ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचले. ह्या सदरातला हा शेवटचा लेख.
आत्तापर्यंत आपण बेकीचे १० सिद्धांत वाचले. मुलाच्या एखाद्या वेगळ्या वागणुकीबद्दल पहिल्याप्रथम कुतूहलाची भावना आपल्या मनात निर्माण होणं का महत्त्वाचं आहे, इथून आपण सुरुवात केली. ‘तू मला ओरडायला लावतोस’ असं म्हणणं का चुकीचं आहे, हा पालकांचा जरासा नावडता सिद्धांत आपण फेब्रुवारीत वाचला. मुलाच्या चित्राचं ‘वा! किती छान!’ असं कौतुक करणं ठीकच, पण ह्याहून जरा तपशीलवार गप्पा करण्यातून मुलांच्या कुठल्या क्षमता विकसित होतात हे मार्चमध्ये समजून घेतलं. आपल्या मुलांच्या मनात भावंडांबद्दल फक्त चांगल्या गोष्टी असाव्यात असं बेकींना का नाही वाटत हे एप्रिलमध्ये पाहिलं. लर्निंग स्पेसमध्ये असताना मुलाला ‘लाज’ वाटू न देणं किती महत्त्वाचं आहे हा मे महिन्याचा विषय होता. ‘काहीच न करता आनंद मिळतो’ हे सर्किट बालपणीच पक्कं होऊ देण्यातून मोठेपणी कशा प्रकारचा माणूस निर्माण होऊ शकतो ते जूनमध्ये वाचलं. “
‘बाबा हवा, आई नको!’ ह्या प्रसंगाला आईनं कसं सामोरं जावं हे जुलैमध्ये पाहिलं. मुलांचे तमाशे/थयथयाट सुरू असताना आपलं नेमकं काम काय, हे ऑगस्टमध्ये पाहिलं. दुःखद प्रसंगी, आई-बाबा रडत असतील, अशा प्रसंगी मुलांना नेमकं काय सांगावं हे आपण सप्टेंबरमध्ये पाहिलं. जोडअंकात आपण निराशा ही एक अतिशय उत्तम भावना का आहे, त्यातून मुलाला त्वरित बाहेर काढणं आपलं काम का नाही, मुलांना आनंदी ठेवणं आपलं काम का नाही, हे समजून घेतलं.
असे अजून अनेक अतिशय उपयुक्त सिद्धांत बेकींनी मांडले आहेत. पण आता ह्या अंकात मालिकेचा शेवट आला असल्यानं बेकींचं सर्वात महत्त्वाचं धोरण पाहून थांबूया. ते आहे ‘रिपेअर’. म्हणजे दुरुस्ती. आई/वडील कधीतरी वाईट वागले आणि ते तुमच्या मनात घर करून राहिलं, असं झालंय का तुमच्याबाबत? आई/वडील नसतील वागले वाईट, तर मग कोणी जवळचं – भावंडं, मावशी, शिक्षक, मित्र, वगैरे? तेही नसतील, तर मग एखादा तिऱ्हाईत माणूस वाईट वागला आणि ते मनाला लागून राहिलं, असा एखादा प्रसंग आठवा. आता कल्पना करा, की त्या व्यक्तीनं आज फोन करून तुमची मनापासून माफी मागितली, स्वतःच्या वागण्याची जबाबदारी घेतली; खरं म्हणजे कसं वागायला हवं होतं तेही सांगितलं. कसं वाटेल तुम्हाला? थोडंतरी गार वाटेल ना आतून? ती व्यक्ती अगदी जवळची असेल तर जास्तच बरं वाटेल, बरोबर? कितीही जुनी जखम असली, तरी ती थोडीतरी भरल्यासारखी वाटेल ना? ह्यालाच बेकी ‘रिपेअर’ म्हणतात. आई/वडील/इतरांच्या माफी मागण्यानं आपल्याला बरं वाटणार असेल, तर आपण घातलेल्या गोंधळांबद्दल आपण आपल्या मुलांची माफी मागू तेव्हा त्यांनाही बरंच वाटेल ना! ‘मी उगाच ओरडलो!’, ‘मी असं नको होतं करायला!’, ‘चुकलं माझं खूप! वाईट वाटतंय!’ असं म्हणणारे पालक भेटले की बेकी म्हणतात, “शाब्बास! रिपेअरची पहिली पायरी यशस्वीरित्या सर केलीत तुम्ही! आधी गडबड केल्याशिवाय नंतर सॉरी कसं म्हणणार! चला आता तुमचं मुलासोबतचं नातं रिपेअरद्वारे अधिक घट्ट करूया!”
कितीका उशीर झालेला असेना; मनापासून माफी मागणं, केलेल्याची जबाबदारी घेणं, आपल्या उणिवा मान्य करून सुधारणेचा प्रामाणिक प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं वाटतं बेकींना.
करूया मग फोन?
रुबी रमा प्रवीण

ruby.rp@gmail.com
पालकनीती संपादकगटाच्या सदस्य.
(सदर समाप्त)
