माडिया शिकू या

मराठी ते जर्मन, जर्मन ते माडिया: एक प्रवास

1. भाषेचे भान

माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मराठीची आवड निर्माण करणारे काही चांगले शिक्षक तिथे भेटले आणि मातृभाषेचा पाया भक्कम झाला. संस्कृत शिकवण्यासाठी ‘व्याकरण-भाषांतर’ पद्धत वापरली जायची. म्हणजे ‘रामः रामौ रामाः प्रथमा’ वगैरे व्याकरण पाठ करायचे आणि मग सरळ भास, भवभूती किंवा कालिदास यांचे साहित्यिक वेचे मराठीत भाषांतरित करायचे; त्यातील भाषेची गंमत, सौंदर्य याच्याविषयी पूर्ण अनभिज्ञ राहून! इंग्रजी तर मराठीत भाषांतर करूनच शिकवण्याची पद्धत होती. एकाच वर्षी एक नवीन बाई आल्या. त्या पूर्ण वेळ इंग्रजीतून बोलायच्या. हे नवीनच असल्याने सर्व मुली बावचळून जायच्या; पण सतत जाणवे, की या बाई करत आहेत हे उत्तम आहे, हे असेच असायला हवे. शाळेत वेगवेगळ्या भाषेतून नाटके व नाट्यवाचने करायची संधी मिळाली. त्यामुळे त्या भाषांशी जवळीक होण्यास खूप मदत झाली. या साऱ्या मिश्र संस्कारांमुळे आपल्याला भाषाच शिकायची (व पुढे शिकवायची) आहे ही खूणगाठ शाळेत असतानाच बांधली गेली.

पुढे महाविद्यालयात आणि विद्यापीठात मी जर्मन भाषेचा अभ्यास केला. भाषा शिकण्याबरोबरच भाषाशास्त्र, भाषेचा इतिहास, शब्दांची व्युत्पत्ती, त्या भाषेची संस्कृती, त्या भाषेतील साहित्य आणि साहित्यातील भाषेचे सौंदर्यशास्त्र समजावून घेणे किती आवश्यक असते हे लक्षात आले.

भाषेच्या विविध अंगांचे मूलभूत ज्ञान घेऊन जेव्हा मी भाषा व साहित्य शिकवायला सुरुवात केली, तेव्हा हळूहळू भाषेचे भान येऊ लागले. उदा. संवादाचे साधन म्हणून (कोणतीही) शब्द-भाषा किती समर्थ किंवा असमर्थ आहे याचे भान, भाषा ही सत्तेचे साधन कशी बनू शकते व काही सांगण्याऐवजी काही लपवण्यासाठी तिचा उपयोग कसा केला जातो याचे भान, संस्कृती आणि भाषा यांचा घनिष्ठ संबंध व शब्दांना असणारे (उदा. माजघर) सांस्कृतिक अवकाश याचे भान, प्रसिद्ध भाषातत्त्वज्ञ विट्गेन्श्टाईन (Wittgenstein) यांच्या ‘आपल्या भाषेच्या मर्यादा या आपल्या जगण्याच्या मर्यादा असतात’ या विधानाचे भान, 21व्या शतकात बदलत जाणाऱ्या भाषेच्या स्वरूपाचे भान, साऱ्या बदलांना सामावून घेणारे भाषेचे प्रवाहीपण- नदी जशी तीच पण दरक्षणी नवी- त्याचे भान आणि मुख्य म्हणजे भाषा कशी शिकवावी याचे भान. मग (जर्मन) भाषा आणि साहित्य कसे शिकवावे याचे शास्त्र हा माझ्या विशेष अभ्यासाचा, संशोधनाचा व विद्यापीठीय अध्यापनाचा विषय झाला.

2. माडिया

‘माडिया’ ही एक आदिवासी जमात असून त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आणि छत्तीसगडमधील बस्तर, नारायणपूर भागात आढळून येते. शतकानुशतके ही आदिवासी जमात जगापासून तुटून अश्मयुगातल्यासारखी राहत होती. मात्र ब्रिटिश राजवटीत आणि स्वातंत्र्यानंतरही बाहेरच्या तथाकथित सुसंस्कृत जगाच्या अतिक्रमणाला त्यांना तोंड द्यावे लागले. पोलीस, वनरक्षक, तेंदू पत्त्याचे ठेकेदार, व्यापारी यांच्याकडून होणारी पिळवणूक – विनामोबदला काम करवून घेणे, पोरीबाळींवर अत्याचार, एक पोते मिठाच्या बदल्यात आदिवासींकडून एक पोते तांदूळ घेणे- अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा व अनारोग्य हे शत्रू. गडचिरोली जिल्ह्यातील निसर्गही परीक्षा पाहणारा. उन्हाळ्यात 480 से. तर हिवाळ्यात 50 से. तापमान, पावसाळ्यात एवढा पाऊस, की तेथील सात नद्यांना पूर येऊन आजही ह्या भागाचा जगाशी संपर्क तुटतो.

