अश्शी भाषा, तश्शी भाषा | अनिता जावळे वाघमारे

भाषा मानवाला लाभलेला आविष्कार आहे. निसर्गातील वेगवेगळे पक्षी, प्राणी, वारा, नदीचे झुळझुळ वाहणे, सगळ्यांचीच व्यक्त होण्याची एक भाषा असते.

चिमणीच्या चिवचिवाटामध्येदेखील भाषा दडलेली असते. प्रत्येक चिवचिव काहीतरी सांगू पाहत असते. माझ्या घरातील मांजर वेगवेगळ्या प्रकारे म्याऽऽव म्याऽऽव आवाज करत असते. प्रत्येक म्यावमधून काहीतरी नवीन सांगायचे असते तिला. मी सकाळी उठायच्या आत दार वाजवते आणि न बोलताच सगळे सांगून टाकते, ‘‘उठ, झाली सकाळ. मला भूक लागलीय. दूध दे.’’ दूध नाही दिले, तर तिचे ‘म्याव’ वेगळे असते. कधीकधी रागाने डोळ्यात डोळे घालून पाहते आणि सांगत असते, ‘‘तू दूध दिले नाहीस, तर तू बाहेर गेल्यावर मला स्वयंपाकघरात जे करायचे ते मी करणारच आहे.’’

खरे तर काय करते ही मनी? म्याव म्याव तर करते; पण त्या म्यावमध्येही भाषा दडलेली असते आणि आपल्याला ती सहज कळतेपण.

माणसांबद्दल बोलायचे झाले, तर पावलापावलावर भाषा बदलत जाते. प्रत्येक बोलीभाषेचे साहित्यात वेगळे स्थान आहे. मालवणी, अहिराणी, वर्‍हाडी; शिवाय पश्चिम महाराष्ट्रातील मराठीचा ठसका वेगळाच आणि मराठवाड्यात तर आमची जीभ रेटूनच बोलत असते. मराठीची ही वेगवेगळी रूपे जपायलाच हवीत.

भाषा तशी जिवावर उठणारी आणि जीव लावणारीपण आहे. म्हटले तर भाषेत आहे तरी काय… फक्त ‘शब्द’! शब्दांचा खेळ म्हणजे भाषा. हे शब्द तारतातही आणि मारतातही. भाषा हे संवादाचे साधन आहे असे मानले जाते; परंतु विचार करणे, संवेदना किंवा जाणिवा व्यक्त करणे, प्रतिसाद देणे, या सर्वांसाठीच साधन म्हणून भाषा लागते. लहान मुलांबरोबर काम करताना भाषेचा हा व्यापक उपयोग फार महत्त्वाचा आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व आणि क्षमतांना बाल्यावस्थेत भाषेमुळे आकार येत असतो. मुलांची जगाकडे बघण्याची दृष्टी, जीवनमूल्ये, वृत्ती अशा अनेक गोष्टींना भाषा ताकदीने आकार देत असते. भाषेचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे भोवतालच्या जगाचा अर्थ लावणे.

बाल्यावस्थेत शब्द आणि कृती हातात हात घालून येतात. कृती करताना येणारे अनुभव व्यक्त करायला शब्दांची गरज लागते. इथे शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. मुले आपली बोलीभाषा घेऊन वर्गात प्रवेश करतात, तिचा स्वीकार व्हायला हवा आणि गोडवाही जपला जायला हवा. कारण ती बोलीभाषा एका संस्कृतीचेही दर्शन घडवत असते. आमच्या जिल्हा परिषद शाळेत लेकरे आपल्या मित्राची झ्याक ओळख करून देतात, ‘‘म्याडम हा शिरप्या माझा लय जिग्री दोस्त हाय. लय भारी हाय राव!’’ मुलांचे मनमुराद बोलणे मला भारीच आवडते. त्यांच्या भाषेचा गोडवा हृदयालाच भिडतो.

देशातून जाताना इंग्रज त्यांची भाषा मात्र येथेच सोडून गेले. पालकांना आपले मूल इंग्रजी शाळेत घालण्याचे भारीच वेड. आमच्या अंगणवाड्यातदेखील ताई ‘वन’, ‘टू’ शिकवते आणि हे लेकरू पोपटावाणी बोलते. ग्रामीण भागात बाप कसातरी दहावी नापास आणि माय कशीतरी चौथी, असे काहीसे वातावरण आणि हे आपले लेकरू घालतात इंग्रजी शाळेत. मग काय? मायबाप लेकराला विचारतात, ‘काय शिकून आलं माझं बाळ?’ लेकरू म्हणते, ‘माय नेम इज चिंतामणी.’ बस! मायबाप लय खूष, त्याच्या पुढे काय लेकरू जातच नाही. आणि पालकाचा गैरसमज, ‘पोरगं लय हुशार झालं’. इंग्रजी भाषा ही भाषा म्हणून शिकायला हवी; माध्यम म्हणून नव्हे. परकीय भाषा म्हणून तिचा तिरस्कारही नाही करायचा. आपल्या परिसरात इंग्रजी बोलत नाहीत, कानावर पडत नाही आणि पालकांचा हट्ट की मुलांना इंग्रजी बोलता यायला हवी. त्यांचे वाटणे चुकीचे नाही. जागतिक स्तरावर विचार केल्यास इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जाते; पण शिकण्याची पद्धत नैसर्गिक हवी.

परिसरातील भाषा मुलांना समृद्ध करत असते. घडवत असते, आपल्या वेदना-संवेदना व्यक्त करण्यासाठी मुलांना मदत करत असते. अशा वेळी प्रमाणभाषेचा आग्रह धरल्यास त्याची अभिव्यक्ती मारली जाते.

आम्ही आमच्या शाळेत भाषिक वारसा जिवंत ठेवण्याचे काम करत आहोत. लिखित अभिव्यक्तीच्या माध्यमातून मराठवाडी बोलीभाषा जतन केली जात आहे. मुले आपल्या परिसरातील अनुभव आपल्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘टपरीवरची छपरी पोरं’, ‘जिल्हा परिषद बोरगावची लेकरं निघाली चंद्रावर’, ‘माझी सायकल’ असे बरेच विषय घेऊन मुले लिहीत आहेत. शिक्षक म्हणून आम्हाला ह्याचा अभिमान वाटतो.

अनिता जावळे वाघमारे  |  anitajawale1977@gmail.com

लेखिका लातूर जिल्ह्यातील बोरगाव काळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहेत.

चित्र: रमाकांत धनोकर