भय इथले संपत नाही…

वर्तमानपत्र हे सहसा समाजमनाचं  प्रतिबिंब असतं. बातम्या, संपादकीय, अभिप्राय, पुरवण्या, आणि घडामोडी असा  जो मजकूर दररोजच्या  वर्तमानपत्रांमध्ये छापून येतो, त्यातून  वाचकांच्या आणि पर्यायानं समाजाच्या आवडीनिवडी आणि प्राधान्यविषयांचं त्यात संपूर्ण नाही तरी काही प्रमाणात दर्शन घडतं.

परवाच दिल्लीहून परत येताना मी एक बातमी वाचली – एका सोळा वर्षांच्या मुलानं रागाच्या भरात आपल्या आई व  बहिणीला ठार मारलं! रिपोर्टरच्या मते, या मुलाची आई त्याला ओरडली, कशासाठी तर व्यवस्थित टेबलाशी बसून अभ्यास करण्याऐवजी तो सोफ्यावर बसून अभ्यास करत होता. एवढंच निमित्त होऊन त्या मुलाला  संताप अनावर झाला आणि त्यानं हे दोन्ही खून केले.  माझा यावर विश्वासच बसेना.

त्याहूनही अधिक आश्चर्य मला त्या मुलाच्या वडिलांची प्रतिक्रिया वाचून वाटलं.  घरात हे घडलं तेव्हा ते कामासाठी घराबाहेर होते. त्यांना कळल्यावर ते म्हणाले,  “मी माझ्या बायको आणि मुलीला तर गमावलं आहे. आता मला फक्त माझ्या मुलासाठी जगायचं आहे. तो बरा होण्यासाठी, स्थिरावण्यासाठी एक वडील म्हणून मी पूर्ण प्रयत्न करीन.”

आपल्या अल्पवयीन मुलानं असं का केलं असावं याबद्दल विचार करताना ते वडील म्हणाले, ” माझा मुलगा अगदी स्कॉलर नव्हता, पण अभ्यासात चांगला होता. त्याला शिस्त लावण्यासाठी माझी बायको त्याला ओरडायची. पण त्याने आजवर कधी त्याबद्दल माझ्याकडे तक्रार केलेली नव्हती किंवा तो कधी रागावलाही नव्हता. त्याचं आईवर फार प्रेम होतं.”

ही बातमी वाचून मला वाटलं की आपण बाप-मुलाच्या त्या जोडीला जाऊन भेटावं. कसल्या भयंकर विचित्र परिस्थितीत सापडलाय हा बाप! अश्यावेळी माणसानं करावं तरी काय आणि कसं ? त्याच्या मनाचा काय आणि कसा कोंडमारा होत असेल असा विचार मनात आला आणि मला वाटलं आपण ह्या सगळ्यात या बापाला काही मदत करायला म्हणून तरी असावं.  अखिल पृथ्वीतलावर  या माणसाच्या वाट्याला आलेल्या पालकत्वापेक्षा अजून कठीण काही असेल का , या विचारांनी मला ग्रासलं.

पालकत्व ही बाब मुळातच एवढी अशक्य कठीण आणि संघर्षमय आहे का? की  आजकालच्या  अधिकाधिक किचकट होत चालेल्या जगात पालकत्व कठीण होऊन बसलं आहे?

नॉर्वेत मुलांना जोराने ओरडल्याबद्दल एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली.  ही बातमी मी वाचली पण ती  माझ्या पचनी काही पडेना! पोलीस, कायदा, किंवा कोणाही बाहेरच्या व्यक्तीला पालक आणि मुलांच्या नात्यासारख्या अत्यंत जवळिकीच्या स्वाभाविक नात्यात ढवळाढवळ करण्याचा खरं तर काय अधिकार आहे, असं मला वाटलं.  पण पालकांनी ओरडल्यामुळे, किंवा अवास्तव दबाव टाकल्यामुळे जर मुलांमध्ये नैराश्य व  गुन्हे करण्याच्या  प्रवृत्ती जर अश्याच वाढत राहिल्या, तर आपल्या देशातही असे कायदे करावे लागतील कदाचित.

