आदरांजली – सतीश काळसेकर

‘आपले वाङ्मय वृत्त’चे संपादक म्हणून परिचयाचे असलेले कवी, अनुवादक श्री. सतीश काळसेकर यांचं जुलै 2021 मध्ये निधन झालं. त्यांचे मार्क्सवादी चळवळीतील आणि समांतर लेखकसंघातील काम, विचार, संपादनं, अनुवाद, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार याबद्दल एव्हाना आपल्याला माहिती झाली असेल. त्यामानानं प्रसिद्धीच्या चौकटीत न बसणारा हा कवी मृत्यूनंतर मात्र समाजमाध्यमावर झळकला. वय आणि आजारपणं यांनी त्यांच्या मृत्यूची अनपेक्षितता ठेवलेली नव्हती; पण अचानक धक्का बसल्यासारखे अनेकजण समाजमाध्यमावर लिहित सुटले. 

वाङ्मय वृत्ताच्या दर संपादकीयात काळसेकरांनी वाचलेल्या, कष्टानं मिळवलेल्या मराठी- इंग्रजी पुस्तकांबद्दल वाचायला मिळे. वाचकांनी ती पुस्तकं वाचावीत यासाठीचा आग्रह असे. त्या लेखनाला कधी त्यांच्या वैयक्तिक सुखदु:खाचीही धार असे. काळसेकरांशी संवाद होतो आहे असं वाटे. त्यांच्या कविताही अशाच असत. बोलणार्‍या; कधी वाचकांशी तर कधी स्वत:शी. 

तसं तर कमी कष्टाचं नसलेलंच हे सगळं… अशा ओळींनी कवितेची सुरुवात करणारा हा कवी, 

हे जगण्याचे कष्ट जसे माझ्या जगण्याचे असतात, तसेच ते इतरांच्या जगण्यातही दिसत असतात. काही माझ्यासारखे. काही माझ्याहून निराळे आणि त्याने डोळे भरून येतात असं सांगतो, तेव्हा त्याची भूमिका आपल्यापासून दूर कुणा परक्याची उरत नाही. आणि 

सर्वनामं आणि संबोधनं कशी गळून पडतायेत कवितांतून.

आता कात टाकावी तसं सोलून निघताना आयुष्य सगळं

सगळ्याचं बरंवाईट कसं होत चाललंय आपलंच.

ही कविता वाचताना तो ‘मी’पणाचा व्याप सर्वांना कवेत घेतो.

पालकनीती परिवारातर्फे सतीश काळसेकर ह्यांना भावपूर्ण आदरांजली. 

2016 च्या ‘विश्रांती’ दिवाळी अंकात काळसेकरांनी लिहिलेला ‘माझी कवितेविषयक भूमिका’ हा लेख जरूर वाचा.

vishrantideepank.com/mazi-kavitevishayak-bhumika/