ज्योतसे ज्योत जलाते चलो…

ती आहे एक चिमुरडी, अवघे 15 वयमान असलेली, शरीरानं लहानखुरी.

चारचौघीतली एक म्हणून सहज खपेल अशी.

‘काय करतेस?’ ह्या प्रश्नाला ‘काही नाही, बाबा कामावर जातात. त्यांना स्वयंपाक करून घालते, बस्स.’ असं उत्तर देणारी.

अशा तर कितीक. मग आज हिच्याबद्दल काय एवढं?

एवढं काय, ते एव्हाना समाजमाध्यमातून तुमच्यापर्यंत पोचून शिळंही झालंय, खरं तर.

हो, ही तीच. ज्योती पासवान. गुरूग्राम ते दरभंगा हे 1200 किलोमीटर अंतर जायबंदी वडिलांना सायकलवर मागे बसवून घर गाठणारी.

पण नाही, हे ते नाही.

एवढी अचाट कामगिरी आपण केलीय, हेही तिच्या गावी नसणं, त्याचं भांडवल करता येऊ शकतं, आपण नाईलाजानं केलेल्या कृतीला ‘ब्रेकिंग न्यूज’चं मूल्य आहे, हेही तिला माहीत नसणं, हेही ते नाही.

मग?

तर ते असं आहे…

अभूतपूर्व अशी कोरोना-परिस्थिती. त्यापाठोपाठ आलेली प्रदीर्घ टाळेबंदी. एकीकडे स्वतःच्या, आप्तस्वकीयांच्या आरोग्याची काळजी, तर दुसरीकडे नोकरी गमावण्याची चिंता. वाढती महागाई, मुलांची शिक्षणं, घरातील ज्येष्ठांची आजारपणं, एक ना दोन. सगळीकडून घेरून टाकणारी परिस्थिती. अस्वस्थता, भीती, चिंता, हतबलता. बस्स.

ज्योतीच्या बातमीनं मात्र मनामनांत लख्खकन काहीतरी उजळतं. 15 वर्षांची चिमुरडी अशक्य असं काही करून दाखवते. हातपाय गाळावे अशी जिची परिस्थिती, तिनं मनात तसा विचारही येऊ दिला नाही, उभारी धरली आणि गाव गाठलं, त्यापुढे आपणासारख्यांच्या समस्या त्या काय आणि किती!  

ज्योतीचे आईबाबा, माहीत नाही, मुलीचं नाव ज्योती ठेवताना तुम्ही काय विचार केला होतात; केला होताही की नाही. परंतु अशी एखादीच ज्योत असते, स्वकर्तृत्वानं आपल्या आयुष्यात दिवा पेटवणारी. पण एवढंच नाही, इतर असंख्यांच्या मनातही आशेचा दीप उजळवणारी. नाही तर मग बाकीचे असतातच ‘नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा’ ही म्हण सार्थ करणारे!

अनघा जलतारे