आदिवासींच्या या कष्टमय परिस्थितीने अस्वस्थ होऊन बाबा आमटे यांनी 1973 साली गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. डॉ. प्रकाश व डॉ. मंदा आमटे यांनी आपल्या सहकार्‍यांबरोबर या प्रकल्पाची धुरा उचलली. येथे मुख्यत्वेकरून आरोग्यसेवा व शिक्षणाचे काम चालते. माडिया लोक जी भाषा बोलतात तिला ‘माडिया’ असे म्हणतात. माडियांना केंद्रबिंदू मानून सुरू झालेल्या या प्रकल्पात काम करताना त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून या प्रकल्पावरच्या डॉक्टर, शिक्षक आणि कार्यकर्त्यांनी त्या काळी अतिशय कष्टपूर्वक माडिया भाषा शिकून घेतली.

1982 सालापासून मी या प्रकल्पाशी जोडली गेलेली आहे. या प्रकल्पावर नव्याने येणारे कार्यकर्ते, डॉक्टर यांना माडिया भाषेची ओळख करून देण्यासाठी पुस्तकाची गरज आहे, असे 2018 मध्ये डॉ. प्रकाश आमटेंच्या सूनबाई डॉ. अनघा यांनी मला सहज बोलता बोलता सांगितले. भाषा शिकवणे हा माझ्या अभ्यासाचा विषय असल्याने मी तत्काळ पुस्तकाची जबाबदारी घेतली.

3. काम सुरू करण्यापूर्वी

पुस्तकावर काम सुरू करण्यापूर्वी माडिया भाषेविषयी व भाषा शिकवण्यासंबंधी काही महत्त्वाच्या मूलभूत मुद्द्यांचा विचार केला:

अ) कामातील आव्हाने व शोध

माडिया भाषा शिकवण्याचे पुस्तक करताना मला माझ्या जर्मन भाषाशिक्षणशास्त्राचा, अनुभवाचा फायदा होणार असला, तरी अनेक नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागणार होते. एक तर मला ही भाषा समजावून घेणे गरजेचे होते. बोलीभाषा असल्यामुळे लिखित दस्तऐवज उपलब्ध नव्हता. शब्द गोळा करावे लागणार होते. उच्चार समजावून घ्यावे लागणार होते. व्याकरण शोधून लिहून काढावे लागणार होते. पुण्याचे संकेत जोशी, रुबी सप्तर्षी आणि प्रफुल्ल गुंदेचा यांनी संकलित केलेल्या ‘माडिया भाषेची तोंडओळख’ ह्या पुस्तिकेची काम सुरू करताना खूप मदत झाली. या पुस्तिकेमुळे सुमारे 300 माडिया शब्द माझ्या हाती आले; पण अनेक नवे प्रश्नही निर्माण झाले, विशेषतः व्याकरणाविषयी.

या प्रश्नांची उत्तरे शोधताना अनेकांचे सहकार्य झाले. विशेष मदत झाली, ती त्यावेळी पुण्यात असलेल्या व भाषेचे अतिशय चांगले भान असणाऱ्या मनीषा मज्जी या माडिया मुलीची. आमच्या पहिल्या भेटीत मी तिला म्हणाले, ‘नन्ना तिइनान’ म्हणजे ‘मी खाते’ हे मला माहीत आहे; पण (क्रिया करून दाखवत) ‘मी आत्ता खात आहे’ असे काही तुमच्या भाषेत आहे का? एका विरामानंतर ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, हो, आमच्यात continuous tense आहे. मी अवाकच झाले आणि मला एवढा आनंद झाला. मग व्याकरण शोधून काढायला मला मनीषाची खूप मदत झाली. मनीषाच्या जोडीने किशोर वड्डे, शारदा ओक्सा, रमिला वाचामी, विज्जे कासारे, सुरेश महाका, डॉ. पांडू पुंगाटी अशा अनेक माडिया गुरूंकडून भाषेचे आवश्यक मूलभूत ज्ञान आणि निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवत गेले.

