प्रणाली सिसोदिया
प्रसंगांचा पहिला संच –
१. लेकीचा बुटात पाय घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती बूट उलटे घालते आहे हे लक्षात येताच, “अग बाळा तू बूट उलटे घालते आहेस. असे नाही घालायचे.”
२. लेक एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओतते आहे. जरा कुठे पाणी आजूबाजूला सांडलं आणि तिचे कपडे ओले होताहेत असं दिसताच, “माऊ पाणी खाली सांडतंय, कपडे ओले होतायत. नीट ओत.”
३. पोळपाटावर कणीक ठेवून लेक तिला जमेल तसं त्यावरून लाटणं फिरवतेय असं दिसताच, “अग अशी नाही करायची पोळी. थांब मी करून देते.”
प्रसंगांचा दुसरा संच –
१. लेक स्वतःच्या हातानं खायला शिकली तेव्हा ताटातला निम्मा वरणभात पोटात जायचा आणि निम्मा तिच्या अंगावरून ओघळत असायचा. सारा संयम एकवटून, परिस्थिती ‘करेक्ट’ न करता आम्ही तिथं बघत बसायचो.
२. लेकीला नवीन खेळ आणून दिला. पुढचा अर्धा तास ती तो कसा खेळता येईल हे तिचं तिचं समजून घेत होती. आम्हीही तिला काहीही न सुचवता फक्त बघत बसलो होतो.
३. परवा लेक तिचे कपडे कपाटात ठेवत होती (मोठ्यांच्या भाषेत कोंबत होती!). काहीही न बोलता आम्ही तिच्याकडे फक्त बघत बसलो होतो.
आमच्या घरात आम्ही मोठे चार आणि आमची २ वर्षांची लेक एवढी माणसं आहोत. वर दिलेल्या दोन्ही संचांतले प्रसंग घरात आलटून पालटून घडत राहतात.
मूल आहे तसं त्याला असू द्यायचं, ते जे करतंय ते त्याला त्याच्या पद्धतीनं करू द्यायचं हे तत्त्वज्ञान ऐकलं आहे; मात्र आजूबाजूला कधीच ते प्रत्यक्षात येताना बघायला मिळालेलं नाहीये. उलट मूल दिसलं की ‘दे सल्ले’, ‘कर करेक्ट!’ हेच बघितलंय आणि अनुभवलंही आहे. त्यामुळे मुलाचं किती नुकसान होतंय हे इतका काळ खरं तर लक्षातच आलं नाही. आता स्वतःचं मूल सतत समोर असतं तेव्हा हे सगळं जवळून अनुभवायला मिळतंय.
यातही एक गंमत आहे. आपण मोठे म्हणून मुलाला ‘असू’ देतोय; त्यात पुन्हा कुठेतरी ‘देणं’ आलंच! प्रत्यक्षात मूल ‘असण्याचा’ स्वीकार हवा म्हणजे त्यात ‘देणारं’ आणि ‘कुणीतरी’ राहत नाहीत.
लेक एखादी गोष्ट करत असताना जेव्हा जेव्हा आम्ही तिचं ‘असणं’ स्वीकारलंय आणि आम्ही फक्त बघत बसलोय, तेव्हा तेव्हा तो आमच्यासाठी अत्यंत आनंददायी अनुभव ठरलाय. त्यातून आम्हालाच आमची लेक नव्यानं कळत जातेय.
