भय… स्वत:ला स्वीकारण्याचं…

आजवर वाचलेल्या गोष्टींमधून भीतीबद्दल आपली काही एक कल्पना झालेली असते. मात्र मुलांच्या सहवासात बराच काळ घालवल्यावर ती एकदमच बदलून जाते. भीती काही फक्त अंधाराची, उंचीची, पाण्याची किंवा अनोळखी माणसांचीच नसते. माझा तर असा समज होता, की भीती ही संकल्पनाच मुलांना माहीत नसते. अगदी लहान असताना मुलं बेधडक धावपळ करतात. आपण पडू-झडू असं त्यांच्या ध्यानीमनीही नसतं. आपण पालकच त्यांना भीतीची ओळख करुन देतो.

अनेकदा मोठ्या माणसांना म्हणताना आपण ऐकतो, ‘‘ही मुलं कसलीही भीडभाड बाळगत नाहीत, बरेचदा उद्धट म्हणावीत इतकी धीट, आगाऊपणे वागतात, विशेषत: जास्त मोकळ्या वातावरणात वाढणारी मुलं ते स्वातंत्र्य गृहीत धरायला लागतात, त्याचवेळी त्यांची एकंदर जीवनशैली बघता जबाबदारीची त्यांना जाणीव असल्यासारखं दिसत नाही’’ इ.इ. मला इथे काही सुचवावंसं वाटतंय. कदाचित मुलं आगाऊपणा करत नसतीलही. असं बघा, लहान किंवा पौगंडावस्थेतील मुलांकडून बर्‍याच अपेक्षा केल्या जातात. उपलब्ध मर्यादित साधनं, पर्याय यांच्या साहाय्यानं त्यांनी खूप गोष्टी कराव्यात अशी पालकांची किंवा परिस्थितीची अपेक्षा असते, मग अशावेळी स्वत:ला सिद्ध करण्याचा, अपेक्षांना पुरं पडण्याचा त्यांना काच होऊ शकतो. त्यावरील स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून त्यांचं वर्तन उद्धटपणाकडे, अनादराकडे झुकल्यासारखं वाटणं शयय आहे. एखादा माणूस जसा आहे तसं त्याला स्वीकारलं न जाण्याची भीती ही आजकाल सर्वात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ही भीती कायम मनात राहते.

प्रत्येकाच्या गरजा, अपेक्षा त्याच्या वागणुकीतून व्यक्त होतात. उदा. आपण टीव्ही बघतो तेव्हा एकतर उत्साह वाटावा किंवा कशापासून तरी तात्पुरती सुटका मिळावी असा उद्देश असतो. कधीकधी शांतता हवीशी वाटते म्हणून दुसर्‍यावर खेकसून आपण आपल्या रागाला वाट करून देतो. मुलांनी शांत राहावं हे आपण त्यांना ओरडून सांगतोच की. तसंच मुलांना समजून घ्यायचं, तर त्यांच्या वर्तनामागचा हेतू समजून घ्यायला हवा.

स्वीकारलं न जाण्याबद्दलची मुलांची भीती खूप वेगवेगळ्या मार्गांनी उघड होत असते. एका खाजगी शाळेतील मुलांसाठी समुपदेशक म्हणून काम करताना मला जे मार्ग दिसले, सुचले ते मी तुम्हाला सांगते.

मुलाचं मन:स्वास्थ्य मुख्यत्वे घरातल्या वातावरणावर अवलंबून असतं. त्यातूनच त्याची जडणघडण होत असते. एखाद्या घरातलं वातावरण मुलासाठी सुरक्षित नसेल तर ते सहजपणे जाणवतं; पण तसं पाहिलं तर मुलाबद्दल चांगली भावना असलेले पालकही मुलांसाठी त्रासदायक ठरतात, म्हणजे उदाहरणच द्यायचं तर मुलाला जवळजवळ दुर्लक्षित वाटेल इतकी मोकळीक देणारे किंवा मग मुलांकडून भरमसाठ अपेक्षा ठेवणारे पालक. (काही पालक मुलांना स्वातंत्र्य द्यायच्या नादात त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवत नाहीत. त्यांच्या कुठल्याही वागण्याबद्दल बरंवाईट मत व्यक्तच करत नाहीत. तर काही पालक याच्या अगदी दुसर्‍या टोकाचे असतात.)

मुलांसाठी ही दोन्हीही टोकं अतिशय धोकादायक आहेत. पालकांच्या गरजा, अपेक्षा आणि भावना मुलांना अचूकपणे समजतात. त्यांच्यासमोर पालक किंवा त्यांच्या मोठ्या भावंडांचा आदर्श असतो. आणि त्यांच्यासारखं वागण्याची आपली जबाबदारी आहे असं वाटून त्याचं त्यांना प्रचंड दडपण येतं.

