गाभार्‍यातला देव

जग समजून घेताना लहान मुलं खूप सुंदर प्रश्न विचारतात. आणि मग त्यांना समजेल अशी उत्तरं देताना आपली जी तारांबळ उडते, त्यातून निर्माण होणारे संवाद निव्वळ अप्रतिम असतात. केवळ कल्पनेचे धुमारे; त्याना कुठल्याच तर्कशास्त्राचं बंधन नसतं. घातलं तर आपणच वेडे! पण पूर्णपणे अतार्किक बोलता येणंही अवघडच असतं. त्यामुळे उत्तरं सोपी करण्याच्या नादात अर्धवट तर्काचे आणि गंमतीशीर संवाद निर्माण होतात. हे सगळं इतकं सतत घडत असतं, की त्या-त्या वेळी मोबाईलचा रेकॉर्डर सुरू करून ते संवाद साठवूनही ठेवता येत नाहीत. बरं नंतर लिहावं म्हटलं, तर अखंड कमी पडणारा वेळ. आणि सगळाच्या सगळा संवाद ठरवूनही नीट लक्षात राहत नाही. आणि किती वेगवेगळे संवाद लक्षात ठेवणार!

खरंतर हे प्रत्येकच मुलाच्या बाबतीत घडत असणार. आपली फक्त ‘तू गप रे…’ ऐवजी त्याच्याशी बोलायची तयारी हवी. माझ्या लहानपणचे प्रश्न मला आठवत नाहीत; पण ‘टीन’एजमध्ये पडलेले प्रश्न आणि त्यांची न मिळालेली उत्तरं आठवतात. प्रश्न विचारलेले कोणाला चालत नाहीत याची निश्चितच नोंद होते मनात. अर्थात, त्यामुळे प्रश्न विचारणं बंद होईल असं काही नाही; कमीत कमी माझं तरी झालं नाही. किंबहुना अजूनच वाढलं. त्यामुळे आपण मात्र आपल्या मुलाच्या प्रश्नांना थांबवायचं नाही आणि त्याला यथाशक्ती आणि यथासमज उत्तरं द्यायची हे आधीच ठरवलं होतं. त्याची अंमलबजावणी आता चालू आहे.

सुहृद जन्माला आला तोवर मी विचारांनी नास्तिक झाले होते. त्यामुळे मंदिरात नियमितपणे जाण्याचा काही त्याला योग येत नाही. पण मंदिरात जाण्यातही शिक्षणाच्या काही संधी आहेत याचं भान असल्यानं त्या संधी मी अधूनमधून जरूर साधते. अशाच संधींपैकी ही एक…

सारसबागेतील गणपती मंदिरात पहिल्यांदाच गेलो असताना ‘गाभारा’ हा शब्द मी त्याला सांगितला.

सुहृद : आई, मला आत जायचंय.

मी : गाभार्‍यात फक्त पुजारीच जाऊ शकतात.

सु : का गं?

मी : सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय, की फक्त पुजारी काकांनीच आत जायचं.

सु : म्हणजे तू पण ठरवलं आहेस का असं?

मी : (मनात) नाही रे, मी नास्तिक, मी कशाला काही ठरवू असं! (प्रत्यक्ष) मी नाही, सगळ्यांनी मिळून.

सु : पण का?

मी : आत खूप गर्दी होईल सगळे गेले तर म्हणून…

सु : गर्दी झाली तर काय होईल?

मी : मग देवाला काही दिसणार नाही.

सु : म्हणजे कोण दिसणार नाही?

मी : लहान मुलं…

सु : देवाला लहान मुलं खूप आवडतात का?

मी : हो…

सु : तो त्यांना मांडीवर का घेत नाही?

मी : त्याची मूर्ती लहान असते ना, मग मांडीवर मावत नाहीत लहान मुलं…

यातली पहिली चार वाक्यं मंदिरात असताना बोलली गेली. पुढचा संवाद दुसर्‍या दिवशी संडासात बसून…!

12. Preetee Oswal

प्रीती ओ.  opreetee@gmail.com