काहीच दिवसात  मी अजून एक बातमी वाचली  – ९व्या इयत्तेतल्या एका मुलानं  काहीशा अशाच कारणानं  आत्महत्या केली.  “मोबाईलवर सारखे गेम्स काय खेळत असतोस,” असं म्हणून आईवडील त्याला ओरडले होते, गेम्ससारख्या क्षुल्लक गोष्टीचं रूपांतर आत्महत्या किंवा  खुनासारख्या भयंकर गुन्ह्यांत होऊ  शकतं ही एक चिंताजनक बाब तर आता आपण बघत आहोतच. या गोष्टी आपल्याला क्षुल्लक वाटतात खरं, पण त्या फक्त निमित्तमात्र असतात.  त्यामागे मुलांना सहन करायला लागणारे अक्षरश: अनंत तणाव दडलेले असतात.  दबाव, एकटेपणा, शोक, स्वातंत्र्याचा अभाव, कुणाचीतरी दादागिरी सहन करावी लागणं, छळवणूक, स्पर्धा, नकार, सातत्यानं केली जाणारी तुलना, योग्य – अयोग्य  गोष्टींचे शिक्के बसणं अशी अनेको कारणं असतात; आणि पालकांना बरेचदा ती माहीतही नसतात. या कारणांच्या खोलात जाण्याची गरज आहे. मुलांना मोकळेपणानं  त्यांच्या भावनांबद्दल बोलता येईल असं वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे. त्यांचे विचार ऐकणं, ते समजून घेणं आणि त्यांच्याशी जजमेंटल न होता चर्चा करणं गरजेचं आहे.

मुलांच्या अंतर्मनाचा थांग लावायचा प्रयत्न करणं आपल्याला शक्य आहे  ना? त्याआधी आपल्या धावपळीच्या आयुष्यात थोडंसं थांबून आपल्या स्वतःच्या अंतर्मनाचा थांग लावणं तरी शक्य आहे ना ?

तसं करण्यानं प्रश्न सुटतील की नाही ते मला माहीत नाही, पण तरीही आपण प्रयत्न करत राहायला पाहिजेत,  असं मला वाटतं.

मुलांच्या हिंसक वागणुकीमागचा आणखी एक पैलू फोर्टीस हेल्थकेअरच्या मानसआरोग्य आणि वर्तनशास्त्राचे प्रमुख यांनी मांडला आहे. ते म्हणतात की किशोरवयीन  मुलांच्या अश्या वागण्याला कोणतंही एकच कारण नसतं. आजकालचा समाज सर्वांना आक्रमक बनायला प्रवृत्त करतोय. क्रिकेट आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये जे स्लेजिंग चालतं, त्या स्लेजिंगला, किंवा इंटरनेट वरच्या ट्रोलिंगला सगळीकडे उत्तेजनच दिलं जातं. टीवी वर चालणारे परिसंवाद आणि रियालिटी शो मधले वादविवाद पहा, किंवा अगदी साधे खेळ जरी पाहिलेत तरी त्यातल्या युद्धासारख्या आक्रमकतेनं  आणि हिंसेनं आपल्या मुलांना पूर्णपणे वेढलंय.  रायन स्कूल मध्ये मागे एक घटना घडली होती, इयत्ता ९वीतल्या एका मुलानं दुसरीतल्या मुलाचा गळा चिरला होता.  त्यामागचं कारण होतं, शाळेत घडलेल्या अशा भयंकर घटनेमुळे येणारी परीक्षा आणि पालक-शिक्षक संघटनेची मीटिंग पुढे ढकलली जावी असं ! याच प्रकारे लखनौच्या ब्राइटलँड स्कूल मधील ६व्या इयत्तेतील मुलीनं शाळेला सुट्टी मिळावी म्हणून पहिल्या इयत्तेच्या मुलाला चाकूनं भोसकलं . त्यानंतर एके दिवशी मला पेपर मध्ये “शैतान  – ए क्रिमिनल माईंड: आज रात्रौ १० वा. ” असं छापलेली पूर्णपानी जाहिरात दिसली, तेव्हा मला कळेचना की प्रसारमाध्यम हे समाजाचा आरसा आहे, की समाजाचं दिशायंत्र?

