खेळघर कृती कार्यक्रम

 

१. खेळ, कला आणि संवाद यांच्या माध्यमांतून विकास

खेळघरात खेळ, कला आणि संवाद या माध्यमांतून शरीर, मन आणि बुद्धी यांच्या समन्वयातून काम व्हावे. त्यातून मुले विचार करायला, निर्णय घ्यायला आणि त्यांची अंमलबजावणी करायला शिकतात.

‘खेळघर’ आणि ‘संवादगट’ या आठवडी उपक्रमांतून मुलांच्या जाणिवांचा विकास व्हावा यासाठी खालीलप्रमाणे काही विषयांची निवड करता येईल.
– स्वतःला शोधताना
– नातेसंबंध
– आपण कसे शिकतो?
– माझी वस्ती
– माध्यमांचा प्रभाव

अर्थातच वेळोवेळी यात बदल करण्याची, भर घालण्याची मुभा खेळघराच्या कार्यकर्त्यांना असायला हवी. या विषयांच्या माध्यमातून, विविध शैक्षणिक साधने वापरून मुलांना जाणिवांच्या विकासापर्यंत कसे पोहोचता येते याची ओळख या पुस्तकात करून दिली आहे.

खेळघर संवाद गट

 
 


२. अभ्यासवर्ग

मूल शालेय विषयांच्या अभ्यासात मागे पडत गेले तर ते शाळेतून बाहेर पडण्याची भीती असते. शाळा सोडून जर ते मूल रोजंदारीवर काम करू लागले तर खेळघरातून मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधींची शक्यताही संपते. प्रत्येक मुला-मुलीने किमान दहावीपर्यंत तरी शिकावे म्हणून खेळघराला शालेय विषयांतल्या मूलभूत संकल्पनांच्या शिक्षणाची जबाबदारी काही प्रमाणात घ्यावी लागते.

भाषेने निर्माण केलेल्या वातावरणात मूल जगत असते. ‘भाषा’ मुलाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असते. मुख्यतः भाषेच्या माध्यमातूनच मूल विचार करते, विचार व्यक्त करते आणि ज्ञान आत्मसात करते. त्यामुळे ‘भाषिक क्षमता विकसित होणे’ ही मुलांच्या विकासासाठी फार महत्त्वाची गोष्ट ठरते.

शालेय शिक्षणातून अनेकदा मुलांच्या मनांमध्ये गणिताची भीती निर्माण होते. मुले गणितापासून फटकून राहतात. खरे तर ‘गणित’ मुलांना तर्क करायला, अंदाज बांधायला शिकवते.

गणिती क्षमतांचा विकास आणि जीवनाशी जोडलेले व्यवहारातील गणित या दोन्ही अंगांनी मुलांना गणित शिकवणे अतिशय आवश्यक आहे. सर्जनशील, अर्थपूर्ण पद्धतीने खेळघरात होणारे भाषा आणि गणिताचे शिक्षण ही मुलांसाठी आत्मविश्वसाच्या दिशेने नेणारी फार मोलाची शिदोरी ठरते.

 
 


३. विशेष उपक्रम

खेळघर उपक्रम

शनिवार खेळघर

 
 

वाचन जत्रा

 

खेळघरातील वर्गांना सण – उत्सव – दिन – शिबिरे – जत्रा अशा उपक्रमांची जोड फार आवश्यक आहे.
दिवाळी, गणपती, दहीहंडी, संक्रांत, ख्रिसमस, मोहरम अशा पारंपरिक सणांच्या सादरीकरणातील अनिष्ट प्रथांना छेद देऊन सकारात्मक गोष्टींना महत्त्व दिले जावे.

पारंपरिक सणांच्याबरोबरीने महिला दिन, शिक्षक दिन, पऱ्यावरण दिन इत्यादी नवे सण साजरे केले जावेत.
मुलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन – विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन, अभ्याससहली इत्यादी.
शैक्षणिक विषयांशी जोडून – विज्ञानजत्रा, आरोग्यजत्रा, वाचनजत्रा इत्यादी उपक्रमही मोठे बहारीचे ठरतात.

