वंदना कुलकर्णी
गेल्या महिन्यात वृत्तपत्रात आलेल्या बातमीनं खूप अस्वस्थ करून टाकलं होतं ‘दत्तक दिलेले बालक मूळ आईकडे परत द्यावे’, ‘न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल’ ‘रियुनियन ऑफ फोर इयर ओल्ड चाइल्ड अँड मदर’, ‘मदर्स गेन टर्न्स टु फोस्टर पेरेंट्स लॉस’ अशा आशयाची ती बातमी होती.
ही घटना थोडक्यात अशी होती – डिसेंबर ९७ मध्ये माटुंगा येथे साहिल हा तीन वर्षांचा मुलगा आईबरोबर देवदर्शनाला गेला होता. त्याच्या आईला, पूजाला, ३ दिवसांच्या उपवासामुळे चक्कर आली व तिची शुद्ध हरपली. ती पुन्हा शुद्धीवर आली तेव्हा साहिल जवळपास नव्हता. खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही तेव्हा त्यांनी जवळच्याच पोलीस ठाण्यात तो हरवल्याची नोंद केली. नंतर सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला.
इकडे श्री. चव्हाण यांना रस्त्यावर रडत असलेला साहिल सापडला. त्यांनी त्याला आपल्या घरी नेलं. नंतर कऱ्हाडजवळच्या गावी नेलं, त्याचे नाव विजू तिथे दोन-एकमहिने ठेवून साताऱ्याजवळील पोलीस चौकीत दादर येथे मूल सापडल्याचं सांगून पोलीसांच्या स्वाधीन केलं. तेथून त्याला बालकल्याण मंडळ सातारा आणि नंतर संगोपनासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्यातील ‘प्रीत मंदीर’ या संस्थेत दाखल करण्यात आलं. तीन महिन्यांनंतर त्याला दत्तक देण्यासंबंधीचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला व दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडे (हे जोडपं पंजाबमधील आहे) त्याला सोपवण्यात आलं. त्यांनी त्याचं नामकरण शिवम् असं केलं. प्रेमाच्या सुरक्षिततेच्या उबेमध्ये दोघांनीही एकमेकांना जीव लावला. या दरम्यान साहिलच्या आईला त्यांचा हरवलेला साहिल प्रीत मंदीरमध्ये दाखल करण्यात आल्याचे समजलं आणि शेवटी न्यायालयाच्या आदेशानंतर साहिलला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं. अशा आशयाची ही बातमी होती.
ही बातमी मनाला अपार वेदना तर देऊन गेलीच; पण मनात अनेक प्रश्न, शंकाही निर्माण करून गेली. वृत्तपत्रातून रसभरित वर्णनाच्या उलट-सुलट बातम्या आल्या पण वस्तुस्थिती आणि अनुत्तरित मुद्यांचा खुलासा करणारा लेख कोणाकडूनच दिला गेला नाही. म्हणूनच प्रत्यक्ष या घटनेच्या तपशिलात न जाता त्या निमित्ताने पुढे आलेल्या मुद्यांचा विचार व्हावा, त्याचप्रमाणे दत्तक पालकांना याबद्दल काय वाटतं आहे हे जाणून घ्यावं, ह्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
खरे तर पुण्यासारख्या शहरात दत्तकाबद्दलचा निकोप, सकारात्मक दृष्टिकोन विकसित होताना दिसतो आहे. शारीरिक अडचणीमुळे मूल न होऊ शकणारी जोडपी किचकट, गुंतागुंतीच्या, खर्चिक, अनिश्चित वैद्यकीय उपचारांपेक्षा दत्तकाचा पर्याय स्वीकारताना दिसताहेत. एक स्वतःचं व एक दत्तकमूल असा जाणीवपूर्वक निर्णय घेणाऱ्यांबाबतही पूर्वी इतकी नवलाई राहिलेली नाही. याही पुढं जाऊन एकट्या राहणाऱ्या स्त्रियांनी (अविवाहित असूनही) मूल दत्तक घेतल्याचीही काही उदाहरणं आहेत. स्वतःला एकच मूल असेल आणि ते दत्तकच असेल असा विचार करणारी तरुण जोडपीही दिसताहेत. असा सारा दत्तकासंबंधीचा आशेचा पट डोळ्यासमोर आहे. अर्थात, हेही तितकंच खर आहे, की दत्तक मूल घरी येईपर्यंतचा काळ हा काहीसा ताणाचाही असतो. आपल्या या बाळाचं स्वागत कसं होईल? लोकांची प्रतिक्रिया काय असेल? आपल्याला झेपेल ना सगळं? असे बरेच प्रश्न सतावत असतात.
या पार्श्वभूमीवर ही बातमी वाचल्यावर आम्ही अनेक दत्तक पालकांशी बोललो. तुमच्या मनात काय काय विचार आले, तुम्हाला काय वाटलं, या आमच्या प्रश्नांना प्रतिसाद म्हणून आलेल्या प्रतिक्रिया, मते, मनोगत त्यांच्याच शब्दात संकलित करून दिलेली आहेत. या लेखाच्या पहिल्या भागात पुनरावृत्त विचार टाळायचा प्रयत्न केलेला आहे. काहींनी त्यांच्या मनोगताला वैयक्तिक अनुभवाच्या परिसाचं आंदणही दिलं आहे. लेखाच्या दुसन्या भागात दत्तक देणाऱ्या भारतीय समाज सेवा केंद्र या संस्थेत अनेक वर्षं काम करणाऱ्या कार्यकर्त्या अनुराधा दीक्षित यांचे या घटनेच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या मुद्यांसंदर्भातले विचारही आपल्या समोर मांडत आहोत.
