आदरांजली – विलासराव चाफेकर 

विलासराव चाफेकर गेले. अनेकांच्या जगण्यावर निरर्थकतेचा ओरखडा उठला. काही माणसं आहेत म्हणून या जगात जगण्यात अर्थ आहे, असं वाटत राहतं. आपल्या प्रत्येकाची अशी यादी वेगवेगळी असते. मात्र त्यात काही सामायिकताही असते. तसं अनेकांच्या यादीतलं सामायिक नाव विलासरावांचं. अनेक फेरीवाले, शरीरविक्रयाचा व्यवसाय करणार्‍या स्त्रिया, त्यांची लहान मुलं, प्रांतातले बालशिक्षणकारणी, सामाजिक संघटनांमध्ये रमून काम करणारे अनेक कार्यकर्ते, स्त्रियांना प्रत्यक्षात समता मिळावी म्हणून प्रयत्न करणार्‍या संस्था यातल्या अनेकांच्या यादीत विलासराव नक्कीच होते. त्यांच्याशी कधी ओळख झाली, कुणास ठाऊक. त्यांची चर्या इतकी आश्वासक ओळखीची असे, की त्यांच्याशी आपली ओळख आधीपासून आहेच असं वाटे. ते कुठल्याही कामाशी जोडून असोत, त्यातले प्रश्न फार सहज सोडवून देत. त्यांच्याशी बोलून आल्यावर ते प्रश्न आपल्यालाही सोपे वाटत आहेत, हे जाणवे. ‘जाणीव’ आणि ‘वंचित विकास’ या दोन संस्थांचे ते उद्गाते होते. मात्र बर्‍याच, सुमारे 8-10 वर्षांपूर्वीच त्यांनी कामातून निवृत्ती घेतलेली होती. गेली काही वर्षं तर त्यांच्या आजारपणांच्याच निमित्तानं गाठ पडे. त्या वेळीही ते इतक्या आनंदानं आपल्याशी बोलत, की त्यांच्या आजाराबद्दलची काळजी आपल्या आवाजात दिसते आहे याची आपल्यालाच लाज वाटावी. त्यांच्या निधनानं एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. 

पालकनीती परिवारातर्फे विलासराव चाफेकर ह्यांना भावपूर्ण आदरांजली.