कला आणि बालपण

‘टीचर प्लस’ मासिकात आलेली रविकुमार काशी या कलाकाराची मुलाखत वाचली. कला आणि कलाशिक्षण यावर ते बोलत होते. त्यांचे बालपण, कलेची ओळख कशी झाली, बालपणात मनावर कशाचे प्रभाव होते, त्यामुळे कलेकडे ओढा कसा निर्माण झाला, अशा सगळ्या आठवणी ते सांगत होते.अशाच आठवणी काही नव्या-जुन्या कलाकारांनीही सांगितल्या आहेत. त्या सगळ्यातून सापडलेल्या गोष्टी मी मांडते आहे.मुलांची संवेदनक्षमता, संवेदनशीलता बालपणातच विकसित होण्याच्या संदर्भात याचे महत्त्व आपल्याला जाणून घेता येईल.

काशी म्हणतात, ‘‘माझे बालपण बंगळुरूमध्ये मेडरम् भागात गेले.तो सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भाग होता. कृष्ण मंदिरात पारंपरिक संगीत भरपूर ऐकायला मिळे. ‘राम सेवा मंडळी’ अनेक कलाप्रकार सादर करत.‘शनिमाहात्म्य कथा’ रात्ररात्र सांगितली जाई. यक्षगान असे, बाहुलीनाट्ये असत. या सगळ्याचा माझ्यावर काहीएक प्रभाव असणार. लहानपणापासूनच माझा दृश्यकलांकडे ओढा होता. चित्रकला परिषदेमध्ये चित्र काढणार्‍या लोकांचे काम मी तासन्तास पाहत राही.माझ्या शाळेसमोर पाट्या रंगवण्याचे एक दुकान होते. तिथे निसर्गदृश्ये रंगवणारा एकजण होता, त्याचे काम मी पाहत राही.शाळा सुटली की तिथेच. शिवाय परिसरात गारुडी असत आणि कितीतरी खेळ रस्त्यावर चालू असत.त्यात आम्ही रंगून जात असू. आजच्यासारखे मुलांवर सतत कुणीतरी लक्ष ठेवून नसे. मार्क मिळवण्याच्या कामाला आम्हाला जुंपत नसत. मेडरम् आणि तिथल्या या वातावरणाचा माझ्या वाढीमध्ये मोठा वाटा आहे.’’

अशाच आठवणी इतर कलाकारांनी, शिक्षणतज्ज्ञांनी सांगितलेल्या आहेत. आसपासचे वातावरण सुयोग्य असेल, तर मुलाच्या जाणिवांचा विकास व्हायला मदत होते असा सर्वांचाच अनुभव आहे.

शांत, नैसर्गिक परिसरातले अनुभव, वेगवेगळी माध्यमे, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, कथा यांनी बालपण समृद्ध होते. कोणताही दबाव न येता, मुलाच्या मनातली उत्सुकता, कल्पनाशक्ती, विस्मय जागृत करता आले, तर ते अधिक उपयुक्त ठरते. महान कलाकार देवीप्रसाद यांनी त्यांच्या ‘आर्ट : द बेसिस ऑफ एज्युकेशन’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांच्या शालेय अनुभवाचे वर्णन केले आहे. ना कशात रस, ना कशाचे कौतुक! पण नवव्या वर्षी, घर बदलल्यावर, तिथे काम करणार्‍या कारागिरांनी त्यांच्या जीवनात बदल घडवला.

‘‘त्यांच्या भोवती त्यांचे काम बघत मी फिरत राहिलो, त्यांच्या हत्यारांना हात लावला, तरी त्यांना चालत असे. मग मला सुतारकामात रस वाटू लागला. माझ्या-माझ्या पैशातून मी हत्यारे विकत घेतली आणि काहीबाही तयारही करू लागलो. घराची दारे ठाकठीक करू लागलो, रंगवू लागलो. नंतर मला चित्रकलेत रस निर्माण झाला.’’

‘‘मला वाटते, त्या कारागिरांनी मला लाकडाला हात लावू दिला नसता, हत्यारांशी खेळू दिले नसते, तर स्वत:च्या हाताने काही तयार करण्यातली गंमत मला कधीच समजली नसती. या अनुभवाशिवाय लहान मुलाचे मन समजणेदेखील मोठेपणी मला शयय झाले नसते.’’