राजगुरूनगरच्या डॉ. माणिक बिचकर दत्तकाचा आपला अनुभव किती मधुर आहे हे सांगताना लिहितात, “मी लहान आहे तर माझी काळजी घेणं तुझं काम नाही का? असं मला ठणकावून विचारणारी आमची लेक अश्विनी म्हणता म्हणता ८ वर्षांची झाली की! ८ वर्षांपूर्वी नाजूकशी, भिरभिर डोळ्यांची आमची ही दत्तक-कन्या घरी आल्याचा दिवस मला फारच ठळक स्मरतो. मित्र-मैत्रिणींच्या गप्पांमध्ये लोकसंख्येच्या विस्फोटावर चर्चा चालली असता, ‘खरं तर आपल्या सरकारने कायदा केला पाहिजे की एकच स्वत:चे मूल होऊ द्यावे अन् जर जास्ती मुलांची हौस असेल तर पुढे पाहिजे तेवढी मुलं दत्तक घ्यावीत. त्याशिवाय लोकसंख्याही आटोक्यात येणार नाही अन् ज्यांना काळजीची गरज आहे त्या मुलांचा प्रश्नही सुटणार नाही!’ असं तावातावानं ‘ह्यांचं’ बोलणं चाललं होतं. ‘मग आपणच का नाही?’ अशी आमची चर्चा झाली. त्यावेळी आमचा मुलगा अक्षय साधारण साडेचार वर्षांचा होता. विचारापासून सुरू होऊन सर्व अर्ज इ. सोपस्कार होऊन एक-दीड वर्षांनी अश्विनी घरी आली. हळूहळू आमचं सर्व घरदार तिच्या बाललीलांमध्ये सामील झालं. मुलं वाढवतानाचा आनंद आम्ही पुन्हा एकदा मनसोक्त अनुभवला.
मूल आपल्या हाडामासाचे बनले की नाही त्यापेक्षा आपले अनुबंध किती जुळले हेच जास्त महत्त्वाचं. आपल्या सहवासातून कितीतरी पद्धती ,आचार-विचार मुलं आपोआपच उचलत असतात. इतपत की ज्यांना माहिती नाही तेच नव्हे तर ज्यांना अश्विनी दत्तककन्या आहे हे माहिती आहे अशीही माणसं ‘ती किती आईसारखी बोलते, दिसते, वागते.’ ‘दादासारखी समजूतदार आहे.’ इ. शेरे देतात. अशा वेळेला जास्तच जाणवतं, की हे आपल्या मनात जास्त असतं – आपला, दुसऱ्याचा असं. मुलांसाठी तसं नसतं. ती मनापासून प्रेमच करतात.
रोहिणी जोशी म्हणतात, ” या घटनेनंतर मला अनेकांनी विचारलं की असं तुमच्या बाबतीतही घडू शकेल. पण या बाबतीत संस्था आवश्यक ती काळजी घेतातच असा माझा अनुभव आहे. त्यामुळं ही अगदी अपवादात्मक केस म्हणूनच त्याकडं बघावं असं मला वाटतं.”
श्रीनिवास आणि साधना खट्टी आपला अनुभव मांडताना म्हणतात, “३ वर्षांपूर्वी आमची धाकटी मुलगी आम्ही दत्तक घेतली. एका नव्या आनंदाला, सुखाला आम्ही सामोरे गेलो. तो आनंद, ते सुख दरदिवशी आमची लेक द्विगुणित करते आहे. मात्र ही बातमी वाचल्यानंतर त्या सुखाला क्षणभर का होईना तडा गेला असे वाटले. बाळ दत्तक घ्यायचे हे आम्ही उभयतांनी ठाम ठरविले होते. त्यामुळेच ही बातमी वाचून आम्ही दोघंही हबकलोच. अनेक प्रश्न मनात येऊन गेले. यातील वेदना, कुचंबणा जवळून अनुभवल्या. त्या दिवशी संध्याकाळी शेजारी येऊन सल्ला देऊन गेले. ‘दोन-चार वर्षानेही दत्तक मुलीच्या बाबतीत असा प्रश्न येऊ शकेल. कागदपत्रे तपासून घ्या.’ पण तोपर्यंत यंत्रणेतील दोष, दत्तकासंबंधीची कायदा-प्रक्रिया या सगळ्याचा शांत चित्ताने विचार करून मन स्थिरावलं होतं. मन हेलावणारी बातना देऊन या प्रकरणाला वृत्तपत्राने वाचा फोडली खरी; पण दत्तक देणाऱ्या संस्थांबाबत, त्या प्रक्रियेबाबत कायद्यासंदर्भात फारशी माहिती नसणाऱ्या नागरिकांची दिशाभूल होऊ शकते. ती होऊ नये याची जाणीव पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे.”
