अनुभव – जपून ठेवावा असा

कचरावेचक, बालमजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकांतल्या मुलांना सुरक्षित आणि आनंददायी बालपण मिळावे यासाठी ‘वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी’ ही संस्था 2013 सालापासून जळगाव शहरात काम करतेय.

www.vardhishnu.org

कचरावेचक मुले वयाच्या अगदी 3 ते 5 वर्षांपासून अमली पदार्थांच्या सेवनाला बळी पडतात. घरात, आजूबाजूच्या माणसांच्या आणि समवयस्कांच्या तोंडात सतत गुटखा असतो. त्याचे दुष्परिणाम सांगणारे कुणी नसते. कचरा वेचून मूल दिवसाला 20-30 रुपये सहज कमावते. त्यामुळे गुटख्याची पुडी विकत घेणे त्यांना सहज शक्य होते. वस्तीत बर्‍याच दुकानांमध्ये गुटखा मिळतो.

 आनंदघर सुरू झाले तेव्हा अशी अनेक मुले दिसली. एक मूल दिवसाला 5 ते 7 पुड्या सहज खायचे. मला हे सगळे स्वीकारणे खूप कठीण होते. एकदा मी मुलांना गुटखा खाण्याचे दुष्परिणाम समजावत होते. अचानक गटातील एक मुलगी म्हणाली, ‘‘ताई, माझी 70 वर्षांची आजी आणि असे भरपूर म्हातारे दिवसभर गुटखा खातात, मग त्यांना का बरं काही झालं नाही?’’ तिच्या या प्रश्नाने मला त्यावेळी निरुत्तर केले. मुलांनी या विषयावरच्या अशा अनेक चर्चा हाणून पाडल्या.

एक दिवस मी आनंदघरातील मुलांच्या फोटोंवरून व्हिडिओ बनवत बसले होते. 11 वर्षांची शोभा (नाव बदलले आहे) माझ्या शेजारी येऊन बसली. 

‘‘ताई तुम्ही काय करताय? ’’

‘‘तुम्हा मुलांचा एक छान व्हिडिओ बनवतेय. तुम्हाला उद्या वर्गात दाखवणार आहे.’’

‘‘नक्की दाखवणार का?’’

 ‘‘हो, नक्की दाखवणार. पक्कंवालं प्रॉमिस!’’

‘‘नाही दाखवलं तर काय?’’ इति शोभा.

‘‘आणि मी खरंच दाखवला तर काय?’’ मीही पिच्छा सोडला नाही. 

‘‘तुम्ही सांगणार ते करेल. मीपण पक्कंवालं प्रॉमिस!’’

‘‘बरं, मग मला सांग की तू दिवसाला किती पुड्या खाते गं?’’ माझा प्रश्न तयारच होता.

‘‘ताई, सात.’’ – माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच तिचे उत्तर तयार होते. मुलांचे आणि आमचे खूप विश्वासाचे नाते असल्याने मुले अगदी प्रामाणिकपणे आम्हाला सांगत असतात.

‘‘मी जर उद्या व्हिडिओ दाखवला तर दिवसाच्या दोन पुड्या कमी करशील?’’

‘‘तुम्ही उद्या दाखवा तर खरं, मग आपण बघू,’’ शोभाने तिथून पळ काढला.

दुसर्‍या दिवशी वर्गात मी तो व्हिडिओ दाखवला, शोभाही हजर होती. तो आणि पुढचे 2-3 दिवस मी शोभाला आमच्या त्यादिवशीच्या संवादाबद्दल छेडले नाही; पण मनातून मात्र मी खूप अस्वस्थ होते.

बरोब्बर तिसर्‍या दिवशी आनंदघर संपवून घरी निघताना शोभाने मला गाठले. 

माझ्या जवळ येऊन म्हणाली, ‘‘ताई, परवापासून दोन पुड्या कमी केल्यात बरं का.’’ 

माझ्यासाठी ही ‘विनिंग मोमेंट’ होती.

या आधी व्यसनावर अनेक प्रकारे मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता; पण काहीही उपयोग होत नव्हता. आणि आज माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी, विश्वासापोटी शोभाने दिवसातल्या दोन पुड्या कमी केल्या होत्या.

तिथून पुढे एक पक्के झाले. ‘गुटखा खाणे’ याविषयी मुलांना प्रेमानेच जिंकायचे.

Pranali

प्रणाली सिसोदिया   |   pranali.s87@gmail.com

लेखिका ‘वर्धिष्णू’ संस्थेच्या सहसंस्थापक असून पालकनीती संपादकगटाच्या सदस्य आहेत. त्यांना मुलांबरोबर काम करायला आवडते.