देवीप्रसाद यांचे शिक्षक आचार्य नंदलाल बोस यांचे बालपण मात्र चित्तवेधक होते. पूर्व बिहारमधल्या हवेली खरगपूर इथल्या जंगलात त्यांचे बालपण गेले. मोह, साल, सागवानाचे वृक्ष, चित्ते, वाघ, अस्वले आणि हत्तींचा वावर. त्यांच्या आई क्षेत्रमणीदेवी यांना सौंदर्य पारखणारी नजर होती. त्या अत्यंत कल्पकतेने बाहुल्या आणि सुंदर खेळणी बनवत. संदेश आणि इतर मिठाईवर नक्षी करण्यासाठी मातीचे ठसे बनवत. नंदलालना लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करण्यात रस वाटू लागला. नवरात्रीत पूजामंडप आणि मोहरमला ताजिया सजवणे त्यांना फार आवडे. शाळेत जाताना त्यांना कुंभार, सुतार, खेळणी बनवणारे दिसत. चाकावर मातीचा गोळा टाकण्यातले, चाक फिरवण्यातले, मातीचा आकार बदलण्यातले कुंभाराचे कौशल्य त्यांना गुंगवून टाके. साधी पटाशी वापरून लाकडावर कसे अचूक काम होते, ते पाहून ते खुश होत. ‘‘त्यांच्या साध्या-सरळ बालपणात भारतीय संस्कृतीचे रंग भरलेले होते. रामायण, महाभारतातल्या गोष्टींनी त्यांच्या जाणिवेत प्रवेश केलेला होता. हातांनी काम करण्यातली मजा त्यांना खेड्यातल्या कारागिरांनी दाखवली होती.निसर्गाच्या संथ-शांत प्रवाहाने त्यांना शांत, स्थिर मन बहाल केले होते.’’ (दिनकर कौशिक, 1983)

शिक्षण सुधारक जॉन ड्युई यांनी लहानपणी सुसंवादी वातावरण दृष्टीस पडण्याचे महत्त्व मांडले आहे. अशा वातावरणात वाढलेल्या मुलाची आवडनिवड दर्जेदार बनते. उजाड-ओसाड वातावरण असेल तर सौंदर्याची इच्छाच नष्ट होते. सौंदर्यपूर्ण परिसरात राहूनच ती रुची विकसित होते, ती शिकवता येत नाही आणि माहितीसारखी देताही येत नाही.

मला वाटते, या सगळ्या म्हणण्यातून आपल्याला मुलांच्या सान्निध्यात असणार्‍या सर्वांनाच एक वेगळा दृष्टीकोण लाभेल… मुलाच्या आयुष्यात पोषक आणि प्रोत्साहक वातावरण आधी येते. इकडेतिकडे शोधून पाहावे, काही करून बघावे, मनातले व्यक्त करावे यासाठी मोकळीक हवी. मुलाचा कल आणि सर्वांगीण विकासाचे टप्पे त्यातूनच ठरतात. कलेचे तंत्र महत्त्वाचे आहे आणि प्रशिक्षणही; पण ते सगळे नंतर येते. जवळच्या सजीव-निर्जीव विडाशी मुलाचे नाते जोडून देणे, अग्रक्रमाचे असते. मनात सहानुभाव हवा.कशात किती गुंतायचे, कशातून दूर राहिले तर चालते, ते ठरवायला जागा मिळावी. कुठल्याही कलाकारासाठी तेच तर महत्त्वाचे असते, नाही का?

असे मोकळे वातावरण देणे हे कुठल्याही पालक-शिक्षकाला शयय असते. त्यासाठी प्रशिक्षणाची वा पदवीची काहीच गरज नाही. देवीप्रसाद यांनी म्हटले आहे, ‘‘चित्र मुळीच काढता न येणारे; पण लहान मुलांची चित्रकला समजणारे, त्याचा आनंद लुटणारे अनेक शिक्षक मला माहीत आहेत. मुलांच्या गरजा ओळखणारे हे शिक्षक त्यांच्यासाठी उत्तम शिक्षक असतात. असाच शिक्षक मुलांची सर्जनशक्ती आणि प्रतिभा फुलवू शकतो. आता हा शिक्षक चांगला कलाकारही असला तर उत्तमच; पण ते दुर्मीळ आहे, आणि मुख्य म्हणजे त्याची गरजही नाही.’’ (देवीप्रसाद, 1998)

जेन साही यांनीही त्यांच्या ‘लर्निंग थ्रू आर्टस्’ या पुस्तकात काहीसे असेच मांडलेले आहे- पंचेंद्रियांना आवाहन करणारा वैविध्यपूर्ण आणि समृद्ध अनुभव अगदी लहानपणीच मिळायला हवा, त्यातूनच अनेक कृतींचा मार्ग जातो. त्या म्हणतात, ‘‘सहा वर्षांपेक्षा लहान मुलांना समृद्ध अनुभव देणारे वातावरण मिळायला हवे. याशिवाय शिक्षकाने मुलांना ऐकणे, पाहणे, स्पर्श करणे, हातात घेणे, हलवणे, ढकलणे, ओढणे, माती- पाणी- वाळूत खेळणे यासाठी मोकळीक दिली तर अधिक प्रोत्साहन मिळते. मुलांना माहीत असलेल्या संदर्भांबद्दल विचार करायला लावतील असे प्रश्न विचारणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे यामुळे मुले निरीक्षण करायला शिकतात, जाणीवपूर्वक अनुभव घ्यायला शिकतात.’’

