नाट्यकला – जगणे समृद्ध करणारा प्रवास

‘‘उपजीविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला तुम्ही का जगायचे हे सांगून जाईल’’ – पु. ल. देशपांडे

पु.लं.नी कला आणि आयुष्य याबद्दल सांगितलेले हे गूज गेली अनेक वर्षे मी स्वत। अनुभवतोय आणि ते तनयापर्यंत, म्हणजे माझ्या मुलीपर्यंत, पोचवू शकलो याचे, एक पालक म्हणून, मला समाधान आहे. तनया गेली सात-आठ वर्षे(इयत्ता तिसरीपासून) प्रा. देवदत्त पाठक यांच्या ‘गुरुस्कूल’च्या माध्यमातून गुरु-शिष्य परंपरेशी जोडलेली असून ‘रंगभूमी’ (नाटक) हा आता तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे.आपल्या मुलाचे आयुष्य घडवण्यात ‘कला’ किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते याचा प्रत्यय तिच्या या प्रवासातील एक सह-प्रवासी म्हणून मागे वळून बघताना मला नेहमी येतो.अर्थात, हा प्रवास एवढा सरळ-सोपा नव्हता आणि पुढेही नसणार आहे याचीही पालक म्हणून पाठोपाठ जाणीव होत राहते.

विभक्त कुटुंबांचे वाढते प्रमाण, त्याचा प्रामुख्याने मुलांवर होणारा परिणाम, मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी होत चाललेला संवाद, पैसे कमावण्यासाठी करावी लागणारी जीवघेणी धावपळ, बदलत्या राहणीमानाचा कुटुंबाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर होणारा विपरीत परिणाम अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत आपण जगत आहोत. या सगळ्यात भरडली जातात ती मुले. टोकाच्या जीवघेण्या स्पर्धेच्या जगात पालकांच्या अपेक्षांचा बोजा डोययावर घेऊन, स्वत।ला सिद्ध करण्यात मुलांचे आयुष्य खर्ची पडते आहे.एकूणच, आपणच जन्माला घातलेल्या या जीवांना जगात जगण्यासाठीचे ‘उत्तम मशीन’ बनवण्याच्या कल्पनेमागे आपण सुसाट पळत आहोत, याचे भान आपल्याला; सर्व पालकांना, कधी येणार? असे प्रश्न मांडून एकमेकांवर चिखलफेक करण्याचा किंवा भाषण देण्याचा माझा अजिबात हेतू नाहीये; पण पालक म्हणून आपण मुलांपर्यंत पोचत आहोत का हे मात्र स्वत।च वरचेवर तपासायला हवे. असो.

यात भर म्हणजे सध्या एक नवीन ‘फॅड’ बघायला मिळते आहे.‘माझ्या मुलाला कुठली तरी कला यायला हवी’, असे ही प्रत्येक पालकाला वाटते.मग अभ्यासाच्या ओझ्याबरोबरच कलेचेही ओझे मुलांवर टाकले जाते.‘रिअ‍ॅलिटी शोज’ ही त्याचीच भयाण आवृत्ती.या मायाजालात आम्हीसुद्धा एक पालक म्हणून अडकलो असतो; पण कला ही आयुष्यात आनंद, समाधान आणि जगण्यासाठी उर्मी देणारी गोष्ट आहे याचे आम्ही सतत भान ठेवले.आणि जिथे कुठे आमचे भान हरवतेय असे वाटेल तिथे पाठकसरांनी आम्हाला जागेवर ठेवले.

