व्ही. एस. रामचंद्रन 

शास्त्रज्ञांवर ही मालिका लिहिण्यामागे माझे विज्ञानाबद्दल असलेले अमर्याद कुतूहल कारणीभूत आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात विज्ञान कसे आणि कुठे कुठे येते, त्याचे मानवी जीवनावर कोणते भलेबुरे परिणाम होतात, ह्या सगळ्याबद्दल जाणून घेण्यात मला खूप रस वाटतो. काही लोकांचे काम त्यांच्या आयुष्याला केवळ अर्थ आणि उद्देश पुरवण्यापुरतेच नसते, तर ते त्यांच्या आनंदाचे निधान असते. शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एस. रामचंद्रन ह्याचे उदाहरण म्हणता येतील. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘विज्ञान म्हणजे निसर्गाशी असलेले प्रेम-प्रकरण आहे. प्रेमात पडल्यावर येणारा सगळा वेडेपणा, अस्वस्थता, उत्कटता; सगळे जसेच्या तसे.’’

डॉ. रामचंद्रन हे प्रसिद्ध भारतीय-अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट आहेत. ते सॅन दिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘मेंदू आणि आकलन केंद्रा’चे (उशपींशी षेी इीरळप रपव उेसपळींळेप) संचालक आहेत. त्याच विद्यापीठात ते प्राध्यापक ह्या मानाच्या पदावर काम करतात. त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पद्मभूषण ह्या भारतातल्या नागरी पुरस्काराबरोबरच 2011 साली ते टाईम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीतही झळकले आहेत. ह्या त्यांच्या लौकिकापलीकडे मला भावते ती त्यांची विज्ञानाप्रति असलेली उत्कटता आणि विचार करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत. 

शास्त्रज्ञाचा जन्म 

विलयानूर सुब्रमणियन रामचंद्रन ह्यांचा जन्म 1951 साली तामिळनाडूमध्ये झाला. त्यांची आई गणिती होती आणि वडील अभियंता तसेच यूएनमधील (संयुक्त राष्ट्रे) एक मुत्सद्दी अधिकारी होते. त्यांचे आजोबा भारतीय संविधानाच्या शिल्पकारांपैकी एक म्हणून ओळखले जात. रामचंद्रन ह्यांना अगदी लहान वयातच विज्ञानात रुची निर्माण झाली. 12 वर्षांचे असल्यापासून ते शिंपले (सीशेल्स) गोळा करून त्यांचे वर्गीकरण करू लागले होते. हे नमुने त्यांनी अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री येथील एका शंखशास्त्रज्ञाकडे पाठवले. त्या शास्त्रज्ञाच्या मते ते नमुने अत्यंत दुर्मीळ प्रजातींचे होते. रामचंद्रन ह्यांना त्यांचे आईवडील तसेच भारतातल्या आणि पुढे वडिलांच्या बदलीमुळे लाभलेल्या बँकॉकच्या शिक्षकांकडून ह्या कामी नेहमीच प्रोत्साहन मिळाले. पुढे त्यांच्या वडिलांना वाटले, की मुलाने संशोधनकार्याच्या मागे न लागता डॉक्टर व्हावे. त्यानुसार मद्रासच्या (चेन्नई) स्टॅनले वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. येथे एमबीबीएसची पदवी घेत असतानाच ‘नेचर’ ह्या प्रथितयश नियतकालिकात त्यांचा ‘मानवाची दृष्टी’ (र्हीारप र्ींळीळेप) ह्या विषयावर पेपर प्रकाशित झाला. लंडनच्या ट्रिनिटी महाविद्यालयातून पी.एचडी. करण्यासाठी पुढे ते इंग्लंडला गेले. 