त्याच जोडीला मग एकेकाळी माझ्याकडे भाषा शिकवण्याचे शास्त्र (Didactics) शिकलेल्या आणि आज विविध ठिकाणी जर्मन भाषा शिकवत असलेल्या माझ्या विद्यार्थिनींची एक टीम तयार केली. पैकी मैथिली देखणे-जोशी, ऋजुता टिळेकर आणि ख्रिस्तीन फरायस या प्रत्यक्ष पुस्तक लेखनात, पुस्तकाचा दृश्य भाग तयार करण्यात सहभागी झाल्या.

ब) माडिया भाषेविषयी

माडिया ही शतकानुशतके चालत आलेली आदिम भाषा आहे. ती बोलीभाषा आहे. तिला लिपी नाही. खरे तर बोली स्वरूपातच उच्चार व लयीसोबत कोणत्याही भाषेचे परिपूर्ण रूप सामोरे येते. आणि मुळात कोणतीही भाषा ही बोलीभाषाच असते, तिला लिपी नंतर दिली जाते, उदा. मराठी वा हिंदीने (संस्कृतची) देवनागरी लिपी स्वीकारली. कोणताही लिखित दस्तऐवज नसताना या आदिवासी बोलीभाषा शतकानुशतके टिकल्या व आजही त्या त्या जमातीत, त्यांच्या खेड्यातील दैनंदिन जीवनात वापरल्या जातात हे या भाषांचे सामर्थ्य थक्क करून टाकणारे आहे. आजच्या आधुनिकोत्तर जगात लेस्ली फिडलर यांच्या ‘cross the borders – close the gaps’ या विधानानुसार प्रमाणित (standard) भाषा व लोकभाषा (dialect) किंवा लिखित व बोलीभाषा यांची श्रेष्ठ-कनिष्ठ अशी उतरंड (hierarchy) नाहीशी होताना दिसते आणि त्या समान पातळीवर आहेत अशी नवी जाणीव निर्माण होऊ लागली आहे.

काही अभ्यासकांच्या मते माडिया ही द्रविडी भाषा असून गोंडीच्या उपकुळातील आहे. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.

माडिया भाषेचा अभ्यास करताना लक्षात आले, की या भाषेत सुमारे 22 व्यंजने आणि 10 स्वर आहेत. बऱ्याच शब्दांत ‘ङ’ (ŋ ‘वाङमय’) हा उच्चार आहे, उदा. ‘ओराङ’. काही शब्दात पायमोड्या ‘अ्’ (उदा. उअ्नान glottal stop(?)) सारखा उच्चार आढळतो. ‘ओग़ु’- या शब्दात ‘ग’ खाली नुक्ता आहे, त्याचा उच्चार घशातून होतो. हा वेगळाच उच्चार आहे, मराठीतील कोणत्याही उच्चाराशी साम्य नसलेला, जर्मनमधील एका उच्चाराशी [ʁ] किंचित साधर्म्य असलेला. या उच्चारासाठी लिहिताना ग खाली नुक्ता (ग़) वापरायचा हे माडिया लोकांनीच ठरविले आहे. भाषा शिकताना असेही लक्षात आले, की बोलताना काही वेळा शब्दांचे उच्चार बदलतात, उदाहरणार्थ ‘नन्ना’ चे ‘नन’ (मी) होते, ‘अदू’ चे ‘अद’ (ती) होते. यावरून ही बोलीभाषा असली, तरी एक ‘प्रमाण’भाषा व एक रोजच्या व्यवहारात वापरली जाते ती भाषा असा भेद होत असावा असे वाटते. तसेच वेगवेगळ्या भागात, अगदी 10/15 मैलांवर शब्द व उच्चार बदलतात त्याचाही हा परिणाम असावा.

कोणत्याही भाषेच्या प्रवासात त्या भाषेवर नेहमीच इतर भाषांचा विविध कारणाने प्रभाव पडत असतोच. होमी भाभा म्हणतात त्याप्रमाणे आज एका ‘थर्ड स्पेस’मध्ये जगताना असा प्रभाव विशेष जाणवतो. बहुभाषिकत्व, भाषांची सरमिसळ ही 21व्या शतकातील भाषाव्यवहाराची वैशिष्ट्येच आहेत. आदिवासी भाषाही या प्रभावाला अपवाद नाहीत.