आशिष व अंजली लिमये म्हणतात, “ही बातमी वाचून मन सुन्न झाले. बातमी वाचताक्षणी चूक कुणाची हे समजण्याआधी पहिल्यांदा मनात आले ते इतक्या लहान वयात वेगवेगळ्या ठिकाणांहून साहिलची झालेली ससेहोलपट, या संपूर्ण काळात त्याच्या आईने भोगलेला मनःस्ताप तसेच थोड्या काळासाठी कुटुंबात सामावलेल्या साहिलच्या नवीन आईवडिलांच्या पदरी आलेली निराशा व दुःख. एका घटनेने किती जणांच्या मनावर खोलवर आघात केले! बातमी खोलात शिरून वाचल्यावर विचार आला तो दत्तक देणाऱ्या संस्थेवर किती मोठी जबाबदारी असते याचा. मूल दत्तक घेण्यासाठी आलेल्या जोडप्यांना दत्तकविषयक कायदे, कोर्टाचा नियम यांची अंमलबजावणी या सारख्या अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनाची मुख्य जबाबदारी या संस्थांवर असते. संस्थेच्या कारभारातील लहान लहान त्रुटीसुद्धा पुढे प्रश्न म्हणून उभ्या राहू शकतात. दत्तक देण्याची प्रक्रिया किती किचकट आहे असं दत्तक घेताना वाटलं होतं. पण या घटनेनंतर ते आवश्यकच आहे असं मनापासून वाटलं.”
संजीवनी चाफेकर लिहितात, “इतक्या वर्षात दत्तकासंबंधी अनुचित प्रकार मी प्रथमच ऐकला. त्यातही नेमका कोणाचा हलगर्जीपणा या घटनेस जबाबदार आहे हे वृत्तपत्रातील बातम्यांवरून मला स्पष्ट झालं नाही. आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात, या बाबतीत दोन्ही बाजूने (पालक व संस्थाचालक) परस्परविश्वासावर व सहकार्यानेच गोष्टी झाल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. नियम फक्त दिशादर्शकासारखे असतात. किंबहुना ते तसेच असले पाहिजेत. कारण इथे आपण एखाद्या वस्तूची देवघेव करत नसून अनेक व्यक्तींसाठी आयुष्यभर महत्त्वाचा ठरणारा निर्णय घेत असतो. मी स्वतः दत्तक घेताना (प्रत्यक्षात बऱ्यापैकी व्यवहारी, संशयी इ.इ. असूनही) अशा परस्परविश्वास आणि सहकार्यावरच अवलंबून होते ह्याची जाणीव मला ह्या घटनेनंतर झाली.
या सगळ्याचा परिणाम काही प्रमाणात नव्याने दत्तक घेऊ इच्छिणारे व विशेषतः ज्यांचा निर्णय डळमळीत आहे अशांवर होईल. पण त्यातले बहुसंख्य लोक आत्तापर्यंत सुरळीतपणे पार पडलेल्या दत्तकविधानांच्या आधारे पुढे पाऊल उचलतील असा विश्वास वाटतो. त्याचबरोबर एखाद्याच्या मनात शंका असेल, तर त्यानी व्यवस्थित कागदपत्रे पाहण्यात काहीच अयोग्य नाही असे वाटते. इथे स्थावर मालमात्तेप्रमाणे कागदपत्रे तपासणे क्लेशकारक वाटेल पण सतत मानसिक ताणाखाली राहण्यापेक्षा स्वतःची खात्री पटवून घेणे हे केव्हाही श्रेयस्कर!
वरील घटनेत घडलेली चूक अक्षम्यच आहे. दोन्ही पालकांची (विशेषतः आता दत्तक पालकांची) मानसिक स्थिती काय असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. त्यामुळे अशा घटना घडूच नयेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे वाटते.
श्रीमती सुनीता बोधनी या घटनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतात. त्या लिहितात, “वर्तमानपत्रात साहिल्ची बातमी वाचली आणि मनात चर् र्र झालं. जन्मदात्या आईला तिचं मूल मिळालं ही आनंदवार्ता खरी; पण त्या वर्तेला अनंत दुःखद समस्यांची झालर आहे हेही जाणवलं! बातमी वाचल्यानंतर सर्वप्रथम वाईट वाटलं ते साहिलच्या कोवळ्या वयात त्याच्या मनावर झालेल्या आघाताचं. मुंबईहून कऱ्हाड, तेथून नंतर बालग्राम सातारा, प्रीत मंदीर पुणे येथे विजू या नावानं दखल होणं, तेथून तडक पंजाबमध्ये एका कुटुंबात दत्तक म्हणून जाणं, तेथे शिवम हे नाव मिळणं आणि या दत्तक-पालकांशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं न होतं तोच पूजा या जन्मदात्या मातेकडे साहिल या नावानं जाणं. या सगळ्या घडामोडीत त्याच्या मनाची किती मोडतोड झाली असेल? या प्रत्येक ठिकाणी स्वत:ला सामावून घेणं त्याला किती जड गेलं असेल? कोवळ्या वयातील आघातांचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर किती आणि कसा परिणाम होईल याचा विचारही करवत नाही.
साहिलच्या दत्तक पालकांना त्याच्या विरहाचा आघात सहन करणं किती कठीण झालं असेल? मी एक दत्तक माता आहे आणि पहिला मुलगा दत्तक घेतल्यावर पाच वर्षांनी मला स्वत:ला मुलगा झाला. या दोन्ही अनुभवातून आई होण्यातील आनंद, सुख मी अनुभवले आहे. लग्नाला दहा वर्षे झाली तरी मूल नाही. दत्तक घ्यावे असं सुचविण्यात आलं. मनातील वात्सल्याला वाट करून देण्यासाठी आम्ही दोघांनी एकमताने भारतीय समाज सेवा केंद्रातून चंद्रहासला दत्तक घेतलं. त्या तीन महिन्यांच्या जीवाने आमच्या घराला खरं घरपण आणलं. त्याच्या आगमनानंतर घरात दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्याला हक्काचं भावंड मिळालं.