एक बारा वर्षांची अतिशय हुशार मुलगी होती. इतर पालकांप्रमाणे तिच्याही पालकांची तिला सर्वोत्तम तेच देण्याची धडपड होती. तिच्या नैपुण्याचा त्यांना कोण अभिमान. शाळेत तिलाच प्राधान्य मिळावं यासाठी तिचे पालक शाळेत, शाळेबाहेर तिच्या शिक्षकांचा पिच्छा पुरवताना ती पाहत होती. त्यामुळे तीही स्वत:ला कोणीतरी विशेष व्यक्ती समजायला लागली; शिक्षकांप्रती अनादर, वर्गातल्या मुलींना तुच्छ लेखणं, शाळेतले कुठलेही नियम न पाळणं वगैरे नेहमीचंच. शाळेनं तिच्या अशा वर्तनाचे होणारे परिणाम तिला दाखवून दिले. अपेक्षा ही, की तिनं त्यावर विचार करावा. तिचे वर्गशिक्षक, समुपदेशक तिच्याशी याबद्दल बोलले; पण त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता. तिच्या पालकांशी अनेकवेळा चर्चा झाल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. तिच्या हुशारीमुळे, नैपुण्यामुळे ती कोणीतरी खास व्यक्ती असल्यासारखं वागवणं, म्हणेल ती प्रत्येक गोष्ट देणं, ह्यामुळे तिच्या वाट्याला अपेक्षाभंग, निराशा कधीच आली नव्हती. वर्गातल्या मुलींनी तिच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली, की दरवेळी ‘मला सुधारायची एक संधी द्या’ म्हणायची; पण परत आपलं ये रे माझ्या मागल्या! शाळेला किंवा तिच्या वर्गातल्या मुलींना तिच्या वागण्यातलं नेमकं काय खटकतंय हे तिला समजत नव्हतं आणि समजून घ्यायची तयारीही नव्हती. स्वत:च्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त करणं हा खरं तर सर्वात सोपा उपाय होता. मात्र त्यात सर्वात मोठा अडसर होता, ‘एक व्यक्ती म्हणून स्वत:च्या वर्तनाचा स्वीकार न होणं’ हा. आपल्या हातून चुका होऊ शकतात आणि त्या सुधारायच्या असतात ह्याची तिला ओळख नव्हती, जाणीवही नव्हतीच. शाळेनं गांभीर्यानं विचार करण्याचा आग्रह धरला, तेव्हा पालकांनी उभी केलेली तिची प्रतिमा आणि वास्तवातली ती, ह्याचा तिला मेळ घालता येईना. कारण आपण जसे आहोत तसा स्वत:चा स्वीकार करण्याची भीती तिच्या मनात खोलवर रुजली होती.

काहीवेळा पालकांच्या अपेक्षा आणि दबावाचा वेगळाही परिणाम दिसून येतो. आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या एखाद्या पैलूमुळे पालक निराश होतील, ह्या भीतीनं मूल ते स्वीकारतच नाही. म्हणजे पालकांना निराश करण्याचा प्रश्नच येणार नाही. आपली मूल्यं मुलामध्ये रुजवण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. त्यानं एक सर्वोत्तम व्यक्ती व्हावं यासाठी दडपण आणतो. मग ते नाही साधलं, तर मूल स्वत:ला दोषी, अपयशी समजतं. प्रत्येक वेळी सर्वोत्तम असणं – मग ते मुलाच्या दृष्टीनंचं सर्वोत्तम का असेना – कधीकधी त्याच्या आवाययाबाहेरचं असतं. सतत सर्वोत्तम राहणं कुणालाच जमत नाही. मग लहान मुलांना ते न जमण्यात आश्चर्य काहीच नाही. खरं तर त्यांना चुका करायला वाव मिळायला पाहिजे. तसा तर अनेकवेळा मिळत नाहीच, उलट चुका करणं म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट आहे असा त्यांचा समज होऊन बसतो. त्यावर मात करण्यापेक्षा ती मग स्वत:ला मिटूनच घेतात.

