ही महिन्यांपूर्वी वृत्तपत्रात वाचलेली एक बातमी मनात घर करून राहिली आहे. पुण्यातल्या सेंट हेलेनाजमधे बालवर्गात शिकणारी एक छोटीशी, 3॥ वर्षांची मुलगी. रोज शाळेत घेऊन जाणार्या मेटॅडोरच्या डायव्हरनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. एवढ्या लहान पिाला अशा घृणास्पद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तिनं आणि तिच्या आईवडिलांनी काय काय भोगलं असेल आणि पुढेही किती काळ या घटनेच्या परिणामांची छाया त्यांना व्यापून टाकेल याची आपण कल्पना करू शकतो.
या घटनेला वाचा तरी फुटली, पण अशा कितीतरी घटना, प्रसंग लहान मुलींप्रमाणे मुलांनाही भोगावे लागतात. शाळांत, वाहनांत आणि प्रत्यक्ष घरातही. यातल्या अनेक गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. आपल्या लहानपणीचा काळ आठवून पाहिला तरी पाहिल्या – अनुभवलेल्या अशा लहानमोठ्या घटना आठवतील. एका पाहणीमधे असं आढळलं की 60 ते 70% लोकांना बालवयात लैंगिक त्रासाच्या घटनांना सामोरं जावं लागलं. एवढं हे प्रमाण मोठं आहे.
7-8 वर्षांच्या आतलं निष्पाप, निरागस मूल. जगातल्या कुरुपतेचा, अमंगळाचा विचारही करू न शकणारं – मग विरोधाचा तर प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच अत्याचारी व्यक्तींच्या ते अगदी सहज हातात सापडतं! कधी कधी खेळ, गंमत, एखादं आमिष, कुतूहल यातूनही या लैंगिक वापराची सुरुवात होते. ‘सिक्रेट’च्या नावाखाली ते गुप्त राखलं जातं. समजा मुलांना ते आवडलं नाही तरी ते व्यक्त करण्यासाठी, त्याबद्दल पालकांशी बोलण्यासाठीची भाषाही विकसित झालेली नसते. या विषयांवर असणार्या सार्वत्रिक मौनामुळे ह्या संदर्भातले शब्दही मुलांना माहीत नसतात. यामुळेच लहान मुलांसंदर्भात आपली जबाबदारी आणखीनच वाढते.
एक प्रसंग आठवतो. 7-8 वर्षांची एक मुलगी, शाळेतनं पायी घरी येत होती. रस्त्यात काही तरी बोलणं काढून एक माणूस तिला आडबाजूला घेऊन गेला. त्या माणसाचं विचित्र वर्तन पाहून मुलगी अत्यंत घाबरली, पळत सुटली. घरी पोचताच तिला रडू फुटलं. घरी वडील होते. सगळं ऐकल्यावर ते एवढे संतापले की त्यांनी तिच्या एक कानफडातच ठेवून दिली. ‘तू त्याच्याबरोबर गेलीसच कशाला?’
पालकांनी अशा प्रसंगी जे आणि जसं वागायला हवं त्याच्या बरोबर उलट हे वडील वागले. कदाचित आधी या संदर्भात विचार झालेला नसणार. प्रचंड संताप, अपमानाची भावना, गुन्हेगार तर समोर नाही तेव्हा राग कुठे काढायचा? त्यामुळे अशी प्रतिक्रिया आली. पण याचे परिणाम काय होतील? मुलगी यातनं काय शिकेल? पुन्हा कधी मोकळेपणानं ती वडिलांशी बोलेल का?
आधी समजणं महत्त्वाचं
लहानग्यांना या प्रसंगांना निभावून न्यायला मदत करायची तर आपल्याला त्याबद्दल वेळीच समजायला हवं. प्रत्यक्ष मुलाकडून याबद्दल समजण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रसंगात मूल ताबडतोबीनं आपल्याशी बोलेल, आपण त्याला समजावून घेऊ शकू असा विश्वास आपण त्याच्या मनात आधीच निर्माण करायला हवा. कधी मूल प्रत्यक्ष बोलणार नाही. पण त्याच्या नजरेतून, स्पर्शातून, वागण्यातल्या बदलांतून हे आपल्यापर्यंत पोचू शकतं. कधी कधी अगदी वेगळ्याच वर्तन समस्यांचं – उदा. अभ्यासात लक्ष न लागणं, चिडचिड करणं, अंथरूणात शू होणं, शाळेत जायलाच नको म्हणणं, यामागचं खरं कारण अशा काही प्रसंगांत दडलेलं असू शकतं. हे आपल्याला शोधायला लागेल.