प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठल्या न कुठल्या कलेचा अंश असतो यावर माझा विडास आहे.तो अंश शोधणे, रुजवणे आणि फुलवणे हे आपण नक्कीच करू शकतो.मात्र मुलांच्या बाबतीत इथे आपली गफलत होते. ‘त्याला/तिला काय कळतेय चांगले-वाईट’ असे म्हणत, आपल्याला सोयीस्कर असलेल्या, कलेच्या यलासला पाठवणे किंवा एकदम दुसरे टोक म्हणजे ‘तुला हवे ते कर; फक्त आमच्या मागे भुणभुण लावू नकोस’ असे म्हणून स्वत।ची सुटका करून घेणे एवढेच पर्याय आहेत अशी आपली समजूत असते. हवा तेवढा पैसा मुलांपुढे टाकला की आपली जबाबदारी संपली, ही मानसिकता आधी बदलायला हवी. माझ्या मते, मुलांना आपली कला निवडण्यासाठी पालकांना खरेच मनापासून मदत करायची असेल, तर त्यांना निवडीचे स्वातंत्र्य द्यायला हवे, त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा, त्यांना ने-आण करण्यासासाठी वेळ काढायला हवा आणि त्यांचा आत्मविडास कमी पडतोय असे जिथे जाणवेल तिथे ‘आम्ही आहोत तुझ्याबरोबर’ हे मुलांना सांगत राहायला हवे. नाटक उभे करण्यासाठी पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे, त्याचीसुद्धा व्यवस्था आपल्याला करावी लागते. स्वानुभवावरून मी असे म्हणेन, की आपल्या मुलाला चांगले नाटक करता आले पाहिजे, म्हणजे मुख्यत्वे अभिनय, अशा संकुचित विचाराने कुणी नाटकाकडे किंवा कोणत्याही कलेकडे बघत असेल, तर ते योग्य होणार नाही.

मुलांमध्ये कला रुजवायची असेल तर सुरुवातीला त्यांचे सह-प्रवासी म्हणून बरोबर राहायची जबाबदारी पालकांनी घ्यायला हवी.मुलांना त्यांच्या आवडी-निवडीची जाणीव होईपर्यंत त्यांना फक्त सोबत करावी.आम्ही तनयाला अशी सोबत करायचा प्रयत्न केला.वेगवेगळ्या कलांची तोंडओळख व्हावी म्हणून सुरुवातीला आम्ही तिला सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना घेऊन गेलो.त्यातून तिने नाटक स्वीकारले.इतर कलांपेक्षा नाटकाची एक खासियत आहे.या कलेमध्ये इतर कलांचा, म्हणजे नृत्य, गायन, वाद्यवादन, संगीत, साहित्य इत्यादींचा समावेश असतो.त्यामुळे नाटकाच्या साथीने तनयाला इतर कलांचीही तोंडओळख झाली. नाट्यप्रशिक्षणादरम्यान घेण्यात येत असलेल्या खेळांमधून (वीराींळली शुलशीलळीश) मुलांना नुसते नाटकाबद्दलच शिकायला मिळते असे नाही, तर एकूणच आपल्या व्यक्तिमत्त्वाचे निरनिराळे पैलू समजायला, त्यावर काम करायला मदत होते. आपले बोलणे, चालणे, हावभाव आणि एकूणच शारीरभाषा सुधारायला मदत होते.पण सर्वात महत्त्वाचा बदल होतो मानसिक, बौद्धिक आणि भावनिक पातळीवर.उदा.‘ट्रस्ट गेम’, यामध्ये 4-5 मुलांना गोलामध्ये जवळजवळ उभे केले जाते आणि मधोमध एकाला उभे केले जाते.अशी रचना झाल्यावर त्या मुला/मुलीने डोळे बंद करून स्वत।ला गोलातल्या सहकार्‍यांवर झोकून द्यायचे आणि त्यांनी त्याला न पडू देता झेलत राहायचे.आपण एकमेकांवर किती विडास टाकू शकतो किंवा आपल्यावर टाकलेला विडास सार्थ करण्यासाठी आपण किती सक्षम होतो, हे यातून समजते. असे शंभरेक खेळ आहेत, ज्यांमधून मुलांची स्मरणशक्ती, शुद्ध मराठी वाचन, लेखन (ज्याची सध्या खूपच बोंब आहे), स्वतंत्र विचार करण्याची आणि आपले मत मांडण्याची शक्ती, सद्सद्विवेकबुद्धी, सर्जनशीलता असे अनेक गुण विकसित होऊ शकतात.