मनातल्या मनात आपल्यापैकी बरेच जणांनी अनेक अपराध केले असतील, भांडण झाल्यावर थोडा वेळ प्रतिस्पर्ध्याचं वाईटही चिंतलं असेल,  पण खरोखरच त्यांचं काही बरंवाईट करण्याचा विचारसुद्धा आपल्याला शिवत नाही. तर मग आपले हिंसक विचार कृतीमध्ये आणण्याचं धाडस या मुलांना झालंच कसं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मुलांशी त्यांच्या विचारांबद्दल, भावनांबद्दल बोललंच पाहिजे. त्यासाठी आपल्याशी बोलावंसं वाटावं अशी जवळीक मुलांना आपल्याबद्दल वाटली पाहिजे.

ह्या शेवटच्या रायन आणि ब्राइटलँड स्कूल्स मधल्या दोन्ही घटनांमध्ये तर सूडाचाही काही भाग नव्हता. ज्या लहान मुलांवर हल्ले झाले, त्यांनी हल्ला करणाऱ्या मुलांचा काही गुन्हा केलेला नव्हता.  क्षुल्लक फायद्यासाठी पूर्णपणे निरपराध मुलांवर प्राणघातक हल्ला करण्याचं बळ त्या मुलांमध्ये आलं तरी कसं? दुसऱ्यांच्या  दुःखाबद्दल,  वेदनांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील असणारी,  स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचं नुकसान  करणं ‘नॉर्मल’ आहे असा विचार करणारी पिढी आपण निर्माण करतोय का?

NCRB  ( राष्ट्रीय अपराध नोंदणी कार्यालय) ने केलेल्या पाहणीप्रमाणे २०१४ मध्ये अल्पवयीन मुलांनी आपल्या देशात ८४१ खून आणि १९८९ बलात्कार केले आहेत. तसेच विविध गुन्ह्यांच्या आरोपात भारतभरात ४८,२३० अल्पवयीन मुलांना अटक झालीय. या अल्पवयीन गुन्ह्यांचं प्रमाण दर वर्षी वाढतंच आहे. हे अल्पवयीन गुन्हे हे सामाजिक बदलांमुळे आणि अपुऱ्या पालकत्वामुळे वाढत आहेत, की वाढत्या लोकसंख्येमुळे दिशाहीन वाढणाऱ्या किशोरवयीनांची त्यात सगळी चूक आहे? अल्पवयीनांच्या  गुन्हेगारीचा अभ्यास करणाऱ्या संशोधनात असं आढळून येतं की  कौटुंबिक परिस्थिती आणि पालकांचा प्रभाव ही  त्यामागची प्रमुख कारणं आहेत. संशोधक म्हणतात की बाकी घटक, उदाहरणार्थ सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचा परिणाम, मित्रमंडळींचा प्रभाव, मादक पदार्थांची व्यसनं, आणि वाढता व्यक्तिवाद, इत्यादी दुष्परिणामांच्या जखमा चांगले पालकत्व आणि उमद्या कौटुंबिक आधारानं भरल्या जाऊ शकतात.

नुकताच मी एक सुंदर लेख वाचला. आजच्या जगाबद्दलची माझी समजूत बदलून टाकणारा असा तो लेख  होता. आतापर्यंत आपण ज्या समस्यांबद्दल बोललो त्या समस्यांकडे बघण्याचा पूर्णपणे वेगळा  दृष्टिकोण  तो लेख दाखवतो. त्या लेखाचा काही भाग इथे समाविष्ट करत आहे. तुम्हाला आवडला, तर मूळ लेख नक्की वाचून पहा.