आपल्या अनुपस्थितीत मुलांचा दिवसभराचा वेळ अनेक ठिकाणी जातो. पाळणाघर, रिक्षा-मेटॅडोर, शाळा, ग्राउंड, यलास, मित्र-नातेवाईक यातल्या कुणाहीकडे मूल सोपवून ‘मोकळं’ होता येणार नाही. तिथे काय आणि कसं चालतं यावर आपलं लक्ष हवंच – संवाद हवा – माहिती हवी.
मुलं जागरूक कशी होतील?
लैंगिक शिक्षणासाठीचं आपल्या मनातलं वय 11-12च्या पुढचं असतं. परंतु तोपर्यंत मुलांशी याबद्दल कधीच न बोलून चालणार नाही. अगदी लहान मुलांनाही, ‘कुणी चड्डीला हात लावत नाही ना? लावला तर – मी इतरांना सांगेन – असं सांगायचं आणि त्याबद्दल आम्हाला सांगायचं’, अशी स्पष्ट कल्पना द्यायला हवी. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्या त्या वयाच्या समजेनुरूप, मात्र संपूर्ण खरी उत्तरं द्यायला हवीत. अशा वेळी मदत कशी मिळवता येऊ शकेल हेही सांगावं. नको असलेल्या स्पर्शाला-गोष्टीला विरोध करायची हिंमत मुलांमधे येणं हे आपल्या वागण्यावर बरंच अवलंबून आहे.
मुलांबरोबर सदोदित रहाणं, लक्ष ठेवणं तसंच मुलांच्या समाजात मिसळण्यावर बंधनं आणणं शक्य नाही आणि योग्यही नाही, त्यामुळेच अशा प्रसंगांना तोंड द्यायची आपली स्वत:ची आणि मुलांचीही तयारी करणे, ताकद, क्षमता वाढवणे हाच आणि एवढाच खरा उपाय आहे.
असं काही घडलंच तर
अशा प्रसंगी मुलाच्या किंवा मुलीच्या मागे उभं राहाणं, त्यांना जपणं सर्वांत महत्त्वाचं ठरतं. मुलांना कणमात्रही दोष देता कामा नये. अशा व्यक्तीशी ताबडतोबीनं संबंध तोडून, हे पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. यामधे त्या व्यक्तीशी असलेल्या कोणत्याही आर्थिक, व्यावहारिक नात्याची – अवलंबनाची फिकीर न करता योग्य समज द्यायला हवी, खरं तर खटला भरायला हवा. आपण पक्के आहोत, घाबरत नाही हे लक्षात आल्यावर अत्याचारी माणसाचे धाडस कमी होऊ शकते.
या घटनेकडे पाहायचा समाजाचा दृष्टिकोन मुलाला-मुलीला दोष देण्याचा, अपवित्र-अस्वच्छ ठरवण्याचा, कीव करण्याचा असू शकतो. त्यापासून आपल्या मुलांना वाचवायला हवं. त्याविरूद्ध मुलांच्या बाजूनं उभं राहायला हवं.
वर्षानुवर्ष अशा गोष्टींवर मौन पाळून, या विकृत गोष्टी दडपून टाकल्या गेल्या. हे आता बदलायला हवं. यासाठी पालकांना एकत्र येऊन विचारांची आणि उपायांचीही देवाण घेवाण करता येईल. अत्याचारी वृत्तीला विरोध करण्याची ताकदही त्यामुळे वाढेल.
खेळण्या-बागडण्यात, कल्पनेच्या राज्यात रमून जाण्याच्या ह्या वयात अनुभवलेले असे घृणास्पद प्रसंग अनेकदा मोठेपणीही मुलांच्या विकासात अडथळे बनू शकतात. पुरेशी काळजी, वेळीच हस्तक्षेप आणि प्रेमळ जपणूकच मुलांना यातून तारून नेऊ शकेल.