2005 साली रामचंद्रन ह्यांनी ‘क्युरियस माईंड्स’ ह्या पुस्तकात ‘द मेकिंग ऑफ अ सायंटिस्ट’ ह्या शीर्षकाचा एक निबंध लिहिला. त्यात ते म्हणतात, की शास्त्रज्ञ घडविणारा गुण म्हणजे पछाडून टाकणारे कुतूहल; अशी जिज्ञासा जी शमली नाही तर शरीरभर एक अस्वस्थता निर्माण करते. त्यांना स्वतःला कर्नाटक संगीत, पुरातत्त्वशास्त्र, इतिहास, कला अशा अनेक गोष्टी भारावून टाकतात. त्यांनी सिंधू खोर्‍यातील लिपीची उकल करणारा (डीकोड) एक अतिशय प्रभावी निबंध लिहिला आहे. त्यांना जीवाश्मशास्त्रातही खूप रस आहे. त्यांनी केलेल्या एका डायनासोरच्या कवटीच्या निरीक्षणावरून एका प्रजातीचा शोध लागला. त्यामुळे ह्या प्रजातीचे नाव त्यांच्या नावावरून ‘मिनोटोरोसॉरस रामचंद्रानी’ असे ठेवण्यात आले आहे. त्यांची आवड चौफेर आहे. वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, रसायनशास्त्र ह्याबरोबरच, आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत शिकलेले मानवी मेंदू, डार्विन उत्क्रांती आणि संज्ञानात्मक न्यूरोसायन्स हे विषयही त्यांच्या आवडीचे आहेत. 

ओल्ड स्कूल सायन्स आणि न्यूरोप्लास्टिसिटी… जुने ते सोने

अत्यंत क्लिष्ट अशा मेंदूच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी कमीतकमी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी 

डॉ. रामचंद्रन प्रसिद्ध आहेत. ‘मेंदूविज्ञानाचे जुने सोनेरी दिवस मला प्रेरणा देतात’, असे ते म्हणतात. त्यावेळी रुग्णाच्या एखाद्या विशिष्ट कार्यामध्ये झालेली गडबड अभ्यासून संशोधक 

मेंदूच्या कार्यप्रणालीचा अंदाज लावत. उदा. अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना चेहरे ओळखणे किंवा व्याकरणशुद्ध बोलणे जड जाते. ऋचठख किंवा झएढ स्कॅनसारख्या मेंदूच्या क्रियाकलापांबाबतची माहिती गोळा करणार्‍या प्रगत तंत्रज्ञानाचा ते वापर करत असले, तरी रुग्णांशी बोलणे आणि साध्यासोप्या चाचण्या करण्यालाच ते प्राधान्य देतात. 

डॉ. रामचंद्रन ह्यांना सुरुवातीच्या काळात कीर्ती मिळाली ती त्यांच्या ‘फँटम लिम्ब्स’च्या अभ्यासामुळे. रुग्णाचा एखादा अवयव कापून काढलेला असला, तरी तो अस्तित्वात आहे असे रुग्णास वाटत राहते हे डॉक्टरांना पूर्वापार माहीत होते. एवढेच नाही, तर तेथे वेदनाही जाणवतात. त्यांना ‘फँटम पेन’ अशी संज्ञा आहे. आता प्रश्न असा होता, की ह्या वेदनांवर इलाज कसा करायचा? फँटम पेन असणार्‍या एका रुग्णाला डॉ. रामचंद्रन ह्यांनी हाताने हळुवारपणे पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत तपासले. रुग्णाच्या प्रतिसादाने त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी रुग्णाच्या चेहर्‍याच्या एका बाजूला स्पर्श केला. रुग्णाला तो त्याच्या फँटम अवयवालासुद्धा जाणवला. मेंदूच्या एका विशिष्ट भागात त्वचेच्या संवेदनांचा नकाशा असतो, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे समजा एक हात कापला, तर त्याच्याशी संबंधित मेंदूच्या भागाला संदेश मिळणे बंद होते. मात्र म्हणून काही मेंदूतील तो भाग निष्क्रिय होत नाही. त्याच्या आजूबाजूच्या भागांकडे इतर अवयवांकडून संदेश येत असतात. ते संदेश मग हा भागही घेऊ लागतो. त्यामुळे प्रत्यक्षात चेहर्‍याकडून संदेश पाठवले गेले असले, तरी जणू काही त्या गमावलेल्या अवयावानेच संदेश पाठवला आहे, असे रुग्णाला वाटते आणि फँटम पेन जाणवते. ह्या ज्ञानाच्या बळावर डॉ. रामचंद्रन ह्यांनी रुग्णाच्या फँटम लिम्ब्समधील वेदना कमी करण्याच्या दृष्टीने तंत्र विकसित करायला सुरुवात केली. फँटम लिम्बमधील वेदनांपासून आराम मिळावा म्हणून चेहर्‍याला मालीश करणे हे त्यातलेच.