दत्तक घेऊन एखाद्या अनाथावर आपण उपकार करतो असे नाही. तर अनाथ असलेलं आपलं मातृत्व सनाथ करीत असतो. आज समाजानेही दत्तक कल्पना उत्तमप्रकारे स्वीकारली आहे. सामाजिक समस्यांतून अनेक मुलं अनाथ निराधार होत असतात. मूल नसलेले पालक अशा अनाथांना दत्तक घेऊन आपल्या जीवनात सुखाची, आनंदाची हिरवळ निर्माण करीत असतात. अशा वेळी वर्तमानपत्राने अशा बातम्या नाट्यपूर्ण करून समाजापुढे आणल्यास दत्तक घेऊ इच्छिणाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मुळात मूल दत्तक घेण्यासाठी त्या पालकांच्या मनाचा पक्का निर्धार होणं सोपं नसतं. अशा नाट्यपूर्ण घटनांची रंगतदार वर्णनं वर्तमानपत्रातून येऊ लागली, तर त्याचा दत्तक-पालकांच्या मनोनिर्धारावर विपरीत परिणाम होईल आणि समाजात मूळ धरू पाहणाऱ्या दत्तक कल्पनेवर कुठेतरी आघात होईल असे वाटते.
खरं पाहता अनेकांच्या चुकीच्या वागण्याने हा प्रसंग गुदरला आहे. वास्तविक या बातमीमध्ये काही अनुत्तरित प्रश्न आहेत. १) पूजाने असे अनेक दिवस उपास करणे योग्य आहे का ? २) ज्या इसमाला रस्त्यावर चुकलेला साहिल सापडला त्याने त्याला पोलीस चौकीत न नेता आपल्या गावी का नेले? ३) प्रीत मंदीरने संस्थेत दाखल झालेल्या मुलाचे निवेदन देऊनही पोलीस यंत्रणेने तपासाच्या दृष्टीने काहीच कसा प्रयत्न केला नाही?
दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी प्रातिनिधिक म्हणून या घटनेकडेन पाहता लाखात एखादी घटना अशी घडते म्हणून ती नगण्य मानावी. समाजानेदेखील अशा बातम्यांचा व्यावहारिक पातळीवरून विचार करावा आणि प्रसारमाध्यमांनीही अशा बातम्यांना फार महत्त्व देऊ नये. व्यावसायिकतेपेक्षा त्याचे समाजावर उमटणारे पडसाद याला प्रसारमाध्यमांनी महत्त्व द्यावे.”
श्री. जोशी म्हणतात, “मी स्वतः श्रीवत्स या संस्थेतून मुलगी दत्तक घेतलेली आहे. त्यामुळे दत्तक मुलाबद्दलच्या भावना पूर्णपणे समजू शकतो. माझ्यासारख्या कित्येक पालकांचे जीवन या संस्थांमुळे पूर्ण बदललेले आहे. कोणत्याही पालकांच्या भावनेशी अशा प्रकारे खेळले जाऊ नये असे वाटते. ही बातमी वाचल्यावर माझ्या मनात अनेक शंकाकुशंका आल्या, त्यांचं मी स्वत: संबंधित संस्थेत जाऊन निरसन करून घेतलं. अशी घटना दहा हजारात एखादीच असली, तरी समाजाच्या विश्वासाला धक्का पोचणार नाही ह्याची दखल संबंधित संस्था घेतील असे वाटते.”
वृत्तपत्रांनी ज्या पद्धतीने ही बातमी दिली, त्याबद्दल जवळजवळ सगळ्यांनीच निषेध नोंदवलेला आहे. मालती लिमये या एका दत्तक मुलाच्या आजी आपला निषेध व्यक्त करताना म्हणतात, “समाजात अपवादात्मक घटना घडतं असतात. त्यांची दखल घेणं ठीक; पण इतके रकाने भरून लेख लिहिताना त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल याचं भान प्रसिद्धीमाध्यमांनी राखायला हवं होतं, कारण अशा काही ‘जोडलेले’ ‘तोडू’ शकणाऱ्या घटना यामुळे घडल्याचे आम्ही अनुभवलेलं आहे. यासारख्या घटनांमुळे मुलांच्या कोवळ्या मानांमध्ये किती असुरक्षिततेची भावना निर्माण होईल! ‘जगाच्या पाठीवर कुठेतरी माझी जन्मदात्री असेल. ती माझा शोध घेत असेल का? तिला माझी आठवण असेल का?’ असे विचार करणारे कोवळे मन शंकित होऊन जाते. तर दुसरीकडे ‘आपण ज्या घरात राहतो, ते माझं घर, माझे आई-बाबा, आजी-आजोबा त्या घरातून, कधी आलीच तर माझी आई मला घेऊन जाईल का ? तेव्हा मी काय करू?’ ही इतकी प्रचंड उलथापालथ बालमनाला घाबरवून सोडते. कुठल्याही सामाजिक प्रश्नांबाबतीत प्रसिद्धी देताना माध्यमांनी सतर्क सावध रहायला हवं. “
मीरा ओक या बालविकास आणि कौटुंबिक नातेसंबंध याविषयातील डॉक्टरेट आहेत आणि दत्तक पालकही आहेत. या दोन्ही भूमिकांतून त्यांना असं वाटतं की संबंधित केसमध्ये संपूर्ण विचार हा ‘मोठ्यांच्या, प्रौढांच्या नजरेतून, दृष्टिकोनातून’ झालेला आहे आणि मुलाच्या मन-नजरेनं याकडं पाहिलं गेलेलं नाही. कायद्याकडे बोट दाखवून त्यातील मुलाच्या कल्याणासंबंधीचा मुद्दा दुर्लक्षिला जातो की काय? त्यामुळं हक्कांपेक्षा मुलाच्या आरोग्यसंपन्न वाढीला आणि विकासाला अधिक महत्त्व द्यायला हवं. तो मुलांचा हक्क आहे. मुलांविषयीच्या हक्कांसंबंधीच्या सरकारच्या धोरणामध्येही या गोष्टीला महत्त्व द्यायला हवं असं त्या आग्रहपूर्वक सांगतात.
