आजोबा होणार

एका होऊ घातलेल्या आजोबांना आपण ‘आजोबा’ होण्याचा आनंद ‘पालकनीती’ला आणि आपल्या वाचकांना सांगावासा वाटला…

अहाहा! आजोबा होणार

अहो मी आजोबा होणार

लेकासंगे आतुर होऊनी वाट तुझी बघणार

रडे पहिले पडता कानी मिशीत मी हसणार

मृदू गुलाबी पाऊल चुंबुनी आनंदे फुलणार

शुद्ध निरागस रूप पाहुनी डोळे ही टिपणार

अहाहा! आजोबा होणार …

 

लुटुपुटीच्या खेळामध्ये सदैव माझी हार

घोडा घोडा करता करता तूच मजवरी स्वार

मित्र मिळुनी दंगा घालुनी करा मला बेजार

शिंगे मोडून वासरांतली गाय मीच असणार

अहाहा! आजोबा होणार …

 

होतो पिता कळते आता कठोर नच बनणार

गंमतजंमत गप्पागोष्टी विनोदही करणार

मस्त माा करुया सारे नकोत ते संस्कार

पत्ते भेंड्या चेंडूफळी अन् धपका तो हळुवार

अहाहा! आजोबा होणार …

 

चॉकी बिस्किट देतिल सारे चिंच-बोर देणार

रुसवा-फुगवा चिडणे-रडणे हे सारे सहणार

पाऊसपाणी चिखलामध्ये खुशाल खेळवणार

पडल्यावरती देईन स्फूर्ती तुझाच तू उठणार

अहाहा! आजोबा होणार …

 

आपण दोघे हात गुंफुनी आसमंत फिरणार

जुनीच सृष्टी नवीन दृष्टी अचंबित होणार

अलगद सोडिन हात तुझा तू पुढे पुढे जाणार

आठवणी मग मम अंतरी अखंड दरवळणार

अहाहा! आजोबा होणार …

  • डॉ. प्रसन्न दाभोलकर