अर्थात, इतकं सोपं असतं का मूल आहे तसं त्याला ‘असू देणं’? सॉरी सॉरी… मला ‘त्याचं तसं असणं’ स्वीकारणं म्हणायचं होतं. एक आई म्हणून माझ्यासाठी ते नक्कीच सोपं नाहीये. एखादी गोष्ट ते आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं करत असेल, तर त्याला ती गोष्ट नीट करण्यासाठी मदत करण्यामागे वाईट हेतू कुणाचाच नसतो. ‘मुलाला त्वरित मदत करणं’ हे मुळात माझ्या डीएनए मध्येच मुरलेलं आहे, हे स्वतःचा आईपणाचा प्रवास सुरू झाल्यावर माझ्या लक्षात आलं. आणि त्यामुळे ते माझ्या असण्याचाच अविभाज्य भाग होऊन बसतं. तसं करणं ही माझी जबाबदारी आहे असंच वाटायला लागतं आणि मग माझ्याही नकळत सुरू होतो मुलाला सतत त्वरित मदत करण्याचा प्रवास!
ह्या साऱ्याचा काय परिणाम होतो?
त्यातून मूल जे शिकणार असतं ते राहूनच जातं. लेकीची चिडचिड होते ती वेगळीच. कधीकधी ती ‘मला माझं माझं करू दे’ असं आम्हाला ठणकावून सांगते. प्रत्येक गोष्ट करण्याचे तिचे कष्ट कमी करण्यात आपण काय मिळवत असतो, तर तिला मदत केलीय असं आपलं समाधान; दुसरं काहीही नाही. मात्र ह्यात तिचं तिचं ‘असणं’ हरवून जातंय.
अर्थात, मुलाचं ‘असणं’ स्वीकारणं हे प्रत्येकच गोष्टीत लागू पडत नाही; पण तो धागा या लेखात मी मुद्दाम टाळलाय कारण मूल ‘असण्याच्या’ प्रक्रियेत स्वतःच्याही नकळत आपण खूप अतिक्रमण करत असतो. हां, पण काही अपघात होणार नाही ह्याची काळजी घ्यायलाच हवी.
मुलाचं ‘असणं’ इतकं आनंददायक असतं, तर पालक म्हणून ते स्वीकारणं आपल्याला कठीण का जातं याचा खोलवर विचार केल्यावर मुलाला आपलं आपण काही करू देणं आपल्याला न जमणं हेच आपल्या डीएनए मध्ये शिरलंय हे प्रकर्षानं लक्षात आलं. मग मात्र ठरवून स्वतःच्याच धारणा तोडण्याचा, ‘अनलर्निंग’चा प्रवास सुरू केला. तो मुळीच सोपा नव्हता. एखादी गोष्ट करण्यासाठी आपलं मूल प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, आपण त्याचं काम सोपं न करता फक्त बघत बसावं… हे दर वेळी स्वतःला सांगावं लागतं. ती गोष्ट करताना माझी लेक त्यातून आनंद घेत असते आणि मी मात्र तिच्याकडे बिच्चारी होऊन बघत राहते.
ही तारेवरची कसरत आहे खरी; पण ती प्रयत्न करत असताना मी अनुभवलेला आनंद, लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिचं कधी ‘मला हे जमत नाहीये, मदत कर ना’ म्हणणं आणि तिला हवी तेवढीच (त्यापुढे नाही) मदत करून मी लगेच बाजूला होणं हे मी आता ठरवून करायला लागली आहे. पहिल्या संचांतले प्रसंग कमीतकमी घडावेत आणि दुसऱ्या संचांतल्या प्रसंगांमध्ये सहजता यावी ह्यासाठी धडपड चाललेली आहे. ही वाट निसरडी खरी; कधीकधी माझा पाय निसटतो; पण मग मी स्वतःला आठवणही करून देत असते, की ‘माझं असणं’ जसं मला हवंय तसंच ‘तिचं असणं’ तिलाही हवंय! मग मात्र एकमेकींचा ‘असण्याचा – असू देण्याचा’ प्रवास बहारीचा होतो.
प्रणाली सिसोदिया

pranali.s87@gmail.com
‘वर्धिष्णू’ संस्थेच्या सहसंस्थापक आणि पालकनीतीच्या संपादकगटाच्या सदस्य. त्यांना कुमारवयीन मुलांबरोबर काम करायला आवडते.