डॉ. रामचंद्रन ह्यांनी केलेला दुसरा प्रयोग तर आणखीनच भन्नाट होता. त्यांनी अशा रुग्णांच्या भेटी घेतल्या ज्यांना फँटम  लिम्ब्स हलताहेत असे वाटत होते, त्यात पेटके येत होते आणि काही जणांनी तर अर्धांगवायू झाल्याचीदेखील तक्रार केली होती. ह्या गूढ आजारावर इलाज करण्यासाठी त्यांनी एक पुठ्ठ्याचा बॉक्स तयार केला. त्याच्या मधोमध एक आरसा बसवलेला होता. हात अ‍ॅम्प्यूट केलेल्या रुग्णाने आपला दुसरा हात एका बाजूने आत घालून हळूहळू फिरवायचा. त्यामुळे अ‍ॅम्प्यूट केलेला हात जणू पुन्हा आला आहे, असा भास होतो. मेंदूच्या दृष्टीने तर तो गमावलेला हात अस्तित्वात होताच आणि आणि आता डोळ्यांनाही तो दिसतोय. ह्या ‘मिरर बॉक्स’च्या मदतीने अनेक रुग्णांनी त्यांच्या फँटम लिम्ब्समधील पेटके किंवा इतर व्याधींवर मात केली. काहींनी तर असेही म्हटले, की बॉक्स वापरायला लागल्यावर काही आठवडे किंवा महिन्यांच्या कालावधीत त्यांचे फँटम लिम्ब्स नाहीसे झाले. या आणि अशा इतर प्रयोगांमधून डॉ. रामचंद्रन ह्यांनी मेंदूविज्ञानातील नवीन दाखलाच सादर केला. यंत्रात जसे निरनिराळी कामे करणारे मोड्यूल्स असतात, तशी काटेकोर व्यवस्था मेंदूमध्ये असत नाही. न्यूरोप्लास्टिसिटीमधील ह्या नव्या संकल्पनेनुसार मेंदूच्या व्यवस्थेत सातत्याने बदल होत असतात. त्यातील विशिष्ट भाग विशिष्ट काम करतात असे असले, तरी इतर संबंधित कामांसाठी त्यात रूपांतरणही शक्य आहे. वेगाने बदलणार्‍या पर्यावरणाशी जुळवून घेणे भाग असल्याने आपल्यासाठी ही मोठीच बातमी आहे. कारण त्यासाठी आपल्याला फक्त आपले ‘सॉफ्टवेअर’च नाही, तर ‘हार्डवेअर’सुद्धा ‘अपडेट’ करावे लागणार आहे.    

मानवाची दृष्टी, फँटम लिम्ब्स ह्यांचा अभ्यास केल्यावर डॉ. रामचंद्रन एका अभूतपूर्व घटनेकडे वळले -‘सिनेस्थेशिया’. ह्या पारिभाषिक शब्दाचा अर्थ आहे संवेदनांचे मिश्रण. अशा माणसांमध्ये संवेदनांची सरमिसळ होते. उदा. प्रत्येक अंक किंवा अक्षराशी एक विशिष्ट रंग जोडलेला असतो. म्हणजे 1 कदाचित हिरवा असेल, 2 पिवळा, असे काहीसे. काहींच्या भावना विशिष्ट पोताशी (ींर्शुीीींश) जोडलेल्या असतात. अमुक एका प्रकारचा सँडपेपर मनात अपराधभाव निर्माण करतो, तर दुसरा कुठला धादांत खोटे बोलत असल्याची भावना. डॉ. रामचंद्रन ह्यांनी अनेक वर्षे अशा व्यक्तीुंचा (सिनेस्थेट्स) अभ्यास केला. त्यांना न्यूटन, आईनस्टाईन, नाबाकोव्ह, पोलॉक असे अनेक कलाकार, शास्त्रज्ञ सिनेस्थेट्स होते हे दाखवून देणारे पुरावेही सापडले. आपण रोजच्या भाषेत अनेक रूपके वापरत असतो. ‘तो पोलादी पुरुष आहे’ किंवा ‘ती व्यक्ती खूप उबदार आहे’ वगैरे. डॉ. रामचंद्रन ह्यांचा निष्कर्ष सांगतो, की अशी रूपके तयार करण्याचे मूळ ह्या संवेदनांच्या सरमिसळीत आहे. त्यांनी सिनेस्थेशिया आणि सर्जनशीलता ह्यातील दुव्याचादेखील अभ्यास केला. मेंदूतले हे क्रॉस-वायरिंगच माणसातील सर्जनशीलतेला कारणीभूत ठरते, असे त्यांना आढळून आले आहे.  