- आपलं मूल ३ वर्षांपर्यंतच्या वयाचं आहे का? त्याला नाव, गाव, पट्टा सांगता येतोय ना? मूल बोलायला लागल्यावर त्याला हे आवर्जून शिकवूया.
- घर, घराभोवतालचा परिसर, आसपासच्या खुणा याबद्दलही मुलाशी बोलूया.
- नवीन, भेदरलेलं मूल दिसलं, तर त्याची / तिची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करूया. पोलिसांशी संपर्क साधूया.
- वृत्तपत्रांच्या भूमिकेमध्ये हव्या असलेल्या बदकलाची मागणी वृत्तपत्रांपर्यंत पोचवूया.
भारतीय समाजसेवा केंद्राच्या अनुराधा दीक्षित यांनी – संस्थेपर्यंत मूल कसे येते, सापडलेल्या मुलांच्या पालकांचा शोध कशा प्रकारे घेतलं जातो, मूल दत्तक देण्याजोगे केव्हा मानले जाते, दत्तक पालक कसे निवडले जातात – या साऱ्या प्रश्नांचा शंकांचा उहापोह त्यांच्या खाली दिलेल्या मांडणीत केलेला आहे.
“‘दत्तक’ या गोष्टीमुळे या संबंधित बातमीशी ज्यांचा दूरान्वयानेही संबंध असेल, त्यांच्यावर या बातमीचा प्रभाव नक्कीच पडला असेल. ‘अरेरे! बिचारे सिंघल पती-पत्नी – बिचारा साहिल – बिचारी पूजा – अरे वा! आईला तिचे बिछडे हुए मूल परत मिळाले – अरेरे! मूल आईला ओळखत नाही म्हणजे किती वाईट वाटते ना?… अशा नानाविध प्रतिक्रिया प्रत्येकाने आपापल्या परीने व्यक्तही केल्या असतील. अशा प्रसंगी त्या घटनेतील ज्या पत्राच्या भूमिकेतून विचार करू, त्याप्रमाणे आपली प्रतिक्रिया नोंदवली जाते. शेवटी सर्वसाधारण मतैक्य मात्र या एका गोष्टीवर झाले असणार की झाला प्रकार व्हायला नको होता. म्हणजे नक्की काय? मूल हरवायला नको होते पण निदान नंतरच्या टप्प्यात त्याची आई सापडायला हवी होती. मूल नक्की निराधार आहे असे ठरण्यासाठी पालकांच्या शोधाचे जे काम केले जाते ते सर्व काम करणारी यंत्रणा पूर्णपणे कार्यक्षम हवी. कच्चे दुवे राहू नयेत याची सर्व स्तरावर चांगली काळजी घ्यायला हवी होती. नंतर आईचा शोध लागल्यावर आई-मूल यांचा मिलाफ होण्यासाठी एवढी कोर्टकचेरीतली कारवाई आणि वर एवढी नाट्यमय प्रसिद्धी हे सगळे व्हायला नको होते.
मूल सापडले आहे?
हरवलेली किंवा मुद्दाम सोडून दिली गेलेली मुळे एकटी, बिनपालकांची कुणाला तरी सापडतात, तेव्हा नक्की काय घड्डते? किंवा घडावे?
ज्या कोणाला असे मूल बिनापालकांचे आढळून येईल तेव्हा त्या व्यक्तीने ही बातमी नजीकच्या पोलीस ठाण्याला द्यावी. पोलिसांनी मूल सापडले त्याठिकाणी जाऊन पंचनामा करून ही घटना पाहणाऱ्या व्यक्तींचे जबाब घेणे अपेक्षित असते. भरण-पोषणाची व्यवस्था न करता एखादे मूल असे टाकून देणे / सोडून देणे / दुर्लक्ष करणे हा भारतीय दंड विधानाच्या ३१७ कालावान्वाये गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा करणाऱ्या अज्ञात प्रौढ व्यक्तीविरुद्ध (या मुलाची काळजी घेण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर आहे अशा पालकावर) गुन्हा दखल केला जातो.
संस्थेच्या छत्राखाली
अशा सापडलेल्या मुलाच्या संरक्षण आणि संगोपनाची तातडीची गरज असते. त्यासाठी असे सापडलेले मूल संबंधित पोलीस सर्व हकिगतीच्या अहवालासह बालकल्याण मंडळापुढे सदर करतात. नंतर बालकल्याण मंडळ हे सापडलेले मूल नीट सांभाळण्यासाठी व पालकांचा शोध घेण्यासाठी म्हणून एखाद्या संस्थेमध्ये दखल केले जावे असा आदेश देते. नंतर पालकांच्या शोधाची चक्रे सुरू होतात.
