पालकनीती मासिक ओळख

 

जगातल्या प्रत्येक लहान मुलाला समजदार पालकपण मिळावे  ही मोठ्यांची जबाबदारीच असते. यासाठी सामान्यपणे कुणी शिक्षण घेत नाही की त्यासाठी कुठले नियम-कायदेही असत नाहीत. संगोपन, बालविकास, बालशिक्षण ह्याबद्दलचा विचार, वाचन आपला अभ्यासाचा विषय असल्याशिवाय सहसा केले जात नाही. अर्थात आपल्याजवळ अनुभवाची एक शिदोरी नक्की असते; आपल्या बालपणात आपल्याला जसे वाढवले गेले त्याची. त्याप्रमाणे आपण आपल्या बाळाला वाढवू बघतो, किंवा काही वेळा आपल्यावर झालेला अन्याय, आपल्याला न मिळालेल्या गोष्टी आपल्या बालकांना मिळाव्यातच असा जीवापाड प्रयत्न करू पाहतो. अशा आपापल्या धारणांवर विचार करत आपलीआपली पालकनीती तयार होणार असते. ह्या ह्या प्रयत्नात आपल्याशी संवाद साधण्यासाठी सातत्याने कुणी सोबतीला असेल तर आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे मिळतील, आपल्या अनुभवांना अभ्यासाची, विवेकाची जोड मिळेल, तेही सातत्याने. त्यासाठी 1987 च्या 26 जानेवारीला पालकत्वाबाबत समाजजाणीवा सजग करणारे, त्या संवादात सर्वांना सामील करून घेणारे मासिकपत्र : पालकनीती सुरू झाले. पालकत्वाच्या बद्दलच्या सर्व विषयांना या मासिकात स्थान असते.

‘मूल वाढवणे’ हा व्यापक विकासनीतीचाच एक भाग आहे असंच पालकनीती मानत आली आहे.  पालकनीतीचा प्रवास आजही प्रसन्न संवेदनशीलतेने सुरू आहे. 2005 साली महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कारही पालकनीती मासिकाला मिळाला. 2014 साली संपादक मंडळाने पालकनीती मासिक आता वेगळ्या संपादकांनी चालवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आधीच्या संपादक मंडळानेच बदललेल्या काळातही केवळ जबाबदारी म्हणून अंक सुरू ठेवणे यामध्ये एकसुरीपणा येणार असे वाटू लागले होते. त्या कल्पनेला प्रतिसाद मिळून 2015 साली प्रगत शिक्षण संस्था, फलटण यांनी तर 2016 साली क्वेस्ट, सोनाळे, वाडा या संस्थेने पालकनीतीच्या संपादनाचे काम केले. त्यानंतर एक वर्ष भारतभरातल्या अनेक बालकारणी संस्थांचा- शाळांचा  परिचय पालकनीतीने वाचकांसमोर आणला. या वर्षातच काही युवक-युवतींनी पालकनीतीच्या संपादनाची धुरा अंगावर घेतली. एव्हाना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फक्त पुण्यातील नाही तर जगात इतरत्र राहूनही काम करता येणे शक्य झाल्याने ही मंडळी जगभरातून कुठूनही काम करतात. केवळ मराठीभाषकच यात आहेत असंही नाही. पालकनीतीच्या आधीच्या संपादकमंडळातले काहीजण तरूणगटाला आवश्यक तिथेच फक्त हवे तर साहाय्य करतात. ह्या नव्या गटाची एक विशेषता आहे. ते एकमेकांच्या सोयीने ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या त्या अंकांमध्ये किंवा कालावधीत काम करावे, आणि त्याशिवायच्या काळात इतर जबाबदार्‍या घ्याव्यात अशी मुभाही घेतात आणि इतरांना देतात. या कल्पनेला साहाय्य म्हणून पालकनीती परिवाराने कार्यकारी संपादकाची नेमणूक केली. या व्यवस्थेमुळे पालकनीतीच्या कामाला एक प्रकारचे स्थैर्य आले आहे. यापुढेही नवीन नवीन लोक यामध्ये संपादनाची जबाबदारी घेत राहातील आणि नवचैतन्यानं नटलेली पालकनीती आपल्यासमोर येईल अशी खात्री वाटते.