‘अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक’ (भाग-2)

दिवाळी अंकानंतर…

ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या जोडअंकात ‘अर्थव्यवस्था, निसर्गर्‍हास आणि ग्राहक’ ह्या गुरुदास नूलकर ह्यांच्या लेखात ‘सध्याच्या विकासाची अशाश्वतता का आणि कशी आहे’ याचा ऊहापोह आपण वाचला. तरीही कोणाला असं वाटेल की ‘छान चाललंय की! थोडी महागाई असेल पण चालतंय, किंमती वाढणारच.’ थोडक्यात काय, की या अशाश्वततेचे चटके बसण्यासाठी कदाचित माणसाचं आत्ताचं आयुष्य अपुरं आहे; पण पुढच्या पिढ्यांना ते जाणवेल यात शंकाच नाही. आणि पुढच्या पिढ्याही सुखात राहाव्यात असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्या जीवनशैलीत बदल करायला हवेत हे नक्कीच. त्यासाठी विवेकी उपभोगाची चळवळच उभारायची वेळ आली आहे आणि तीही आपल्यापासून म्हणजे स्वत:पासूनच.

आपण पैसे देऊन खरेदी करतो म्हणजे काय करतो? त्या वस्तूचं त्यावेळचं बाजारमूल्य देतो. ‘बाजारमूल्य’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ती वस्तू तयार करण्यासाठी खर्ची पडलेल्या घटकांची पर्यावरणीय किंमत या मूल्यामध्ये नसते हे ध्यानात घ्यायला हवं. बाजारातली मागणी, व्यापार्‍यांनी केलेला मालाचा साठा, इंधनाचे भाव आणि नफा कमावण्याची संधी इत्यादी गोष्टींवर भाव ठरत असतात. पर्यावरणीय घटक, मानवी कष्ट, कष्टांचं योग्य मूल्य यांची किंमत वस्तूच्या किमतीत मिळवायची झाल्यास ती वस्तू खरेदी करणं आपल्याला परवडणार नाही आणि व्यापार्‍यांना, उत्पादकांनाही नफा होणार नाही. त्यामुळे नफा कमावण्यासाठी फुकट संसाधनं आणि मानवी कष्टांचं शोषण या दोन गोष्टी निश्चितपणे प्रत्येक वस्तूच्या किमतीमागे दडलेल्या असतात हे पक्कं लक्षात ठेवायला हवं.

यासाठी एक अगदी छोटंसं उदाहरण घेऊ. कोथिंबिरीची जुडी कधी 25 रु तर कधी 5 रुपयांनासुद्धा मिळते; पण ती पिकवण्याच्या कष्टात, खर्ची पडलेल्या माती आणि पाण्यात काही कमी जास्त असतं का? या घटकांचा वापर तितकाच असूनही बाजारमूल्य मात्र बदलत असतं. कारण बाजारमूल्याला संसाधनांच्या किमतीशी काही देणं घेणं नसतं.

विवेकी उपभोग हा आपल्या जीवनशैलीचा भाग होण्यासाठी आताच्या पालकांना आपली जीवनशैली हळूहळू का होईना बदलावी लागेल, तरच ते मुलांपर्यंत हा विचार पोचवू शकतील. एक गोष्ट तर अनेकांनी सांगितली आहे, की प्रत्येक वस्तू खरेदी करताना ती खरंच गरजेची आहे का हे स्वत:ला विचारा. चावून चोथा झालेलं उपदेशात्मक वाक्य असलं, तरी विवेकी उपभोगाची पहिली पायरी हीच आहे. तिला पर्याय नाही.

तुलना आणि स्पर्धा या शब्दांना फाटा दिला, तर जीवनशैलीतल्या बदलाचा प्रवास नक्कीच योग्य मार्गानं सुरू होईल. याउलट निवांतपणा, फावला वेळ, आयुष्याच्या वेगाला लगाम या गोष्टींना थारा दिला तर हा बदलाचा प्रवास सुकर होईल. त्यासाठी आपल्या डोक्यातल्या प्रतिष्ठेच्या कल्पना तपासून पहाव्या लागतील, कष्ट – बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे- घ्यावे लागतील. यामुळे बाजार, जागतिक अर्थकारण यात होणारा बदल लगेच अनुभवायला नाही मिळणार; पण वैयक्तिक जीवनात समाधानाचा टक्का वाढेल आणि मुलांमध्ये हे बदल उपदेश न करता सहजपणे होतायत याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

फावला वेळ म्हटलं, की मला एक संवाद आठवतो. खांडस ते भीमाशंकर वाटेवर चालताना एक छोटंसं गाव लागलं. पाणी प्यायला थांबलो. ‘‘बघा! नोकरी, धंदा करून शनिवार-रविवारी लोकं शहरातून तंगडतोड करत येतात आणि आम्ही बसलोय इथंच निवांत,’’ कामंधामं आटोपून खांबाला टेकून बसलेला एक शेतकरी म्हणाला. मी म्हटलं, ‘‘अहो, तुम्हाला असा निवांत वेळ मिळतोय आणि तोही निसर्गाच्या जवळ. तुम्ही भाग्यवान आहात. हे मिळवायला आम्हाला तंगडतोड करावी लागते.’’ मग अर्थातच त्याची कळी खुलली. त्याच्या निवांतपणाची किंमत त्याला जाणवली आणि मग दिलखुलास गप्पा झाल्या.

