पालकनीती मासिकाचा छापील स्वरूपातला हा शेवटचा अंक. यानंतर पालकनीती तुमच्याकडे ऑनलाईन येणार आहे. महिन्याचा अंक येण्यापूर्वी दर आठवड्याला त्यातील एक लेख आणि महिन्यातल्या चार लेखांसह अंक तयार करून तोही तुमच्याकडे येईल. शिवाय आतापर्यंतच्या पालकनीतीतले आजही समर्पक असणारे काही लेख, त्यावर नव्या काळातलं भाष्य करून पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत.

पालकनीती सुरू झाली तेव्हा एकोणचाळीस वर्षं पालकत्व या विषयाला वाहिलेलं मासिकपत्र नियमितपणे निघू शकेल अशी कल्पना सुरुवात करणाऱ्या कुणीही केलेली नव्हती. पण ते जमलं, याचं कारण विचाराल तर कोणतीही आर्थिक किंवा तत्सम अपेक्षा न धरणारे आणि सातत्यानं मदतीला येणारे सवंगडी असं नक्कीच देता येईल. आपणहून जीव टाकून काम करणारे लोक मिळणं कधीही आणि कुठेही अवघडच असतं. पण ते आले. या मागे अनेक कारणं होती. त्यांना मनापासून हवं असलेलं आणि इतरत्र मिळत नसलेलं काहीतरी इथं मिळत होतं. काही अंक वाचून लोक भेटायला यायचे आणि मग त्यांना जाणवायचं, की हे मासिक विचार करायला लावतं, आनंदानं सहज खूप काही शिकायला भाग पाडतं. ‘मुलांचंच नव्हे तर प्रौढ झालेल्या आपल्या स्वत:चं पालकत्व आपणच घ्यायचं असतं हे इथं समजतं; घरातल्या माणसांमध्ये पालकत्वाबद्दल मतभेद असले, तर ते वेळीच लक्षात येऊन त्यावर चर्चा होते, आपण घेत असलेल्या निर्णयाची किंमत कळते’ असं म्हणत ते पालकनीतीच्या कामात रमून जात. 

सुरुवात करणाऱ्या आम्हा एकदोघांची इतरांना काही शिकवण्याची क्षमता असली-नसली, तरी या सहकाऱ्यांमुळे पालकनीती हे आमचं सर्वांचं अभ्यासाचं – विचारमंथनाचं माध्यम झालं. जे समजलं ते आमच्या प्रत्यक्ष जीवनात आणायचा प्रयत्न आम्ही मनापासून केला. सर्वांना सर्वार्थानं ते जमलंच असं जरी नसलं, तरी काय चुकतं आहे हे कळलं आणि ते सुधारायचे प्रयत्नही होऊ लागले.  

चारपानी अंकापासून सुरुवात करून पुढे सोळा-वीस पानी अंक निघणं, एरवीच्या सात-आठ पट मोठा दिवाळी अंक काढणं, ‘पालकनीती परिवार’ ही संस्था स्थापन होणं, त्यातून काही प्रकल्प सुरू होणं, त्यातला ‘खेळघर’ हा प्रकल्प मोठा आणि यशस्वी होणं हे सगळं झालं ते या निष्ठावान निरपेक्ष साथींमुळेच. पालकनीतीतून येणारे लेख, त्यातली भूमिका, सातत्य – इतरत्र दिसत नसल्यामुळे असेल – या कामाचं मोल त्यांना पैशात मोजता येण्याहून मोठं वाटलं.

