण असायला हवी. मुलांबद्दल जास्त जाणून घ्यायला जाल, तेव्हा त्याचा उपयोग शिक्षा करण्यासाठी नव्हे, तर त्यांची अधिक काळजी घेणे, त्यांच्या अडचणी सोडवणे यासाठी करा. आपण जेव्हा चौकस निरीक्षण करतो, तेव्हा जो वेगळेपणा आणि विषमता दिसते, त्याची नुसती नोंद करून पुढे जात नाही. हा वेगळेपणा का आहे, विषमता कमी करता येईल का, कोणत्या मार्गाने, यावरही विचार करतो. मग ‘विविधतेमध्ये एकता’ हे वाक्य रवंथ करायला न घेता, न्यायाच्या – समतेच्या संदर्भात कृती केली जाते. 

प्रश्न विचारणे म्हणजे तपासणी करणे. आपल्याच आयुष्याची तपासणी, पुनर्विचार. शाळेत आणि कुटुंबात प्रश्न विचारायला जागा असायला हवी. ठरलेला सोयीस्कर साचा त्यामुळे मोडू लागला तरी हवी. खाजगी आणि सामाजिक आयुष्य या दोन्ही ठिकाणी एकमेकांना छेदत असते. मूल या दोन्हीच्या केंद्रस्थानी असते. इथले प्रत्यक्ष जगणे कितीही असंबद्ध वाटले, वेगवेगळे दिसले तरी त्याच्याकडे डोळेझाक न करता ते स्वीकारायला हवे. नियमात, चौकटीत बसवण्यासाठी त्याला कुंपणे घालण्यापेक्षा त्या विविधतेचा उत्सव करायला हवा. प्रत्येक मूल आणि त्याचे जगणे जाणून घेतल्याशिवाय, त्या मुलासाठी स्वप्ने बघायची जागा आणि त्या स्वप्नासाठी कष्ट करायची शक्यता आपण प्रत्यक्षात कशी आणणार? काहीही जाणून घेण्याची सुरुवात प्रश्नातूनच होते. म्हणूनच कुठल्याही वर्गात मुलाला प्रश्न विचारायची भीती वाटता कामा नये. सगळे आधीच माहीत नसले तरी चालेल, माहीत नसलेल्या गोष्टी सगळे मिळून शोधत जाण्याची पद्धत आपल्याला हवी आहे. जगाबद्दल सगळीकडून विचार करणारी मुले हवी आहेत, बहुविध शक्यतांचा विचार करू शकणारी, वेगवेगळ्या भविष्यांची स्वप्ने पाहणारी आणि वैविध्याचा उत्सव करणारी मुले आपल्याला हवी आहेत.

खालील लिंकवर क्लिक करून ‘हम हिंदुस्तानी’बद्दल अधिक जाणून घेता येईल  – 

https://spoti.fi/44YxUda

संदर्भ : https://onbeing.org/programs/seeing-the-generative-story-of-our-time/

समीना मिश्रा

saminamishra@gmail.com

लेखक शिक्षक आणि माहितीपट-निर्माता आहेत. मुलांसाठी असलेल्या माध्यमांमध्ये त्यांना विशेष स्वारस्य आहे. बालपण आणि शिक्षण ह्या भिंगातून त्या भारतीय मुलांचे चित्रण करतात.