वृत्तपत्रात निवेदन
ज्या ठिकाणी मूल सापडलेले असते, अशा ठिकाणी सर्वसामान्यतः जे दैनिक जास्त वाचले जाते, अशा स्थानिक दैनिकात मुलाचा फोटो व ते कधी कुठे सापडले त्याबाबत माहिती छापली जाते. त्या निवेदनाद्वारे मुलाच्या पालकांना संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते. हे मूल चालते-बोलते असले, तर ते चुकलेले / हरवलेले असण्याची व त्याचे पालक त्याला शोधात असतील अशी शक्यता खूप असते. अशा मुलांच्या बाबतीत स्थानिक पातळीवर नुसता शुद्ध घेणे पुरेसे नसते. त्यामुळे अधिक व्यापक मध्यम म्हणून दूरदर्शनवरूनही या मुलाचा फोटो व माहिती प्रसारित केली जाते. ‘लापता’ माणसांबद्दलचे प्रसारण असते त्याचवेळी अशा सापडलेल्या मुलांबद्दलचे निवेदन प्रसारित केले जाते. ज्यांचे मूल हरवलेले आहे त्या व्यक्ति अशी निवेदने नक्की लक्षपूर्वक पाहतात; एवढेच नाही तर त्यांच्या शोधाच्या प्रयत्नात अनेक जणांना हे माहीत झालेले असते. म्हणून कोणाच्या ना कोणाच्या बघण्यात, वाचण्यात हे निवेदन येते व हे मूल संस्थेत आहे ही गोष्ट पालकांपर्यंत पोचते. या निवेदनांमुळे हरवलेल्या अनेक मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोचवण्यात यश आलेले आहे.
पण त्याचबरोबर असाही अनुभव आहे, की ज्यांनी आपणहून मुले त्यागलेली असतात त्यांच्यापर्यंत निवेदन पोचूनही मूल परत मिळावे म्हणून ते संपर्क साधत नाहीत. ठरावीक मुदतीत कोणी पालक हक्क सांगत आले नाहीत, तर मात्र त्या मुलांच्या पालकांना मूल नको आहे असा निष्कर्ष काढला जातो.
पोलीस यंत्रणेची कार्यपद्धत
पोलीस यंत्रणादेखील याचवेळी त्यांच्या पद्धतीने शोधकार्य करत असते. ३१७ मधले गुन्हेगार शोधून त्यांच्यावर खटला भरणे व मूल टाकून देण्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांना शिक्ष करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते.
मूल जिथे सापडते त्या ठिकाणी श्वानपथक नेऊन त्याद्वारे मूल त्यागणाऱ्या व्यक्तीचा माग काढणे, आजूबाजूला बारकाईने चौकशी करणे व चौकशीतून पुढे आलेल्या दुव्यांचा पाठपुरावा करून अशा पालकांचा शोध घेणे हे त्यांचे मार्ग असतात. तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये हरवलेल्या व सापडलेल्या मुलांबद्दलच्या माहितीची बिनतारी यंत्रणेद्वारे सतत देवाणघेवाण चालू असते. विशेषतः रेल्वे, बस स्थानके अशा ठिकाणी सापडलेल्या मुलांबाबत तर अधिक दूरगामी शोधकार्य चालू असते.
मूल सापडून संस्थेत दखल होताना पहिला अहवाल (FIR) संस्थेत असतो. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनंतर संस्था त्याच पोलीस ठाण्याकडून दुसरा शोध-अहवाल मागवते. हा अहवाल खालील तीन मुद्दयांबद्दल असतो –
१. ज्या व्यक्तीवर ३१७ खाली हा गुन्हा नोंदवलेला असतो ती अज्ञात व्यक्ति सापडली का?
२. अशा वर्णनाचे मूल हरवले असल्याची नोंद आहे का?
३. ह्या मुलावर हक्क सांगत कोणी आले का?
पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका
मूल सापडल्यानंतर दोन-तीन महिने हा काळ या शोधासाठी पुरेसा असल्याचे गृहीत आहे. पण कधीकधी याहून अधिक काळ आवश्यक असेल, तर त्या काळात अजून शोध चालू आहे असा रिपोर्ट मिळतो. अन्यथा पुरेसा शोध घेऊनही काही माग लागलेला नसेल, तर पोलीस तसा अहवाल देतात व अशा केसेसमधील सक्रिय शोधकार्य संपवून ही केस ‘अ फायनल’ रिपोर्टसह बंद केली जाते. त्यामुळे ज्या मुलांच्या बाबतीत असा सर्वंकष दुसरा पोलीस रिपोर्ट मिळतो, त्या मुलांच्या बाबतीत मूल निराधार असल्याचा निष्कर्ष काढला जातो. हे मात्र नक्की की यासंदर्भात पोलीस यंत्रणेने जाणीवपूर्वक, कार्यक्षमतेने कसून शोध घेतलेला असणे ही गोष्ट फार महत्त्वाचे आहे. कुठलेही कच्चे दुवे न सोडता हा शोध घेतला जाणे व नंतरच पोलीस तपास थांबवून केस ‘अ फायनल’ करणे अपेक्षित आहे. कारण त्यानंतरच मूल निराधार असल्याचा निष्कर्ष निघून त्याच्या पुढील पुनर्वसनासंबधीचे, त्याच्या आयुष्यात आमूलाग्र व कायमस्वरूपी बदल करण्याचे निर्णय घेतले जाणार असतात – म्हणजे त्याला कायदेशीरपणे दत्तक दिले जाणार असते.