अशा उपक्रमांच्या निमित्ताने सलग काही दिवस एखाद्या विषयावर काम होते. त्यामुळे असे उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या फायद्याचे तर ठरतातच शिवाय त्या दरम्यान जो उत्साह, आनंद मनात भरून राहतो त्यामुळे खेळघर – कुटुंबातल्या सगळ्यांमधील नात्याची वीण पक्की होते.

 
 


४. कृतीतून शिक्षण

‘करता करता शिकणे’ हे गांधीजींनी सांगितलेले फार महत्त्वाचे शिक्षणतत्त्व आहे. खेळघरात – बागकाम, स्वयंपाक, स्वच्छता, सजावट, वस्तूंची – साहित्याची व्यवस्था, दुरुस्ती अशा अनेक गोष्टी गटाने पार पडतात. हा दैनंदिन कामाचाच एक भाग असावा.

आर्थिक मदत
सरकारी मोफत शिक्षण संपले की मुलांचे पुढील शिक्षण आर्थिक प्रश्नांमुळे बंद पडू शकते. अशा वेळी सल्ला आणि प्रत्यक्ष आर्थिक मदत या दोन्हींचीही गरज असते.

 
 


५. पालकांबरोबरचे काम

मुलांचे पालक हा खेळघराच्या कामातील एक महत्त्वाचा दुवा आहे. पालकांनी मुलांना खेळघरात पाठवावे आणि त्यांना खेळघर संकल्पनेबद्दल, इथल्या सर्जनशील पद्धतींबद्दल माहिती असायला हवी, यासाठी पालक आणि खेळघर यांच्यामध्ये विश्वासाचे, संवादी नाते असायला हवे. पालकांशी होणाऱ्या अनौपचारिक गप्पांमधून मुलांचे जगणे, भावना आणि प्रश्न कार्यकर्त्यांच्या लक्षात येऊ शकतात. हे शक्य व्हावे म्हणून पालकसभा, शिबिरे, सहली यासारख्या उपक्रमांची मुद्दाम आखणी करणे गरजेचे आहे. याशिवाय खेळघरातल्या सण, उत्सव, प्रदर्शन यासारख्या शैक्षणिक उपक्रमांमध्येही पालकांना सहभागी करून घेता येते.

 
 


६. कामाचे मूल्यमापन

एखादे निश्चित ध्येय घेऊन त्यानुसार आपण काम करतो, तेव्हा या कामातून आपण खरेच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत आहोत का हेही तपासून बघायला हवे. आपण योग्य दिशेने जात आहोत का हे आपल्याला कसे समजावे?

मुले जर खेळघरात नियमित, वेळेवर, आपण होऊन आली तर समजावे की त्यांच्या मनात खेळघराने स्थान मिळवले आहे.

अभ्यासवर्गांमध्ये अजिबात लक्ष देऊ न शकणारी मुले आता दहा – पंधरा – वीस मिनिटे मनापासून वर्गात बसू लागली, लक्ष देऊ लागली तर ती खेळघरात रमू लागली आहेत असे समजावे.

खेळघरातील वर्गामध्ये, उपक्रमांमध्ये, कामामध्ये मुले जर सहभाग घेऊ लागली, पुढाकार घेऊ लागली तर त्यांना खेळघर आपले वाटू लागले आहे असे समजावे.

मुलांच्या वर्तनासंदर्भात अगदी संताप आणणाऱ्या प्रसंगातही कार्यकर्ते जर ठामपणे आणि सहृदयतेने वागू शकले आणि त्यानंतर मुलांमध्ये छोटेसेही वर्तन बदल दिसले तर कार्यकर्ते दोन पावले पुढे गेले आहेत असे समजावे.

खेळघरातले नियम ठरवण्यात, स्वतः पाळण्यात आणि इतरांनी पाळावे म्हणून प्रयत्न करण्यात मुले रस घेत आहेत असे दिसले आणि गटाने काम करताना भांडणे कमी होऊन सहकार्य जाणवले तर… फारच छान !