एका मुलाला पालकांचं त्याच्याविषयी काय मत आहे, हे खूप महत्त्वाचं वाटायचं. अर्थात, बर्‍याच मुलांना असं वाटतं, त्यात विशेष काही नाही. त्यानं बिनचूक, परिपूर्णच असलं पाहिजे अशी पालकांची अवास्तव अपेक्षा दिसली. मुलानं त्याचा असा अर्थ लावला, की त्याच्या हातून चुका झाल्या तर तो चांगला मुलगा नाही. आपल्या हातून चुका होतील आणि त्या पालकांना कळतील ह्या भीतीनं तो शाळेतल्या शैक्षणिक किंवा इतरही कोणत्याच उपक्रमांमध्ये भाग घेत नसे. चुका करायला अजिबात वाव नसतो आणि आपण चुकलो तर कोणीही, अगदी पालकसुद्धा, ते स्वीकारणार नाहीत, असं त्याचं ठाम मत झालं. ‘तुझ्या चुकांसकट आजूबाजूची माणसं तुझा स्वीकार करतील’ असा विडास त्याच्यात निर्माण करण्याची गरज होती. पालकांच्या अपेक्षा आणि स्वत:च्या क्षमता यांच्या तो कसा कचाट्यात सापडलाय हे त्याच्या लक्षात यायलाच खूप वेळ लागला.

दुसरं टोकाचं उदाहरण घरात प्रेम, माया न मिळणार्‍या दुर्लक्षित मुलांचं. अशा उपेक्षित मुलांना अकाली मोठं होऊन आयुष्यात स्वबळावरच उभं राहावं लागतं. घरातून जिव्हाळा मिळाला नाही, तर मुलं शाळा किंवा इतर ठिकाणाहून मिळवण्याचा प्रयत्न करतात. पैशानं विकत घेण्याजोग्या सगळ्या उत्तम गोष्टी, शैक्षणिक साधनं किंवा इतर सोयी-सुविधा मुलांना पुरवणं म्हणजे त्यांच्यासाठी ‘सगळं’ करणं अशी काही पालकांची समजूत असते; पण कोणत्याही परिस्थितीत आपण मुलांसाठी उपलब्ध असणं, त्यांना आपला सहवास मिळणं हाच त्यांच्यासाठी खरा आधार असतो. आपण पालकांसाठी महत्त्वाचे आहोत, ते आपल्यावर प्रेम करतात ही आडासक जाणीव त्यातून मुलांच्या मनात निर्माण होऊन ती मनमिळाऊ, खेळकर होतात. आणि मोठेपणी दुसर्‍यांनाही आनंद, स्वास्थ्य मिळवायला मदत करतात.

एका आठ वर्षांच्या मुलीच्या घरातील वातावरण प्रतिकूल होतं. तिच्या भौतिक गरजा भागवल्या जात होत्या; पण तिला पालकांचा सहवास मिळत नव्हता. त्यामुळे ती शिक्षकांचं आणि वर्गातल्या मुलांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करे. एखाद्या गटातून किंवा खेळातून तिला वगळलं गेलं, तर तिला त्याचा त्रास व्हायचा. तिला एकटं पडण्याची खूप भीती वाटत होती असं समुपदेशकाला तिच्याशी बोलताना जाणवलं. ती शाळेत आलेली नसताना शिक्षकांनी पुढचा धडा शिकवला तर त्यांनी मुद्दामच तसं केलंय, तिला एकटं टाकलं गेलंय, वगळलं गेलंय असं वाटून ती अतिशय अस्वस्थ व्हायची. तिच्याकडून एखादी चूक झाली आणि तिला ते सांगितलं, तर ती ते खूपच मनाला लावून घ्यायची. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून इतका आटोकाट प्रयत्न करूनही आपण कोणाला आवडत नाही हा तिचा समज आणखी पक्का व्हायचा. लहान मुलांमध्ये तात्पुरती भांडणं, मतभेद होतच असतात. पण हिच्या बाबतीत असं काही झालं तर त्यासाठी ती सर्वस्वी स्वत:ला दोषी समजत होती, त्याचं तिला खूप ओझं होत होतं. खरं तर तीही तिच्या वर्गातल्या मुलामुलींना, घरच्यांना हवीहवीशी आहे, तिला सामावून घेतलं जातंय असा दिलासा तिला मिळायला हवा होता आणि घरातून तर ते होत नव्हतं. अशावेळी शाळेत शिक्षकांनी दक्षता घेतली नाही तर तिची एकटं पडण्याची भीती आणखीनच वाढेल.

मूल लहान असताना त्याच्या वागण्यातील बारकाव्यांकडे लक्ष दिलं जायला हवं. त्यावेळी ‘काय त्रास!’ म्हणून दुर्लक्ष केल्यास त्याचे पडसाद त्याच्या पुढील आयुष्यावर पडलेले दिसतात. मोठं झाल्यावर परिस्थितीशी जुळवून घेता न आल्यानं ते हिंसक, आक्रमक होऊ शकतं. वरवर दिसतं त्यापेक्षा अशा वर्तनामागचं मूळ कारण खोलवर दडलेलं असतं. समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय केले तरच स्थायी बदल घडवून आणणं शयय होईल नाहीतर एकूण जगाबद्दल त्याच्या मनात असलेली नकारात्मकता, गैरसमजुती तशाच राहतील.