मूल चालते-बोलते असेल तर त्याच्याकडून त्याच्या कुटुंबाविषयी पुष्कळ माहिती मिळू शकते. तिचा उपयोग या शोधकामात होतो. शिवाय त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचे घर, आईवडील सापडवण्यात मूल स्वत:देखील साहाय्य करते. मुलांना प्रत्यक्ष ठिकाणावर नेले जाते व आजूबाजूच्या परिसरात नेऊन त्यांना ओळखणारे कोणी भेटते का, किंवा घर दाखवता येते का हा प्रयत्न केला जातो. जवळपासच्या बाजार, शाळा, देवळे, अशा ठिकाणी या मुलाला नेल्यास, ‘हे मूल मी पूर्वी पाहिले आहे’ असे म्हणणारे कोणी सापडू शकते. या सर्व शोधकामात शोधणाऱ्या व्यक्तींची जिद्द, शोध लावण्याची इच्छा, संवेदनशीलता मात्र पणाला लागते. अशा पद्धतीने शोध लावून मुलांचे आईवडील सापडवल्याचा व ‘बिछडे हुए’ जीव एकत्र आणल्याचा आनंद अवर्णनीय असतो.
या सर्व कामात चोखपणा असूनही हजारोंमधील एखाद्या केसमध्ये दुर्दैवाने हा शोध योग्यवेळी लागला नाही असे घडू शकते व तिथेच असे काही नाट्यमय प्रसंग उद्भवतात. परंतु हे उदाहरण अपवादानेच आढळते हे मात्र लक्षात घ्यायला हवे.
कसून शोध करण्याचा प्रयत्न सर्व पातळ्यांवर योग्य तऱ्हेने केला गेल्याची खातरजमा करूनच मूल निराधार असल्याचा निष्कर्ष काढून बालकल्याण मंडळ अशा मुलाच्या पुनर्वसनाची जबाबदारी संस्थेला देते. त्यानंतरच मूल दत्तक देण्याची कार्यवाही केली जाते.
दत्तकासाठी योग्य
त्या काळात आधी योग्य दत्तक पालक मुलासाठी शोधले जातात व ते या मुलाचा सांभाळ चांगला करतील असा विश्वास वाटला तरच दत्तकाचा प्रस्ताव तयार होतो. दत्तकाच्या कायद्याच्या आधारे कोर्टाकडे रीतसर अर्ज केला जातो. त्या अर्जासोबत अनेक कागदपत्रे पुराव्यादाखल जोडलेली असतात. मूल दत्तक जाण्यास योग्य आहे का, अर्जदार हे भावी दत्तक पालक म्हणून योग्य आहेत का, या दोन्हीचे परीक्षण या कागदपत्रांच्या आधारे केले जाते. सापडलेले मूल दत्तक देण्याचा प्रस्ताव असतो तेव्हा त्याच्या पालकांचा शोध घेण्याच्या कार्यवाहीविषयी जे पुरावे सादर केलेले असतात ते पुन्हा तपासले जातात. पुन्हा एकदा कोर्टाकडूनही मूल निराधार असल्याचा निष्कर्ष निघून बालकल्याण मंडळाने काढलेल्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब होणे आवश्यक असते. म्हणजे मग मुलाच्या पुनर्वसनासाठीचा दत्तकाचा प्रस्ताव असतो त्याचा विचार करता येतो.
दत्तक पालकांबद्दल
ज्यांनी हे मूल दत्तक मिळण्यासाठी प्रस्ताव दिलाय, त्यांच्याकडे या बाळाचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी आवश्यक सर्व क्षमता आहेत ना याचीही खात्री केली जाते. त्यांचे वय, उत्त्पन्न, शिक्षण, आरोग्य या सर्वांचा जसा विचार होतो तसाच दत्तक घेण्याची कोणती प्रेरणा आहे, दत्तकत्त्वाबद्दलचे त्यांचे विचार, दृष्टिकोन तपासले जातात. आपल्यापोटी न जन्मलेले मूल सर्वस्वी आपले म्हणून वाढवण्यासाठी लागणारी प्रेरणा, ओढ, निश्चय, सकारात्मक दृष्टिकोन, कुटुंबातील इतरांकडून व संबंधित सामाजिक वर्तुळातून हे मूल कसे स्वीकारले जाणार आहे हे सर्व बघितले जाते. जिथे मूल जन्माला घालण्याची अडचण असल्याने मूल दत्तक घेतले जाते तिथे देखील वास्तवाचा स्वीकार या जोडप्याकडून कसा केला गेला आहे हे पाहणे महत्त्वाचे असते. संस्थेने या कुटुंबाविषयीचा जो अहवाल सादर केलेला असतो त्यात हे सर्व अभ्यासून या जोडप्याची शिफारस दत्तकासाठी केलेली असते. त्याचे अवलोकन करूनच कोर्ट अर्जदाराचा हा दत्तकाचा प्रस्ताव मान्य करते.
