नका उगारू हात आणखी…

नका उगारू हात आणखी, नका वटारू डोळे.

पोर कोवळे, पान नाजुक, छान उमलते आहे.

नकोस देऊ भार त्यावरी, दडपून जाईल सगळे

नकोस लावू वळण कोणते, अनिर्बंध वाढू दे.

धरू नको रे कधी अबोला, खोल जखम ती होते

दंगा, मस्ती, होईल चिडचिड, वाहून जाते सगळे.

नको वाढवू त्याला कुंडीत, नको करू शोभेचे

घेऊन आला निसर्ग अवघा, ठाऊक त्याला जगणे.

जरूर तेवढा आधार द्यावा, पाणी द्यावे हलके

छान पाहावे रोप वाढते, निसर्ग उमलत आहे.

                          – अनिल अवचट

आनंद निकेतनच्या सौजन्याने

नाशिकच्या आनंद निकेतन शाळेचे अरुण ठाकूर आणि अनिल अवचटांचे जिवाभावाचे मैत्र होते. अवचटांना शाळेबद्दल आणि मुलांबद्दल जिव्हाळा होता. 2010 साली शाळेच्या ‘शाळा एक मजा’ ह्या पुस्तकाचे काम सुरू असताना अवचटांची नाशिकफेरी झाली. त्या वेळी त्यांनी दिलेली ही कविता…

अवचट गेले.

जवळजवळ लहानपणापासून ओळखीच्या असलेल्या त्यांच्या लिखाणाबद्दल, छंदांबद्दल आणि कामाबद्दल आता अनेक माध्यमांवर आपल्याला वाचायला मिळेल. त्यांनी जोडलेली असंख्य माणसे आणि सांगितलेल्या अनंत स्टोर्‍या तर आठवत राहतीलच, ‘कार्यरत’, ‘धार्मिक’पासून ‘रक्ताभिसरण संस्था’पर्यंत. शिवाय त्यांनी त्यांच्या पद्धतीने सहजपणे शिकवलेल्या गोष्टीही मनात जागा करून राहतील. नाही… दही लावणे किंवा ओरिगामीतला मोर यांच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी मला आठवत आहेत.

माझ्यासारख्या साध्यासुध्या माणसांना त्यांनी एक छान आनंदाची वाट दाखवली. आपण सामान्य असलो, आपल्याला अनेक गोष्टीत थोडाथोडा रस असला, तो सारखा बदलत असला, त्यातले काहीही फार उच्च पातळीवर जाणार नाही हे आपल्याला माहीत असले तरीही… तरीही ठीक आहे! त्या त्या वेळी त्या त्या गोष्टीतला आनंद मनापासून घ्यावा. तो आनंद बाकी काही माणसांनाही आपोआप मिळतो. छोट्या छोट्या गोष्टीत जे काही करण्यासारखे आपल्याला दिसत असते, ते करत राहावे. ते बिनमहत्त्वाचे नसते. त्यातून घडणारे बारीकसे बदल आपल्याबरोबर राहतात. हे सगळे त्यांनी कुठलाही उपदेश न करता पोचवले. आपल्या आयुष्यातले आपल्या माणसांचे आणि आपल्या भावनांचे स्थान तर ओळखायचे असतेच, तसे स्पष्ट म्हणायचेही असते, असे त्यांनी दाखवून दिले.

मोठे लेखक, मोठे कलाकार, नावाजलेले पत्रकार, अत्यंत व्यस्त आयुष्य असूनही माझ्यासारख्या ओरीगामीतल्या चार गोष्टी शिकायला येऊ इच्छिणार्‍या कुणालातरी ते सहज घरी बोलावून पटकन शिकवायचे. ठरलेले रुटीन, बसलेली घडी, असल्या गोष्टींच्या आधी ते अनोळखी माणसांनाही जागा देत. कुठलाही अभिनिवेश नसणे हे कसे ग्रेसफुल असते, ते त्यांना भेटून मला कळले होते. शांतपणे एखादी गोष्ट लावून धरता येते, आणि आरडाओरडा न करताच त्याचे काम कसे होऊ शकते ते त्यांच्याकडून शिकावे.

पालकनीती परिवारातर्फे अनिल अवचट यांना भावपूर्ण आदरांजली.

नीलिमा सहस्रबुद्धे