विस्तार प्रकल्पांविषयी
 

१. खेळघर संकल्पनेचा विस्तार

खेळघराचं काम करताना आम्हाला मिळालेल्या अनुभवांचा, आम्ही आत्मसात केलेल्या गोष्टींचा लाभ इतरांनाही मिळावा असं वाटतं. खेळघरासारखं एखादं काम आपल्या परिसरात सुरू करण्याची इच्छा असणा-या किंवा प्रत्यक्षात करत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी जरूर आमच्याकडे संपर्क साधावा. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात या प्रशिक्षणाचं आयोजन होतं. वंचितांसाठी अनौपचारिक शिक्षणाच्या क्षेत्रात आधीपासून काम करत असलेल्या व्यक्ती व संस्थांना या शिबिरात सहभागी होता येतं.

२. नव्या खेळघरांसाठी मार्गदर्शक पुस्तिका

खेळघराच्या आजवरच्या अनुभवातून आणि अभ्यासातून आम्ही ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ ही खेळघर हस्तपुस्तिका तयार केली आहे. महाराष्ट्रभरातल्या शिक्षक / कार्यकर्त्यांनी या पुस्तकाचं उत्स्फूर्त स्वागत केलं आहे.

 

 


खेळघर कार्यशाळा

 

१९९६ सालापासून सातत्यानं खेळघराच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे मुलांना शिकण्याची गोडी लागते आहे. ती विचार करून निर्णय घेतात आणि त्या निर्णयांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्नही करतात. एका प्रसन्न आत्मविश्वासानं जगताहेत. हे पाहून ‘बदल शक्य आहे’ हा विश्वास आम्हाला लाभला आणि काम आणखी पुढे नेण्याचं बळ मिळालं.

खेळघराचे काम महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक वंचित मुलांपर्यंत पोहोचावं यासाठी २००७ पासून खेळघर संकल्पनेचा विस्तार ह्या प्रकल्पाचं काम सुरु झालं. या माध्यमातून वंचित मुलांबरोबर काम करणाऱ्या शिक्षक / कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणांची रचना झाली आहे.

१. पाच दिवसांची निवासी कार्यशाळा

फेब्रुवारी २००७ पासून पुण्यात दरवर्षी खेळघराची पाच दिवसांची कार्यशाळा घेतली जाते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वंचित मुलांसाठी खेळघरासारखी कामे सुरु व्हावीत आणि आपापल्या शैक्षणिक कामांमध्ये खेळघरानं विकसित केलेल्या सर्जनशील पद्धतींचा समावेश करता यावा हा या कार्यशाळांचा उद्देश आहे. सहभागींना कृतीतून, अभिव्यक्तीतून संवादातून आनंदाने शिकण्याची अनुभूती मिळावी अशी रचना असते. खेळघराच्या संकल्पनेची आणि पद्धतींची सहभागींना ओळख होते. काहीतरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींचा हा एक आनंद मेळावा असतो.

‘आपणही आपल्या जवळच्या वाड्या-वस्त्यांमध्ये खेळघराच्या धर्तीवर काम सुरु करावं’ असा विचार ज्यांच्या मनात असतो, त्यांच्याबरोबर शिबिराच्या दरम्यान साकल्यानं चर्चा होतात. त्यानंतर ज्यांनी नवी खेळघरं चालू केली आहेत अशा व्यक्ती अथवा संस्थांशी प्रत्यक्ष भेटीतून, फोन आणि ई-मेलद्वारे संपर्क-संवाद होतो. खेळघराची जागा कशी निवडावी, या कामात समाजाचा सहभाग कसा मिळवावा, अनौपचारिक पद्धतींचा कामात वापर कसा करावा, कामाची घडी बसवताना येणाऱ्या अडचणी अशा अनेक प्रश्नांवर उपायांच्या दिशेने चर्चा होते.

२. नव्या खेळघरांसाठी गरजेनुसार प्रशिक्षण

खेळघराचे कार्यकर्ते प्रशिक्षणानंतर वर्षातून किमान दोनदा नव्या खेळघरांना भेट देतात. या भेटीत त्यांचं प्रत्यक्ष काम बघून आढावा घेतला जातो. त्यानुसार जिथे मदतीची गरज आहे त्या संदर्भात विशेष प्रशिक्षणांचे नियोजन केले जाते. या भेटीत पालकनीती खेळघराचे कार्यकर्ते तेथील मुलांचे वर्ग सर्जनशील पद्धतीने घेऊन दाखवतात. त्यावर चर्चा होते. भाषा, गणित आणि जीवनकौशल्ये या विषयांसंदर्भातल्या विविध संकल्पना आणि साधनांची माहिती करून दिली जाते.

३.पालकनीती खेळघरात सहभागी होऊन शिकणं

नव्या खेळघराचे कार्यकर्ते वर्षातून आठ दिवस पालकनीती खेळघराच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होतात. पालकनीती खेळघराच्या ताईकडून वर्गाची आखणी समजावून घेणं, प्रत्यक्ष वर्गाचं निरीक्षण करणं, त्यानंतर ताईशी चर्चा करणं अशा अनुभवातून हे कार्यकर्ते नियोजन, सकारात्मक शिस्तीच्या पद्धतीनं प्रत्यक्ष वर्ग घेणं आणि वर्गाच्या नोंदी ठेवणं अशा अनेक गोष्टी शिकतात. सहभागींना विविध शैक्षणिक साहित्याची ओळख करून दिली जाते. नव्या खेळघरासाठी साहित्य बनवलं जातं. ‘प्रशिक्षणामध्ये आपण जे शिकतो ते वास्तवात येणं शक्य आहे’ याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्यानं, सहभागी मोठ्या उत्साहानं त्यांच्या खेळघराच्या कामाला भिडतात.

४.विशेष प्रशिक्षणं

पाच दिवसांच्या कार्यशाळेत सहभागींना अनेक संकल्पनांची ओळख होते. त्यापुढे जाऊन वेगवेगळ्या पद्धती आणि साधनांची सविस्तर ओळख व्हावी यासाठी वर्षभरात एका दिवसाच्या काही कार्यशाळांची आखणी केली जाते.


जीवनभाषा शिक्षण
गणित शिक्षण
संवाद गट
खेळघर एक सर्जनशील उपक्रम
पालकांबरोबरचे काम
सकारात्मक शिस्त

खेळघरातर्फे शाळा आणि सामाजिक संस्थांच्या मागणीनुसार विविध विषयांवर प्रशिक्षण घेतली जातात.

या प्रशिक्षणमालिकेतून नव्या खेळघरातील कार्यकर्त्यांना शिकण्या-शिकवण्याच्या नव्या सर्जनशील पद्धती, उपक्रम, साधनं यांची माहिती मिळते. मुलांबरोबर काम करताना मुलांच्या गरजांशी जोडून घेत एकात्मिक पद्धतीनं कसं काम करायचं या संदर्भातल्या नवनवीन कल्पना सुचायला लागतात.

खेळघराच्या प्रशिक्षणांमध्ये सर्वांचे स्वागत आहे.