——————————————————————————————————————————–

ओडावा जमातीचे नेते आणि शिक्षक विल्फ्रेड पेल्टियर सांगतात की शिक्षण – सर्व मानवी नात्यांसारखंच – हस्तक्षेप-विमुक्त असावं. दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता स्वतःचे निर्णय स्वतःच्या पसंतीनं घेण्याचा हक्क सर्वांना असावा. तसंच निष्णाबेग जमातीच्या विद्वान आणि लेखिका लिअँन बेटासमोसाके सिम्प्सन म्हणतात की शिक्षण – सर्व मानवी नात्यांसारखंच संमतीच्या नैतिक तत्त्वावर आधारित असावं. हिंसा आणि जबरदस्तीपासून ते मुक्त असावं. सिम्प्सन पुढे म्हणतात, “ शिक्षणामध्ये काहींची मुजोर मनमानी आणि बळजोरी चालते असं मुलांना दिसलं तर परस्परसंमती शिवाय कृती करणं योग्य असतं असा त्याचा अर्थही ते घेतील, आणि निष्णाबेग जमातीच्या नीतीकल्पनेत हे बसतच नाही.

लक्षणीय बाब जगभरचे उत्तमोत्तम कलाकार आणि वैज्ञानिक सुद्धा हेच म्हणतात की खुलं मन, स्वातंत्र्य, कुतूहल, मुक्त विचार , सहयोग, आणि संमती यांतूनच आपल्याला ज्ञान, शोध आणि आविष्कारापर्यंत पोचता येतं. प्रत्यक्षात मात्र काय घडतं?

आपण एका सुधारलेल्या, बहु-सांस्कृतिक समाजात राहतो असा आपला समज आहे. मुलं आपल्या मनाप्रमाणे वागतात, ते चूक की बरोबर असतं याची तमा बाळगत नाहीत, हे आता कुणाला मुद्दाम सांगावंही लागत नाही. आपल्या शाळा मात्र मुलांच्या स्वतंत्र मनाला लगाम घालायचा बघतात. सदैव शिस्त, बंधनं, आणि शिक्षेची भीती  नसली तर मुलं बिघडतील,  नीट शिकणार नाहीत, वाया जातील,  स्वतःची आणि इतरांचीही हानी करतील आणि शेवटी एक कर्तृत्वहीन, असहाय्य व्यक्ती बनून जगतील अशी कल्पना त्यांच्या मनात ठसलेली असते.

(…)  अस्वलं रानटी असतात, पाळीव नाही, वाट फुटेल तिथे, हजारो एकरांच्या जंगलांमध्ये फिरायची त्यांना सवय. एखाद्या अस्वलाला जर पिंजऱ्यात ठेवलं, तर ते सतत फेऱ्या घालत राहातं – या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून या टोकापर्यंत. जोवर त्याचे खूर रक्तबंबाळ होत नाहीत तोवर. रक्तबंबाळ खूर त्या विस्तृत मोकळ्या जगाची, माश्यांनी भरलेल्या झेपावणाऱ्या नद्यांची, दगडांखालच्या मऊ जमिनीखाली वळवळणाऱ्या किड्यांची, मैलोन्मैल पसरणाऱ्या करवंदांच्या घमघमाटाची गोष्ट सांगतात.

काही प्राणी पिंजऱ्यांमध्ये जगू शकतात. खारी, उंदीर, कबुतरं आणि काही पक्षी कोणत्याही स्थितीत आणि परिस्थितीत जगू आणि वाढू शकतात. आमच्या वन्यजीवन केंद्रात आम्ही शुश्रूषा करत असलेली खारीची पिल्लं आपल्या इवल्याइवल्या पंजांमध्ये प्लास्टिकची सिरिंज घट्ट धरून दूध पितात – तगण्याची एक विलक्षण जिद्द असते त्यांच्यात. पण इतर वन्य प्राणी नाही जुळवून घेऊन शकत बंदिस्त वातावरणाशी. ते भेदरतात. त्यांची क्षमताच  खुंटते.  ती पाय फुटेपर्यंत चालतात, अन्न पचवू शकत नाहीत,स्वतःची कातडी, पिसंसुद्धा त्यांना बोचू लागतात;  ती उपटून टाकायचा ते प्रयत्न करतात. अतिशय आक्रमक तरी बनतात किंवा घाबरट तरी;  किंवा आजारी पडून मरून जातात.

आपली काही मुलं ही कबुतरं आणि खारींसारखी असतात, आणि काही अस्वलांसारखी. त्यांच्या भोवतीच्या संस्थात्मक भिंतीशी काही मुलं जुळवून घेऊ शकतात आणि काही त्या भिंतींपल्याड जाण्याच्या नादात स्वत:ला रक्तबंबाळ करून घेतात.

