आदरांजली: लीलाताई

प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ आणि सृजन आनंद शाळेच्या संस्थापक लीलाताई पाटील ह्यांचे नुकतेच निधन झाले. अध्यापक विद्यालयातून प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी सृजन आनंद विद्यालयाची स्थापना केली, शिक्षणाचे अनेक प्रयोग राबवले. मूल्यवर्धित शिक्षण संकल्पना मांडणारी त्यांची पुस्तके शिक्षणक्षेत्रात संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात. त्यांनी लिहिलेली शिक्षणातील ओअ‍ॅसिस, परिवर्तनशील शिक्षण, ऐलमा पैलमा शिक्षण देवा, प्रवास ध्यासाचा आनंद सृजनाचा, ही आणि अशी कितीतरी पुस्तके त्यांची बालशिक्षणाबद्दलची कळकळ व्यक्त करतात.

लीलाताईंच्या निधनाने शिक्षणक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

पालकनीती परिवाराकडून लीलाताईंना भावपूर्ण आदरांजली.

आपल्या मनात काही माणसांचं स्थान इतकं अढळ असतं, की ते भेटले किंवा नाही, यानं काहीच फरक पडत नाही. लीलाताई गेल्या. 2014 साली त्यांना भेटून त्यांच्या घरातून बाहेर पडले. धरतधरत त्या सोडायला बाहेरपर्यंत आल्या. कशाला येता लीलाताई, म्हटलं, तरी त्यांनी हट्ट सोडला नाही. त्याच वेळी आणखी काही दिवसात ही बातमी येणार अशी शंका आलेली होती. त्यामानानं बरीच उशिरा आली. 

त्यांची भेट पहिल्यांदा झाली ते 1990 साल असावं. सृजन आनंद बघायला विद्या पटवर्धन आणि मी गेलो होतो. त्याच्या आदल्या रात्री बसून मी त्यांची तोपर्यंत हाती असलेली पुस्तकं वाचून काढली होती. आम्ही शाळा काढायचा विचार करत होतो, आणि त्यासाठी समविचारी शाळा बघत होतो. दिवसभर शाळेत होतो. मला आठवतंय, की मी हजार प्रश्न विचारत होते. हे असं तुम्ही म्हणताय, मग हे असं कसं? हे तुम्ही म्हणताय; पण ते प्रत्यक्षात कसं आणलंत? त्यांनी मनापासून उत्तरं दिली. नम्रपणे दिली असं मी नाहीच म्हणणार; पण प्रांजळपणे दिली. 

त्या तशाच होत्या. तेव्हापासून ते चौदा सालापर्यंत अनेकदा त्यांच्याशी तासन्तास गप्पा झाल्या. दोनतीनदा तरी रात्री त्यांच्या घरी राहायला गेले. ही त्यांची गप्पा मारायची आवडती पद्धत असावी. एकदा पुण्यातही त्या उतरल्या होत्या त्या घरी रात्री राहायला गेले होते. अनेक पुस्तकांबद्दल आमचं बोलणं व्हायचं. त्यांना पुण्याहून पुस्तकं हवी असायची. ‘काय वाचताय सध्या?’ असा नेहमीचा पहिला प्रश्न असे. कोल्हापुरात घरी गेल्यावर कौतुकानं मोदक मागवून ठेवून खाऊ घातल्याचं आठवतं. वरपांगी कठोर वाटायच्या; पण ते अगदी वरवरचं फोलपट होतं. ते उकललं, की आत मऊ मायेचा झरा होत्या लीलाताई. 

त्या लहान असतानाच्या त्यांच्या वडिलांच्या वागणुकीबद्दल आणि बाळच्या मृत्यूबद्दल त्या आयुष्यभर खंतावल्या. दु:खाचा वाट्याला आलेला चरा भरून काढायला त्यांनी सृजन आनंद, पुस्तकं लिहिणं, कार्यशाळा घेणं, पुस्तकं वाचणं असे आनंदाचे अनेक डोंगर उभे केले आणि स्वत:सह इतरांनाही आनंदबागेत- ओअ‍ॅसिसमध्ये आणलं. 

अनेकदा सांगूनही संजीवनीताई अशी हाक मारायच्या. शेवटी मात्र संजू, माझी संजू असं म्हणण्यापर्यंत आल्या, तेव्हा आपण काहीतरी मोठं बक्षिस मिळवल्याचा आनंद मला झाला. लीलाताई माझ्या मनात आहेत तशा, मला खात्री आहे, अनेकांच्या मनात आहेत. त्या कुठंही जाणार नाहीत. 

संजीवनी कुलकर्णी

संपादक, पालकनीती