1990 च्या दशकात इटलीतल्या मेंदूवैज्ञानिकांनी मानवी मेंदूत असलेला एक नवीन प्रकारचा मज्जातंतू (न्यूरॉन) शोधून काढला. त्याला त्यांनी म्हटले ‘मिरर न्यूरॉन’. हे मज्जातंतू आपल्या मेंदूभर असतात आणि फक्त आपणच नाही, इतरांनी काही कृती केली, तरी सक्रिय होतात. इतरांच्या क्रियेवर प्रतिक्रिया देण्याच्या त्यांच्या ह्या गुणधर्मावरूनच त्यांचे ‘मिरर न्यूरॉन’ असे नामकरण करण्यात आले. ह्या अजब न्यूरॉनमुळेच माणसाला समोरचा आता काय करणार आहे किंवा करू शकतो ह्याचा अंदाज येतो असा डॉ. रामचंद्रन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कयास बांधला. हे न्यूरॉन मानवामधील विलक्षण क्षमता समजून घेण्याची गुरुकिल्ली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण दुसर्‍याचे अनुकरण करतो, त्याचा दृष्टिकोन काय असू शकेल ह्याचा अंदाज बांधतो. त्यांचा दावा आहे, की ह्या दोन गोष्टी इतर सगळ्या क्षमतांमधला उदा. नवीन शिकण्याची, भाषा वापरण्याची क्षमता तसेच गुंतागुंतीची मानवी संस्कृती विकसित होणे ह्या सगळ्यातला समान दुवा आहेत. इतरांच्या कृती, त्यांचे विचार ह्यांना आपल्या मनात जागा देणे, त्यावरून अंदाज बांधणे या क्षमतेमुळेच मानवाचा ‘स्व’ उत्क्रांत होऊ शकला, असेही ते म्हणतात. 

भाषा, संस्कृती आणि आपला स्व कसा कसा उत्क्रांत होत गेला अशा कल्पनांवर काम करत असतानाच त्यांनी सर्जनशीलता आणि कलास्वाद याबद्दलही न्यूरोलॉजीच्या आधारे भाष्य केले. मानवी मेंदूच्या अभ्यासाच्या आधारे त्यांनी काही नियम मांडलेत. आनंद मिळवण्याची आणि कलानिर्मिती करण्याची मानवाची क्षमता ह्याबाबत त्यातून माहिती मिळते. धर्म आणि गूढवाद ह्यांचाही त्यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत अभ्यास केला. त्यांच्या असे लक्षात आले, की अनेक संत, योगीपुरुष जी एकत्वाची भावना मांडतात, त्यासाठी मेंदूतील काही न्यूरल सर्किट्स कारणीभूत असतात. 

‘ते खर्‍या विज्ञानापासून दूर जात आहेत,’ ‘मानवी मेंदूबद्दल ते मांडत असलेले अनेक सिद्धांत, कल्पना विज्ञानापेक्षा तत्त्वज्ञानाच्या अंगाने जातात’ असा अनेक शास्त्रज्ञांचा दावा आहे. पण त्यांचे म्हणणे, की वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपला वाटा उचललेला आहे. आणि त्यामुळे आता त्यांना नवीन कल्पना आणि सिद्धांत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. इतरांनी कठोर परीक्षांची चाळणी लावून तपासणी करावी. मला असे वाटते, की खरे तर कुठल्याही; पण त्यातल्या त्यात मेंदूविज्ञानासारख्या तुलनेने नवीन असलेल्या क्षेत्रात अशा धाडसी कल्पना मांडणार्‍या लोकांची खूप गरज आहे. पुढे त्या कल्पना निरनिराळ्या कसोट्यांवर पारखून घेता येतीलच; नाही का! 

प्रांजल कोरान्ने pranjpk@gmail.com

लेखक भाषाअभ्यासक असून ‘क्वेस्ट’च्या माध्यमातून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात. लेखन आणि वाचन हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.

अनुवाद : अनघा जलतारे