मुलांना कलाकार बनवणे, शाळेत कलाशिक्षण देणे असा हा विषय नाहीच. मुलांकडे असलेल्या अफाट क्षमता फुलवण्यासाठी योग्य ते शैक्षणिक अनुभव कसे देता येतील असा आहे आणि हेच महत्त्वाचे आहे. नाही का? मारिया माँटेसरी यांनी ते उत्तम सांगितले आहे, ‘‘मुलांकडे योग्य तितके लक्ष दिले गेले, त्यांच्या अफाट क्षमता फुलायला वाव दिला गेला, तर जगातली युद्धे बंद करण्याच्या, शस्त्रास्त्रे टाकून देण्याच्या कल्पना मांडणार्‍या आंदोलनाची गरजच पडली नसती. मुलांचा मूळ स्वभाव माणुसकीला धरूनच असतो. त्या मूळच्या नीतीधैर्याचे खङ्खीकरण झाले तर मगच ती युद्धात सहभागी होऊ शकतात.’’ (देवीप्रसाद, 1998)

एक मात्र खरे, सगळ्या मुलांना काही असे शैक्षणिक वातावरण मिळत नाही. शाळा तर सोडाच, पण कुटुंबसुद्धा त्यांच्या नशिबी नसते. गरिबी, उपासमार, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्यंतिक दुर्लक्ष यामुळे घर सोडावे लागलेले असते. आणि मग रस्त्यावरचे जगणे नशिबी येते. इथे तर जास्तच मारहाण, जखमा, टोळीयुद्धे, अत्याचार आणि अंमली पदार्थ. आरोग्य, सुरक्षा आणि शांतीचे नामोनिशाण नाही. या मुलांचे बालपण टिकवून कसे ठेवायचे?

अशा मुलांना पर्यायी वातावरण देण्यासाठी झटणार्‍या एका संस्थेत काम करताना घडलेला हा प्रसंग. पाच-सहा वर्षांचा मुलगा होता. संस्थेत येण्याआधी तो रेल्वेत भीक मागत असे. आम्ही चित्र काढत होतो.तोतरेपणामुळे तो बोलण्याचे टाळत असे. मी त्या शिबिरात मुलांना आपल्याला आवडणार्‍या सुरक्षित जागेचे चित्र काढायला सांगितले होते.त्याने चमकदार हिरवा रंग घेतला. आणि एका बाहुल्याचे चित्र काढले. सगळे एकाच रंगात. त्याला ते पेन इतके आवडले होते, की बाकी सगळे साहित्य परत केले तेव्हा पेन मात्र ठेवून घेतले. शू करायला जाताना देखील तो ते घेऊन गेला होता.

थोड्या वेळाने आम्ही रेल्वे स्टेशनचे चित्र काढायला घेतले; पण त्याला काहीच सुचेना. तो कागद घेऊन आला, मला येत नाही, म्हणाला. सहज आणि सोपे बोलणे, मुलांनी जे पाहिले अनुभवले असेल त्याबद्दल बोलणे महत्त्वाचे असते, कारण चित्र काढताना मुले त्यांच्या आठवणीत बुडून जातात… असे देवीप्रसाद यांनी म्हटलेले आहे. स्टेशनवर काय काय पाहिले, त्याबद्दल आम्ही बोलू लागलो. त्याला इतका उत्साह आला होता, त्याची यादी संपत नव्ह्ती. पण चित्र काढ म्हटले असते, तर तो उत्साह विरून गेला असता. मग मी एक साधासा डबा काढला, त्याने तसेच तीन डबे काढून रेल्वे तयार केली. मी रूळ काढायला सुरवात केली, त्याने ते पूर्ण केले. मग त्याने स्टेशनवरच्या पाट्या काढून त्यावर जबलपूर असे नावही दिले. मी काढत असलेल्या चित्राचे निरीक्षण करून तसा प्रयत्न करावासा त्याला वाटला. मला येत नाही… पासून आपल्या पद्धतीने चित्र काढून पूर्ण करेपर्यंत एक पा त्याने गाठला.

बर्‍याच दिवसांनी मला देवीप्रसादांच्या पुस्तकात याबद्दल लिहिलेले सापडले – ‘‘ज्या मुलांना सतत नवनवे अनुभव मिळत राहतात, ती मुले नक्कल करत नाहीत. जर एखाद्या वेळी केलीच, तर त्या विशिष्टवेळी नवी कल्पना सुचली नसेल किंवा एखाद्या चित्रातली एखादी गोष्ट फारच आवडल्यामुळे असेल. या विषयात मागे पडणारी मुले मात्र नक्कल करायला बघतात, त्याचा बाऊ करू नये, कदाचित नक्कल करता करताच मुलांना आपले स्वतंत्र चित्र सुचणार असेल.’’ (देवीप्रसाद 1998)

मुलांनी नक्कल करणे वेगळे आणि मोठ्यांनी नक्कल करणे वेगळे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

Jamuna_Inamdar

जमुना इनामदार

jamuna.inamdar@gmail.com

लेखिका योगशिक्षक असून त्यांनी कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थी, रस्त्यावर वाढणारी मुले यांच्याबरोबर काम करणे हे त्यांच्या आनंदाचे निधान आहे.

अनुवाद – नीलिमा सहस्रबुद्धे