माझ्या मते, नाटकामधून आपल्याला आयुष्य जगण्यासाठी लागणारी मूल्ये मिळतात. एखादी गोष्ट सातत्याने, सलग, नियमितपणे करण्याची मुलांना सवय लागते; सध्याच्या जमान्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये धरसोड प्रवृत्ती वाढत चालल्यामुळे, ही गोष्ट खूप दुर्मीळ झाली आहे. नाटकामध्ये रोज कमीतकमी तीन-चार तास सलग तालमी करायला लागल्याने कष्ट करायची आपोआप सवय लागते.दुसरे म्हणजे, नाटकामुळे, पडेल ते काम करण्याची सवय लागते.कारण तिथे नाटक उभे करणे ही एक प्रक्रिया असते.त्यामध्ये संहिता लिहिण्यापासून ते तिकीट विक्रीपर्यंत सगळ्या गोष्टींचा अनुभव मुलांना देता येतो.आणखीन सांगायचे तर अभिनय, नेपथ्य (सेट लावणे), रंगभूषा (मेकअप), वेशभूषा (ड्रेपरी), संगीत, प्रकाशयोजना (लाईट्स) अशा अनेक गोष्टींवर एकावेळी काम करावे लागते.हे सगळे ‘टीमवर्क’ म्हणूनच चांगले होते.त्यामुळे मुलांना गटात काम करायला शिकवायचे असेल, तर कला हे एक चांगले माध्यम आहे.मात्र एक-दोन महिन्यांसाठी, वेळ जात नाही म्हणून लावलेल्या नाटकाच्या उन्हाळी शिबिरांतून हे साध्य होऊ शकणार नाही. दुसरे म्हणजे, ‘आम्ही पैसे भरले आहेत, तेव्हा माझ्याच मुलाला ‘मेन रोल’ मिळायला हवा’, ‘सतरंज्या उचलणे, सगळ्या टीमला चहा वाटणे, सेट लावणे अशी कामे माझे मूल करणार नाही’, अशीही पालकांची भूमिका असते. खरे म्हणजे ह्या गोष्टीही महत्त्वाच्या असतात; पण आम्हा पालकांना ‘खालच्या दर्जा’ची वाटणारी अशी कामे आपल्या मुलांनी करायला नको असतात. एवढा पैसा देऊनही अशी ‘फालतू’ कामे माझ्या मुलाने का करावी यावर ते अनेकदा वाद घालताना दिसतात. ही मानसिकता पालकांनी बदलायला हवी, तरच ती मुलांमध्ये डोकावणार नाही.

शेवटचे म्हणजे, नाटकाकडे व्यावसायिक पद्धतीने न बघता, जगण्याचा प्रवास अधिक समृध्द करण्यासाठीचे एक साधन म्हणून बघावे आणि माझ्या मते, ही दृष्टी पालकांपेक्षा एक गुरूच देऊ शकतो. म्हणून मुलांच्या आयुष्यात ‘गुरू’सारखी दुसरी अशी व्यक्ती (मूर्तीरूपी गुरू नाही) असावी असे मला प्रामाणिकपणे वाटते.आयुष्याला समर्थपणे सामोरे जायचे बळ मुलांना देईल, असा गुरू आपल्याला कलेच्या माध्यमातून मिळू शकतो हे मला मुलीच्या निमित्ताने बघायला मिळाले.माझी मुलगी गुरू-शिष्य परंपरेचा वारसा चालवीत असलेल्या गुरुस्कूलमध्ये रंगभूमीची सेवा करीत आहे याचा मला अभिमान वाटतो.

Dr. Nitin Jadhav

डॉ. नीतिन जाधव | docnitinjadhav@gmail.com

लेखक आरोग्यहक्कांवर काम करणार्‍या ‘साथी’ ह्या संस्थेत कार्यरत असून ‘गुरुस्कूल’ ह्या नाट्यसंस्थेशी जोडलेले आहेत.