एका थोड्या मोठ्या मुलाचीही अशीच काहीशी समस्या होती. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि म्हणून आपल्याला कोणी स्वीकारणार नाही अशी त्याला लहानपणापासून भीती होती. वर्गशिक्षकांशी किंवा इतर मोठ्या माणसांशी तो याबद्दल मोकळेपणानं बोलत असे. कालांतरानं ह्या भीतीनं त्याचा पूर्णपणे ताबा घेतला. कोणालाच त्याची काळजी नाही, तो कोणालाही आवडत नाही, सगळे त्याच्याबद्दल गैरसमजच करून घेतात अशी त्याची खात्री पटत गेली. ही भीतीच त्यानं जुळवून घेण्याचं माध्यम केलं आणि स्वत:ची ओळख ‘उपेक्षित’ अशी निर्माण केली. पण त्यामुळेच मोठी माणसं किंवा त्याच्या बरोबरीची मुलं, कुणीही त्याला मदत करू शकणार नाही, तो उपेक्षितच राहणार, प्रत्येक लढाई त्याची त्यालाच लढायची आहे आणि जमेल त्या मार्गानं स्वत:च स्वत:चं संरक्षण करायचंय, येणारा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी लढाईच आहे हा त्याचा समजही पक्का झाला. वेळप्रसंगी हिंसक मार्गाचा अवलंब करण्यातही त्याला काही गैर वाटत नव्हतं. आणि त्याबद्दल आक्षेप घेतला गेल्यावर तर ‘कोणीच आपल्या बाजूनं उभं राहणारं नाहीय’ हा त्याचा समज पक्का होत गेला. दुबळेपणा आणि एकटं पडण्याची भीती यावर मात करण्यासाठी त्यानं स्वत:भोवती अभेद्य भिंत उभी केली होती. मुलांवर अशी अप्रिय, नकोशी भूमिका घेण्याची वेळ यावी हे चांगलं नाही. मुलं आधारासाठी त्यांच्यावर विसंबून राहू शकतात हा विडास मुलांना देण्यात पालक अपयशी ठरलेत असा याचा अर्थ होतो.

दुबळेपणाची भीती वाटणारी मुलं स्वत:पेक्षा लहान किंवा अशक्त मुलांवर दादागिरी करून, त्यांची टिंगलटवाळी करून स्वत:चं सामर्थ्य सिद्ध करू पाहतात. त्यांना ताब्यात ठेवण्यामुळे छान वाटून मग पुन्हापुन्हा हाच मार्ग चोखाळला जातो. स्वत:चा दुबळेपणा झाकण्यासाठी हा मार्ग वापरणं म्हणजे अतिरिक्त भरपाई करून घेण्यासारखं आहे. मुलग्यांमध्ये ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात दिसून येते.

मुलांचं वर्तन ही समस्येची फक्त लक्षणं असतात, ती बदलत राहतात. त्यामुळे केवळ त्यावर उपाय करून उपयोग नाही. मुलांच्या वर्तनाचं निरीक्षण करत राहणं ही पालकांची जबाबदारी आहे. खोलवर दडलेली भीती, गरजा शोधून त्यावर उपाय करणं वाढत्या वयाच्या, पौगंडावस्थेतील मुलांसाठी आवश्यक आहे. अमुक प्रकारच्या वर्तनाच्या मुळाशी अमुक भीती असते असा काही ठरलेला साचा किंवा सूत्र नसतं. आपण स्वत: तर मुलांशी संवाद साधू शकतोच, त्याचबरोबर त्याच्याप्रती ज्यांना आस्था आहे अशांचीही मदत घेता येईल. मुलाला ‘आहे तसं’ विनाअट स्वीकारलं जाईल अशी किमान एकतरी जागा असणं त्याच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. मुलांना गरज भासल्यास विनासंकोच मदत मागायला शिकवायला हवं. मुलांच्या वर्तनसमस्येवर उपाय योजताना त्यांना चर्चेत सामील करून घेऊन, कशाप्रकारची मदत हवी आहे हे सांगण्याइतका मोकळेपणा देणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे.

SwatiSambrani

स्वाती सांब्रानी

ssambrani@gmail.com

लेखिका चेन्नई येथे एका शाळेत समुपदेशक असून सामाजिक व भावनिक स्तरावर अडचणी असणार्‍या मुलांना मदत करतात.

अनुवाद : प्रीती केतकर