माडियांच्या वस्तीच्या आसपासच्या प्रादेशिक भाषांचा प्रभाव, उदा. मराठी, हिंदी, तेलुगू व इतर दाक्षिणात्य भाषांचा व त्याच जोडीला इंग्रजीचा प्रभाव या भाषेवर, विशेषतः शब्दसंपत्तीवर पडलेला जाणवतो. काही उदाहरणे पाहू:

दाक्षिणात्य भाषांचा प्रभाव: नन्ना = मी , रेंडू = 2, मुंडू = 3

हिंदी: बीमार

संस्कृत (पण हे शब्द दाक्षिणात्य भाषेतून घेतले असावेत): पापम्, पुण्यम्

मराठी: ज्या गोष्टी त्यांच्या आदिम संस्कृतीत नव्हत्याच त्यासाठी मराठी किंवा इंग्रजी शब्द वापरतात. उदा. पाटी, वही, पुस्तक. पण मग या शब्दांचे माडियाकरणही करतात, उदा. ‘पुस्तक’ अनेकवचन- पुस्तकिंग किंवा अंघोळ कियनाद = अंघोळ करणे

(आपणही मराठीत ‘जॉब करणे’ असे म्हणतोच की!)

इंग्रजी: TV, laptop, problem, BP

माडिया शब्दांविषयी काही गमतीच्या गोष्टी पाहू:

‘पाल’ या शब्दाचा अर्थ ‘दूध’ होतो (द्रविडी प्रभाव), ‘आत्या’ म्हणजे ‘सासू’ आणि ‘कांदा’ म्हणजे ‘फांदी’. म्हणजे हे वाटतात मराठी शब्द; मात्र त्यांचे अर्थ वेगळे आहेत.

‘भूत’, ‘मत्स्यकन्या’, ‘पुनर्जन्म’ अशा अमूर्त गोष्टींसाठी शब्द आहेत; पण जे आकाश रोज दिसते त्याच्या निळ्या रंगाला शब्द नाही! (म्हणजे गेली तीन वर्षे जंग जंग पछाडूनही निदान आम्हाला तरी तो मिळालेला नाही).

क) भाषाशिक्षणाची मूलतत्त्वे

आपण भाषा शिकतो म्हणजे काय शिकतो? तर, भाषेतील शब्द, भाषेचे व्याकरण आणि भाषाकौशल्ये.

– बोलणे, लिहिणे, ऐकणे (ऐकून समजणे) व वाचणे (वाचून समजणे) ही चार भाषाकौशल्ये आहेत. या भाषाकौशल्यांसाठी शुद्धलेखन, उच्चार, शब्दावरील योग्य आघात व भाषेची लय शिकणे गरजेचे असते. याच जोडीला बोलताना आवाजात होणारे चढउतार, तसेच देहबोली या गोष्टीही महत्त्वाच्या. शिवाय शिकणे आवश्यक असते ती संस्कृती; भाषा हा संस्कृतीचा एक भाग असते आणि संस्कृती त्या त्या भाषेतून व्यक्त होत असते.

– शिकणाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार (Types of Learners) असतात.

उदा. काहींना ऐकून, काहींना वाचून, तर काहींना सर्व लिहून काढल्यावर समजते. त्यामुळे शिकवताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक असते.

– शिकण्याचा व स्मरणशक्तीचा खूप जवळचा संबंध आहे. दिले ज्ञान दीर्घ स्मरणशक्तीच्या कप्प्यात जाणे महत्त्वाचे.

– शिकणे ही सर्वांगीण प्रक्रिया असते, असायला हवी. बुद्धी, तर्क, विचार यांच्या जोडीने भावना, शारीरिक हालचाली यांचाही शिकण्यात सहभाग असायला हवा.

– शिकवताना अनुभव देणे हे खूप महत्त्वाचे आहे. उदा. ‘सफरचंद’ हा शब्द शिकवताना किमान सफरचंदाचे चित्र दाखवायला हवे; सफरचंद हातात घेऊन त्याचा वास, चव घेता आली तर आणखी चांगले.

– शिकवताना शिकणाऱ्यांच्या सर्जनशीलतेला (creativity) वाव द्यायला हवा.

– शब्दांचे अर्थ किंवा व्याकरणाचा एखादा नियम स्वतः शोधून काढण्याची संधी शिकणार्‍यांना मिळाली, तर तो त्यांना सर्वात चांगला समजेल व ते तो विसरणार नाहीत.

– वर उल्लेखलेल्या गोष्टींमुळे शिकताना आनंद मिळतो. आता शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की जेव्हा शिकताना आपल्याला आनंद मिळतो, तेव्हा हॉर्मोन्सवर चांगला परिणाम होऊन शिकण्याची इच्छा, प्रेरणा वाढते, शिकलेला भाग आपल्याला जास्त चांगला समजतो व जास्त चांगल्या प्रकारे स्मरणात राहतो.