नीट कान देऊन ऐकलं तर हे त्यांचं रक्तबंबाळ होणं आपल्याला अनेक गोष्टी सांगून जात. एड्रॉलच्या नशेतला मुलगा आपल्याला त्याच्या झपाझप चढता येणाऱ्या उंच झाडांनी भरलेल्या जंगलाची, पोहता आणि डुंबता येणाऱ्या नद्यांची, वाऱ्याच्या वेगात धावत सुटावा अश्या कुरणांची कथा सांगतो. खाणंपिणं बंद करून आपली भूक मारणारी ‘अनोरेक्सिक ‘ मुलगी आपल्याला एका कुटुंबाची आणि समाजाची गोष्ट सांगते.  तिथे मुलांना ती आपली आहेत म्हणून सामावून घेतलं जातं;  त्यांना चांगले मार्क मिळतात किंवा ती सडसडीत आणि देखणी आहेत म्हणून नव्हे! बंडखोर म्हणून गणली गेलेली आणि स्वतःच्या नाशास सिद्ध झालेली मुलं आपल्याला सांगतात, स्वातंत्र्याची कहाणी… हुकूमशाहीपासून, बक्षिसं आणि शिक्षांपासून, अविरत पहार्‍यांपासून आणि मूल्यमापनांपासून. नशा करणारी मुलं आपल्याला एक दंतकथा सांगतात. ती दंतकथा असते, वात्सल्याची, आपुलकीची,उत्साहाची आणि शांततेची;  त्यांना त्याच्या धकाधकीच्या स्पर्धात्मक बालजीवनात कधीच अनुभवायला  न मिळालेल्या सगळ्यासगळ्याची.

आपली काही मुलं ही कबुतरं आणि खारींसारखी असतात, आणि काही अस्वलांसारखी. त्यांच्या भोवतीच्या संस्थात्मक भिंतीशी काही मुलं जुळवून घेतात आणि काही त्या भिंतींपल्याड जाण्याच्या नादात आपली पावलं रक्तबंबाळ करून घेतात.

ड्रग्सच्या व्यसनाचं  मॉडेल गेल्या अनेक दशकांपासून प्रयोगशाळेतल्या उंदरांवर केलेल्या संशोधनावर आधारीत आहे. त्या उंदरांना एक बटण दिलं जात असे. ते दाबून हेरॉइन अथवा कोकेनमिश्रित पाणी त्यांना मिळे. उंदीर पुन्हापुन्हा बटण दाबत. त्यातल्या मादक द्रव्यांमुळे काही वेळानं त्यांचा मृत्यू होई. यावरून संशोधकांना वाटलं की त्या मादक द्रव्यांचं उंदरांना व्यसन लागतं आहे. पण काही वर्षांनी मानसतज्ञ ब्रूस अलेक्सान्डर यांनी दाखवलं की अशाप्रकारे स्वतःचा मृत्यू घडवून आणणारे उंदीर आधीपासूनच अनैसर्गिक आणि एकलकोंड्या जगात, पिंजर्‍यात राहत होते. तिथे त्यांना जगण्याजोगं असं करायला काहीच नव्हतं. तिथे ड्रग्स वापरून स्वतःला उत्तेजित ठेवण्याशिवाय त्यांना दुसरा कुठालाही पर्याय नव्हता. उंदरांना जेव्हा वेगळ्या, अधिक नैसर्गिक, अधिक वैविध्यपूर्ण वातावरणांत ठेवलं गेलं, तेव्हा त्यांचा ड्रग्सचा वापर अगदी रूपयात चार आणे उरला. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर हवं तसं आणि हव्या त्या वातावरणात जगू दिलं तर हे प्राणीसुद्धा स्वत:चं नुकसान करून घेत नाहीत.

“It’s not you. It’s your cage.” 

ऑन द वाईल्डनेस ऑफ चिल्ड्रेन या लेखातील काही भाग. लेखिका – कॅरल ब्लॅक: https://www.ecologise.in/2018/01/12/on-the-wildness-of-children/

कृणाल –  krunal.palakneeti@gmail.com