अभिनंदन! – रणजितसिंह डिसले

शालेय शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत अगदी आत्ताआत्तापर्यंत एक नकारात्मक भावना बघायला मिळत असताना सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक असलेल्या रणजितसिंह डिसले ह्यांनी त्याच तंत्रज्ञानाचा अतिशय डोळसपणे वापर करत वर्गात बंदिस्त असणारे शिक्षण शब्दशः ‘ग्लोबल’ केले. त्यासाठी त्यांना शिक्षणक्षेत्रात नोबेल मानल्या गेलेल्या ‘ग्लोबल टीचर अ‍ॅवार्ड’ने गौरविण्यात आले आहे. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.   

तंत्रज्ञानाची कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना डिसलेसर शालेय वयापासूनच ह्या क्षेत्रात मुशाफिरी करू लागले. त्यांनी QR कोडेड पुस्तके तयार करून प्रत्येक मुलाला स्वतःच्या गतीने शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांचा हा प्रकल्प मायक्रोसॉफ्टच्या 300 नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये निवडला गेला. त्याच्या सादरीकरणासाठी टोरांटोला गेलेल्या डिसलेसरांची विविध देशांतील उपक्रमशील शिक्षकांशी ओळख झाली. ‘व्हर्चुअल फिल्ड ट्रिप’च्या माध्यमातून विविध ठिकाणचे शिक्षक व विद्यार्थी ह्यांच्यात संवाद वाढीस लागला. आजवर सर 83 देशातील 1531 शाळांतील 86,513 विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहेत. 

डिसलेसरांच्या रूपाने हा पुरस्कार भारतातील शिक्षकाला प्रथमच मिळाला आहे. 140 देशांतील 12 हजारांहून जास्त शिक्षकांमधून त्यांची निवड झाली आहे. पुरस्काराप्रीत्यर्थ मिळालेल्या 7 कोटी रुपयांपैकी निम्मी रक्कम त्यांनी अंतिम फेरीतील इतर नऊ सहकार्‍यांना दिली असून ते प्रतिनिधित्व करत असलेल्या देशांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास त्याद्वारे मदत व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. शिक्षकांमधील उपक्रमशीलतेला चालना देण्यासाठी त्यांची स्वतःची रक्कमही ते ‘टीचर इनोव्हेशन फंड’करता वापरणार आहेत. 

रणजितसिंह डिसलेसरांचे मनःपूर्वक अभिनंदन!