संवादकीय – फेब्रुवारी २०१३

‘‘मला वाटतंय, आता मानसीच्या दप्तराला कुलूपच लावावं! शाळेत सारखं कुणी न कुणी तिची वह्या-पुस्तकं खराब करतंय!’’

एका प्रतिष्ठित शाळेत जाणार्‍या मुलीची आई वैतागून शाळेमधली गार्‍हाणी सांगत होती. शाळेत मुलींमध्ये स्पर्धेचं वातावरण म्हणे इतकं पेटलंय की एकमेकींच्या वह्या चोरणं, लिहिलेली पानं फाडणं, आपल्यापेक्षा जास्त गुण मिळवणार्याम मुलींच्या यशात अडथळे निर्माण करणं, त्यासाठी साम-दाम-दंड-भेद…..सगळ्याचा वापर करणं चालू आहे. आणि हे सगळं कशासाठी? आपल्याला यश मिळावं, आपला पहिला नंबर यावा यासाठी नाही, तर केवळ दुसर्या् मुलीनं माझ्या पुढं जाऊ नये यासाठी… इथं खर्‍या यशाची व्याख्या, शाश्वत प्रगतीचा अर्थ वगैरे गोष्टींची चर्चा तर होऊच शकत नाही. पण या भीषण मार्गांपेक्षा पाठांतरं करून गुण मिळवणं परवडलं असं वाटायला लागतं. तिथं निदान मुलाला स्वत:ला खपायची, ढोर कष्टाची सवय लागण्याची तरी शक्यता आहे. पण दुसर्यााला मागं खेचण्यात यशाचा/ सुखाचा मार्ग पाहणं हे मात्र मुलांना विकृतीकडे नेणारं आहे.

अर्थात अशा विकृत कल्पना आणि योजना मुलांच्या डोक्यातल्या नसाव्यात, कुणाच्या तरी नियोजनपूर्वक सांगण्यावरून, प्रभावातून, आमिषांच्या मुक्यासाठी किंवा शिक्षेच्या माराच्या भीतीनंच असं घडल्याची शक्यता अधिक आहे. म्हणजेच मुलांचं असं वागणं त्यांच्या पालकांच्या, मोठ्या व्यक्तींच्या बोलण्या-वागण्याचं आणि मुख्य म्हणजे विचारांचं प्रतिबिंब आहे. आज आजूबाजूच्या वातावरणात हिंसा, अन्याय आणि क्रूरतेला उघडउघड मान्यता (आणि प्रतिष्ठाही!) आहे, तिथं मूल म्हणजे ‘यशनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वापरायचं संसाधन’ समजलं जातं. खरं तर, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेल्या, बहुविध प्रज्ञांचा-कौशल्य-क्षमतांचा पट वेगवेगळा असणार्याय मुलांमध्ये/ व्यक्तींमध्ये स्पर्धा होणं मुळातच अतार्किक आहे. तरीही यशाचं/ प्रगतीचं इंधन म्हणून स्पर्धेचं समर्थन जवळजवळ सगळीच मोठी माणसं, खुलेआम करताना दिसत आहेत. स्पर्धेनं पेटवून दिल्यानंतर मानवी मन कसं बिथरतं, आणि विवेकाचं भान कसं सुटतं, हे वारंवार होणार्या जातीय-वांशिक दंगली, अस्मितेच्या राजकीय खेळ्या ते देशाच्या सीमेवरच्या आक्रमक हालचाली यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. स्पर्धेला शह देणार्या शिक्षणहक्क कायद्याच्या अनेक मुद्यांचा (सर्वसमावेशकता, फी-वाढ नियंत्रण, वंचित गटातल्या मुलांसाठी २५ टक्के आरक्षण, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इ.) झालेला खेळखंडोबा बघता मुलांसाठीच्या शैक्षणिक वातावरणाची गुणवत्ता तर अत्यंत निराशाजनक आहे, असं जाणवतं.

ह्या अशा भीषण, अंगावर येणार्‍या अंधार्‍या वातावरणातसुद्धा पणतीप्रमाणे बाजूचा परिसर उजळून टाकणारी काही माणसं आपापलं काम नेटानं करतच असतात.

अशीच एक गोष्ट मला तुम्हाला सांगायचीय. मराठी भाषा शिकवणार्‍या एका शिक्षकाची, शिवाजी आंबुलगेकर सरांची. तालुका मुखेड, जिल्हा नांदेड इथल्या कमळेवाडी नावाच्या तांड्यावर विद्यानिकेतन नावाची आश्रमशाळा आहे. पाचवी ते बारावी पर्यंतच्या या शाळेत लमाण-बंजारा, पारधी, वडार, कैकाडी, मसणजोगी, नंदीवाले, मदारी… अशा चाळीसएक जमातींची जवळजवळ ६४० मुलं आहेत. बहुसंख्य मुलांच्या घरातली शिकणारी ही पहिलीच पिढी आहे. त्यांची मातृभाषाही वेगळी असते. त्यांना मराठी भाषा शाळेत आल्यावरच शिकावी लागते.

मराठी शिकवायचं म्हणजे धड्याखालची प्रश्नोत्तरं पाठ करून घ्यायची, हा सर्वसाधारणपणे आढळून येणारा रिवाज! जेमतेम मराठी येत असताना मुलांना साहित्य, त्यातलं सौंदर्य, अलंकार, काव्य इथपर्यंत कसं पोचवायचं हा प्रश्न शिवाजी सरांना पडत असे. याबद्दल ना बी. एड. च्या अभ्यासक्रमात काही शिकवलं जातं, ना अनुभवी शिक्षकांकडे काही उपाय असतो ! ‘तसंच पुढं जायचं हो, नाहीतरी या पोरांना काय करायचंय कविता आणि सौंदर्य?’ असं ऐकल्यावर शिवाजी सरांची तडफड होई.