वर म्हटल्याप्रमाणे फावला वेळ तुम्ही मिळवलात आणि समजा सिंहगडावर जायला निघालात. आज आपली गाडी न काढता सिंहगड पायथ्यापर्यंत बस जाते, त्या बसने जाऊन बघा. तुमचं पेट्रोल वाचलं, ड्रायव्हिंगचा ताण वाचला, प्रदूषणात तुम्ही भर घातली नाहीत. ज्या ठिकाणी जाण्यासाठी बस धावणार आहे त्याच ठिकाणी जाण्यासाठी अजून एक वाहन धावणार. पेट्रोल जाळत, धूर ओकत. फक्त कष्ट आहेत ते बसस्टॉपपर्यंत जाण्याचे. सार्वजनिक वाहतुकीचे उपलब्ध पर्यायही जर आपण वापरणार नसू तर त्याबद्दल बरंवाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. अशक्य वाटणार्‍या ठिकाणी दर्‍याखोर्‍यातल्या गावांपर्यंत एस.टी.च्या बसेस वेळेवर जातात हे किती जणांना माहीत आहे? ते माहीत करून घ्यायला हवं. सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याचा अजून एक फायदा आहे. त्या वाहतुकीने नियमित प्रवास करणार्‍या स्थानिक लोकांची जीवनशैली आपल्याला आणि आपल्या मुलांनाही जवळून कळते आणि मजेत, आनंदात राहण्यासाठी खूप वस्तूंची, आरामाचीच गरज आहे असं अजिबात नाही याची प्रचीती येते. ग्रामीण आणि शहरी अर्थकारणातली प्रचंड तफावत जाणवते. पर्यावरणाच्या, संसाधनांच्या र्‍हासामुळे किती लोक त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीला मुकले आहेत आणि त्याला शहरातील लोकांची जीवनशैली कारणीभूत आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आपण आपल्या शहरी कोषातून थोडंतरी बाहेर डोकावतो. स्वत:च्या वाहनानं जाणं म्हणजे एक ‘बेट’ बनून, काहीच अंगाला लावून न घेता निसर्गात ‘घुसून’ परत येणं आहे असं मला वाटतं.

Eco2

‘सेलिब्रेशन’हा आताशा परवलीचा शब्द झाला आहे. सतत कुठला ना कुठला दिवस सेलिब्रेट करायचा असतो. त्या सेलिब्रेशनची पद्धतही ठरलेली झालीये. अनुकरण, परधार्जिणेपणा, प्रतिष्ठेच्या कल्पना यांच्या गर्दीतून थोड्या विवेकबुद्धीनं या गोष्टींचा विचार केला तर त्यातला फोलपणा लक्षात येईल आणि अनावश्यक उपभोगापासून दूर राहता येईल. जाहिराती आणि शेकडो स्कीम्स याकडे दुर्लक्ष करणं किंवा त्यांच्या फसवेपणाबद्दल चर्चा करणं (मुलांना उपदेश करणं नाही) याचा सकारात्मक परिणाम मुलांवर झाल्याशिवाय राहत नाही असा माझा अनुभव आहे. प्रचंड प्रमाणात उत्पादित झालेला माल काहीही करून विकणं ही सध्याच्या अर्थव्यवस्थेची गरज झाली आहे. कारण विक्रीवरच कर्जाधारित अर्थव्यवस्था चालू राहू शकते. ज्या वस्तूची जाहिरात करावी लागते ती नक्कीच जीवनावश्यक नसते. किंबहुना ती जीवनावश्यक नसते म्हणूनच ती विकण्यासाठी जाहिरात करावी लागते. गरज, आराम आणि चैन हे तीन निकष लागू केले तर खरेदी सोपी होऊन जाईल. मग पैसे कमवण्याचा तगादा, त्यानं येणारी अस्वस्थता कमी होईल. आर्थिक गदारोळापासून अलिप्त राहण्याची कला ज्या पालकांना जमली ते कुटुंब सुखी अशी नवी व्याख्या आता करायला हवी.

