काहीही न बोलता

मी म्हटलं,

मी एक झाड लावलं

मी म्हटलं,

मी एक, दोन, चार, आठ झाडं लावली

मी म्हटलं,

मी हजार, पाच हजार, दहा हजार झाडं लावली

पक्ष्यांनी अन्न म्हणून खाल्ल्या खूप बिया

पाहिजे तेवढ्या घेतल्या पोटासाठी,

नको असलेल्या टाकल्या विष्ठेपोटी

आणि त्यांनी लावली झाडं कितीतरी लक्ष

 काहीही न बोलता

 

मी म्हटलं,

यावर्षी या अमक्याअमक्या झाडाचं एवढं फळ 

मी घेतलं

फळ मोठंय, मस्तय, गोडय

अगदी साखरच जणू

झाड काहीही न बोलता 

फळं देत राहिलं, फळं देतच राहिलं

 

मी म्हटलं,

मी माझ्या मुलांना जन्म दिला

मी माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलं

सगळ्या सुखसुविधा दिल्या

पंचमहाभूतांनी त्यांना मोठं करण्यात मोलाचा वाटा उचलला 

समाजानं अनुभवाचं दान पदरात टाकलं

काहीही न बोलता

 

मी म्हटलं, यावर्षी शेतात मला भरघोस पीक झालं

मी खूप कष्ट केले शेतात, रात्रन्दिवस राबराब राबलो

म्हणून हा आजचा दिवस सोन्याचा

सोन्यासारख्या भुईनं

स्वतःत पिकाला रुजवून घेतलं

पावसानं पाणी दिलं

खतांनी पोसलं, वाढवलं

 पिकाला टपोरं केलं

काहीही न बोलता…

 

DeeptiDeshpande

दिप्ती देशपांडे   |   deepti.deshpande233@gmail.com