एकदा ‘शेवंतीचं बन’ ही लोकगीतांची ध्वनिफीत त्यांनी ऐकली. त्यातलं एक गाणं ‘सासरच्या वाटे कुचु कुचु काटे’ त्यांच्या मनात घुमत राहिलं. दुसर्या् दिवशी सकाळी शाळेत जाताना त्यांना ते गोरमाटी भाषेतून ऐकू येऊ लागलं, त्याच चालीवर. (सरांनी गोरमाटी लोकगीतांचा अभ्यास केला होता. त्यामुळे शाळेत बहुसंख्येनं असलेल्या लमाणी मुलांची गोरमाटी भाषा सरांना येत होती.)
त्यावेळी सरांच्या मनात एका नव्या कल्पनेचं बीज रुजलं. पाचवीच्या पुस्तकातली इंद्रजित भालेरावांची ‘बाप’ कविता त्यांनी मुलांना गोरमाटीतून गाऊन दाखवली. तेव्हाची मुलांच्या डोळ्यांमधली आनंदाची चमक त्यांना कधीच
विसरता येणार नाही!

आपल्या भाषेत कविता आणायची कल्पना मुलांना इतकी भावली, की मुलं कुणीही न सांगता, रात्रीची जागून, धडपडून कवितांचे अनुवाद करू लागली. मोठ्या वर्गातल्या मुलांकडून चाल समजावून घ्यावी, अन त्याच चालीत अनुवाद करावा असं सत्रच चालू झालं. कुणीही समजावून न सांगता कवितेला उराउरी भेटण्याचा हाच अनुभव देण्यासाठी तर सरांची सारी धडपड होती. मग वर्गातही कवितांचे अनुवाद होऊ लागले, फळ्यावर वेगवेगळ्या भाषेतील पर्यायी शब्द लिहिले जाऊ लागले, मुलांना शब्दांशी खेळण्याची संधी मिळाली, शब्दांची गोडी लागली.

या सुंदर अनुभवातूनच पुढे इतरही प्रकल्प चालू झाले – बोलीभाषेतील पर्यायी शब्दांचा कोश, मुलांच्या साहित्यातून तयार झालेलं भित्तिपत्र, सुट्टीच्या काळात घरी गेल्यावर आपापल्या भाषेतील लोककथा, लोकगीतं, म्हणी जमवून आणणं, वाचन-संस्कृती रुजवण्यासाठी पुस्तक लावणं असे कितीतरी ! दर चातुर्मासात देवळात जसं एखाद्या पोथीचं वाचन होतं, तसंच शाळेमध्ये मुलांना आवडणारं एखादं पुस्तक लावून त्याचं अभिवाचन केलं जातं. श्यामची आई, झोंबी, शेतकर्या चा आसूड, … अगदी मालगुडी डेज पर्यंत कितीतरी पुस्तकं मुलांनी ऐकली आहेत. यातून उत्सुकता वाढून आता मुलांसाठी शाळेत ग्रंथालयही तयार झालेलं आहे. वाचलेल्या पुस्तकांचे लेखक, कवी यांच्याशी मुलांना बोलावंसं वाटतं, त्यांना बघावंसं वाटतं. मग शिवाजी सर फोनवरून त्यांची वेळ घेतात. मोबाईल फोन लाउडस्पीकर सारखा वापरून मुलं त्या लेखकांशी बातचीत करतात. त्यांचा फोटो मिळवून समोर खुर्चीवर ठेवलेला असतो.

भाषेची अशी ओढ लागल्यावर आता त्याचा वापर हरतर्हां नी होऊ शकेल. मुलांच्या मातृभाषेतल्या कविता, शिक्षक दरवर्षी नव्या मुलांसाठी वापरू शकतील, त्या त्या भाषेतले शब्दकोश वापरून मुलांना संकल्पना समजावून घ्यायला आधार मिळू शकेल. मोठ्या मुलांनी आपल्या भाषेत आणलेल्या या कविता शाळेतली लहान मुलं जेव्हा ऐकतील, लिहिलेल्या बघतील, तेव्हा प्रमाण मराठीतल्या काहीशा अपरिचित शब्दांच्या भाषेशी जवळीक साधायला त्यांना त्यांची सोपी पाऊलवाट सापडेल.

धडपडणारं, भाषेवर प्रेम करणारं, मुलांवर प्रेम करणारं माणूस आपल्या परिस्थितीत, खडतर दारिद्य्रात हजारो अडचणींना बाजूला सारत काय घडवून आणतं, आणू शकतं त्याचं हे उदाहरण आपल्या सर्वांसाठीच प्रकाशाचा एक कवडसा हाती घेऊन आलं आहे.

२१ फेब्रुवारी हा ‘मातृभाषा दिन’ म्हणून युनेस्कोनं जाहीर केलेला आहे. त्या निमित्तानं दिवाळी अंकापासून चालू असलेली आणि या अंकात पुढे नेलेली ‘मातृभाषेतून शिक्षण’ या विषयाची चर्चा, तसेच शिवाजी सरांचे त्यांच्या शाळेत चालू असलेले प्रयत्न यातलं औचित्य नोंदवायलाच हवं.