आता हे थोडं विषयांतर आहे पण सगळ्या गोष्टी एकात एक गुंतलेल्या आहेत म्हणून जरा तपशिलात जावं लागतंय. शारीरिक आरोग्य आणि आर्थिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी घरीच स्वयंपाक, पदार्थ करणं ही सवय अंगी बाणवायला हवी. इतक्या भ्रष्ट नोकरशाहीमध्येही कित्येक हॉटेलांवर अस्वच्छतेसाठी, पदार्थांच्या अवास्तव किमतीसाठी, भेसळीसाठी आणि अतिक्रमणासाठी खटले भरले जातायत, छापे टाकून पदार्थ जप्त केले जातायत, बेकायदेशीर बांधकामं पाडली जातायत म्हणजे प्रत्यक्षात या गोष्टी कुठल्या थराला गेलेल्या असतील ते कल्पनेपलीकडचं आहे. पण तरीही आपण रांगा लावून, गर्दी करून ते बेचव अन्न खातो, वाट्टेल तेवढी बिलं भरतो, भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष हातभार लावतो. कारण आपण गर्दी करतो म्हणून ते वाढीव बेकायदेशीर बांधकामं करतात. खोलवर रुजलेली पुरुषप्रधानता जरा सोडली तर घरी सर्वांनी मिळून स्वयंपाक आणि चविष्ट पदार्थ करणं सहज शक्य आहे.

व्यायाम करायचा म्हणजे जिमला जायचं असा एक दंडकच झालाय. जिम म्हणजे पुन्हा प्रचंड यंत्रसामग्री, प्लास्टिक, फायबर आणि असंख्य अविघटनशील वस्तूंचा वापर. अत्यंत साध्या गोष्टी वापरून किंवा नुसता शारीरिक व्यायाम करूनही आरोग्य कमवता येतंच की. सूर्यनमस्कार, योग, टेकड्या चढणं, पोहणं यांनीही उत्तम व्यायाम होतो. पण ते आपल्याला बुरसटलेलं वाटतं. आपल्या मनोधारणांना प्रश्न विचारण्याची सवय लावून घेतली तर आपली जीवनशैली जास्त पर्यावरणपूरक होऊ शकेल.

प्रचंड गर्दीच्या रस्त्यावर आपलं वाहन घुसवत इच्छित ठिकाणापर्यंत जाण्याचा अट्टहास करण्यापेक्षा योग्य ठिकाणी वाहन पार्क करून 1 ते 1॥ किलोमीटरच्या परिघात चालत जाऊन कामं करून येणं याची सवय लावून घेतली पाहिजे. माझा अनुभव आहे की वाहनापेक्षा चालत आपण लवकर पोचतो. सायकलींचा वापर, आपल्या भाज्या आपण पिकवणं, पाण्याच्या बचतीचे कित्येक उपाय, सोलर ऊर्जेचा वापर, खत निर्मिती, वस्तूंचा पुनर्वापर या सगळ्याबद्दल आधीच्या लेखात लिहिलं गेलं आहेच. आणि सातत्यानं, अनेक लोक त्याविषयी बोलत आहेत, लिहित आहेत म्हणून मी त्यांचा पुनरुल्लेख इथे टाळते. फक्त सजगपणे याबद्दल वाचत राहणं, जास्तीत जास्त अमलात आणण्याचा प्रयत्न करणं हे मात्र गरजेचं आहे.

निसर्गाकडे बघण्याची दृष्टी मिळवण्यासाठी निसर्गशिक्षण खरोखर गरजेचं आहे. आतापर्यंत ही गरज इतकी निकडीची वाटत नव्हती. अनेक पर्यावरणतज्ज्ञ काय म्हणत आहेत, विकासाला विरोध का करत आहेत हे सर्वांनी समजून घेण्याची वेळ आली आहे. हे पालकांना समजलं तर मुलांच्यातही पाझरेल. नाहीतर मुलं गोंधळून जातील. एक संवाद बघा हं. शाळेत पर्यावरण विषय असतो. शिक्षक सांगतात, ‘‘कचरापेटीतच कचरा टाका.’’ गाडीतून जाताना मुलगा म्हणतो, ‘‘बाबा, इथे कचरापेटी नाहीये, हा कागद कुठे टाकू?’’ आणि बाबाचं उत्तर, ‘‘टाक रे बाहेर, काही होत नाही.’’ हा परस्पर- विरोध मुलांना बेदरकार बनवेल. म्हणून पालकांनी शिक्षण घेणं गरजेचं होऊन बसलंय. कारण त्यांच्या दुर्दैवानं त्यांना ते कधीच मिळालेलं नाहीये. निसर्गातल्या प्रत्येक सजीव किंवा निर्जीव घटकाची पर्यावरणातली भूमिका समजली तर अनेक गोष्टींची जाण येईल आणि आपोआपच पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत अनेक उपाय सुचत राहतील. हे शिक्षण डोळस वाचनानं आणि विचारमंथनानं होत राहील.

मनाची मशागत केली तर निसर्गाचं नुसतं रक्षणच नाही तर पुनरुज्जीवनही शक्य होईल आणि शाश्वत विकासाची बीजं रुजतील हे निश्चित. कारण ग्राहक हाच राजा आहे! राजा बोले दळ हाले!

भारती केळकर समाजाच्या धारणा, जागतिकीकरण आणि पर्यावरण यांच्या संबंधांच्या अभ्यासक असून 1998 सालापासून इकॉलॉजिकल सोसायटीबरोबर काम करतात.