ड) पुस्तकासंबंधीचे पूर्वनिर्णय

पुस्तकासंदर्भात काही गोष्टी गृहीतच होत्या: कोणतीही भाषा ही दुसऱ्या कुठल्या भाषेचे भाषांतर नसते. त्यामुळे भाषांतर न करता भाषा शिकवणे महत्त्वाचे. त्यामुळे पुस्तकातील दृश्य भाग महत्त्वाचा.

ही भाषा शिकवायला शिक्षक नसणार हे गृहीत धरून हे पुस्तक मुख्यत्वेकरून स्वयंअध्ययनासाठी (self-study) तयार करण्याचे ठरवले. तसेच एकाच पुस्तकात पाठ्यपुस्तक आणि अभ्यासपुस्तक (Textbook workbook) द्यायचे हेही ठरले. मात्र पुस्तक स्वयंअध्ययनासाठी असल्याने व्याकरणाच्या स्पष्टीकरणासाठी, सरावातील सूचनांसाठी माडिया सोडून एक भाषा वापरावी लागणार हे उघड होते. त्यामुळे ज्यांच्यासाठी पुस्तक करायचे तो गट लक्षात घेऊन यासाठी मराठी भाषा वापरायचे ठरवले. त्यामुळे साहजिकच माडिया भाषेसाठी देवनागरी लिपी वापरायचे ठरवले. देवनागरी ही काही किरकोळ दोष (‘च’ व ‘ज’ चे दोन उच्चार, उदा. ‘च’ व ‘च्य’) सोडता परिपूर्ण लिपी आहे. या लिपीत प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र चिन्ह आहे, त्यामुळे माडिया भाषेचे उच्चार व्यवस्थित लिहिता येतील हा विचार त्यामागे होता. आमच्या माडिया मार्गदर्शकांशी झालेल्या चर्चेनुसार कळायला सोपे जावे म्हणून ‘ङ’साठी अनुस्वार वापरायचे ठरवले. म्हणजे ‘ओराङ’ असे न लिहिता ‘ओरांग’ असे लिहायचे; थोडक्यात, मराठीत आता अनुनासिकांसाठी अनुस्वार वापरला जातो तसे. पुस्तकात आम्ही ‘प्रमाण’भाषाच दिली आहे (उदा.‘नन्ना’); पण आधी उल्लेखलेल्या अंतर्भेदांचा उल्लेखही केला आहे (उदा. ‘नन’). अशा रीतीने उच्चार समजावून घेऊन मग लिपीचे नियम ठरवले.

4. पुस्तकाविषयी

69

295 पृष्ठांच्या या पुस्तकात प्रत्येकी 20 ते 24 पानांचे 10 पाठ आहेत. अनुक्रमणिकेत प्रत्येक पाठातील व्याकरण, शब्दसंपत्ती व संवाद्कौशल्ये दिली आहेत. प्रत्येक पाच पाठांनंतर त्या पाठांवर आधारित चाचण्या आहेत. श्रवणकौशल्यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे. त्यानंतर पुस्तकात आलेल्या सर्व व्याकरणाचे स्पष्टीकरण, नियम, अपवाद व आवश्यक ते तक्ते दिले आहेत, उदा. क्रियापदांची आज्ञार्थी रूपे, तिन्ही काळात चालवलेली क्रियापदे यांचे तक्ते. पुस्तक स्वयंअध्ययनासाठी असल्यामुळे पाठातील सर्व सरावांची व दोन्ही चाचण्यांची उत्तरे शेवटी दिली आहेत. त्यामुळे आपले उत्तर बरोबर आहे ना हे ताडून बघता येईल. सर्वात शेवटी पुस्तकातील सर्व शब्दांची व त्यांच्या मराठी अर्थाची सूची आहे (उदा. अक्को, अक्कोर (नाम) = आईचे वडील).

पुस्तकाबरोबर एक ऑडिओ पेन-ड्राइव्ह दिला आहे. त्यावर पुस्तकातील सर्व धडे असून त्याचा उपयोग योग्य उच्चार, आघात व लय समजण्यासाठी होईल. तसेच श्रवणकौशल्याचा सर्व भाग यावर आहे. यातील सर्व भाग माडिया लोकांच्या आवाजात रेकॉर्ड केला आहे. पाठातील जो भाग या पेन-ड्राइव्हवर आहे, तेथे या चिन्हाने ते सूचित केले आहे.

भाषा शिकवण्याच्या शास्त्रोक्त व अत्याधुनिक पद्धती पुस्तकात वापरल्या आहेत. आदिम भाषा आणि आधुनिक पद्धत यांचे इथे अनोखे मिश्रण झाले आहे.