मुले – मुली आपण होऊन पुस्तके वाचायला घेऊ लागली, त्यावर बोलू लागली तर दिशा योग्य आहे असे म्हणता येईल.

खेळघरात पाठवावे म्हणून मुली पालकांकडे हट्ट धरू लागल्या तर त्या आत्मविश्वासाच्या वाटेवर चालू लागल्या आहेत असे समजावे.

अशा प्रकारे किमान काही गोष्टी साधल्या तर आपल्याला हे काम जमते आहे असे समजायला हरकत नाही.

काही विशिष्ट काळानंतर मुले काय शिकली, कुठे मागे राहिली हे नेमकेपणाने लक्षात यावे यासाठी मूल्यमापनाच्या उपक्रमांची आखणी करायला हवी. भाषा आणि गणिताच्या मूल्यमापनासाठी लेखी परीक्षांचे आयोजन करता येते. मात्र हे मूल्यमापन मुलांचा दर्जा ठरवण्यासाठी नसून मुलांनी काय आत्मसात केले आहे आणि त्याला कार्यकर्त्याच्या मदतीची नेमकी कुठे गरज आहे हे लक्षात यावे यासाठी व्हावे.

विशेष कार्यक्रमांत प्रकल्पांचे, सहलींचे निर्णय घेणे, आखणी करणे, कामांच्या जबाबादाऱ्या घेणे, समजलेल्या मुद्यांचे सादरीकरण करणे यातूनही मुलांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन होऊ शकते.

 
 


७. मुलग्यांचा स्वतंत्र वर्ग – दोस्ती गट

पाचवी ते आठवी या इयत्तांमध्ये, खेळघरात मुलग्यांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे ही खंत आम्हाला सातत्याने सतावत होती. असं का होतंय याचा विचार करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे मुलग्यांना चाकोरी नको वाटते. या वयोगटातील मुलग्यांना मोकळं वातावरण, वस्तीत आणि आसपास भटकणं, खेळणं हे जास्त प्रिय असतं. या मुलांसाठी नेहमीच्या वर्गांपेक्षा अधिक सर्जनशील उपक्रम घेता येतील का या विचारांतून जून २०१९ पासून एक वेगळी बँच सुरू केली. मुलांनी तिचे नामकरण केले ‘दोस्ती गट’!

विशेषतः मुलग्यांचं जग आणि त्यांचं भावविश्व समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेऊन, संवादाच्या सहाय्याने विचार करून त्यातून कसा मार्ग काढता येईल ह्याची अनुभूती त्यांना देणं, हा त्या गटाचा उद्धेश आहे. त्यातूनच असं लक्षात आलं की जी मुले अभ्यास विषयात कच्ची राहतात, शाळेतून गळतात आणि ज्याचे घरात अति लाड होतात किंवा ज्यांच्याकडे अति दुर्लक्ष होतं अशा मुलांना वाईट संगत लागू शकते, ती गुन्हेगारीच्या मार्गाला जाऊ शकतात. मुलग्यांबरोबर काम करण्याची गरज इथं अधोरेखित होते

 
 

८. युवक प्रकल्प

या प्रकल्पासाठी आम्हाला सामाजिक बांधिलकीची जाणीव असलेल्या सर्व लोकांकडून मदत मिळते.

दहावीनंतर मुलांना सक्षमपणे आपल्या पायावर उभं राहाण्याकरता व्यवसाय शिक्षणाची शाखा निवडता यावी यासाठी मार्गदर्शन, आर्थिक मदत, मानसिक प्रश्नांवर सल्ला यासाठी खेळघरात प्रयत्न केले जातात. १६ ते २० वयोगटातल्या मुलांना वस्तीतील व्यसनं, मारामाऱ्या, गुन्हेगारी, छेडछाड यासारख्या गोष्टी आकर्षित करीत असतात. यापासून स्वतःला व मित्रांना वाचवणं मुलांना शक्य व्हावं आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांच्या मनात रुजावी यासाठी युवक गटात उपक्रम आखले जातात.