आता परिस्थिती बदललेली आहे, आताची पिढी अतिशय हिशेबी आहे, कुणीही आपला वेळ आणि बुद्धी पैशांशिवाय खर्च करत नाही… असं म्हटलं जातं. पण ह्या पिढीतूनही स्वत:चेच पैसे खर्च करून प्रवास करत, किंवा काही चिटूकभर मानधनावर पालकनीतीचं काम करायला एक तरुणगट आपणहून आलेला आहे. खेळघरातही अशी स्वयंस्फूर्तीनं आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. अशी स्वयंसेविता हा आमच्या प्रयत्नांना मिळालेला मोठा प्रतिसाद  म्हणता येईल. आता नव्या पिढीनं जबाबदारी घ्यायला पुढे यावं, अशी विनंती केल्यापासून ही सात-आठ तरुण मंडळी पालकनीतीत आली आणि तेव्हापासून गेली आठनऊ वर्षं आमच्यासोबत आहेत.

परंपरागत रूढ झालेल्या अनेक सामाजिक दृष्टिकोणांना पालकनीतीनं विरोध केला. स्पर्धात्मकता, पुरुषप्रधानता, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं वाढतं पेव, धर्म – संस्कृती वगैरे अफूच्या गोळ्या… यादी खूप मोठी आहे. त्यांना विरोध करायचा म्हणजे आपण काय करणार, हा विरोध आपण का करत आहोत, त्यामागचं तत्त्व, संशोधन आणि अनुभवांच्या लेखातून विषय मांडायचा, मग वाचकांना ते पटतं की नाही, ते त्यांचं त्यांनी ठरवावं. ही पद्धत जोरदार आवाज करण्यापेक्षा कमी प्रभावी असेलही, पण पालक विचार करणारे आणि बालकांच्या भल्याचा आचार करणारे असतात हे आपलं गृहीतक आहे, तर दुसरा कुठला मार्ग उरतो?

ह्या प्रकारचं, एका अर्थी परिवर्तनाचं काम त्याच त्या लोकांनी करत राहू नये, असं आम्हाला सुरुवातीपासूनच वाटत आलं. त्याच त्या लोकांनी काम केल्यामुळे एकेरीपणा येतो; त्यात बदल व्हावेत. पालकनीतीचा दमदार गट तयार होण्यापूर्वीही प्रा. देवदत्त दाभोलकरसर आणि शोभाताई भागवत यांनी आपला सहभाव दाखवायला एकेक अंक संपादित केला होता. त्यानंतर तर सात-आठ जणांचा गट तयार झाला, एकेरीपणा उरलाच नाही. त्यानंतर २०१५ साली ‘प्रगत शिक्षण संस्था’ या मित्रसंस्थेनं वर्षभर पालकनीतीच्या संपादनाची सर्व जबाबदारी घेतली. दुसऱ्या वर्षी ‘क्वेस्ट’नं तशीच जबाबदारी घेतली. या दोन्ही संस्थांच्या सहकार्याबद्दल खूप आभार. त्यानंतर  २०१७ च्या वर्षभरामध्ये भारतभरातल्या अनेक संस्थांबद्दलचे अंक झाले, तोपर्यंत नवा, तरुण मुलामुलींचा गट आमच्यात हळूहळू सामील होऊ लागला होता.

मला आठवतंय अगदी सुरुवातीला म्हणजे आत्ताच्या तरुण संपादकांचा जन्मही झाला असेल-नसेल तेव्हा पालकनीतीची छपाई खिळे जुळवून होत असे. या काळात अंक फक्त चार पानांचा असे व डाव्या वरच्या कोपऱ्यापासून उजव्या खालच्या कोपऱ्यार्यंत गच्च लिहिलेला असे. छापून अंकांचे गठ्ठे घरी आले, की रात्री घरी मित्रमंडळी जमत आणि अंकांच्या घड्या घालून त्यावर पत्ते लिहीत, दुसऱ्या दिवशी अंक पोस्टात जाई. त्यात पुढे बदल झाला. आता प्रत्येक अंकाला मुखपृष्ठ असतं, चित्रं, रचना असतात. बहुतेक वेळा लेखकाकडून लेख टाईप होऊनच येतो. मग तो तपासून, त्यात हवे असलेले बदल झाले, की त्याची ‘सीटीपी’ फाईल छापखान्यात जाते. आता पत्ते लिहावे लागत नाहीत, ते काम यंत्राकडून होतं, पत्ते लावून अंक पोस्टात जाण्याची सोय आहे.