पाठ्यपुस्तकाचे progression अतिशय महत्त्वाचे असते. सोपे ते अवघड, साधे ते गुंतागुंतीचे, माहीत गोष्टींपासून नव्या गोष्टीकडे असा क्रम लावणे, एकातून एक उलगडत जाणे यास प्राधान्य दिले आहे. शिकलेल्या गोष्टी दीर्घ स्मरणशक्तीच्या कप्प्यात पोचण्यासाठी शिकवत असलेल्या भागावर शिकणार्‍यांचे लक्ष केंद्रित होईल असे चित्र किंवा संवाद दिले आहेत. शिकवायच्या गोष्टीसोबत चित्रे, उदाहरणे अशा निगडित गोष्टी (associations) दिल्या आहेत व एका पाठात शिकवलेल्या गोष्टींची पुढच्या पाठात उजळणी केली आहे.

प्रत्येक पाठाच्या पहिल्या पानावर पाठाचे नाव, परिसराची, माडिया संस्कृतीची ओळख करून देणारा फोटो असून त्या पाठात नवीन शिकायच्या गोष्टींची सूची दिली आहे. पाठाच्या शेवटी सराव आहेत व आपल्याला किती येते हे स्वतः अजमावण्याची (self-evaluation) संधी दिली आहे.

आता पाठातील महत्त्वाच्या गोष्टी बघू:

70       71

अ) व्याकरण

आम्ही व्याकरण शोधायला लागलो, तसे लक्षात आले, की ते अतिशय विकसित आहे. आधुनिक भाषाशास्त्रानुसार एखादी भाषा किती विकसित आहे, हे ठरवण्याचे परिमाण म्हणजे त्यातील क्रियापद. माडियामधील क्रियापद अतिशय व्यामिश्र आहे. ते मराठी व जर्मनप्रमाणे पूर्ण चालवावे लागते (मी -आम्ही, तू-तुम्ही, तो-ते, ती-त्या). शिवाय नकारार्थी (मी खात नाही), प्रश्नार्थी (तू खातेस का?) वाक्यांसाठी पूर्ण वेगळ्या प्रकारे क्रियापद चालवावे लागते. पुस्तकात साधा वर्तमानकाळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ घेतला आहे. याखेरीज आज्ञार्थ, शक्यता व क्षमतादर्शक (उदा. ‘करू शकणे’) आणि हेतुदर्शक (उदा. ‘करायला हवे’) रूपे, नाम त्याचे लिंग व अनेकवचन, आठापैकी चार (प्रथमा, द्वितीया, चतुर्थी आणि षष्ठी) विभक्त्या, सर्वनाम, स्थलकालदर्शक अव्यये, विकारी व अविकारी विशेषणे यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.

पुस्तकात वापरलेले संपूर्ण व्याकरण आणि त्याचे पुस्तकाच्या शेवटी दिलेले स्पष्टीकरण लिहिणे हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा भाग होता.

व्याकरणाच्या एखाद्या भागाची ओळख भाषांतर न करता inductive method ने पाठात करून दिली आहे. म्हणजे आधी उदाहरणे देऊन त्यातून नियमाकडे जाणे अशा पद्धतीने. उदाहरणे मिळवण्यासाठी चित्रांचा किंवा विशिष्ट उदाहरणाचा, प्रसंगाचा, छोटे उतारे किंवा संवादाचा वापर केला आहे. उदा. व्यक्तिवाचक सर्वनामांसाठी चित्रांचा उपयोग केला आहे.

72

‘शकणे’ हे रूप शिकवताना ‘मंगली एखादी गोष्ट उत्तम करू शकते; पण मंगरू करू शकत नाही’ अशी चित्रे व उदाहरणे दिली आहेत.

Madiya2

प्रश्नार्थीरूपाची ओळख करून देताना मंगली म्हणते, मोठी माणसे सारखी प्रश्न विचारतात. (पुढील भाग माडियामध्ये) आई विचारते, अंघोळ केलीस का? बाबा विचारतात, अभ्यास केलास का? आज्जी विचारते, जेवलीस का? यातून उदाहरणे मिळतात.

उदाहरणांनंतर सोपे नियम व अपवाद दिले आहेत. आणि पुस्तकाच्या शेवटी व्याकरणाचे जे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे, त्यात हा संबंधित भाग कुठे सापडेल ह्याचा निर्देश केलेला आहे.