दत्तकपूर्व काळ (फोस्टर पिरीएड)
कोर्टात जेव्हा दत्तकाचा अर्ज / प्रस्ताव दाखल केला जातो, त्याचबरोबर मूल त्या कुटुंबाकडे दत्तकपूर्व काळात नुसते सांभाळण्यासाठी दिले जाते. हा काळ ३ ते ६ महिने असतो. प्रत्यक्षात हे मूल या कुटुंबात कसे रुळेल यासंबंधीचा अंदाज येण्यासाठी हा काळ उपयुक्त असतो. त्यामध्ये हे कुटुंब दत्तकासाठी योग्य आहे म्हणून संस्थेने जो अंदाज बांधलेला असतो तो योग्य आहे का नाही हे पहाता येते. तसेच ‘हे आपले बाळ’ असे आपण ठरवले खरे, पण आपल्याला ही जबाबदारी नीट निभावेल ना तसेच आपला निर्णय बरोबर आहे ना हे अजमावण्याची संधी कुटुंबालादेखील या काळात मिळते.
कोर्टातून दत्तकाचा अर्ज मान्य होईपर्यंत मुलाचे कायदेशीर पालकत्व या कुटुंबाला मिळालेले नसते. त्या मुलांचे कायदेशीर पालक त्या काळातही सरकार किंवा संस्था हेच असतात. दत्तकाचा अर्ज मान्य होऊन दत्तक विधानाची नोंदणी झाली, की मगच दत्तक घेणारे त्या मुलाचे आईबाबा होतात. एकदा दत्तकाची कार्यवाही पूर्ण झाली, की मग मात्र कोणीही कधीही हे त्यांचे एकमेकांशी जोडलेले नाते बदलू शकत नाही, काळ्या दगडावरची रेघ असे हे नाते अभेद्य होते.
या घटनेबाबत
प्रस्तुत घटनेमध्ये या (pre adoption foster care) दत्तकपूर्व काळात, कोर्टाच्या लक्षात आले, की मूल हरवलेले होते, शोध घेण्याचा सर्व प्रयत्नही झाला होता; पण नंतरच्या काळात बाळाची त्याला शोधणारी आई सापडली असून तिला तिचे मूल हवे होते. अशा वेळी ते मूल निराधार नाहीच; तेव्हा त्याला दत्तक देण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते मूल जन्मदात्या आईकडे परत सोपवले गेले. त्याची खूप सचित्र, तपशीलवार, चुरचुरीत बातमी केली गेली त्यामुळे मात्र बरीच खळबळ निर्माण झाली. एवढे मात्र नक्की, की अशी दुर्देवी घटना अपवादात्मक आहे. त्याचा बाऊ केला जाऊ नये. ज्यांच्या दत्तकाची कायदेशीर कारवाई पूर्ण झालेली आहे त्यांनी हे अभेद्य नाते तुटण्याची अजिबात भीती बाळगू नये.
ही घटना अपवादात्मक असली तरी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत गोवल्या गेलेल्या अनेक निरपराध लोकांना त्यातून दुःख-वेदना भोगाव्या लागल्या आहेत. मानवी नात्यांमधलं सर्वात जवळचं, घट्ट विणीचं नातं असतं पालक-मुलाचं! पोलीस यंत्रणेतील परस्परसंवादाचा अभाव ही या घटनेतील प्रमुख त्रुटी जाणवते. हरवलेल्या सापडलेल्या मुलांच्या बाबतीत तरी यंत्रणेनं अधिक कार्यक्षम आणि संवेदनशील बनायला हवं. मूलतः सामाजिक कारणांपायीच (गरिबी, मुलांप्रती असणाऱ्या कल्पना, विवाहाच्या चौकटीच्या बाहेर जन्मलेलं मूल, मुलाचं संगोपन करणं अशक्य वाटणं…) मुलं निराश्रित होतात. त्यावेळी शोधकार्याचा प्रश्न इतका जटिल नसतो. कारण इथे मूल हरवलेलं नसतं.
पण हरवलेल्या मुलांचा मात्र तहान-भूक हरपून, डोळ्यांत प्राण आणून पालक जिवापाड शोध घेत असतात. अशा वेळी पृथ्वीच्या पाठीवर कुठेही हरवलेलं मूल सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्याइतपत ही सगळीच सामाजिक यंत्रणा कार्यक्षम, सजग बनायला हवी.
नागरिक म्हणून आपणही यात भूमिका बजावायला हवी. त्यासाठी नागरी-प्रशिक्षण, माहितीची गरज असते. (उदा. इथे असं हरवलेलं मूल सापडलं असेल, तर सर्वात प्रथम नजीकच्या पोलीस ठाण्यात कळवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, याची जाणीवच त्या व्यक्तीला नसल्याचं दिसतं.) दत्तक-पालकांना कुठल्याही प्रकारे असुरक्षित वाटू नये हा विश्वास या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांनी देणं महत्त्वाचं आहे.
संबंधित घटनेमध्ये पूजाच्या बाजूने पूर्ण सहानुभूती असूनही, हरवलेलं मूल परत गवसण्याचा आनंद पूर्णपणे समजून उमजूनही असं कुठे तरी वाटत राहिलं, की शेवटी प्रत्यक्षात जे घडलं, ते काहीसं ‘मालकी हक्क’, ‘हस्तांतरण’, ‘ताबा घेणं’ अशा काहीशा तांत्रिक, अमानवी पातळीवर. इथे साहिलला समजावून घेणं, बोलणं, दत्तक पालकांशी ‘संवाद’ साधणं अशा साऱ्या मानवी नात्यांमधील गाभ्याच्या गोष्टींना अवकाश देणंही आवश्यक होतं.
वंदना कुलकर्णी
vandanaparul@gmail.com