पोस्टाचा विषय निघालाच आहे तर एक गंमत तुम्हाला सांगण्याजोगी आहे. मोठ्या प्रमाणात अंक पाठवायचे म्हणून पोस्टाची सवलत घेतलेली असते. कोणत्या पोस्टातून अंक पाठवावा ह्यात काही बदलही होत असतात. त्या त्या पोस्टात एक प्रत द्यायची असते. गेल्या ३९ वर्षांमध्ये ४-५ पोस्टांमधून आम्ही अंक पाठवले. पोस्ट बदलल्यावर आधीच्या पोस्टातले काही कर्मचारी येत, ‘आता आमच्याकडून अंक जात नाही त्यामुळे पालकनीती वाचायला मिळत नाही हो’ असं म्हणत वर्गणी भरत.

तर अशा रीतीनं, इतकी वर्षं आपणा सर्वांना कागदावर छापलेला अंक पोस्टानं मिळत असे, घरातल्या सर्वांना तो दिसे आणि हवा तेव्हा वाचता येई. काही वर्षांपूर्वी तर प्रत्येक अंकावर आम्ही ‘पालकनीती वाचा, वाचायला द्या, घरात अशा ठिकाणी ठेवा की सहज नजरेला पडेल’ अशी ओळ छापायचो. आता मात्र हा अंक ऑनलाईन तुमच्याकडे येणार आहे. तो अधिकांनी वाचावा यासाठी तुम्हालाच पुढे पाठवावा लागेल, अनेकांपर्यंत पोचवायला लागेल.

नव्या पिढीच्या काही उत्साही आणि सक्षम कार्यकर्त्यांचा गट जमला आहे, हे मी तुम्हाला सांगितलंच. गेली ५ वर्षं ते पुढाकारानं मासिकाच्या कामात लक्ष घालत आहेत. आता जानेवारीपासून ही तरुण पिढी पालकनीतीची जबाबदारी पूर्णांशानं घेणार आहे. त्या गटाची ओळख ते करून देतीलच. आता त्यामध्ये अंकाची रचना ठरवणारांसह तंत्राचा मंत्र येणारी मंडळीही आहेत.

मुद्दा असा, की पालकनीती बंद होणार नाहीये, तुमच्यापर्यंत पोचायच्या माध्यमाचं रूपांतर होणार आहे. या प्रकारात काही फायदे आहेत. छपाई आणि पोस्टिंगचा खर्च पूर्णपणे वाचणार आहे. अर्थात, अंक तयार होण्यासाठी काही खर्च येतच राहील. वर्गणी मागितली जाणार नसल्यामुळे होणाऱ्या खर्चांसाठी काही देणगी द्यावीत अशी विनंती मात्र आहे.

‘अंक मिळाला नाही’ ही तक्रार संपणार आहे. अनेकांपर्यंत अंक जावा ही तुमची इच्छा पुरी होणं आता सहज शक्य आहे. ऑनलाईन प्रतिक्रिया देण्यात अनेकांना सहजता वाटत असल्यानं त्यांचं प्रमाणही वाढेल. अंक पोस्टानं जात असे त्यापेक्षा अधिक लोकांपर्यंत जाईल अशी आमची अपेक्षा आहे.

आणि, आता या स्थित्यंतराला आपण आपलंसं करावंत. संवाद साधण्याची संधी घेऊन तो वाढता ठेवावात. आपल्या अपेक्षांसह हवे असलेले नवीन विषय सुचवावेत आणि आजपर्यंत दिलीत तशीच साथ द्यावीत ही नम्र विनंती आहे. 

 संजीवनी कुलकर्णी