75

काही ठिकाणी स्वतः नियम शोधण्यासाठी सराव दिले आहेत. पाठात आलेल्या नवीन व्याकरणाचा त्या पाठातील धड्यात वापर केलेला आहे. पाठात आणि चाचण्यांमध्ये अनेक सरावही दिले आहेत. सरावाची काही उदाहरणे पाहू.

सराव: या साऱ्यांनी काल काय केले?

76

आज्ञार्थासाठी सराव

77

ब) शब्द

एखादा शब्द शिकवायचा म्हणजे काय? प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो आणि एक रूप असते. रूप म्हणजे शब्दाचा उच्चार, शब्दावरचा आघात, शब्दाचे सुलेखन आणि शब्दाचे व्याकरण (उदा. नाम असेल तर लिंग, अनेकवचन; क्रियापद असेल तर ते चालवणे). शब्दाचे सुलेखन व व्याकरण प्रत्येक शब्दाबरोबर दिले आहेच व योग्य उच्चार आणि आघात शिकण्यासाठी ऑडिओ पेन-ड्राइव्हचा उपयोग होईल.

अर्थाचा विचार केला तर शब्दाचा अर्थ आणि वापर महत्त्वाचा. वेगवेगळ्या संदर्भात वापरल्यावर शब्दाचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो, उदा. ‘कर’ या शब्दाचा अर्थ ‘हात’ किंवा ‘काम कर’ असाही होऊ शकतो. शब्दांचे अर्थ मराठीत सांगणे हा शब्द शिकवायचा सर्वात सोपा मार्ग असला, तरी तो सर्वात शेवटचा उपाय म्हणून वापरला आहे. कारण मग मुले भाषा शिकत नाहीत, तर भाषांतर शिकतात. शब्द शिकवण्यासाठी विविध पद्धती वापरल्या आहेत. त्यातील काही पद्धती पाहू :

– दृश्य भाग, छायाचित्रे, चित्रे

78

– संदर्भासहित उदाहरण देणे:

डॉ. प्रकाश आमटे यांच्या परिचित कुटुंबाचे छायाचित्र व उदाहरण देऊन, एलो (धाकटी बहिण), बाबाल (वडील), आवाल (आई), मुत्ते (बायको) इत्यादी शब्द भाषांतर न करता चौथ्या धड्यात शिकवले आहेत.

79

मग पाचव्या धड्यात मोठ्या कुटुंबाचे छायाचित्र दाखवून आणि आधी शिकवलेल्या शब्दांचा वापर करून नवीन शब्द भाषांतर न करता देता आले, उदा. क्र.10 ‘तादो’ = बाबाना बाबाल (वडिलांचे वडील) तसेच बापी (वडिलांची आई), कुची( काकू), सासू (आत्या) इत्यादी.

80

– विशिष्ट सिस्टीममध्ये शब्द देणे: उदा. आठवड्याचे सात वार, वेगवेगळे रंग

Madiya_Days

या व अशा पद्धतींमुळे काय होते? शब्दांचा नुसता अर्थच कळत नाही तर तो कसा, कुठल्या संदर्भात वापरायचा हेही कळते. शिवाय आधी माहीत असलेल्या शब्दांशी, दृश्य भागाशी, उदाहरणांशी हा नवा शब्द जोडल्यामुळे तो लक्षात ठेवणे सोपे जाते. शब्द स्वतः शोधण्याची संधी मिळते. शब्दाचा मर्यादित का होईना अनुभव घेता येतो व शिकणे रंजक होते.

शब्दांची उजळणी व चाचणी करण्यासाठी अनेक प्रकारचे सराव दिले आहेत:

प्र ४. खाली दिलेल्या माडिया शब्दातील फळं आणि भाज्या दर्शवणाऱ्या शब्दांना वर्तुळ करा !

ओ सो नि मा गु मु डी गा टो वे ने ति त्ति न ना लुं g पो य ता आ यो ने ल्ली तु म री बे द री

क म का ल जा मा जो न् ना बा त ल रें गा आ पा आं च ळ ए ता रा म ए मि ल मी नू नें डी कु अ कु

प्र. १७ प्राणी ओळखा व माडियात लिहा.

81

82

क) धडे व भाषाकौशल्ये

प्रत्येक पाठात धडे आहेत. धड्यात गाव, घरे, माणसे यांची माहिती दिलेली आहे. रोजच्या जीवनातील अनेक संवाद दिले आहेत, उदा. ‘तुझे नाव काय?’

Madiya3

तसेच शाळेतील व दवाखान्यातील संवाद, दोन आम्हीच रचलेल्या सोप्या कविता आहेत. या धड्यांसंदर्भात आणि स्वतंत्रपणेही ‘लिहिणे’ व ‘बोलणे’ ही active skills आणि ‘वाचणे’ व ‘ऐकणे’ ही passive skills हाताळली आहेत.

ऐकणे: सर्व धडे व संवाद ऑडिओ पेन-ड्राइव्हवर असल्याने ऐकून समजते आहे की नाही हे ताडून बघता येईल. ऐकून समजणे ही अवघड गोष्ट असल्याने श्रवणकौशल्याचा स्वतंत्र विभाग आहे. त्यात शब्द व वाक्य ऐकणे, ऐकून लिहिणे किंवा स्वतः म्हणणे असे विविध सराव दिले आहेत.

प्र. ५. चित्रात आकड्यांनुसार योग्य रंग भरा!

Madiya_House

प्र. १०.शब्द ऐकून योग्य चित्राखालीबरोबरची खूण करा!

84

बोलणे: शब्द, वाक्ये ऐकून म्हणणे असे सराव आहेत. लेखनासाठी दिले काही सराव तोंडीही करता येणार आहेत. उदा. स्वतःची ओळख करून देणे, नमुन्यातील संवादानुसार संवाद करणे.

वाचणे: धड्यांवर, संवादांवर प्रश्न विचारले आहेत व सराव दिले आहेत. त्यातून वाचलेले समजले की नाही हे ताडून पाहता येईल.

लिहिणे: लिहिण्यासाठी शब्द (उदा. गाळलेल्या जागा भरा), वाक्ये (उदा. प्रश्नाची उत्तरे लिहा) व मग दीर्घ उत्तरे (उदा. स्वतःचा दिनक्रम लिहा, संदर्भाप्रमाणे संवाद लिहा) या क्रमाने सराव दिले आहेत. सर्जनशील लिखाणासाठीही (creative writing) सराव दिले आहेत, उदा. दिलेल्या कवितेनुसार छोटी कविता लिहिणे.

ड. परिसराची, संस्कृतीची माहिती:

भाषा ही संस्कृतीशी निगडित असते. जंगल हे आदिवासींच्या जीवनाचा अवकाश. त्या परिसराची ओळख व्हावी म्हणून जंगलाचा परिसर, नद्या, झाडे, जंगलातील प्राणी, पक्षी, कीटक व इतर निसर्ग-घटक यांची अनेक छायाचित्रे व शब्द पुस्तकात दिले आहेत. तसेच माडियांच्या जीवनाचा अंदाज यावा म्हणून त्यांचे जेवण, फळे, भाज्या, गाव, झोपडी आणि माडिया-माणसे यांची छायाचित्रे व माहिती धड्यातून दिली आहे.

या पुस्तकाच्या कामात अनेकांची मदत झाली. मलपृष्ठासाठी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. गणेश देवी यांनी त्यांचे अभिप्राय दिले. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे तत्कालीन आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांनी या कामात रस घेऊन 2019 मध्ये संस्थेतर्फे हे पुस्तक प्रसिद्ध केले.

85

या पुस्तकाचा लोकबिरादरी प्रकल्पातील कार्यकर्ते व डॉक्टर, गडचिरोली भागात काम करणारे कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांना उपयोग होत आहे. मुख्य म्हणजे आपल्या भाषेलाही व्याकरण आहे, पुस्तक आहे, हे पाहून आपल्या भाषेविषयीचे नवे भान येण्यासाठी माडिया लोकांनाही याचा उपयोग होतोय, असा आमचा अनुभव आहे. महाराष्ट्रातील अनेक आदिवासी भाषांची पुस्तके करण्यासाठी हे पुस्तक एक नमुना म्हणून वापरता येईल.

हे पुस्तक करत असताना माडिया भाषा किती समृद्ध आहे हे लक्षात आल्याने या लोप पावत चाललेल्या भाषेच्या दस्तऐवजीकरणाचा (documentation) एक प्रकल्प आम्ही आता हाती घेतला आहे.

‘माडिया शिकू या’ या पुस्तकाचे काम करताना आम्हा सर्वांना खूप आनंद मिळाला, खूप शिकायला मिळाले आणि एकूण भाषाव्यवहाराविषयीचे भान समृद्ध झाले. मराठी ते जर्मन व जर्मन ते माडिया अशा प्रवासाने एक वर्तूळ पूर्ण झाले.

86

डॉ. मंजिरी परांजपे   |   mparanjape7@gmail.com

लेखिका सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या जर्मन विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका आहेत.